ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग ५
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
ऐसा अतर्क्य महिमा मज दाखवीला
तो घागरींत हरि रांझण साठवीला
मी तुच्छ वैभव तुझें मज पाहवेना
हंसावरि स्मृति धरुनिहि राहवेना ॥१२१॥
जैसा दिबांधनयनीं रवि साहवेना
तैसें तुझें विभव तें मज पाहवेना
हंसावरी गगनिं मूर्च्छित मूढ झालों
तुझ्याकृपेस्तव पुन्हा स्मरणासि आलों ॥१२२॥
आच्छादिलें स्व - विभवासि तुवांच जेव्हां
आली प्रतीति उठलों गगनींच तेव्हां
तों तेथ तें किनपिही नयनीं दिसेना
वृंदावनीं तुजविना दुसरें असेना ॥१२३॥
अध्याय पूर्विल तयांत कथार्थ ऐसा
श्लोकांत या न विशदार्थ निरुक्त तैसा
संक्षेपरुप वदतो विधि कीं मुकुंदा
ऐसेंचि तूं रचिसि सर्वहि विश्व - वृंदा ॥१२४॥
होतासि एक मग वत्सप - वत्स - रुपीं
झालासि दाविसि असें जग चित्स्वरुपीं
जैसें मृषा उदक सूर्य - करांत भासे
केले प्रपंच तुजमाजि तुवांचि ऐसे ॥१२५॥
झालासि तूं वत्सप वत्स जेव्हां केली अविद्या मजलागिं तेव्हां
मी भ्रांत कीं कोठिल आणि कैची मूढां जना भ्रांति जसी प्रपंची ॥१२६॥
तूं एकलाचि पहिला गुणहीन देवा
झालासि तोचि सचराचर वासुदेवा
तंतूचि जेविं पट तूंचि समस्त ऐसा
तत्वार्थ नेणति मला भ्रम आजि तैसा ॥१२७॥
जीवांत त्या भजति जे तुज विश्ववंद्या
त्याची कृपेकरुनि नाश्रुनि तूं अविद्या
सर्वत्र त्यांस दिसतोसि पटांत तंतू
जैसा तसा त्रिभुवनीं सचराचरीं तूं ॥१२८॥
तैसाचि आजि हरि वत्सप - वत्स - रुपी
तो तूं सदाद्वय - चिदात्म - सुख - स्वरुपी
झालासि कीं सकळ मी जगदीश आहें
रे ब्रम्हया विविध विश्व असेंचि पाहें ॥१२९॥
केला असा हा उपदेश मातें संहारिलें पूर्विलिया भ्रमातें
श्लोकांत या चेरितिनें विरिंची करी स्तुति श्रीपुरुषोत्तमाची ॥१३०॥
तूं वत्स वत्सप - चतुर्भुज - रुप जैसा
झालासि सर्वहि चराचर रुप तैसा
ऐसें वदोनि विधि शंकितरुप झाला
कीं शब्द हा वहु सदोष मुखासि आला ॥१३१॥
मायामधें स्थिरचरें अगुण स्वरुपें
जैसीं प्रकाशति तसीं जगदीश - रुपें
हें पाहणें प्रिय बहू जगदीश्वराला
गीतेमधें हरिहि येरिति बोलियेला ॥१३२॥
या कारणें उचित हें म्हणणें तथापी
ब्रम्हा महत्व बहु देखुनि विष्णुरुपीं
मूर्ती म्हणे परम या हरिच्या स्वतंत्रा
त्या कर्मबंध - रचिता विवशा विचित्रा ॥१३३॥
त्या पांच भौतिक जडा विधवा कुयोनी
कर्मात्मिका न हरि मूर्ति - समा म्हणोनी
बोलावया त्दृदयिं बाव धरी विधाता
कीं या जडासम न मूर्ति तुझ्या अनंता ॥१३४॥
ब्रम्ह प्रकाशक चराचर रुप माया
तूं ब्रम्ह देह तुज माइक देवराया
हें अन्यथा हरि नव्हे म्हणऊनि ऐसें
मी बोलिलों परि समत्व घडेल कैसें ॥१३५॥
स्वयें कोण हें नेणती जीवजाती जगीं वासनारुप कर्मे करीती
सुटेना विना भोगिल्या कर्म त्यांचें मृषा विश्व भोगार्थ हें त्यांस साचें
करिति कर्म परोपरि तें फळे निज सुखाऽमुख भोगविते बळें
म्हणुनि देह चराचर पावती विवश कर्मफळाप्रति धांवती ॥१३७॥
म्हणुनि सत्य शरीर गमे जयां कवण आपण हें नकळे तयां
तव तनू हरि यद्यपि मायिका परि न कर्ममया व्रजनायका ॥१३८॥
जें जीव कर्म करिती फळ तें तयांते
देशी त्रिमूर्तिपण यास्तव तूज येथें
एतद्विलक्षण तथापिहि त्या स्वमूर्ती
तूझ्या म्हणूनि विधि वर्णिल विष्णु - कीर्ती ॥१३९॥
जे अज्ञ नेणति तुझी पदवी मुकुंदा
तूं देह हे सृजिसि त्या जड - जीव - वृंदा
त्यांच्याच सृष्टि - समयीं जरि तूं अरुपी
मायेंकरुनि चतुरानन तूं तथापी ॥१४०॥
जैं हें अनात्म जग पाळिसि यांत त्याला
तो विष्णुनाम तुज देह नसोनि झाला
ऐसा त्रिनेत्र हर होउनि अंतकाळीं
संहारिसी परम दारुण रुंड माळी ॥१४१॥
ज्या कारणें धरिसि तूं हरि देह ऐसे
त्या सारिखे वदविती तुज देह कैसे
तूं या जगीं पसरुनी निज शुद्ध माया
स्वेच्छेंकरुनि धरिसी तनु देवराया ॥१४२॥
आत्मा स्वयेंचि सकळात्मकतें करुनी
ब्रम्ह स्वयें सकळात्मक तें करुनी
ब्रम्ह स्वयें स्मृति अखंड असी धरुनी
जे देह तूं धरिसि देहहि ते न देवा
देही असा अससि केवळ वासुदे वा ॥१४३॥
इव इव इव तीन्ही शब्द हे याचि भावें
विधि - हरि - हर - रुपीं योजिले ब्रम्हदेवें
त्रिविधहि हरुरुपें लोक दृष्टिस मात्रें
दिसति परि न भूतें जेरिती अन्य गात्रें ॥१४४॥
विधि वदत असें कीं तूं हरी ब्रम्हरुपी
घडि घडि अपराधी मी म्हणों को तथापी
तरि रज - तम - योगें ब्रम्हया मोह होतो
म्हणुनिहि अपराधी होउनी प्रार्थितो तो ॥१४५॥
तथापि ते कर्मतनू तयाची नव्हे स्वयें विष्णुचि तो विरंची
श्रीविष्णु तो केवळ सत्वमूर्ती म्हणूनि वर्णी विधि विष्णु कीर्ती
जशा जीवयोनी तसीं विष्णु - रुपें कसीं हो म्हणावीं सुखाचीं स्वरुपें
म्हणूनीच जीवार्थ सृष्ट्यादि - कारें त्रिमूर्ति प्रभू वर्णिला या प्रकारें ॥१४७॥
त्रिमूर्तीतही श्रुद्ध सत्वें मुरारी जगीं विष्णु तूं एक नानावतारी
करीसी खळो मर्दुनी धर्म - रक्षा विधाता असें बोलतो अंबुजाक्षा ॥१४८॥
देवांत वामन तुझा अवतार देवा
नारायणादिक ऋषींतहि वासुदेवा
श्रीराम कृष्ण अवतार मनुष्य - देहीं
क्रोडादि दिव्य अवतार पश्रूमधेंही ॥१४९॥
तैसेचि जे जळ चरांतहि मत्स्य कूर्म
स्वामी तुझे सदवतार पवित्र कर्म
दुष्टांस निग्रह अनुग्रह साधु - संतां
ऐसे अनंत अवतार तुझे अनंता ॥१५०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP