मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ९

खंड २ - अध्याय ९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । सूत सांगती कथा सुरस । शंकरअंशात्मक दुर्वास । आचरी परम तपास । नेति ब्रह्मांत जन्मला ॥१॥
ब्रह्मभूत तो महामुनी । अति क्रोधयुक्त अशांत मनीं । शांतिलालसा पाहोनी । अत्री ज्ञान देई तयासी ॥२॥
जैसे उपदेशिलें दत्ताप्रत । तैसेंचि दुर्वासासी तो सांगत । मयूरक्षेत्रीं गणेशध्यान करित । दुर्वास स्वशक्तीनें ॥३॥
गणराजानें शांतियोगयुत । केलें त्या महायोग्यासी उदात्त । क्रोधहीन स्वभाव होत । ब्रह्मवित्तम शांतिधारक तो ॥४॥
ऐसें अत्रिसुतांचे चरित । मुद्‌गले कथिलें दक्षाप्रत । तें मीं सांगितलें तुम्हांप्रत । आता ऐका पुढील कथा ॥५॥
स्वायंभुवसंततीचे चरित । सर्वपापघ्न जें पुनीत । मुद्‌गलें सांगितलें दक्षाप्रत तें सर्व तुम्हां सांगेन ॥६॥
शौनक म्हणती सूतास । मुद्‌गलांनी जें कथिलें सुरस । तें चरित्र सर्व आम्हांस । सांगा जें दक्षे ऐकिलें ॥७॥
शापमोहित दक्ष ऐकून । अत्रिसुतांचे चरित महान । योगरुप तें पावन । पुन्हा विनवी मुद्‌गलासी ॥८॥
धन्य तो अत्रि महामुनी । ज्याचे पुत्र गाणपत्य जनीं । महा ओजस्वी योगी म्हणोनी । योगदाते प्रसिद्ध ॥९॥
त्यांचें चरित्र ऐकिलें । आता प्राचीन सृष्टिमार्ग जे झाले । स्वायंभुव मनूचे पुत्र त्यावेळे । काय करिती तें सांगा ॥१०॥
सूत म्हणती दक्षवचन । ऐसें तें ऐकून । हर्षयुक्त चित्तें बोले वचन । महायोगी मुद्‌गल त्यासी ॥११॥
स्वायंभुव मनूचे पुत्र होती । पूर्ण धार्मिक ते जगतीं । प्रियव्रत उत्तानपाद नामें ख्याती । प्रजापति दोघेही ॥१२॥
साधन करण्या वनीं जात । ज्येष्ठ भराती प्रियव्रत । देहादी नश्वर तो जाणत । मनू मानसीं खिन्न झाला ॥१३॥
अवचित नारद मनुसदनांत । आले तेव्हां त्यांस सांगत । प्रियव्रत पुत्रा बोध सांगा विनवित । नारदें तें मान्य केलें ॥१४॥
नारद गेले आश्रमांत । जेथ तप करी प्रियव्रत । त्यास पाहून प्रणाम करित । विनीतभावें त्या वेळी ॥१५॥
नारद त्यास म्हणत । ऐक महाभागा प्रियव्रता वृत्त । देहादीनश्वर हें सर्व ज्ञात । महा अद्‌भूत ज्ञान तुला ॥१६॥
परी हा नरदेह असत । तीन ऋणांनी समन्वित । नरदेह जीं कर्में करित । तन्मूलक जग सगळें ॥१७॥
सर्वांचा अन्नरुप असत । हा नरदेह निश्चित । त्याचें पोषण अत्यंत । प्रयत्नें करावें मनुष्यानें ॥१८॥
स्वधर्म पालन करुन । वर्णाश्रम विधान प्रमाण । देही जे करी पुण्य कर्म साधन । तेणें विश्व पोसतसे ॥१९॥
यज्ञादी करुनी देवांचे ऋण । श्राद्धादींनी पितृऋण । पुत्रप्राप्तीनें मानुष्य ऋण । नष्ट होतें ऐसें मानिती ॥२०॥
अद्यापि ऋणत्रययुक्त । प्रियव्रतां तूं आलास वनांत । परतोनि राज्य करी स्वधर्मनिरत । महाभागा आनंदाने ॥२१॥
वृद्ध होता स्वपुत्रांसी स्थापून । राज्यावरी तूं मो सोडून । योगाभ्यास करी वनीं जाऊन । नंतर तूं सर्वभावें ॥२२॥
नारदाचें वचन ऐकून । प्रियव्रत झाला प्रसन्न । तयासी हात जोडून । प्रार्थितसे श्रद्धेनें ॥२३॥
योगींद्रा कोणत्या उपाये होत । ब्रह्मभूत मानव शाश्वत । तेव्हां नारद तयासी म्हणत । सांगतों तुज तो मार्ग ॥२४॥
ब्रह्मभूयप्रदमार्ग । आश्रय त्याचा करिता मग । मानवा शांता लाभाचा योग । प्राप्त होय सहजची ॥२५॥
गणेशा त्या योगरुप जाणून । ब्रह्मनायक रुप उमजून । करिता प्रयत्नें साधन । प्राणी होय ब्रह्मभूत ॥२६॥
गण शब्द समूह वाचक असत । ब्राहयांतर भेदें योगरुप समूह ख्यात । सकल अन्नांच्या समूहें अन्नमय होत । ऐसे नानागण असती ॥२७॥
त्यांचा पती तो गणपति । ऐसी वेदांत आहे ख्याते । त्याचें जाणतां रुप चित्तीं । योगी शांती लाभती ॥२८॥
आमुचें कुलदेवत्व संप्राप्त । ज्यासी तो हा गजानन उदात्त । त्यासी आराधिता यत्नें लाभता । क्षेम सर्वही जगतांत ॥२९॥
गुणेशा गणराजातें पूजून । भक्तिभावें आराधून । आमुचा पितामह पावन । ब्रह्मभूत जाहला ॥३०॥
त्याचे पुत्र लौकिकांत । ब्रह्मा विष्णू महेश्वर पुनीत । सूर्य शक्ति पांच ही ख्यात । समाराधना करिती त्याची ॥३१॥
नंतर त्या विश्वेश्वरासी प्राप्त । परम शांती अत्यंत । आम्ही ब्रह्माचे पुत्र भजत । गणाधीपासी सर्वकाळ ॥३२॥
नंतर योगींद्र मुख्य झालों । प्रियव्रता बंधहीनत्व पावलों । सर्व ज्ञानें युक्त झालों । ऐसा विशेष गणेश कृपेचा ॥३३॥
तैसें तूं ही राजेंद्रा भजावें । गणेशातें एकभावें । तेणें सर्वत्र साफल्य मिळवावें । निष्पाप होऊन सेवेनें ॥३४॥
ऐसे सांगून एकाक्षर मंत्र । गणेशाचा देत पवित्र । गणेशाराधन सर्वत्र । बोधिलें प्रियव्रता नारदानें ॥३५॥
इतुक्यांत ब्रह्मदेवासहित । स्वायंभुव मनु तेथ येत । सुज्ञ तो पाहून प्रसन्न होत । विनमर अपुल्या सुतांना ॥३६॥
ब्रह्मदेवें बोध केला । प्रियव्रतपौत्रासी तो मान्य झाला । मनू सह तो राजर्षि परतला । स्वनगरांत त्या वेळीं ॥३७॥
उभय पुत्रांस राज्यीं स्थापून । स्वायंभुव वनांत जाऊन । योगमार्गे आराधन । भक्तीनें करी गणेशाचें ॥३८॥
पंचभूमींच्या अतीत । तैसे चित्ताच्याही अतीत जात । महा योगी ब्रह्मभूत । शांतियोगाचा आश्रय करी ॥३९॥
नंतर ब्रह्मलोका जात । गणेशभजनीं झाला रत । पृथ्वी पाळी प्रियव्रत । धर्मनीति त्यागमार्गें ॥४०॥
प्रियव्रताच्या राज्यांत । जन सारे स्वधर्म रत । वर्णाश्रमातें पाळित । सत्यशील प्रसन्न मनें ॥४१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते प्रियव्रतराज्यप्राप्ति वर्णनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP