खंड २ - अध्याय ७२
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । कपिलमुनी आश्रमीं परतत । नित्य नेमें होम करित । एकदा हवि अर्पून अग्नींत । ध्यान करी गणेशाचें ॥१॥
तेव्हां अग्निकुंडांतून प्रकटत । गणेश चतुर्बाहुधर आरक्त । सिद्धिबुद्धिसमायुक्त । सिंहवाहन एकदंत ॥२॥
विशालाक्ष शुंडादंडयुत । शेष नाभीवरी रुळत । पायीं पैंजण निनादत । कपिल त्यासी वंदन करी ॥३॥
भक्तिभावें पूजा करुन । अथर्वशीर्षे करी स्तवन । त्यासी म्हणे गजानन । तुझा पुत्र मी जन्मलों असे ॥४॥
आतां गणासुरा मारीन । चिंतामणि तुज देईन । ऐसें ऐकतां गणेशवचन । कपिलमुनी आनंदला ॥५॥
म्हणे धन्य माझा जन्म । मातापिता तप आश्रम । विद्या व्रतादिक उत्तम । पुत्र झाला गजानन ॥६॥
नंतर तो नित्य भक्तियुत । भक्तीचें रहस्य जाणत । आपणासी आपण निंदित । ज्ञानमदाचा धिक्कार असो ॥७॥
शांतियोग जरी प्राप्त होत । तरी मी मानव राहिलों निश्चित । ज्ञानमदें गळ्यांत बांधित । चिंतामणि गणेशापरी ॥८॥
माझें चित्तं भक्तिहीन । देवाची समता मानितें मन । कुठें तो ब्रह्मणस्पति गजानन । कुठे मीं पामर भक्त एक ॥९॥
भक्तानें देवाची बरोबरी । करु नये या संसारीं । सेवक धन्याचे अलंकार स्वीकारी । हें कैसें योग्य जगीं ॥१०॥
माझ्या देहावरी त्याची सत्ता । योगरुप सदैव असतां । माझी त्याची एकरुपता । मानिली हें धाष्टर्य माझें ॥११॥
चिंतामणि मज मिळाला । परी तो पूजेत न स्थापिला । मोहानें मीं गळ्यांत बांधिला । म्हणोनि तो दुरावला मज ॥१२॥
देवाच्या भक्तिमाहात्म्यें करुन । भक्तासी मिळे जें भूषण, वाहन । अथवा वस्त्रादिक, त्यांचें पूजन । करावें त्यानें भक्तिभावें ॥१३॥
त्याचें उच्छिष्ट गंध पुष्पादिक। धारण करावें मानून पावक । नैवेद्य तो सुखदायक । भक्षण करावा आदरें ॥१४॥
देवाची समता न करावी । भययुक्त चित्तें सेवा करावी । दास व्हावें धन्यता मानावी । बुद्धिमंत भक्तानें ॥१५॥
माझ्या संगतींत चिंतामणि आला । परी त्यासी न सेविला । म्हणोनि तो दुःखित झाला । आतां पडला दैत्यहातीं ॥१६॥
तो असेल अत्यंत पीडित । म्हणोनि मी गणेशासी प्रार्थित । गणासुराचा वध करुनी त्वरित । चिंतामणि सोडवावा ॥१७॥
ऐसा विचार करुन । योगींद्र एकदंता म्हणे वचन । स्वामी गणासुरा त्या मारुन । चिंतामणि परत आणावा ॥१८॥
कपिलाचा प्रार्थना ऐकून । एकदंत देत आश्वासन । तुझें इच्छित पूर्ण करीन । निःसंशय कपिलमुने ॥१९॥
त्या रात्रीं एकदंत । गणासुरासी स्वप्न दावित । आपुलें रुप प्रकट करीत । सिंहारुढ चतुर्बाहु ॥२०॥
कुंजराननधारक परशुधर । गणासुरासी दिसे तो क्रूर । कपिलाची विनंती ऐकून उदार । गणाचें मस्तक तोडितो ॥२१॥
चिंतामणि घेऊन देत । देव तो कपिलाप्रत । ऐसें स्वप्न पाहून चकित । जाहला तो गणासुर ॥२२॥
हे स्वप्न अथवा सत्य असत । कपिलाचा करावा घात । म्हणोनी जावें सैन्यासमवेत । आश्रमीं त्याच्या सत्वर ॥२३॥
ऐसा निश्चय करुन । नाना वीरांस घेऊन । रात्रींस उग्र तो निघून । पहाटें पोहोचला कपिलाश्रमीं ॥२४॥
शिष्टांनी त्यास पाहिलें । कपिल गुरुंना सांगितलें । स्वामी गणासुर सैन्य आलें । तोही आला आश्रमासमीप ॥२५॥
ते भयभीत हें सांगती । कपिल गणपतीस प्रार्थिती । गणासुराचा वध करावा म्हणती । तेव्हां निघाला गणेशान ॥२६॥
सिंहारुढ गणेश जात । जेव्हां गणासुराप्रत । जैसा दिसला स्वप्नांत । तैसाच तो दिसे गणासुरा ॥२७॥
आपुल्या वीरांस दैत्येश प्रेरित । ते उदायुध रणीं येत । गणपतीवरी हल्ला करीत । त्यास पाहून क्रुद्ध सिद्धि ॥२८॥
गणपतीच्या वामांगीं संस्थित । सिद्धि जी निर्मी त्वरित । एक पुत्र ध्याउनी मनांत । गणेशासी स्मरोनी ॥२९॥
त्या सिद्धिपुत्रानें मारिलें । गणासुराचें वीर भले । अनेक दशदिशांत पळाले । विजयी झाला सिद्धिपुत्र ॥३०॥
तो गणेशासी वंदित । तेव्हां लक्ष हें नाव ठेवित । सिद्धिसहित गणेश प्रशंसित । म्हणे पुत्रा ऐक वचन ॥३१॥
जगांत ब्रह्मांत सर्वत्र राहून । नरांचे लक्ष भक्षून । लक्षप्रतापी तूं होऊन । महाभागा निःसंशय ॥३२॥
अभक्तांचे लक्ष नष्ट करी । परी मम भक्तांचे रक्षण करी । बुद्धिपुत्र ‘लाभ’ ही उद्धरी । भक्तांस माझ्या फलदाता ॥३३॥
लक्षाचा तूं बळवंत । भ्राता अससी लाभा जगांत । भुक्तिमुक्ति पापांत । हृदयांत वा ब्रह्मांत ॥३४॥
जैसें प्राण्यांचे लक्ष असेल । तैसा लाभ त्यांस होईल । ऐसे सांगून लक्षास विमल । स्वयं गेला गणासुराप्रती ॥३५॥
त्याचें पाहून आगमन । प्रतापी गणासुर धनु उगारुन । त्यास मारण्या शस्त्र लावून । लक्षवेध करुं लागे ॥३६॥
तोच गणराज परशू मारित । गणासुराचें शिर तोडित । तें भूमीवर क्षणांत पडत । हाहाकार असुर करितो ॥३७॥
सर्वं पळाले पाताळांत । देव जाहले हर्षयुत । मुनिगण सर्वही जात । गणपतीच्या सन्निध ॥३८॥
कपिलाचें सांत्वन करित । चिंतामणि त्यास देत । कपिलास तोषवी एकदंत । कपिल वंदन करी तया ॥३९॥
तेव्हां कपिल भक्तिसंयुक्त । म्हणे गणनायका ऐका प्रार्थित। तुमचें हें भूषण असत । आपणचि ठेवा स्वतःजवळ ॥४०॥
आम्हांसी तें पूजनीय । धारण करण्या अयोग्य । म्हणोनि विघ्नेशा उपभोग्य । चिंतामणि हा तुम्हांसी ॥४१॥
आपल्या कंठीं धारण करावा । माझ्या मनींचा हेतू पुरवावा । माझ्या मनींचा हरावा । अज्ञानाचा अंश देवा ॥४२॥
तूं माझ्या चित्तांत । सर्वदा गणेशा निवसत । माझी चिंता जाणून करित । सफल माझे मनोरथ ॥४३॥
म्हणोनी माझी ही चिंता । बांधितों आपुल्या कंठीं आता । ऐसे म्हणून चिंतामणि बांधितां ।एकदंत तो स्वाकारी ॥४४॥
नंतर एकदंत अन्तर्धान पावत । स्वानंदलोकी परतत । देवेशही झाले विस्मित । कपिल ध्यान करी त्याचें ॥४५॥
हृदयांत चिंतामणीस पूजित । तत्त्वज्ञान त्या होत । गणासुरा मारुन रक्षित । साधुरक्षण एकदंत ॥४६॥
कपिलास सत्य भक्त करुन । दिव्य ज्ञान त्यास बोधून । गणेश दावी लीला पावन । ऐकतां वाचितां पाप नष्ट ॥४७॥
जो हे एकदाचें चरित । ऐकत अथवा वाचित । त्याचें सर्व पाप नष्ट होत । सर्वसुखें त्यास मिळती ॥४८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते गणासुरवधो नाम द्विसप्ततितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP