खंड २ - अध्याय ३०
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा पुढें सांगती । वसिष्ठापुढें प्रकटलें गणपति । तेव्हां साष्टांग नमस्कार घालिती । स्तवन करिती यथामती ते ॥१॥
आज धरणी झाली धन्य । मातापिता माझीं धन्य । तप आश्रम विद्याव्रतादी धन्य । आपुल्या पददर्शनें गजानना ॥२॥
तूं कर्ता कारणांचें कारण । गम्यागम्यमय शांतिपूर्ण । वेदांत ऐसें असें वर्णन । वेदवेत्ते तें जाणती ॥३॥
सर्वरुप तूं सर्वहीन । सर्वप्रकाशक महान । योग अभेदमया स्तवन । गणाधिपा कैसें करुं मी? ॥४॥
तथापि भक्तिपाश यंत्रित । गजानना स्तवन करित । नामरुपधर तूं कृपावंत । अनुग्रह करण्या आलासी ॥५॥
तुझ्या दर्शनें जो बोध झाला । त्यानेंच तुज मी स्तविला । ब्रह्मनायका वेदादींसी वाटला । जरी अगम्य महिमा तुझा ॥६॥
गणनाथासी सर्वसाक्षीसी । सर्वाकारा स्वसंवेद्यासी । सिद्धिबुद्धिपते तुजसी । सिद्धबुद्धिप्रदा नमस्कार ॥७॥
अमेयशक्तीसी देवदेवासी । असंप्रज्ञाततुंडासी । संप्रज्ञातशरीरा नमन तुजसी । त्यांच्या योगें योगात्मदेहा ॥८॥
शांतियोग प्रकाशकासी । शांति योगमयासी । योग्यांसी योगदात्यासी । योगेशा तुला नमन असो ॥९॥
वक्रुंतुंडासी एकदंतासी । ब्रह्माकारासी आत्मचिन्ह धारकासी । नमन असो गजाननासी । स्तविता हर्षे कंठ भरला ॥१०॥
नाचूं लागला देहभाव सुटून । भक्तिरसांत तो निमग्न । शरीरावरी रोमांच फुलून । महाभक्त तो त्या वेळीं ॥११॥
त्यांस पाहून गजानन। भावज्ञ भावपूरक बोले वचन । तूं रचिलेलं हें स्तोत्र उत्तम । भक्तिरसप्रद निश्चित ॥१२॥
धर्मार्थ काम मोक्षदायक । होईल जगतीं निःशंक । तुझी भक्ति अचल पावक । माझ्यावरी दृढ होईल ॥१३॥
स्मरण करिता तुजसमोर । प्रकटेन मी सत्वर । मुनिसत्तमा तूं मज प्रिय फार । ऐसें म्हणोनी त्या वेळीं ॥१४॥
गणाधीश अंतर्धान पावले । माझ्या हृदयीं परी दिसले । त्यांच्या दर्शनें मानस झालें । शांतिपूर्ण माझे तें ॥१५॥
गाणपत्य स्वभावें मूर्तिपूजेंत । मन माझें रममाण होत । महाभाग योगिवंद्य होत । वसिष्ठ मी जगतांत ॥१६॥
वत्सा तुज हें ज्ञान । शांतियोगप्रद कथिलें महान । शुभ सुखद त्यानें पावन । गणेशातें भज आता ॥१७॥
ऐसें ऐकता त्याचें वचन । पौत्र पराशर त्यासी नमून । वनीं जाऊन करी मनन । परम तप गणेशाचें ॥१८॥
पितामहें जैसें सांगितलें । तैसें सर्व योगज्ञान आचरिलें । योगभूभींचे क्रमाने त्यागिले । बंध त्यानें योगबळें ॥१९॥
अन्तीं गाणपत्य झाला त्यावा पुत्र विष्णु अवतरला । व्यासनामें ख्यात जगाला । तथापि तप घोर त्यानें आचरिलें ॥२०॥
वत्सला पत्नीसहित । महाघोर तप आचरित । पुत्रकामार्थ अविरत । महामुनी त्या वेळीं ॥२१॥
गणराज स्वयं माझा सुत । व्हावा ऐसी इच्छा करित । दहा हजार वर्षे ऐशी लोटत । गजानन तें प्रसन्न झाला ॥२२॥
वर देण्यासी प्रकटात । भक्तिभावें त्याच्या तोषित । त्यास पाहून कर जोडित । प्रणाम करुनी स्तुती करी ॥२३॥
पत्नी सहित स्तोत्र गात । गजवक्त्रा तुजसी नमित । निराकारा तुज वंदित । नरकुंजररुपा तुला ॥२४॥
गणेशाची निर्गूणासी । गुणाधाररुपा परमात्मयसी । परात्परासी देवयानादि सिद्धासी । अनंत विभवा तुज नमन ॥२५॥
अनंत आननधारकासी । अनंत कर-अंध्रि धरासी । गकारासी सर्वहीनासी । माया द्वयवर्जिता नमन ॥२६॥
सदा ब्रह्ममयासी । णकारा वंदन करितो तुजसी । गकार णकारांच्या स्वामीसी । गणेशा तुला नमन माझें ॥२७॥
स्वानंदवासीसी । पूर्ण भुक्तिमुक्तिप्रदासी । परब्रह्मा नमितों तुजसी । तुझी स्तुती कैसी करुं? ॥२८॥
वेदवेदांतानाही अगम्य वाटत । स्वरुप परब्रह्मा तुझें अद्भुत । जरी तुष्ट झालासी मजप्रत । देवेशा तरी पुत्र हो माझा ॥२९॥
आमुचा पुत्र तूं होशील । तरी मन माझे स्थिर होईल । आमुचा कुलदेव तूं निर्मल । गणनायका परब्रह्मा ॥३०॥
विघ्नपा ब्रह्मभावें तुज भजतों । सदैव तुजला मनीं ध्यातों । संसारांत तुझें इच्छितों । सुतभावें संगोपन ॥३१॥
तेणें संसार सफल होईल । ब्रह्म रुपत्व मज लाभेल । त्याची प्रार्थना ऐकून अमल । गणाधीश म्हणे तयासी ॥३२॥
योगधारका त्या भक्ताप्रत । पराशरासी गणेश म्हणत । तुझें सफल होईल वांछित । तुझा पुत्र मी होईन ॥३३॥
गजासुराचा वध करीन । त्यासाठी तो अवतार घेईन । तुझ्या या स्तोत्रें मी प्रसन्न । त्याचा पाठ इष्टप्रद ॥३४॥
जो कोणी हें वाचील । अथवा प्रेमें ऐकेल । भुक्तिमुक्ति त्यास लाभेल । ऐसी वर माझा असे ॥३५॥
ऐसें बोलून पावला अंतर्धान । ब्रह्मनायका गजानन । पराशर मनीं प्रसन्न । पत्नीसहित त्या वेळीं ॥३६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते पराशरवरप्रदानं नाम त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP