खंड २ - अध्याय ४४
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । प्रल्हाद म्हणे गृत्समदास । ऐकिलें च्यवन माहात्म्य सुरस । मानस लाभलें मोदास । मदचरित्र आता सांगावे ॥१॥
ऐसें प्रल्हाद विनवित । तेव्हां तो महायोगी प्रतापवंत । गाणपत्य वरिष्ठ म्हणत । प्रल्हादा ऐक मदचरित्र ॥२॥
च्यवनें मदासी पाताळांत । पाठविलें तेव्हां तो भेटत । शुक्राचार्यासी दैत्यांसहित । प्रणाम करुनी उभा राहे ॥३॥
विनयनम्र त्या पाहून । भार्गव झाला उत्पन्न । म्हणे तू कोण कां आगमन । केलेंसि ते सांग मजला ॥४॥
तेव्हां तो होऊन हर्षित । बोले त्या मुनिसत्तमाप्रत । च्यवनापासून समुद्भुत । जाणा भार्गव आपण ॥५॥
आपुला मी भातृसुत । शरण आलों तुम्हांप्रत । शिष्य आपुला करावें त्वरित । योगीशा जेणें मान जगीं ॥६॥
ब्रह्मांडाचें राज्य करावें । हे भार्गवा मी जग जिंकावें । मदरुपें तुमच्या कृपाप्रभावें । प्रसाद ऐसा मज द्यावा ॥७॥
ऐसें त्याचें वचन ऐकून । स्वीकारी त्यासी शिष्य म्हणून । एकाक्षर विधानें शक्तिमंत्र देऊन । भार्गवाग्रणी कृपा करी ॥८॥
तेव्हां मदासुर शुक्रास नमून । तप करी वनीं जाऊन । निराहार उपवास करुन । शक्तिध्यान परायण झाला ॥९॥
त्याच्या देहावरी वाढत । वारुळ एक त्या काळांत । लतातरु त्यावर लढत । परी तपांत निमग्न तो ॥१०॥
अस्थिमात्र त्याचें राहत । अवशिष्ट परी करी व्रत । जपे मंत्र तो अविरत । स्थिरचित्तें ध्यान करी ॥११॥
ऐसी दिव्यसहस्त्र वर्षे लोटलीं । तेव्हां अन्तीं प्रसन्न झाली । शक्ति यापुढें प्रकट झाली । सिंहारुढ महाभागा ॥१२॥
ती होती अन्य शक्तियुत । पुरुषाकृति त्या पुढती चालत । ती आदिमाया सावध करित । आपुल्या भक्ता मदासुरासी ॥१३॥
परी तो सावध न होत । तेव्हां ती त्यावरी जळ मार्जित । जागृत होऊन पाहत । शक्ति साक्षात् समोर उभी ॥१४॥
झडकरी उठून प्रणाम करी । महाभक्त तो पूजा करी । हात जोडून स्तवन करी । भक्तिभावें मद तेव्हां ॥१५॥
महामाये तुज नमन । सर्व शक्ति समन्विते वंदन । हें सर्व जग तव स्वाधीन । शक्तियुक्त चालतसे ॥१६॥
अनादि अप्रमेया तूं अससी । अज्ञातरुपा महर्षींसी । वेदांत वेद्यरुपे तुजसी । नमन माझें परमेश्वरी ॥१७॥
नाना भेद करीस । नाना भेद विवर्जितेस । भेदाभेदमयीस । सकलेश्वरी तुज नमितों ॥१८॥
पार्वतीस दक्ष पुत्रीस । हिमाचल सुतेस सावित्रीस । समुद्रतनयेस लक्ष्मीस । नमन माझें भक्तिभावें ॥१९॥
रवाहा स्वधा वषट्कारा अससी । शिवे बुद्धिरुपे वंदन तुजसी । देवमयीसी ज्ञानरुपेसी । वंदितों मी आदरभावें ॥२०॥
सर्व कार्यात सिद्धि देसी । सिद्धिरुपा तपस्विनीसी । योगिनीसी योगदात्रीसी । योगेशी तुज नमन असो ॥२१॥
वेदवादी मुनी करिती स्तवन । परी तेही असमर्थ महान । देव स्कंद शेषादि उन्मन । तेथ मी काय स्तुति करुं? ॥२२॥
धन्य माझी माता पिता । धन्य ज्ञान तपादिक आतां । तुझ्या अंध्रियुगाचें दर्शन होतां । सर्वदुःख विमोचक जें ॥२३॥
ऐसें बोलून शांत राहत । भक्तिभावें हृदयं हेलावत । महाशक्ति त्यासी म्हणत । भक्ति भावें संतुष्ट जी ॥२४॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र उत्तम । प्रिय होईल जगतीं मम । देईल महाभागा सर्वकाम । धर्मार्थकाममोक्षही ॥२५॥
जो हें नित्य वाचील । अथवा नियमानें ऐकेल । त्यासी सर्व सुखप्रद होईल । महा असुरा निश्चित ॥२६॥
हया स्तोत्रानें मी तोषित । वर माग जी मनोवांछित । उग्र तपें दैत्येन्द्रा तव संतुष्ट । सुदुर्लभही सुलभ करीत ॥२७॥
मदासुर म्हणे जरी प्रसन्न । देवी तूं जरी महान । तरी द्यावें हें वरदान । मृत्युभय मज नसावें ॥२८॥
कुठेही मरण न यावें । त्रैलोक्याचे राज्य लाभावें । सदाशिवे जगन्मये । इच्छित ऐसें साध्य व्हावें ॥२९॥
तूं प्रकृतिरुप असत । तुझ्यापासून सर्व जन्मत । जें जें पंचभूतात्मक जगांत । तें तें करी मदाधीन ॥३०॥
तेव्हां जगदंबा त्यासी म्हणत । मनीं होऊन विस्मित । जें जें जन्म पावलें जगांत । त्यापासून मरण न तुला ॥३१॥
महादैत्या जें पंचधा विभक्त । तें तें तव अधीन होत । तुझें सर्वही इच्छित । सफल होईल सर्वदा ॥३२॥
आरोग्य अचल लाभेल । ब्रह्मांडाचें राज्य करशील । तुझ्यासम दैत्येंद्रा न होईल । युद्धांत कोणीही समान ॥३३॥
ऐसें महासुरा वरदान । देऊन देवी अन्तर्धान । जगन्माता शक्ति महान । जाहली जेव्हां मदासुर परते ॥३४॥
आपुल्या गृहासी हर्षित । होत अत्यंत प्रसन्न चित्त । प्रमदासुराच्या कन्येसी वरित । सालस नामक शालिनीसी ॥३५॥
दैत्यगण सन्मान करित । विलासद नगर तेव्हां वसवित । तेथ जाऊन निवास करित । महासुरांसह मदासुर ॥३६॥
चार अमात्य नेमिले । जे लोकविख्यात झाले । बाण त्रिपुर तारक शंख भले । आनंदानें राज्य करिती ॥३७॥
ऐश्या दैत्यांसमवेत । एकदा मदासुर विचार करित । परम योगज्ञा कवीस आणित । परमादरें शुक्रासी ॥३८॥
तो मदासुरासी अभिषेक करी । मदासुर बसला राज्यावरी । दैत्य राक्षस असुरांचा कैवारी । दैत्यपति जाहला ॥३९॥
सालसेपासून तीन सुत । विलासी लोलुप धनप्रिय होत । मदासुरासी तो राज्य करित । अहंकार त्यासी स्वबळाचा ॥४०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते मदासुरस्य राज्याभिषेको नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP