खंड २ - अध्याय २३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा सुरस सांगती । स्वायंभुव मनूचा जगती । उत्तानपाद नामें पुत्र धर्मभक्ति । मध्यदेशीं राज्य करी ॥१॥
त्याच्या दोन भार्या सुविख्यात । सुनीति सुरुची नामें असत । सुनीतीपासून ध्रुव जन्मत । सुरुचीपासून सुत उत्तमनामा ॥२॥
सुरुचींने राजासी मोहविलें । आपुल्या संपूर्ण वश केलें । सुनीतीस राजानें अवमानिलें । आठवणही तिची करीना ॥३॥
एकदा ध्रुव बाळ जात । राजासमीप स्नेहात । राजाच्या मांडीवरी बसू इच्छित । जवळी उभा राहिला ॥४॥
तेथ सुरुची दुष्टभावें करित । त्याचा अपमान सर्वांदेखत । म्हणोनि ध्रुव क्रोधसंयुत । वनांत गेला तक्षणीं ॥५॥
मार्गांत नारद त्यास भेटत । त्यासी तो महा बुद्धिमंत । ध्रुव बाळ प्रणाम करित । धर्मधारक सदाचरणी ॥६॥
कळताम अखिल वृत्तान्त । नारद त्यासी उपदेशित । विष्णूचा द्वादशाक्षर मंत्र देत । ध्रुव तेव्हां आनंदला ॥७॥
नारदासी प्रणाम करुन । नंतर मथुरेसी जाऊन । तप केलें निष्ठा ठेवून । सनातन विष्णूचे ध्यान करी ॥८॥
एक सहस्त्र वर्षपर्यंत । परम तप तो आचरित । तेव्हां विष्णु प्रसन्न होत । प्रकटला ध्रुवासमोर तें ॥९॥
पृथ्वीचें राज्य अखंडित । तेव्हां दिधलें ध्रुवाप्रत । अन्तीं स्वर्गराज्य विष्णुपद प्राप्त । ध्रुवात्मक ऐसा वर दिला ॥१०॥
नंतर ध्रुव स्वगृहीं परतला । माता पितरां नमिता झाला । राजा स्वागत करी त्या वेळां । तेजःपुंज त्या पुत्राचें ॥११॥
कालांतरानें ध्रुवा नृपपद देत । उत्तानपाअद राज वनांत जात । महातेजस्वी परम तप आचरित । उत्तानपाद श्रद्धेनें ॥१२॥
तेथ गणेशभक्त नारद येत । त्यास म्हणे नृपा तूं अविरत भेदाभेद विसरुन त्वरित । गणेशासी भजावें ॥१३॥
शिव विष्णु आदि देव भजत । सनकादी योगी जयास पूजित । वसिष्ठादि ऋषिगण सेवित । ज्यास तो हा गजानन ॥१४॥
गणेशाविना शांति न लाभत । यांत संशया जागा नसत । स्वायंभुवादी भूपाल ज्यास सेवत । तो हा गणांचा नायक ॥१५॥
ऐसे सांगून मंत्र देत । गणेशाचा षडक्षरयुक्त । त्या मंत्र प्रभावें उत्तानपाद राजा होत । गाणपत्य एकनिष्ठ ॥१६॥
मृत्यूसमयीं गणनाथा स्मरत । तेणें गणेशसायुज्य पावत । त्याचा पुत्र ध्रुव करित । धर्मनीतीनें राज्य सदा ॥१७॥
नारद करुणानिधि तेथ जात । राज ध्रुवासी भेटत । ध्रुव त्याला आदरें नमित । भक्तिभावें पूजितसे ॥१८॥
पूर्णभावें ओंजळ जोडून । स्वगुरुसमोर विनतवदन । त्यास महायोगी दिव्यदर्शन । नारद तेव्हां सांगती ॥१९॥
आपुल्या शिष्य भक्तियुक्त । पाहून दयानिधि त्यास प्रणत । ध्रुवा ऐक बा माझें वचन उदात्त । वैकुंठाहून मी येथ आलों ॥२०॥
विष्णूनें पाठविलें मज । तुझ्यासाठी येथ आज । महामते ऐक काज । लक्षपूर्वक सुशिष्या ॥२१॥
मयूरेशाचें क्षेत्र असत । भूवरी तें ब्रह्ममय पुनीत । तेथ जाऊन महायात्रा विधिवत । करी माझ्या प्रिय शिष्या ॥२२॥
तेणें तूं पावशील अक्षयपद । माझें सतत जें विशद । अन्यथा विघ्न येऊन दुःखद । पतन तुझें होईल ॥२३॥
तो विष्णु करुणेनें सांगत । एकाक्षर गणेश महामंत्र जप सतत । ब्रह्मादिनीं लय जेव्हां तेणें तरशील ॥२४॥
त्या मंत्रप्रभावानें प्राप्त । ध्रुवपद तुज जें अक्षय्य असत । शांति लाभोनि ब्रह्मभूत । होशील ध्रुवा निःसंशय ॥२५॥
नाहीतरी योगशांति । तुज न मिळेल जगतीं । ऐसे सांगून नारद देती । विधिपूर्वक तो महामंत्र ॥२६॥
गणेशाचा एकाक्षर मंत्र जपत । ध्रुव तेणें सिद्ध होत । मयूरेशक्षेत्रीं त्वरित जात । विधिवत् दारयात्रा करी ॥२७॥
मंत्रकोविद ब्राह्मणा बोलावित । गणेशमूर्ति स्थापित । पूर्वद्धारासमीप ती असत । अर्धाकोस अंतरावरी ॥२८॥
महामूल्यवंत देवालय बांधिलें । सुवर्ण शिखर त्याचें शोभलें । भक्तिपूर्वक पूजन केलें । ध्रुवानें त्या क्षेत्रांत ॥२९॥
त्या गणेशाचें नांव कल्पित । राजा ध्रुवाविनायक उदात्त । वर्षमास निवास करित । ध्रुव त्या मयूर क्षेत्रांत ॥३०॥
नंतर स्वनगरीं परतून । ध्रुवें राज्य केलें गणेशा स्मरुन । अंतीं स्वर्गप्राप्ती होऊन । ध्रुवतार तो जाहला ॥३१॥
त्या ध्रुवस्थानीं ध्यात । महायश तो गणपतीस चित्तांत । ध्रुवस्थानाचा जें लोप होत । स्वानंदांत निमग्न झाला ॥३२॥
ध्रुवविनायकाचें दर्शन घेत । अथवा हें ध्रुवाख्यान ऐकत । त्यासी भुक्तिमुक्ति लाभत । श्रद्धा भक्तियुत सर्वदा ॥३३॥
ओमिती श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदन्तचरिते ध्रुवचरित्रं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP