मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय १७

खंड २ - अध्याय १७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढती सांगती । ऋषभ नाना योग आचरितीं । भूमिप ती चर्या पाहून स्वचित्तीं । संतप्त बहू जाहला ॥१॥
दुर्बुद्धी तो कर्ममार्ग सोडून । पशुसम मानवा करे कर्महीन । जैनमार्ग समुत्पन्न । त्यापासून प्रजापते ॥२॥
कर्ममार्गानुसारी भरत । त्या मार्गा संच्छन्न करित । परी कलियुगांत कलिदोष संयुत । जन तोची स्वीकारतील ॥३॥
ऋषभाचा अग्रज पुत्र भरत । धर्म तत्पर तो राज्य करित । सकल प्रजेसी तोषवित । स्वपुत्रासी समर्पी राज्य सारें ॥४॥
तदनंतर तो जाई वनांत । क्रमशः तपश्चर्या करित । देहशोषणीं प्रतिदिनीं रत । शालिग्रामाश्रमांत ॥५॥
तेथ विष्णुध्यानीं परायण । तप करी अति उग्र तो धर्मज्ञ । एकदा नदी तीरावरी पितृतर्पण । करीत होता भक्तिभावें ॥६॥
तोच अकस्मात सिंहनाद । झाला अत्यंत जो भयप्रद । तो ऐकून एक हरिणी निनाद । गर्भवती ती घाबरली ॥७॥
सहसा तो ध्वनि ऐकून । नदींत उडी मारी भयविहवलमन । नदीजळांत प्रसूत होऊन । गर्भ गळून पडला तिचा ॥८॥
ती नंतर दूर होत । परी तत्क्षणीं दुःखें मरत । जळांत जो गर्भ पडत । त्यांतून जन्मला  हरिणशिशू ॥९॥
भरतमुनी त्यास पाहती । दया उपजली त्यांच्या चित्तीं । त्या मृगबालकातेम संवर्धिती । करुणायुत यत्नपूर्वक ते ॥१०॥
नंतर त्या हरिण शावकावरतीं । जडली भरताची प्रीति । लालन पालन भावभक्ति । करी खेळे त्यासवें ॥११॥
क्रमानें त्याचें सर्व कर्म प्रगत । झाले संगदोषभये आसक्त । मृगावरी तो आसक्तचित्त । अत्यंत झाला भरतमुनी ॥१२॥
एके दिवशीं तो मृगशावक जात । वनांतरी अन्य मृगांसहित । भरतासी तो न दिसत । बहुकाळ प्रिय हरिण तेव्हां ॥१३॥
दुःखपूर्ण त्याचें चित्त । वनांत भटके शोक करित । या वनांतून त्या वनांत । जाई परी तो मृग न दिसे ॥१४॥
तेव्हां तो विलाप करित । शोकसमायुक्त अन्न त्यागित । कालांतरानें मृत्यू पावत । हरिणाचा ध्यास घेऊन त्या ॥१५॥
मृत्यूसमयीं तो मृत पाहत । भरत आपुल्या समीप चित्तांत । म्हणून मृगयोनींत तो जन्मत । संगदोषप्रभावें ॥१६॥
परी पूर्वतप्रभावें स्मरत । पूर्वजन्मीचेम स्मरे वृत्त । ज्ञानयुक्त तो भयभीत । विचार करी स्वमानसीं ॥१७॥
म्हणोनी मृगांचा संग सोडून । पूर्वाश्रमीं गेला उन्मन । तेथ अहिंसेचा आश्रय घेऊन । द्वंद्वभाव त्यानें सोडिला ॥१८॥
वाळली पानें भक्षण करित । अव्यय विष्णूसी स्मरत । तीर्थस्नान करी अविरत । साधुदर्शनीं उत्कंठमती ॥१९॥
एके दिवशीं मृगरुपधर । भरत वनांत करी संचार । पूर्वपुण्य उदेलें थोर । पाहिला त्याने पुलहाश्रम ॥२०॥
पुलहमुनींच्या आश्रमांत । महाभाग कोणी तपोयुक्त । मुनी राहत होते गणेशभक्त । गणेशभजन ते करिती ॥२१॥
तेथ तो मृगजातियुत । भरत राहिला त्या मुनींत । साधुसंगती त्यास घडत । म्हणोनि संतुष्ट जाहला ॥२२॥
एके दिवशीं ब्रह्मदेव येत । पुलहाश्रमीं अवचित । त्यास पाहून प्रणाम करित । पितामहा त्या पुलहादि मुनी ॥२३॥
पुजून भक्तिभावें पादसंवाहन । करी पुलह तो विनम्र मन। भावसंयुत स्तुति करुन । महाभाग गाणपत्याची ॥२४॥
विचारी तेव्हा नम्र भावयुक्त । ताता सांगावेम मजप्रत । सर्व जंतू दुःखयुत । कोणत्या मागें मुक्त होतीं? ॥२५॥
मोक्षभूत ते विमुक्त । दुःखी विषयभोगी कैसे होत । तें सांगावें मजप्रत । तें ऐकून ब्रह्मा तुष्ट झाला ॥२६॥
विनयसंयुक्त कृतांजलीयुत । ऐसे पुलह तो विनवीत । तेव्हा पितामह त्या म्हणत । पुत्रा ऐक परमहित ॥२७॥
तूं विचारिलेंस जें रहस्य महान । तें सर्व पापनाशक शोभन । विघ्नराजाचा अनादर करुन । प्राणी दुःखी होती जगीं ॥२८॥
सर्व लोकांत विघ्नयुक्त । होती सर्व नर भययुक्त । जें जें दुःखकर असत । तें तें विघ्नरुप निःसंशय ॥२९॥
नरकादि महाघोर ख्यात । विकर्माचे फळ तें निश्चित । योग्य कर्मांचे फळ होत । स्वर्गभोगप्रद अन्तीं ॥३०॥
ते स्वर्गभोगद कर्म जाण । दुःखरुप तूं सुजाण । स्वर्गांत द्वंद्वभाव असतो म्हणून । विघ्नरुप तो जाणावा ॥३१॥
स्त्रीपुरुषयुक्त स्वर्ग मोहद । विघ्न तेंची दुःखद । दैत्यादींचें भय विशद । देवादिकांसही असे ॥३२॥
त्या दैत्यांसी जरी मारिती । तरी संपूर्ण भयहीन न होती । जगसंहारीं लय पावती । मृत्यूचें भय तेव्हां असे ॥३३॥
उत्पत्तिनाश संयुक्त । ब्रह्मांड सगळें प्रख्यात । त्रिगुणादींच्या व्यथेनें युक्त । विघ्नग्रसित सारें असे ॥३४॥
अकर्मानें मोक्ष लाभत । नर या जगतीं निश्चित । देही चार देहयुक्त । मोहून बंधनीं पडतसे ॥३५॥
तोच जीव साधन करुन । होई अंतीं बंधहीन । मोहयुक्त तरी तो हीन । सर्वत्र होय विघ्नरुप ॥३६॥
देह देहिमय योगांत । ब्रह्म कल्पनात्मक असत । विकल्पानें द्विधाभूत । स्वतः उत्थानसंज्ञक ॥३७॥
निर्विकल्पे योगानें स्थित । स्वमहिम्यांत स्वात्ममय होत । स्वात्मनिष्ठ ज्यानें धृत । म्हणोनि तो अस्वात्मनिष्ठ ॥३८॥
तेच विघ्नरुप अपर उत्थान । सांख्य ब्रह्म यांत संदेह न । बीज उत्थानधारक महान । सबीज निर्बीज तेच होत ॥३९॥
म्हणोनि योगी जन न मानित । स्वानंद ब्रह्म समाधि रुपांत । तेथ स्वकीय संयोग होत । तदाकारें सर्वदा ॥४०॥
सर्व अभेद स्वरुपें ख्यात । संयोगात्मक तें जगतांत । स्वसंवेद्याहून पर नसत । संयोग अभेददायक ॥४१॥
तेंच योगिजन विघ्नसंयुत । ऐसें वर्णन करित । त्यापासून हें सर्व संजात । योगानें अभेद पावतें ॥४२॥
अन्वयात्मक दोषें प्रकाशित । विघ्नरुप हें उपदेशांत । म्हणोनि मान्यता न लाभत । शांतिमार्गांत सर्वदा ॥४३॥
त्याहून योगस्वरुप भिन्न । प्रकीर्तित जें सदा महान । त्याचा कोणाशीही योग समान । कदापि न होय जगतांत ॥४४॥
ब्रह्मभिन्न अयोगाख्य जें असत । तें तें विघ्न समाकुल होत । व्यतिरेकात्मक दोष तोच ख्यात । अशांतिकर सर्वदा महाभागा ॥४५॥
संयोगित्व अयोगत्व सोडून । शांति लाभेल महान । तेव्हां विघ्नविहीनत्व लाभून । सुखप्राप्ति निःसंशय ॥४६॥
चित्त भूमिस्वरुप पंचधा असत । तें त्याग करी तू सांप्रत । योग अभेद स्वरुप निश्चित । तेणें तू पावशील ॥४७॥
पंचधा चित्तरुपा ख्यात । बुद्धि माया मोहदा असत । पंच ऐश्वर्य मोहांत । सिद्धि असे कारण ॥४८॥
तेथ गणेश बिंब पडलें । योगरुपें द्विधा झालें । मायायुत तें ज्ञान असलें । म्हणोनि त्यागी बिंबभाव ॥४९॥
मागें पुत्रा तुज सांगितलें । गणेश आमुचें कुलदैवत भलें । तें तूं भक्तिभावें आराधिलें । म्हणोनि पात्र योगशांतीस ॥५०॥
आतां मी सांगितली तुज । पूर्ण शांति जी सहज । त्या शांतियोगें नित्य भज । विधानपूर्वक नित्य तूं ॥५१॥
तेव्हां तू गणेशान होशील । संशयातील अमल । ऐसें सांगून ब्रहा निर्मल । अंतर्धान पावला ॥५२॥
पुलहमुनी तो योग साधित । तपमग्न तो तेथ स्थित । क्रमानें योगशांति लाभत । गणेशयोग अभ्यासून ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्‌मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते पुलहोपदेशवर्णन नाम सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP