खंड २ - अध्याय ५३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा सांगत । प्रल्हाद भक्तिभावें ऐकत । ऐसा वर देऊन देवमुनींप्रत । एकदंत स्वपुरा परतला ॥१॥
नंतर एकदा दैत्येद्राप्रत । नारदमुनी भेटण्या जात । मदासुर महाक्रूर करी स्वागत । सन्मान करी तयांचा ॥२॥
त्या महादैत्यातें म्हणत । हास्य करुन नारद क्षणांत । दैत्यपते माझ्या वचनाप्रत । ऐक सुखप्रदायकास तूं ॥३॥
वनांत देवविप्रांनी आचरिलें । सुदारुन तप भलें । शंभर वर्षे तेणें तोषले । गणेश ब्रह्मनायक ॥४॥
वर मागण्या तो सांगत । तेव्हां तुझा वध देव याचित । तो वर गणेशें त्वरित । दिधला असे तयांना ॥५॥
तो गणेश तुज वधील । तुझें राज्य जाईल । असुरांचा विनाश ओढवेल । म्हणोनी सावध तूं रहा ॥६॥
नारदांचे ऐकून वचन । क्रोधे आरक्त मदासुर होऊन । त्या मुनीस तेथ सोडून । एकांती दुःख करु लागे ॥७॥
ब्रह्मांडवासी जे जे असत । त्यांपासून मृत्यू मज नसत । तरी कोण हा एकदन्त । मज मारण्या येणार? ॥८॥
त्यासची मारीन मीं क्रोधयुक्त । मी देवांस सोडिलें दयायुक्त । आता ते शत्रुभाव धरित । त्यांसीही ठार करीन मी ॥९॥
दैत्येंद्रे पूर्वी जे सांगितलें । तें तें सत्य आज झालें । असुरांचे सर्व देव ठरले । शत्रू वेदाधारें सदा ॥१०॥
ऐसा विचार करुन । महा असुरांते बोलावून । देवनाशार्थ उत्सुकमन । सैन्यासहित निघाला ॥११॥
तेवढयांत महादेव अकस्मात । देव एकदंत त्यापुढें प्रकटत । प्रतापी तो शक्तियुक्त । भयदायक असुरांसी ॥१२॥
मूषकारुढ उग्र तो असत । नरनाग स्वरुप दिसत । शस्त्रपाणी चतुर्बाहुयुक्त । पाहून सुविस्मित दैत्य होती ॥१३॥
नंतर ते कोलाहल माजवित । सर्वही त्या आसमंतात । म्हणती कोण हा उपस्थित । पहा हो महा कौतुक हें ॥१४॥
त्यास पाहून भयभीत । झाले दैत्यवीर समस्त । तेथेच उभे राहून म्हणत । आपुल्या दूतासी वचन ते ॥१५॥
अरे दूता तूं त्वरा करुन । जावें त्या पुरुषा सन्निध जपून । सर्व वृत्तांन्त जाणून । परत येई सामोपचारें ॥१६॥
तेव्हां तो असुरदूत । एकदंता समीप जात । त्यांसी प्रणाम करुन म्हणत । देव नायका गणेशातें ॥१७॥
स्वामी, मदासुराचा मी दूत । तो ब्रह्मांडांचा राजा असत । त्यानें मज पाठविले असत । आपणा पाहून विस्मित तो ॥१८॥
आपण कोण कोठून आगमन । काय काम नाव काय पावन । आपण कोणाच्या पक्षाचे म्हणून । सर्वज्ञा सारें सांगावें ॥१९॥
संशय असुरांचा दूर करावा । ऐसा कृपाप्रसाद द्यावा । ऐसें विचारता एकदंत बरवा । म्हणे हसून दैत्यदूतासी ॥२०॥
अरे विचक्षण दूता सांप्रत । ऐक परिचय संक्षेपांत । मी स्वानंदवासी असत । स्वानंद लोकाहून आलों ॥२१॥
मदासुरा मारण्यास । देवांची सुखवृद्धी करण्यास । माझें नाव एकदंत सुरस । ब्रह्मसुखात्मक अरे दूता ॥२२॥
अरे दूतवर्या सांग जा त्वरित । त्या मूढा मदासुराप्रत । जरी जीवनेच्छा असेल मनांत । तरी शरण ये मजला ॥२३॥
देवांचा द्वेष सोडून । आपल्या नगरांत जाऊन । तेथ सुखानें करी वसन । देवां हविर्भाग मिळू द्यावा ॥२४॥
दैत्य पाताळींचे भोग जगांत । भोगतील अविरत । तेणें विश्व सारें सुखांत । होवो स्वधर्मपरायण ॥२५॥
याचसाठी मीं अवतरलों । सत्यधर्माचा रक्षक झालों । आतां मनींचे सर्व वदलों । सविस्तर मी हेतू तुज ॥२६॥
त्या मदासुरासी सविस्तर । सांग महाक्रूरास सत्वर । माझा संदेश सामपर । न ऐकतां मारीन क्षणीं ॥२७॥
एकदंताचें वचन ऐकत । दैत्यदूत त्यासी प्रणाम करित । मदासुरासी वृत्तान्त । जाऊन त्यानें सांगितला ॥२८॥
दूताचें वचन ऐकत । तेव्हा दैत्यपुंगव पडला मूर्च्छित । दैत्यांनी सावध करिता आर्त । तोही शोक करु लागे ॥२९॥
नारदांनी जें सांगितलें । तें सर्व दैत्यां कथिलें । म्हणे तें सत्य जाहलें । माझा हाच तो शत्रू असे ॥३०॥
त्या एकदंतासी मारीन । शस्त्रें अस्त्रें वापरुन । मज मृत्यूचें भय कोठून । काळाचा मी काळ असे ॥३१॥
ऐसें बोलून पापी जात । मदासुर मदसमन्वित । एकदंतावरी सोडित । एक उग्र शस्त्र तेव्हां ॥३२॥
अनिवार्य अमोघ शस्त्र पाहत । गजानन परशू तोलित । यमसंनिभ तो टाकित । मदासुरावरी तेव्हां ॥३३॥
तेजयुक्त परशू पाहून । दैत्य पळाले भयभीत होऊन । दैत्यराजाचे अस्त्र तोडून । दैत्यहनन परशू करी ॥३४॥
अरे प्रल्हादा त्रिपुरादि असुर । परशुभयें संत्रस्त समग्र । पळाले रणभूमीवरुन उग्र । मदासुर परी त्वेषें लढे ॥३५॥
त्याने संहार नामक अस्त्र जोडून । धनुष्य सज्ज केलें उन्मन । परी तत्क्षणीं केलें हनन । हृदयावरी परशूनें ॥३६॥
दैत्यपुंगव परशूने ताडित । धरापृष्ठी गळून पडत । वृक्ष जो जाहला वाताहत । जैसा उन्मळून पडतसे ॥३७॥
प्रहारर्धानें सावध होत । दैत्येश परशुराज पाहत । यमसन्निध अस्त्रासहित । विस्मित हृदयीं जाहला ॥३८॥
हा परशुराज मज न दिसत । तेजःपुंज जरी असत । हातांत धरी दैत्य उन्मत्त । परी आकाशसम शून्य भासे ॥३९॥
तेव्हां मदासुर उमजे हृदयांत । म्हणे ब्रह्ममय हें शस्त्र असत । अवयवहीन परम अद्भुत । कोण हा एकदंत येथ आला ॥४०॥
हा ब्रह्माकार निःसंशय असत । हयासवें लढणें कठिण दिसत । हा मज मारील निश्चित । हयात संशय काही नसे ॥४१॥
ऐसें मनीं चिंतित । दैत्येश मदासुर क्षुब्ध होत । दैवयोगें आठवीत । वेदवाक्य सुखप्रद ॥४२॥
एकदंताच्या रुपाचें ज्ञान । हृदयीं उमजला दैत्येश पावन । मदासुर विघ्नपाचें करी मनन । एकदंत नांवाचें ॥४३॥
एक म्हणजे मायायुक्त । त्यापासून सर्व संजात । भ्रांतिप्रद मोहद नाना खेळयुक्त । संपूर्ण जग हें जाणावें ॥४४॥
दन्त शब्द सत्तात्मक असत । माया चालक जो होत । बिंबाने होऊन मोहयुक्त । स्वयं स्वानंदग जाहला ॥४५॥
माया भ्रांतिमयी वर्णिती । सत्ता चालक म्हणती । त्यांचा संयोग जगतीं । गणेश हा एकदंत ॥४६॥
मदासुर म्हणे मनांत । माझे परम भाग्य असत । तेणें हा आला दुष्टिपथांत । विनासायास आज पाहिला ॥४७॥
तेव्हां यासी जावें शरण । शुक मुख्यु मुनी करिती स्मरण । भक्तींने भजती सिद्धिरमण । ब्रह्मभूत महाभाग ॥४८॥
ऐसा भक्तिभाव उपजून । मदासुर सोडी अभिमान । तेणें दोष निरसून । एकदंतासी शरण गेला ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते मदासुरापराजयो नाम त्रिपंचाशत्तमोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP