मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय १८

खंड २ - अध्याय १८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । ध्याननिष्ठ सदा चिंतन । करी गणेशाचें योगी महान । तेव्हां कालांतरेम प्रकट होऊन । गजानन पुन्हां भेटत ॥१॥
योगशांति लाभून । पुलह करी गणेशमूर्तीचें पूजन । ध्यानांत निमग्न त्याचें मन । गणेश आगमन न कळे तया ॥२॥
तेव्हां ढुंढी जो हृदयीं स्थित । त्यास घालवी गणेश क्षणांत । हृदिस्थ गणेशा न पाहत । भरांत अस्वस्थ पुलह झाला ॥३॥
म्हणोनि ध्यान सोडून । बाहेर शोधी अधीरमन । गणेशा पुढयांत पाहून । कृतांजली त्यास वंदी ॥४॥
विधियुक्त केलें पूजन । अनामय विनायका प्रसन्नमन । पूजा करुन करी वंदन । रोमांच अंगावरी आले ॥५॥
हर्षगद्‍गद करी स्तवन । विघ्नराजा तुज नमन । भक्तविघ्नहर्त्या तुज वंदन । गणेशा तुज नमन असो ॥६॥
अभक्तांसी विघ्नकर्त्यास । ब्रह्मास ब्रह्मरुपास । निराकारास साक्षीस । सर्व संस्थास नमन असो ॥७॥
अनादिसिद्धास नमन । अनामयासी वंदन । महाओजस्वी देवा अभिवादन । अप्रतर्क्या वक्रतुंडा ॥८॥
हेरंबासी स्वानंदराशीसी । भक्तसंरक्षकासी । योगपतीसी योगदात्यासी । शांतासी शांतरुपा नमन ॥९॥
शांतिपतीस भक्तशांतिकरास । योगशांतास सर्वगास । नाना अवतार रुपास । जगदाधामूर्तीसी नमन ॥१०॥
सुर असुरांच्या ईशास । सर्ववंद्यास सर्वादीस । सर्वांतास एकरुपास । मध्ये नानास्वरुपा नमन ॥११॥
आदिमध्यांतहीनास । सृष्टिस्थितिअंतकरास । अनंत उदर संस्थास । लंबोदरा नमन असो ॥१२॥
गजवक्त्रा तुज नमन । गजाकारा तुज अभिवादन । गजकर्णा पूर्णा वंदन । गजानना पुनःपुन्हा ॥१३॥
मूषकध्वजरुपासी । मूषकारुढरुपासी । पाशांकुश धारकासी । विभूतिस्तुतासी नमन असो ॥१४॥
चतुर्भुजधरासी । चतुर्वर्गमयासी । ब्रह्मभूतस्वरुपासी । देहधारिन्‍ नमन तुला ॥१५॥
ज्यास वेदवादी स्तवन करण्या अशक्त । वेद सांग योगी न शकत । ज्याची स्तुति करण्या संभव वाटत । ब्रह्म विष्णु शिवासी ॥१६॥
त्या देवेशा योगरुपमयासी । कैसें मी तुजसी । म्हणोनि प्रार्थितों आतां तुजसी । भावबळें प्रसन्न हो ॥१७॥
ढुंढे वर देई मजप्रत । योगात्मतेत मी व्हावें संतुष्ट । तुझी भक्ति व्यभिचारवर्जित । माझ्या मनीं दृढ व्हावी ॥१८॥
ऐसें बोलून तो पुलहमुनी । प्रेमविव्हल नाचूनी । भक्तिरस संयुक्त वचनीं । प्रार्थी ऐसें गणनायका ॥१९॥
गणेश तेव्हा त्यास म्हणती । माझी सुदृढ ऐसी भक्ति । अव्यभिचारी सात्विक ती । आनंददायी तुज लाभेल ॥२०॥
महायोग्या तुज मम भक्ति । होईल सुखदायी जगतीं । जेव्हा माझें स्मरण चित्तीं । तेव्हां सन्निध मज पाहशील ॥२१॥
तू रचिलेलें हें स्तोत्र वाचील । तैसें जो हें ऐकेल । त्यास भुक्तिमुक्तिप्रद तें होईल । शांतियोग प्रदायक ॥२२॥
मर्त्य हें पाठ करील । त्यास सर्व सुखें मिळतील । तुज जैसा पुलहा होईल । यात संशय कांहीं नसे ॥२३॥
ऐसे बोलून गणाधीश होत । अंतर्धान तेव्हा त्वरित । पुलह तैसाच उभा राहत । मनीं ध्यात गणाधिपा ॥२४॥
मृगरुपधर भरत । तेथ उभा होता ऐकत । ब्रह्मदेव पुलहा सांगत । तें पूर्ण ज्ञान लाभलें त्या ॥२५॥
मृगदेहातही ध्यानसंयुक्त । गणेशास मनांत ध्यात । तेथेचि निवास तो करित । सदा चिंतन गजाननाचें ॥२६॥
तेव्हां तो मनीं प्रार्थना गात । प्रजापते दक्षा ऐक सुवाहित । ऐसें मुद्‌गल सांगत । अहो विघ्न घोर ओढवलें ॥२७॥
राज्य सोडून वनांत । नित्य हरीसी मी होतों स्मरत । तेथेहि मृगसंगानें संजात । मृगरुपधारी मी ॥२८॥
विष्णु प्रमुख अमरेशही होत । निःसंशय विघ्नयुक्त । तेथ पाड काय माझा लागत । विघ्न जिंकण्या मनुष्याचा? ॥२९॥
विघ्नराजाच्या प्रसादें दूर होत । दुर्जय विघ्नही जगतांत । शिव विष्णु आदी सर्व प्राणी पावत । निर्विघ्नता त्याच्या कृपेनें ॥३०॥
धन्य माझी वैष्णवी भक्ति जगांत । वाटे जी परमाद्‍भुत । तेणें संस्कार संयुक्त । प्राप्त उत्तम ज्ञान मला ॥३१॥
गाणपत्य महायोगी पाहिला । पुलह जो गणेश भजनीं रमला । अहो परम भाग्यदायक वाटला । योगायोग हा अपूर्व ॥३२॥
ज्यानें मी गाणपत्याच्या संगांत । नित्य येथें असे स्थित । विघ्नहीन मी स्वभावें होत । जरी गणनायका पूजीन ॥३३॥
ऐश्यापरी भक्तीनें युक्त । गणेशभक्ति करी सतत । मृगसत्तम देहत्याग करित । कालांतरें गणपा स्मरुन ॥३४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते भरतमृगदेहत्यागो नामाष्टादशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP