मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय २१

खंड २ - अध्याय २१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । रहूगण राजा श्रद्धयुक्त । जडभरताचें वचन ऐकत । राजा, मी आंगिरस जडभरत । प्रथम स्वायंभुव, सांप्रत जड ॥१॥
राजर्षे, चिंता न करी मनांत । अज्ञानानें अपराध घडत । माझ्या देहाची अवहेलना तुजप्रत । पापकारक न होईल ॥२॥
आतां जाई जैसें इच्छित । माझ्यापासून तुज भय नसत । मीही जाईन स्वच्छंदे जगांत । प्रारब्ध जेथें नेईल ॥३॥
मुद्‌गल पुढील कथा सांगती । त्या योगींद्रांची ऐकून उक्ति । रहुगणाच्या आनंद चित्तीं । प्रणाम करुन म्हणे तो ॥४॥
धन्य माझे माता पिता । धन्य कुलज्ञान आता । तप विद्या यश तत्त्वतां । तुमच्या चरणांच्या दर्शनें ॥५॥
मी सिंधू देशाचा महीपाल । रहूगण नामें ख्यात सबल । राज्यादि विषय सोडून सकळ । निघालों शांतिलाभार्थ ॥६॥
गौतमी तीरावर निवसत । कपिल ऋषि जे जगतीं ख्यात । त्यांच्या भेटीस निघालों सांप्रत । वाटेंत आपलें दर्शन झालें ॥७॥
आपण साक्षात्‍ ब्रह्मरुप । सुदैवें भेटलां निष्पाप । मज शिष्या तारावें हरुन पाप । योगबोध करुन ॥८॥
शांति तत्त्व मज सांगावे । जेणें शांत मम चित्त व्हावें । त्याचें तें वचन बरवें । ऐकून कृपा करी जडभरत ॥९॥
तो आंगिरस महामुनी सांगत । वेद गुह्य दुर्गम जें असत । योग शांतिकर परम अद्‌भुत । रहस्य रहूगण राजासी ॥१०॥
देह चर्तुविध असत । देही तैसाचि तयांत । एक असोनि अनेक भासत । भरांतीनें देहात्मक वाटे ॥११॥
देहाचे ब्रह्म जें वर्णित । ते बिंदुमात्र दिसत । देहीचें ब्रह्मरुप प्रख्यात । सोऽहं मात्रात्म्क सदा ॥१२॥
त्यांचा संयोग जो होत । तो बोधात्मक ज्ञात । स्वतःपासून जें उत्थान पावत । ब्रह्म तें विलल्पें द्विविध वाटे ॥१३॥
बोधनाश होतां उत्थान नसे । सांख्यरुप ब्रह्म केवळ विलसे । जेथ परसुखही नसे । तेथ कैसें स्वसुख ॥१४॥
त्याच्या परतें उत्थान युक्त । उत्थानाचें बीज ख्यात । स्वसौख्यनिष्ठरुप असत । बोधहीन प्रभावें ॥१५॥
उत्थानहीन स्वानंदवाचक । संयोग अभेद रुपात्मक । सर्वत्र पंचभेदात्मक । स्वानंदरुपें वर्ततसे ॥१६॥
सत्यासत्यसम नेतिरुप । उत्थान स्वयं परतें वा निष्पाप । त्यांचा अनुभव बोधरुप । नानाविध ब्रह्म निर्माता ॥१७॥
अन्नादि नानाविध जग विलसत । जें नामरुप तें असत्य असत । शाक्त ब्रह्म समाख्यात । वेदांत वेदज्ञांकडून ॥१८॥
नामरुपात्मक तें खंडमय असत । सर्व प्रकाशक ब्रह्म परी अखंडांत । त्यांचा अभेद करता जगतांत । आनंद नामें विष्णु देव ॥१९॥
भाव अभाव दोन्ही सम । तें ब्रह्म जाणावें निर्मम । मी कर्ता नसे परम । ऐसें ज्ञान शिव असे ॥२०॥
अव्यक्त मोहहीन ब्रह्म स्वाधीन । चौघांचा अभेदमय संयोग होऊन। स्वस्वरुपाख्य मायायुक्त पावन । तो हा विनायक जाणावा ॥२१॥
संयोग नाशकारी अयोग संमत । निर्मांयिक तो गणेश ख्यात । निवृत्ति उपजे चित्तांत । अयोग होता योग्यांच्या ॥२२॥
स्वकीय भेदहीन । तें ब्रह्म अयोग संज्ञ म्हणून । स्वनाश निवृत्तीनें साधन । त्या ब्रह्माचें शक्य होय ॥२३॥
अयोग तैसा संयोग । शांतियोगात दोघांचाही वियोग । ऐसा योगशांतिमय । सुभग गणनाथ हा जाणावा ॥२४॥
मायायुक्त तो मायावी असत । मायाहीन केवळ ज्ञात । भरांतिमात्र तें त्यागावे अविरत । योगी जनांनीं सर्वदा ॥२५॥
चित्त पंचविध असत । त्याचें ऐश्वर्य द्विविध जगांत । मोहप्रद तें त्यागिता जगांत । शांतिरुप तूं होशील ॥२६॥
ऐसें सांगून जडभरत । महायोगी निघून जात । रहूगण सोडून वनांत । जाऊन शांतियोगाचरण करी ॥२७॥
विधानपूर्वक योगसाधन । करितां शांतियोग प्राप्त झाला महान । महा तेजस्वी रहूगण । गाणपत्य जगीं झाला ॥२८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते रहूगणसिद्धिप्राप्तिवर्णन नामैकार्विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP