खंड २ - अध्याय ४०
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । भृगु मुनींचा शाप मिळत । तेव्हां अग्नि परम दुःखित । अंतर्धान पावून जात । आपुल्या स्थानीं परतोनी ॥१॥
सर्वत्र हाहाःकार माजला । अग्नि न मिळे कोठेंही जगाला । तेव्हां मुनींसहित देवगण गेला । शरण ब्रह्मदेवासी ॥२॥
मुनी ब्रह्मदेवासी सांगती । भृगुशापें अग्नि दुःखित अति । अंतर्धान पावला स्वजगतीं । कर्महीन आम्हीं झालो ॥३॥
आता पितामहा शरण तुजसी । रक्षावें तुम्हीं आम्हांसी । नाहीतरी अन्यथा या चराचरासी । कोण रक्षील या वेळीं ॥४॥
ऐकोनि त्यांचें तें वचन । त्यांच्यासह अग्नीस शोधून । करी त्याचें सांत्वन । बहुविध वेदवाक्यांनी ॥५॥
ब्रह्मदेव म्हणे अग्नीसी । महाभागा दुःखित कां होशी । सर्वभक्ष या तव नामासी । वेदांनी निश्चित केलें असे ॥६॥
भृगूचा अपराध यांत नसत । हें होणारच होतें भविष्यांत । होऊं नको वृथा चिंताग्रस्त । महामते निश्चित केलें असे ॥७॥
म्हणोनि तूं अससी पुनीत । सर्वभक्ष ऐसा तरी ख्यात । जे भक्षण करीसी त्याचा न लागत । दोष तुला कदापि ॥८॥
हें वचन ऐकतां कुद्ध होत । प्रलय करण्या झाला उद्यत । आपुल्या ज्वाळा चराचरांत । पसरवी तेव्हां क्रोधानें ॥९॥
त्या ज्वाळांनी दग्ध होत । ब्रह्मादि देव समस्त । गणेशासी ते मनीं ध्यात । तेव्हां अभयवचन गणेश देई ॥१०॥
नंतर ब्राह्मण रुप घेऊन जात । अग्नि जवळी एकदंत । तयासी सांगे त्याचें हित । म्हणे अग्नि देवा क्रुद्ध कां होसी ॥११॥
अकालीं जगास जाळिसी । विसरलास तूं विनायकासी । स्वतंत्र आपणासे मानसी । परी तूं गर्व करुं नको ॥१२॥
विनायकाच्या कृपेवाचून । स्वातंत्र्य जगतीं अशक्य मान । अग्नीसी न रुचलें तें वचन । दहन करीन म्हणे तुज ॥१३॥
आपुल्या ज्वाळांनी मुनींद्रास । दहन करण्याच्या प्रयास । करी अग्नी तेव्हां तयास । गणनायक मुनीद्रं म्हणे ॥१४॥
महाबले ही शलाका ठेवित । ही जाळून दाखव त्वरित । सामर्थ्य तरी तुझें संमत । होईल मजला तात्काळ ॥१५॥
परी त्या शलाकेचें दहन । करुं न शकला तो हुताशन । गर्व त्याचा सर्व हरुन । वंदन करी त्या ब्राह्मणासी ॥१६॥
नंतर विचारी त्या ब्राह्मणाप्रत । विनायक हा कोण असत । सर्वांचा नायक जो प्रख्यात । तें सर्व करुणासिंधो सांग मज ॥१७॥
त्याचें भजन मी करीन । भक्तिभावें त्यास पूजिन । आपण कोण विप्र महान । तेंही मजसी सांगावें ॥१८॥
प्रशांत अग्नीस गजानन । विप्ररुपी तो बोले वचन । हेतुगर्भ वाक्यें सांगून । सर्वार्थकोविद बोध करी ॥१९॥
स्वानंदवासी विनायक असत । सर्वांचा नायक जगांत । शांतियोगे शांतिज्ञ भजत । द्विजोत्तमा त्या देवासी ॥२०॥
तो योग मी तुज सांगेन । श्रद्धेनें ऐक एकनिष्ठ मन । एक अनेकादि भेदयुक्त असून । प्रणव नामें ख्यात जो ॥२१॥
संप्रज्ञात असंप्रज्ञात । रुप त्याचें संयुक्त । गण हे समूहरुप असत । त्यांचा स्वामी गजानन ॥२२॥
महा तेजयुक्त अग्ने तूं भजावें । त्या गजाननासी स्मरावें । त्यासी शरण भक्तिभावें । हव्यवाहना जाई तूं ॥२३॥
ऐसें बोलून त्यास उपदेशित । गणेश एकाक्षर मंत्री पुनीत । सर्व सिद्धिदाता विधियुक्त । अग्नी देवासी त्या वेळीं ॥२४॥
ब्राह्मण रुप त्यागून । आपुलें स्वरुप प्रकट करुन । सर्व चिन्हांकित गजानन । भक्तपालक त्या वेळीं ॥२५॥
त्यास पाहून हर्षभरित । अग्नि घालीं दंडवत । परी तत्क्षणी अंतर्हित । गणनायक जाहला ॥२६॥
खिन्न होऊनी मानसीं । स्वर्ग सोडोनि गेला वनासी । समाधियुक्त तपासी । गणेशलाभार्थ आचरें तो ॥२७॥
दिव्य वर्षंशत लोटत । तेव्हां गजानन प्रसन्न होत । भक्तवत्सल तो प्रकटत । अग्निदेवा वर द्यावया ॥२८॥
म्हणे वर माग इच्छित । तुझ्या तपें मी संतुष्ट । ल्गृत्समद म्हणे हर्ष समन्वित । प्रणाम करी अग्निदेव ॥२९॥
यथाविधि त्यास पूजित । भक्तिभावें कर जोडित । योगशांतिदात्यासी स्तवित । उत्तम स्तोत्रें त्या वेळीं ॥३०॥
विघ्ननाशकासी विघ्नकर्त्यासी । मूषकवाहनासी गजवक्त्रासी । भक्तहितकर्त्यासी एकदंतासी । हेरंबासी तुज नमन असो ॥३१॥
आदि मध्यांतहीनासी । चतुर्वर्ग प्रदायकासी । चतुर्भुजधरासी लंबोदरासी । गजकर्ण देवासी नमन असो ॥३२॥
ढुंढीसी योगशांति स्वरुपासी । योग्यांच्या पतींसी योगदात्यासी । चराचरमयासी प्रणवाकृतीसी । सिधिबुद्धिमया नमन तुला ॥३३॥
सिद्धिबुद्धि प्रदायकासी । सिद्धिबुद्धिपतीसी । भक्तप्रियासी अनंताननासी । देवेशा तुज नमन असो ॥३४॥
करुणानिधे प्रसन्न व्हावे । गणाध्यक्षा मज रक्षावें । दास तुजा मी मज द्यावें । दृढ प्रेम तुझ्या चरणीं ॥३५॥
धन्य मीं सर्व देवांत । विनायका तुझे चरण पाहत । कृतकृत्य ब्रह्मभूत । महायोगी निःसंशय झालों ॥३६॥
जरी प्रसन्न होऊन । वर देण्यासी आलास पावन । तरी मज करी शापहीन । देवेंद्रसत्तमा गणेशा ॥३७॥
तुझी दृढ भक्ति । माझ्या सदैव वसो चित्तीं । मोह नष्ट होऊन जगतीं । गणेशभक्तांसह सहवास होवो ॥३८॥
जेव्हां जेव्हां संकट येत । तेव्हां तेव्हां मी तुज स्मरत । तुझ्या प्रसादें संकट मुक्त । व्हावें मी सर्वदा ॥३९॥
ऐसें बोलून भक्तिसंयुत । गणाधीशासी वंदित । त्यास गजवदन म्हणत । भक्तवत्सल भक्तिप्रिय ॥४०॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र । माझें आवडतें सर्वत्र । आनंद सुख भाग्यपात्र । करील श्रोत्यास वाचका ॥४१॥
जें जें चिंतिसी इच्छित । तें तें देईन तुज शाश्वत । भक्तिभावें तुझ्या तुष्ट । स्तोत्रानें या हुताशना ॥४२॥
माझी भक्ति अचल चित्तांत । राहील अनघा नितांत । संकट हरेल क्षणांत । केवळ माझ्या स्मरणमात्रें ॥४३॥
भृगू माझा विशेष भक्त । शांतियोगधारी असत । त्याचेही वचन मिथ्या न करित । सर्वभक्षक तूं निःसंशय ॥४४॥
सर्वभक्षक शापप्रभावें जगांत । तूं तरीही पवित्र सतत । अग्निशुद्धिसम सर्वांत । पावन कांही न होईल ॥४५॥
पूर्ववत् सर्वमान्य होशील । द्विजादी तुज मानतील । सर्वभक्षत्व दुःख हरेल । कैसें तें ऐक आतां ॥४६॥
जें जें शुभाशुभ होय प्राप्त । त्यांतलें भक्षण होय अमृत । सर्वभक्षण विकारांचें होत । दुःख तेणें तुला जगीं ॥४७॥
तुज अमृतभक्षक मी केलें । ऐसें गणनायक बोलले । नंतर अंतर्धान पावले । अग्नि हर्षित जाहला ॥४८॥
स्वगृही तो परतला । सर्वभक्षक आता जाहला । परी अमृतभोक्ता शुचित्त्व पावला । योगशांतियुक्त तो ॥४९॥
गाणपत्य स्वभावें भजत । गणेशासी गणेशभक्त संगांत । वाचतां ऐसें हें अग्निचरित । ऐकतांही इष्टलाभ ॥५०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते अग्निमाहात्म्यं नाम चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP