खंड २ - अध्याय १५
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा पुढेती सांगती । सप्तपातालांची माहिती । अतल वितल सुतल तलातल असती । महातल रसातल पाताल ॥१॥
अतल श्यामवर्ण असत । ते अधोभूमींत । अयुत योजनांचा प्रशस्त । लक्ष योजन विस्तार ॥२॥
मयपुत्रानें संयुक्त । तैसाचि नमुचि तेथ राहत । अन्य नागांनी सुशोभित । विविध परींच्या अतल तें ॥३॥
वितल श्वेतवर्ण असे । अतलाच्या खाली विलसे । अयुत योजनें विवर मात्र दिसे । तेथ नागासुर सुखें राहती ॥४॥
कंबल शंकुकर्ण हयग्रीव । जृंभक ख्यात नाम सर्व । सुतल पीतवर्ण अभिनव । वितलाखाली विसावलें ॥५॥
तेथें वैतनेतायादी पक्षी राहत । दैत्याधिप बळी निवसत । काळनेमी आदी दैत्य स्थित । नागही निर्भय करिती ॥६॥
त्या सुतलाखाली तलातल । शार्करं तें अमल । मयासुर बाण अंधक सबल । राहती तेथे सुखानें ॥७॥
अन्यही नाग विगतज्वर । काळकेय महादेह् थोर । निवातकवचादी नाग उग्र । तेथ राहती आनंदे ॥८॥
महातल कृष्णवर्ण असत । तेथ तक्षक पन्नगादी नाग वसत । सुखभोग ते भोगित । हिरण्यपुरधिष्ण्या दैत्य तसा ॥९॥
अन्य हजारो दैत्य निवसत । देवांचें भय त्या येथ नसत । प्रजापते महातलाखाली स्थित । रसातल पाताल ॥१०॥
रसातल शैलमय स्थित । वासुकि प्रमुख नाग राहत । तैसेचि नानाविध दैत्य नांदत । सर्व शोभाढय विवरांत ॥११॥
नाना सौख्यप्रद त्या स्थानांत । तेजस्वी तीक्ष्ण विषयुक्त । ऐसे ते नाग विहरत । सातवें तें पाताल ॥१२॥
पाताल निळे त्या खालती । शेषनागाची तेथ वसती । दैत्यसुर नाग सेविती । नागराजासी तेथे ॥१३॥
भक्तियुक्त ते विवेकयुक्त । नानाविध घरें पाताळ विवरांत । वनें ग्रामें नगरें असत । विचित्र भोगयुक्त सारीं ॥१४॥
नानापरींचे वृक्ष खग असती । प्रभायुक्त मंदिरें तळीं विलसती । त्यात कमळें सदैव फुलती । स्वर्ग समभोग भोगिती ॥१५॥
हृष्ट पुष्ट सर्वजन । नियुत वर्षे जीवनमान । अपार आयु महातेजस्वी असून । देवादीस दुर्जय ॥१६॥
त्याच्याखालीं तीस सहस्त्रे योजनें । शेष राहतो आनंदाने । गणेशभक्ति संयुक्त मनें । गणेशअंश समुद्भव तो ॥१७॥
विष्णूचा कलावतार । तैसाचि स्मृत जो काळरुद्र । सहस्त्र आननेंयुक्त उदार । महाभाग महाबल ॥१८॥
त्याच्या विषाच्या ज्वाला । जाळतील जगा सकळा । मृत्यूवर्जित तो आगळा । एकला अनंत प्रख्यात ॥१९॥
ब्रह्याच्या दिवसांनी लय करुन । राही तो तेथ स्थिरमन । वासुकीप्रमुख नागराजे उत्सुक मन । सेवा करिती तयाची ॥२०॥
असुर प्रल्हाद प्रमुख सेविती । नागयोषिता त्यास पुजिती । कामना पुर्तीसाठी भजती । भक्तितत्पर सारे जन ॥२१॥
त्याच्याखालीं कच्छप स्थान । विष्णूचा जो अवतार महान । एक सहस्त्र योजनें स्थान । पसरले जें विशेषयुत ॥२२॥
तेथ त्यास वरुणादी सेविती । नारायण कूर्मरुप महामती । अन्तमय तेजस्वी द्युती । ऐसे तें कच्छप स्थान ॥२३॥
त्या स्थानापासून खालती । सहस्त्र योजनें होय स्थितीत । वराहरुपधर विष्णूची प्रचीति । शत्रुपुर विजेत्याची ॥२४॥
धरित्रीमुख सारे सेविती । भक्तितत्पर विनमरप्रगति । महादेव जो करालमुख ख्याती । स्वभक्तांसी अभयप्रद ॥२५॥
शेषास आधार हें सर्व । तैसेचि कूर्माचा आधार । वराहरुपाच्या आधरें देव । राहती अन्य विश्वांत ॥२६॥
वराह निराधार स्मरत । गणेशासी स्वहृदयांत । त्याच्या प्रभावें सर्वाधार स्मृत । ऐसे वराहाचें हें स्थान॥२७॥
त्या वराहस्थानाखालती । रौरवादी नरक असती । यातनामय जे करिती । पापीजनांचे शुद्धिकरण ॥२८॥
रौरवतामिस्त्र महारौरव । अंधतामिस्त्र सूचीमुख अपर । लोहदंड तप्तवालुक खङगपत्र । लालास्य कृमिभक्ष्यादी ॥२९॥
ऐश्या बहुविध नरकांत । पापकारी पीडा भोगित । त्या ब्रह्मगोलाचा इतिहास अद्भुत । संक्षेपे तुला निरुपिला ॥३०॥
विस्तारें अशक्य कथन । प्रजापते दक्षा हे रहस्य महान । शापमोहें भरांतियुक्त मन । जाहले तुझे म्हणोनी ॥३१॥
गणेशाची आरधना करशील । तरी भरांति नाश होईल । तेव्हां तत्वतः सर्व जाणशील । यांत संशय काहीं नसे ॥३२॥
ऐसे सर्वांत सामान्य असत । ब्रह्मांडांत हें जगत । अष्टावरण युक्तांत । गुणेश आधारें सारें ॥३३॥
हें गणपतीचें रुप स्थित । ब्रह्माण्डा व्यापून अद्भुत । संक्षेपें कथिलें तुजप्रत । सर्व सिद्धिप्रद हें असे ॥३४॥
जो नर हे भक्तीनें वाचित । किंवा आदरें ऐकत । त्यास भुक्तिमुक्ति लाभत । पाप कंचुक नष्ट होय ॥३५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते सप्तपातालवर्णन नाम पंचदंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP