मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ३४

खंड २ - अध्याय ३४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । पराशराचा पुत्र व्यास । जनार्दन साक्षात्‍ तो जगतास । वेदादींची रचना करण्यास । देवांनी त्यास प्रार्थिलें ॥१॥
तेव्हां ज्ञानगर्वे धुंद झाला । गजाननाचें स्मरण विसरला । मी विष्णुरुप असतां गणेशाला । वंदन कां करावे म्हणे ॥२॥
तेव्हां त्यांचें सकल ज्ञान । तयासी गेलें सोडून । वेदांचे रहस्य विसरुन । दुःखित झाला मानसीं ॥३॥
नंतर ब्रह्मदेवासी शरण जात । पितामह त्यासी बोध करीत । गणेशाचें पुराण सांगत । ते ऐकून ज्ञान लाभलें ॥४॥
सुविपुल तप आचरित । व्यास परम गाणपत्य होत । साक्षात्‍ नारायण तो लाभत । शांतियोग त्या वेळीं ॥५॥
नंतर वेदांच्या शाखांची रचना । शाखानुसार केली भिन्ना । सुलभ व्हावी लोकांना । कर्मादिज्ञान सिद्धीसाठीं ॥६॥
प्रथम यजुर्वेदाचे चार भाग करित । चातुर्होत्रांत सर्व कर्म विभागीत । यजुर्वेदांत पारंगत । अध्वर्यू पदवी त्यास दिली ॥७॥
होता ऋग्वेंदांत निष्णात । उद्‌गाता तो सामवेदांत । अथर्ववेद पारंगत । ब्रह्मा ऐसें नांव त्या विपा ॥८॥
ऐसें यज्ञकर्म चार भागांत । व्यास महर्षि संकल्पित । वेदांच्या संहिता पुन्हां रचित । यज्ञ ग्रंथही बहुत रचिले ॥९॥
त्या ग्रंथांचे नांव ब्राह्मण ख्यात । योगार्थ आरण्यकें रचित । ऐसा वेदविभाग प्रख्यात । व्यास मुनी करिती तेव्हां ॥१०॥
महाबुद्धी पैलशिष्यास करित । ऋग्वेदभेदांत पारंगत । वैशंपायना करी निष्णात । यजुर्वेदाच्या भेदांत ॥११॥
जैमिनी सामवेदांत पारंगत । सुमंतू मुनी अथर्ववेदांत । ऋग्वेदाचे आठ भेद करित । यजुर्वेदाचे शाहायशी ॥१२॥
सामवेदाच्या शाखा एक सहस्त्र । अथर्ववेदाच्या नऊ कल्पित । पुराण एक रुप देत । रोम हर्षण सूतासी ॥१३॥
रोम हर्षण शिष्याप्रत । पुराणांचे अठरा भेद सांगत । पुराणें उपपुराणें होत । द्विविध ऐशी विभागणी ॥१४॥
ब्राह्म वैष्णव पद्म शैव । भागवत तैसें भविष्य । मार्कंडेय वामन वायव । अग्नि मत्स्य वराह ॥१५॥
कूर्म लिंग गरुड पुराण । स्कंद ब्रह्मांड पुराण । ऐसी ही अठरा पुराणें प्राचीन । उपपुराणें सांगतों ॥१६॥
गणेश नारद नरसिंह असत । कपिल नंदी वरु ख्यात । दुर्वास अंबिका पुराणें ज्ञात । कालिका मरीची भार्गव ॥१७॥
औशनास सनत्कुमार कुमार । माहेश्वर सौर पाराशर । मौद्‌गल ऐसीं अठरा पुराणें अपूर्व । उपपुराणें जाणावीं ॥१८॥
धर्म अधर्म व्यवस्थादर्शक । भारत रचना करी समर्पक । ह्या सर्वांचा उत्तम ज्ञाता एक । सूत महापती जाहला ॥१९॥
हीं सर्व गाणपत्य पुराणें जाणावीं । अन्य इतिहाससहित जीं बरवी । गणेशस्तुतियुक्त आघवीं । हें ऐकून मुनि मोहित ॥२०॥
शौनकादी मुनी विचारिती । संशय फेडण्या सूताप्रती । सूता शिवादींची पुराणें जगतीं । गाणपत्य कां संबोधिती ॥२१॥
तेव्हा सवार्थकोविद सूत । त्यांचा संशय दूर करित । महाबुद्धी त्यांसी सांगत । ऐका मुनींनो रहस्य ॥२२॥
व्यास महर्षि वर्णित । गणेशाचें रुप पंचधा असत । त्यांचा भेद मी कथन करित । जाणावा मुनिशार्दूलांनो ॥२३॥
आद्य जें ब्राह्मपुराण असत । तें गाणपत्य प्रकीर्तित । निर्गुण गणपती त्यांत । वर्णिलासे ब्रह्मवाचक ॥२४॥
हृदयांत जनांच्या असत । बुद्धीचें जो प्रकाशन करित । तेच रुप मनीं ध्यात । गणेशाचें योगिजन ॥२५॥
आकारादी विहीन । साक्षिभूत ते परम पावन । मनोवाणीविहीन । जाणावें सम्यक्‌न्यासयुक्त ॥२६॥
त्याचें महाभाग योगी ध्यान । चतुर्विध करिती मनोमन । संन्याश्यांच्या हृदयीं विराजमान । गणेश बुद्धिचालक तो ॥२७॥
अंत्यपुराण ब्रह्मांड ख्यात । गणपतीचें तं असत । त्यांत ओंकारमयाकार वर्णित । सगुण तो गणेश प्रभू ॥२८॥
जगद्विहारकारी गजानन । पंचधा झाला प्रणव महान । अकार उकार मकार पावन । नाद बिंदू पंचविध ॥२९॥
ऐसें पंचप्रकारें विभागून । नाना खेळ करी गजवदन । जगदाकाररुपें स्थित महान । विघ्नेशातें सदा ध्याती ॥३०॥
जगदात्म्यासी प्रणवाकृति । ऐश्या लक्षणात्मक ध्याती । द्विज त्यासी नित्य स्मरती । वेदांत प्रथम सर्वदा ॥३१॥
कर्मसिद्धिस्तव वंदनास । करिती कार्यारंभी गण्पतीस । ब्रह्मांडाकार विघ्नेश । सगुणरुपें ख्यात झाला ॥३२॥
तैसेंच उपपुराणांत । गणेशपुराण आद्य असत । भिन्नमूर्तिधारकाचें तें असत । विशेष वर्णनयुक्त जगीं ॥३३॥
सगुण जगदाकार । निर्गुंण बुद्धिचालक थोर । त्यांच्या ज्ञानप्रसिद्धीपर । मूर्तिमंता स्तविती ते ॥३४॥
गजवक्त्रादि चिन्हांकित । मंत्रादींनी गणनायका पूजित । महर्षि भावभक्तियुक्त । गणेशपुराणीं कथिलें असे ॥३५॥
त्याच्या उपासनेनें लाभत । सगुण निर्गुण जगतांत । ब्रह्म सुलभपणें सतत । तापसोत्तमा योग्यांसी ॥३६॥
अन्त्य उपपुराणे उपनिषत प्रख्यात । त्याचें मुद्‌गलमुनींनी कथिलें सुंदर । शुकादि योगी त्यास भजती ॥३७॥
सगुण मूर्तिरुपधर । ब्रह्म तिघांच्या योगरुपधर । मुद्‌गलमुनींनी कथिलें सुंदर । शुकादि योगी त्यास भजती ॥३८॥
अभेद योग संज्ञित । वर्णाश्रमांनी विवर्जित । ऐसा हा गणेशयोग प्रख्यात । म्हणोनि प्रथम गणेशपूजा ॥३९॥
कार्यारंभीं गणेशपूजन । कार्यांतीही त्यांचेंच स्तवन । सर्वसंमत हें वेदांतवचन । विशेष युक्त जाणावें ॥४०॥
जो आदी अंतीं स्थित । तो गणेश सर्वसंमत । म्हणोनी पुराणीं आद्यंत भागांत । गणेश्वर स्तविलासे ॥४१॥
पंचम मध्य रुप असत । कलांशाने सुविख्यात । शिवविष्णुरुपें खेळत । गजानन परब्रह्म ॥४२॥
म्हणोनि सर्व पुराणांत । गणेशाचेच वर्णन असत । अमित बुद्धि व्यास रचित । यांत संदेह कांहीं नसे ॥४३॥
हे गजाननाचें पंचविध रुप । जाणितो जो नर निष्पाप । मोहहीन होऊन समस्वरुप । अंतीं गणेश लोकीं जातो ॥४४॥
गणेशाचें चतुर्विध पूजन । सर्व कार्यारंभीं करावें पावन । सिद्धि तेणें लाभून । भक्तिभाव दृढ होय ॥४५॥
मूर्तिपूजन पहिलें ज्ञात । प्रणवात्मक भाव द्वितीय असत । बुद्धिप्रसाद तृतीय होत । शांतिरुप पूजन तें चवथें ॥४६॥
म्हणोनि कोणी जन पूजिती । ग्रंथारंभीं ब्रह्मरुप मूर्ति । सर्व सिद्धिप्रदाचें करिती । स्मरण भावभक्तीनें ॥४७॥
कोणी बुद्धिप्रद देवा हृदयांत । स्मरिती पूजिती द्विजेंद्र अविरत । ओंकाररुप गणेशा स्मरत । गणनायका विघ्नेशासी ॥४८॥
कोणी मूर्तिधर देवा पूजिती । सर्व प्रथम गणनाथा नमिती । ही शास्त्रसंमत रीती । दक्ष प्रजापते जाण तूं ॥४९॥
म्हणोनी आदि मध्य अंती । सर्वत्र गजाननाची वसती । योगरुपें शांतिप्रद शोभती । भक्तवत्सल एकदंत ॥५०॥
ब्रह्मदेवें बोध केला । व्यास गाणपत्य जाहला । गणेशप्राप्तिकामें जगाला । नाना भेद तो दाखवी ॥५१॥
वासनांचा भेद करण्यास । लोकां योगसिद्धि होण्यास । शिवादि देवांची पुराणें तयांस । क्रमशः व्यास सांगती ॥५२॥
ऐसा हा व्यासमहिमा वाचील । अथवा जो नर हा ऐकेल । भावभक्तीनें त्यास लाभेल । मनोवांच्छित सर्वही ॥५३॥
ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंतचरिते व्यास माहात्म्यं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP