खंड २ - अध्याय ५४
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । मदासुरें परशू वंदिला । यमसंनिभ जो तयास वाटला । विविध परीनें स्तुतीला । करी ब्रह्ममय शस्त्राची ॥१॥
शस्त्रराजा तुज नमन । परशो तुज माझें वंदन । तेजःपुंजमया अभिवादन । कालकाला नमो नमः ॥२॥
एकदंताचें जें वीर्य असत । स्वधर्मस्थापनात्मक जगांत । तें तूच यांत संदेह नसत । रक्ष मजला शरणागतासी ॥३॥
कालरुप तूच अससी । महाप्रलयसूचक भाससी । तुझ्या वेगा सहन करी ऐसी । कोणा शक्ति देहधारका? ॥४॥
म्हणोनि तुज प्रणाम करित । ज्योतीरुप तूं महाअद्भुत । रक्ष मजला मे भयभीत । शरणागत वत्सल तूं ॥५॥
ऐशी स्तुति मदासुर करित । तेव्हां परशू शांत होत । मदासुरासी सोडून त्वरित । गेला वक्रतुंडाच्या करीं ॥६॥
नंतर मदासुर एकदंताप्रत । भयभीत होऊन शरण जात । प्रणाम करुनी पूजा करित । भक्तिभावें सादर तो ॥७॥
यथान्याय पुजून । साष्टांग दंडवत घालून । गणेशाचें करी स्तवन । तेणें गणेश संतोषला ॥८॥
मदासुर म्हणे एकदंतासी । मायामायिक रुपासी । सदा ब्रह्ममयासी । गणेशा तुज नमो नमः ॥९॥
मूषकारुढरुपासी । मूषकध्वजासी बंधहीनासी । सर्वत्र संस्थिता तुजसी । नमन माझें पुनः पुन्हा ॥१०॥
चतुर्बाहुधरा लंबोदरासी । सुरुपासी नाभिशेषासी । हेरंबासी चिंतामणीसी । चित्तस्थासी नमन असो ॥११॥
गजाननासी गणाधिपतीसी । नानाभूषण युक्तासी । अनंत विभवासी अनंतासी । माया प्रचालका नमन ॥१२॥
भक्तानंद प्रदात्यासी । विघ्नेशासी योगपतीसी । योग्यासी योगदायकासी । योगाकार स्वरुपा नमन ॥१३॥
एकदंतधारका मायाकारासी । एक शब्दें मायामयासी । दंत शब्दें सत्तामय अससी । तव मस्तका नमन असो ॥१४॥
माया सत्ताविहीन । त्यांचा योगकारक तूं उत्तम । तुझी स्तुति करण्या पावन । समर्थ कोण जगी असे? ॥१५॥
शरणागतपाला तुज नमन । शरणागत वत्सला वंदन । सिद्धिबुद्धिपते अभिवादन । तुज करितो मीं पुनः पुन्हा ॥१६॥
एकदंता रक्षण करी । मज शरणागताचें सत्वरीं । भक्तां मातें संसारीं । तारुन नेई गजानना ॥१७॥
ऐसें बोलून प्रणाम करी । प्रदक्षिणा घाली स्तवन करी । हातांची ओंजळ जोडी नंतरी । देवा सन्निध उभा राहे ॥१८॥
त्यास म्हणे गणाधीस वचन । अंतरीं झाला तो प्रसन्न । मदासुरा पाहून विकारहीन । भक्तिपूर्ण विनम्र ॥१९॥
एकदंत म्हणे क्रोधयुक्त । आलों तुज मारण्या निश्चित । परी आतां तूं शरणागत । म्हणोनि तुजला न मारीन ॥२०॥
माझ्या आज्ञेचें करी पालन । देवाचें वैर दे सोडून । माझ्या भक्तींत सदैव मन । रमवी आपुलें मदासुरा ॥२१॥
वर माग जो इच्छित । तुझ्या विनयानें मी संतुष्ट बहुत । स्तोत्र रचिलें जें अद्भुत । त्यानेंही प्रसन्न मीं झालों ॥२२॥
जो हें स्तोत्र वाचील । अथवा भक्तिभावें ऐकेल । त्यास इष्ट काम प्राप्त होतील । मदजनित भय न त्यासी ॥२३॥
अंतीं स्वानंददायक होईल । तूं रचिलेलें स्तोत्र अमल । माझी भक्ति वाढेल । भक्तांच्या हृदयीं सर्वदा ॥२४॥
आसुरभाव सोडून । शांतरुप बोले वचन । जरी गजानना तूं प्रसन्न । एकदंत पदीं भक्ति देई ॥२५॥
भक्तिनाथा दॄढ करावी । शाश्वती वृत्ति मज द्यावी । जी उपभोगून करावी । पूजा तुझ्या पदकमळांची ॥२६॥
मदाचे वचन ऐकून । तथास्तु म्हणे गजानन । माझी दृढ होऊन । मदासुरा तू तरशील ॥२७॥
जेथ माझें प्रथम पूजन । स्मरण तैसें करिती भजन । ऐश्या कर्मीं मदा प्रसन्न । शांतीचें राज्य स्थापन कर ॥२८॥
विपरीत जे वागती । आसुर स्वभाव ते असती । त्यांच्या कर्मांचे फळ निश्चिती । भक्षण करी मदासुरा ॥२९॥
ऐसें एकदंताचें वचन । ऐकून महादैत्य करी नमन । आपुल्या नगरीं परतून । झाला एकदंत भक्त ॥३०॥
त्रिपुरकादी दैत्य जात । उद्विग्न मनें पाताळांत । देव परतले स्वस्थानांत । ऐसा महिमा एकदंताचा ॥३१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते मदासुरशांतिप्राप्तिवर्णनं नाम चतुःपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP