उपदेश - संसारिकांस उपदेश ३ ते ५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
३.
बाळपणीं हिची वर्षें गेलीं बारा । खेळतां दे पोरा नाना-मतें ॥१॥
विटु दांडु चेंडु लगोर्या बाघोडे । चपे पेडखदे एकीबेकी ॥२॥
सेलदोरे खेळी आणि सलवडी । उचलिती धोंडी अंगबळें ॥३॥
कोंबडा कोंबडी आणि पाणबुडी । आणि सेलडी लिंबुठिंबु ॥४॥
नामा म्हणे ऐसें गेलें बाळपण । मग आलें जाण तारुण्य तें ॥५॥
४.
संसारसागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरला अंत ॥१॥
कामाचिया लाटा अंगीं आदळती । नेणों गेले किती पाहोनियां ॥२॥
भ्रम हा भोंवरा फिरबी गरगरा । एक प-डिले धरा चौर्यांशींच्या ॥३॥
नावाडया विठ्ठल भवसिंधु तारूं । भक्तां पैलपारू उतरीतो ॥४॥
नामा म्हणे नाम स्मरा श्रीरामाचें । भय कळिकाळाचें नाहीं तुह्मां ॥५॥
५.
संसार करितां देव जैं सांपडे । तरि कां झाले वेडे सन-कादिक ॥१॥
संसारीं असतां जरी भेटता । शुकदेव कासया जाता तयालागीं ॥२॥
घराश्रमीं जरी जोडे परब्रम्ह । तरि कां घराश्रम त्याग केला ॥३॥
ज्ञातीच्या आचारें सांपडे जरी सार । तरि कां निरहंकार झाले साधु ॥४॥
नामा म्हणे आतां सकळ सांडोन । आलोंसे शरण विठोबासी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP