उपदेश - जनांस उपदेश २९
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
२९.
एक तत्त्व त्रिभुवनीं । दुसरें न धरी तूं मनीं ॥१॥
म्हणे कां नरहरी नारायण । मग तुज गांजील कोण ॥२॥
दोन मनीं जरी तूं धरिसी । तरी वांयां दंडिला जासी ॥३॥
त्रिविध भक्ति चराचरीं । तयामाजिल एक तूम करीं ॥४॥
चहूंवेदीं जें बोलिलें । तें तूं करीं बा उगलें ॥५॥
पंचइंद्रियांचा संग । त्यांचा नको करूं पांग ॥६॥
साहि चक्रीं मन पवन । तेथें नव्हे आत्मनिधान ॥७॥
सप्तस्वरीं करीं कीर्तन । आणिक न लगेरे साधन ॥८॥
अष्टहि गुणीं सात्विक पूजा । भावें भजा गरुडध्वजा ॥९॥
नवहि द्वारें दंडिती । पुनरपि कोठें कैंचि भक्ती ॥१०॥
दाही दिशा अवलेकितां । दिवस गेले मोजितां ॥११॥
अकरा रुद्र जाले जरी । तरी एकचि श्रीहरि ॥१२॥
बारा मास आणि पक्ष । व्यर्थ जाती दे तूं लक्ष ॥१३॥
तेरा गुणांचे तांबूल । समर्पावें पूगीफळ ॥१४॥
चौदा भुवनें ज्याचे पोटीं । त्याचें नाम विचरा कंठीं ॥१५॥
पंधरा दिवसां एकादशी । करा जागर उपवासी ॥१६॥
षोडश उपचारें पूजा । भावें भजा गरुडध्वजा ॥१७॥
सत्रावी जीवनकळा । तिचा घे कां रे सोहळा ॥१८॥
अठरा पुराणें वाणिती । निरंतर कृष्ण कीर्ति ॥१९॥
म्हणे विष्णुदास नामा । शरण जावें पुरुषोत्तमा ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP