उपदेश - जनांस उपदेश ६ ते १०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
६.
चांदणें नावडे चोरा । सद्बुद्धि नावडे रांडेच्या पोरा । वृक्ष नावडे कुंजरा । सत्य कुचरा नावडे ॥१॥
चंदन जाणावा सुगं-धाची धृति । कर्पूर जाणावा उत्तम याति । हंस जाणावा चालतिये गति । कोकिळ श्रुति ओळखावी ॥२॥
लांव जाणावी उफराटिये दृष्टी । क्रोधी जाणावा भोंवयांसीं गांठी । लटिक्या जाणा बहुता गोष्टी । नष्ट कुचेष्ठी ओळखावा ॥३॥
नारी जाणावी भ्रतारभक्ति । आचारें जाणावी महा सति । धनुर्धर जाणावा संधान युक्ति । संत तापसीं ओळखावा ॥४॥
जयीं घातलिया निघे खरा । ज्ञान जाणे तोचि च-तुरा । शिंदळी जाणावी नीच उत्तरा । कुसळी घरोघरा फिरतसे ॥५॥
इतुकिया बोलाची न मानावी खंति । विठ्ठलचरणीं ठेवूनियां मति । प्रसन्न होईल लक्ष्मीपति । ह्मणे विष्णुदास नामा ॥६॥
७.
देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित ॥१॥
मी माझें म्हणतां गेले नेणों किती । रंक चक्रवर्ति असंख्यात ॥२॥
क्षणक्षणा देह आयुष्य पैं काटे । वासना ते वाढे नित्य नवी ॥३॥
मोहाचीं सोयरीं मिळालीं चोरटीं । खाऊनि शेवटीं घर घेती ॥४॥
जोंवरी संपत्ति तंववरी हे सखें । गेलीया तें भुंके सुणें जैसें ॥५॥
नामा म्हणे केशवा मी तों तुझा दास । मज आहे विश्वास तुझ्या नामीं ॥६॥
८.
भुलले हे लोक काळाचें कौतुक । सुरशक्रादिक पाह-ताती ॥१॥
देवा तुझी माया अगम्य अगाध । प्रपंचाचा वेध सुटों नेदी ॥२॥
माझें घरदार माझा संसार । मी मोठा चतुर ह्मणोनियां ॥३॥
आपणा देखतां जाती तें पाहती । मीपणाची भ्रांति सुटों नेणे ॥४॥
नामा ह्मणे आतां काय म्यां बोलावें । भोंवत असावें चौर्यांशीला ॥५॥
९.
विषय सेवितां तुज । नव्हे पुढील काज । कदा न भेटे तुज । गरुडध्वज निश्चयेंसी ॥१॥
काय करिसी खटपत । वांयां मार्ग दुर्घट । वरपडा होसील कष्ट । परि संसार न सुटेचि ॥२॥
सुट-केचें मूळ जाण । रामकृष्ण नारायण । येणें तुटेल भवबंधन । जन्मा न येसी सर्वथा ॥३॥
साधन इतुकेंचि पुरे । न लगती मंत्रांचे भार । ते बुडविती साचार । परि तरों न देती ॥४॥
नामा म्हणे ते पामर । नेणतीच हा मार्ग सार । परि वाचे नाहीं उच्चार । तो जाणावा महादोषी ॥५॥
१०.
मायेचा हा फांसा अहंकार वळसा । परि ह्लषिकेशा भजतीना ॥१॥
नव्हे हे सुटिका हा बोल लटिका । केशवासी एका न भजकारें ॥२॥
होतील त्यां मुक्ती पुरतील त्यां आर्ती । चरण हे चिंतीं विठ्ठलाचे ॥३॥
नामा ह्मणे केशव सर्वांभूतीं देव । ऐसा धरीं भाव भजनशीळ ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP