उपदेश - मनास उपदेश १ ते ५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१.
अरे अलगटा माझिया तूं मना । किती रानोराना हिंड-विसी ॥१॥
विठोबाचे पायीं दृढ घालीं मिठी । कां होसी हिंपुटी वांयां-विण ॥२॥
क्रिया कर्म धर्म तुज काय चाड । जवळी असतां गोड प्रेमसुख ॥३॥
संकल्प विकल्प सांडीं तूं समूळ । राहेंरे निश्चळ क्षणभरी ॥४॥
आपुलें निजहित जाणतूं त्वरित । वासनारहित होईं वेगीं ॥५॥
नामा ह्मणे तुज ठायींचें कळतें । सोसणें कां लागतें गर्भवास ॥६॥
२.
दाही दिशा मना धांवसीं तूं सईरा । न चुकती येरझारा कल्पकोटी ॥१॥
विठोबाचे नामीं दृढ धरीं भाव । तेर सांडीं वाव मृगजळ ॥२॥
भुक्तिमुक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिति निरं-तर वळगणें ॥३॥
नामा ह्मणे मना धरीं तूं विश्वास । मग गर्भवास नहे तुज ॥४॥
३.
अरे मना तूं मर्कटा । पापिया चांडाळा लंपटा । परद्वार हिंडसी सुनटा । अरे पापी चांडाळा ॥१॥
अरे तुज पापावरी बहु-गोडी । देवाधर्मीं नाहीं आवडी । तेणें न पावसी पैल थडी । कर्म बांधवडी पडिसील ॥२॥
अरे तूं अभिलषिसी परमारी । तेणें सिद्ध-पंठ राहेल दुरी । जवळी येईल यमपुरी । आपदा पावसील ॥३॥
आतां तुज वाटतसे गोड । अंतकाळी जाईल जड । महादोष येति सुखा आड । करितील कईवाड यमदूत ॥४॥
माझें शिकविलें नाइ-कसी । आतां सांगेम बळिया केशवासी । धरूनि नेईल वैकुंठासी । चरणीं जडसी ह्मणे नामा ॥५॥
४.
हें गे आयुष्य हातोहातीं गेलें । आंगीं आदळलें जन्म-मरण ॥१॥
कांरे निजसुरा दैवहत मना । आपुली सूचना न करिसी ॥२॥
कांरे तुज भ्रांति पडलीसे मूढा । वेढी चहूंकडा काळ सैन्य ॥३॥
नानारोगें तुझी काया वेधियेली । नरकाचीं भरलीं नवही द्वारें ॥४॥
पाळलीं पोशिलीं आप्त माझीं सखीं । अंतीं तुज पारखी होती जाण ॥५॥
नामा ह्मणे तुज ह्मणे तुज येतों लोटांगण । तारील नारायण भरंशानें ॥६॥
५.
उत्कंठित तप एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कोणालागीं ॥१॥
राहेंरे तूं मना राहेंरे निवांत । ध्यायीं अखंडित नारा-यण ॥२॥
संतसमागमें साथीं हें साधन । पावसी निर्वाण नित्य सुख ॥३॥
नामा ह्मणे तूं सहज सुखरूप । होऊनि निर्विकल्प विचारी पां ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP