उपदेश - मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
४१.
तुह्मी आह्मी जाऊं चला । भेटूम जीवलगा विठ्ठला ॥१॥
विठो सांपडला फुका । जो दुर्लभ तिहीं लोकां ॥२॥
वेदपुराणासी वाड । तो हा भाविकांसी भ्याड ॥३॥
नामा ह्मणे वंदूं चरण । कांही पुसूं जिवींची खूण ॥४॥
४२.
पैल दक्षिणेचा वारा । येतां देखिला समोरा ॥१॥
चला चला पंढरपुरा । विठोबारायाच्या नगरा ॥२॥
पायीं संतांच्या लागत । पाचारितो पंढरिनाथ ॥३॥
नामा ह्मणे वेग करा । विठ्ठल भक्तांचा सोइरा ॥४॥
४३.
पूर्ण परिपूर्ण पंढरी हे पेंठ । आपन वैकुंठ समचरण ॥१॥
ऐसें कांहीं करा नाम हेंचि धरा । विठ्ठल अपारा जप करा ॥२॥
करितां साधन नागवी अहंकार । विठ्ठल उच्चार पुण्य ओघें ॥३॥
नामा म्हणे घेईं विठ्ठल कुलदेवो । सर्व हाचि भावो केशव ऐसा ॥४॥
४४.
न पढावे वेद नको शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥१॥
नव्हे ब्रह्मज्ञान न होय वैराग्य । साधा भक्तिभाग्य संत-संगें ॥२॥
येर क्रियाकर्म करितां हो कलीं । माजि कोण बळि त-रले सांगा ॥३॥
नामा म्हणे मज सांगितलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥४॥
४५.
विष्णूचें सेवन जये गांवीं पूजा । नित्य तया द्विजा समारंभु ॥१॥
घरीं वृंदावन नित्य अन्नदान । श्रीकृष्ण आपण तेथें असे ॥२॥
ऐसी ध्यानगती विष्णूचें पूजन । तयासि पतन नाहीं नाहीं ॥३॥
नाम म्हणे करा विष्णुकथा नित्य । रामनाम सत्य वचन धरा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP