आता वर आणि वधू यांचे गोत्र व प्रवर एक नसावे याबद्दलचा विचार. धर्मशास्त्रग्रंथांत विश्वामित्र, जम दग्नी भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप, आणि अगस्त्य या आठ ऋषींचे पुत्र, पौत्र म्हणजे नातू, व प्रपौत्र म्हणजे पणतू हे मूळ गात्रांचे प्रवर्तक समजावयाचे, असे सांगून शिवाय आपणास केवळ भृगुगणाचे अथवा अंगिरोगणाचे म्हणविणारे यास्क, हरित इत्यादिकांची गणनाही गोत्रप्रवर्तक ऋषींमध्ये करून घेतली आहे. अशा रीतीने गोत्रांची संख्या बरीच अनियमित होत गेली, तथापि त्यातल्या त्यात विशेष प्रमुखता पावलेले ऋषी ४९ आहेत, व त्यांस ‘ प्रवर ’ ही संज्ञा लागते. गोत्रप्रवरांची व्यवस्था केवळ ब्राह्मणवर्णापुरतीच असून, त्या वर्णापैकी ज्या कोणाचे पौरोहित्य क्षत्रिय व वैश्य या वर्णांनी स्वीकारिले, तोच त्या त्या क्षत्रिय व वैश्यवर्णांच्या कुलास आपले स्वत:चे गोत्रप्रवर लावू लागण्याची पद्धती सुरू झाली. ही पद्धती मूळ कशी सुरू झाली हे पाहण्याचे प्रस्तुत प्रसंगी तादृश प्रयोजन नाही.
ब्राह्मणांमध्ये प्रवरांसंबंधाने एकप्रवरी, द्विप्रवरी, त्रिप्रवरी, व पंचप्रवरी याप्रमाणे निरनिराळे भेद असून, प्रत्येक गोत्राचा मनुष्य प्रवरांच्या दृष्टीने आपली गणना या चार भेदांपैकी कोणत्या तरी एका भेदात करीत असतो. क्वचित्प्रसंगी गोत्रे निरनिराळी असूनही त्यांचे प्रवर सारखे, अगर प्रवर निरनिराळे असूनही त्यांचे गोत्र एकच, अशीही उदाहरणे दृष्टीस पडतात, कसेही असो; वर आणि वधू यांचा विवाह ठरविताना उभयतांचेही गोत्रप्रवर भिन्न असावे लागतात अशी धर्मशास्ताने मर्यादा घालून ठेविली आहे. इंग्रजीत जीस consauguinity म्हणजे एका रक्ताचा संबंध असे म्हणतात, त्याचा अर्थ आणि आपल्या धर्मशास्त्रपद्धतीतील ‘ सपिंड ’ या शब्दाचा अर्थ एकच होय. ‘ सपिंड शब्दाचा अति विस्तीर्ण अर्थ घेण्याचे म्हटल्यास स्त्रीपुरुषांचा विवाह होणे अशक्य होते; यासाठी मागे वर्णिल्याप्रामणे पाचव्या व सातव्या पिढीच्या विशेष शास्त्रवचनाने त्या विस्तीर्ण अर्थाचा संकोच केला, तथापि त्या संकोचाचे स्वरूप बदलून गोत्रप्रवरांच्या रूपाने विवाहसंबंध होण्याची सवड पुनरपि दूरावली हे स्पष्टच आहे.