’ पिकले तर विकले ’ , व आडात असेल तर पोहर्यात येईल ’ अशा दोन म्हणी मराठीत प्रसिध्द आहेत; पण त्याप्रमाणे सर्वकाळ स्थिती असतेच असे नाही. माल पिकलाच नाही, तर तो विकता येत नाही, ही गोष्ट खरी, पण विकत घेणाराच कोणी नाही तर माल पिकविण्याची खटपट तरी कोण करितो ? पोहर्यात पाणी येण्याला ते मूळ आडात असले पाहिजे हे खरे, पण पोहर्यातल्या पाण्याची अपेक्षा करणारा कोणी असेल तरच आडात पाणी आहे की नाही याची कोणी तरी चौकशी करील. समाजाचे लक्ष जोपावेतो गुण आणि कर्म यांच्या सुव्यवस्थितपणाकडे असेल, तोपावेतोच व्यक्तीकडून या गोष्टी संभाळण्याचा यत्न होईल ; परंतु समाजच त्यांची किंमत मानणारा नसला अगर मानीनासा झाल, तर त्यांचा व्यवस्थितपणा संभाळण्याचा यत्न कोणीही करणार नाही.
आमच्या प्राचीन आर्यमंडळात संस्कारपध्दतीस मोठा मान आहे. कारण त्या वेळी गुण आणि कर्म यांजकडे समाजाचे लक्ष असे, व त्यांच्या पोषणाकरिताच ही पध्दती घातली गेली होती. परंतु उत्तरकाळी गुणकर्मोकडे कोणीच ढुंकुन पाहीनासे झाले; त्यामुळे अर्थातच त्या संस्कारांचीही किंमत नाहीशी होण्यास सुरुवात झाली. क्वचित कोठे ती दिसली, तरी ती खरी नसून तिच्या मूळ हेतूचाही विपर्यास झालेला असावयाचाच. आजच्या स्थितीत ब्राह्मणांची मुंज ही विद्यारंभाची दर्शक प्रायश: होत नसून केवळ वाढत्या वयात शरीरप्रच्छादनाकरिताच होत असते. फार कशाला, नुकतीच मुंज कोठे होते आहे नाही, तोच मुलाने विद्याभ्यासाकरिता जाऊ नये, ’ सबब तुला आपली मुलगी मी देतो, ’ म्हणून त्याला सांगण्याला त्याचा मामा तयारच असतो !!
सोडमुंज करावयाची ती ब्रह्मचर्यदीक्षेच्या परिसमाप्तीची खूण असा पूर्वीचा रिवाज होता, त्याचीही पण अशीच दुर्दशा उडून गेली आहे. विद्यारंभाजी किंवा ब्रह्मचर्यव्रतरक्षणाची अपेक्षा न धरिता मुंजीपासून लागलीच सोडमुंज उरकून घेण्यात येते. क्वचित प्रसंगी सोडमुंज अडचणीच्या कारणाने होण्याची राहिली, तर तिचा उपयोग सोयरसुतक बाधू नये इतक्यापुरताच मानण्यात येतो. हल्लीच्या युगात क्षत्रिय व वैश्य हे दोन्ही वर्ण लुप्त झाले आहेत असे ब्राह्मण मानितात ; परंतु आपण या वर्णाचे आहोत असा अभिमान बाळगणारे लोक कोठे कोठे असले, तरी त्या लोकांत मुंजीच्या खर्या स्वरुपाचे ज्ञान प्राय: नसल्यामुळे शास्त्राच्या समजुतीने आपणास वेद शिकविण्याचा अधिकार आहे अशी कोरडी बडबड मात्र होते, परंतु वेदांकडे कोणी वस्तुत: ढुंकुनही पाहात नाही. आपणास क्षत्रिय समजणार्या जाती खर्या, पण त्यांची मुंज लग्नाच्या अगोदर फार तर दोनचार दिवस इतकी उशीरा होते. इतर कित्येक जातींत जानवे गळ्यात अडकविण्यात येते, पण त्यांचीही वेदाध्ययनासंबंधाने अशीच दुर्दशा आहे.
या कामी कित्येक लोक ब्राह्मणास बोल लावितात, परंतु तो वाजवी नव्हे ; कारण या कामी मुळातच ज्याची त्याला कळकळ नाही. ही कळकळ नसल्यामुळे ब्राह्मण लोक या सर्वोस शूद्र समजतात, व प्राचीन काळच्या शास्त्रकर्त्यांनी घालून दिलेल्या संस्कारपध्दतीची नुसती थट्टा तेवढी मात्र होत राहते, असा सांप्रताचा प्रकार आहे.