आनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
विश्वमित्र राजा मूळचा क्षत्रिय असता प्रसंगविशेषाने त्याला ब्राह्मणवर्णात येण्याची इच्छा झाली, व त्याच्या दीर्घ प्रयत्नांने ती अखेर सिध्दीसही गेली. ब्राह्मण होण्यासाठी त्याने भगीरथ प्रयत्न केले; परंतु दीर्घकाल चालत आलेल्या आनुवंशिक पध्दतीमुळे ब्राह्मणांना जातीमत्सर वाटून त्यांनी त्यास आपल्या वर्णांत येऊ दिले नसेल; किंवा कदाचित ब्राह्मणांचे गुण त्याच्या अंगी पूर्णपणे आले नव्हते, म्हणून वसिष्ठासारख्या शान्तिधन, ब्राह्मणाने त्याचे ब्राह्मणत्व कबूल करण्याचे नाकरलेही असेल. कसेही असो, विश्वामित्राचे ब्राह्मणत्व स्थापित होईपर्यंत त्याला दीर्घ प्रयास पत्करावे लागले, व अखेर त्याची निष्ठा, त्याचे आचरण, इत्यादि कारणांनी त्याच्या प्रयत्नास यश येऊन तो ब्राह्मण बनला हे निर्विवाद आहे.
या उदाहरणावरुन इतके खचित सिध्द होते की, विश्वामित्राच्या वेळी आनुवंशिक वर्णपध्दती प्रचारात होती असे जरी मानले, तरी ज्या ठिकाणी खरे गुण व खरी कर्मे दृष्टीस पडली, त्या ठिकाणी प्रत्यक्ष वसिष्ठासारख्या परमपूज्य समाजनेत्यानेसुध्दा आनुवंशिक वर्णपध्दती एकीकडे ठेवून गुणकर्मानुसार वर्णपध्दतीचा अंगीकार केला. अर्थात अज्ञानी जन वर्णपध्दतीस आनुवंशिक किंवा कशीही मानोत; परुंतु जे खरे ज्ञाते, त्याच्या दृष्टीने मूळची खरी वर्णपध्दती म्हटली म्हणजे गुणकर्मानुसार व्यक्तिनिष्ठ अशीच होती हे नि:संशय आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP