सुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
स्त्रीवर्गाची सामान्यत: आता वर्णिल्या प्रकारची स्थिती आहे, व ती आपणास जुलुमाची अगर दु:सह वाटते अशी त्यांच्याकडून जर फ़िर्याद अगर कुरकुर नाही, तर समाजसुधारणेच्छू लोकांनी तरी त्यांच्याबद्दल हा नसता उपद्वयाप काय म्हणून करीत राहावे ? सामाजिक सुधारणेस प्रतिकूल असलेल्या मंडळीकडून आता लिहिल्या प्रकारचा प्रश्न पुष्कळ प्रसंगी विचारण्यात येतो, व तो प्रश्न वावगा अगर खोटा आहे असे प्रत्यक्ष सुधारणावाद्यांच्यानेही म्हणवणार नाही.
गोष्ट खरी, तथापि हाच प्रश्न प्रतिकूल पक्षाकडून दहा पंधरा वर्षांपूर्वी जितक्या जोराने विचारण्यात येत असे, तितक्या जोराने आज ते तो विचारू शकत नाहीत, हे लक्षात आणिले, म्हणजे त्या पक्षाच्या मनाचीदेखील चलबिचल झाली आहे, व स्त्रीवर्गासंबंधाने अजून काही थोडी वर्षेपावेतो विचार करण्याचे लांबणीवर टाकिले, तरी पुढेमागे हा प्रश्न आपोआपउचल खाल्ल्याशिवाय राहावयाचा नाही, ही गोष्ठ त्या पक्षासही थोडीबहुत जाणवू लागली आहे असे म्हटल्याशिवाय गत्यंतर राहात नाही.
देशात उत्तरोत्तर दारिद्र्य वाढत चालल्यामुळे असो की इतर निराळ्या कारणांमुळे असो, निदान पुरुषवर्गापुरती तरी बालविवाहाची प्रवृती पुष्कळ अंशांनी कमी होत चालली आहे यात संशय नाही. स्त्रीविवाहाची मुदत अद्यापि रजोदर्शनकालाच्या जवळ जाऊन भिडली नाही, तथापि तिची गती त्या कालाच्या बाजूकडेच आहे हे कोणीही मनुष्य सामान्य निरिक्षणाने जाणू शकेल. अशा रीतीने उत्तरोत्तर सुधारणा होतेच आहे, व ती होणे अनिष्ट नाही, म्हणून नुसते कालप्रतीक्षण करीत राहण्यापेक्षा त्या दिशेने उद्योग होणे अधिक श्रेयस्कर वाटत. कोणास वाटत नाही, किंवा वाटत असले तरी कित्येक लोक तटस्थ वृत्तीने राहतात, - एवढेच काय ते खरे अंतर आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP