पुण्याची ही लटपट एका वेळेपुरती झाली, तिच्या पुढच्या इतिहासाची पंचाईत करणे नको. तात्पर्य सांगवयाचे ते इतकेच की, तेव्हापासून सामान्यत: रूढिभक्तांना - व समाज बहुतेक त्यांचाच आहे - स्त्रीपुनर्विवाह ही कल्ल्पनाच दु:सह वाटत राहिली आहे. तिचा शास्त्राशी संबंध असो वा नसो, त्याची पंचाईत कोणासच नको असे आहे. तरी केव्हा केव्हा व्यक्ती-व्यक्तींचे तंटे होतात. व अशा वेळी एखादे प्रसंगी पुन: शास्त्रार्थाची तेवढ्यापुरती नवीन लटपट होते.
पूर्वीच्या वादप्रसंगी अथर्ववेदातील वचन पुढे आले नव्हते, त्यामुळे त्या वेळी त्याबद्दल कोटिक्रम लढविण्याचे कारण पडले नव्हते. हे वचन मागाहून बाहेर पडले, तेव्हा त्याची कशी तरी वाट लाविलीच पाहिजे, व तीही स्त्रीपुनर्विवाहास अनुकूल न होईल अशी, - तेव्हा अर्थर्ववेद हा वेदत्रयीच्या बाहेरचा, व त्याची प्रवृत्ती जारण, मारण, इत्यादी कर्मांकडे; यासाठी त्या वेदातील वचनास विधिप्रतिपादकत्वाची योग्यता देण्याचे कारण नाही, ही नवीन कोटी कित्येक पंडितांनी काढिली आहे. तसेच स्त्रियांच्या पूर्वीच्या विवाहाचा जसा विधी सांगितला आहे, तसा पुनर्विवाहाचा विधी कोठे सांगितला नाही, व पराशरस्मृतीत परवानगी लिहिली आहे, ती तरी अगदी अखेरी-अखेरीस प्रायश्चित्तखंडात आली आहे.
तेव्हा एकंदरीत पुनर्विवाहास शास्त्राची अनुकूलता मानावयास नको, अशा अर्थाचेही काही काही कोटिक्रम निघाले आहेत. दुर्दैवाने - अगर तेवढ्यापुरते सुदैवानेही म्हणू - अलिकडे प्लेगच्या रोगाने बालविधवांच्या संख्येची वृद्धी करण्याचा क्रम अंगीकारिला आहे, तेव्हा इच्छा - अनिच्छा वगैरे सर्व प्रकार एकीकडे ठेवून या वाढत्या संख्येची काही तरी वाट लाविण्याचा प्रसंग थोडक्यात काळाने केवळ अपरिहार्य होणार आहे यात संशय नाही. ही पाळी आली म्हणजे त्या वेळी वेद, स्मृती, पुराणे, यांपैकी एकाचीही पंचाईत कोणी करणार नाही. तथापि थोडीशी पंचाईत कोणी करण्याचे मनात आणिले तर त्याने साधारणत: पुढील गोष्टी ध्यानात ठेविल्या असता पुरेसे होईल :
( अ ) ब्राह्मणात पुनर्विवाहची चाल होती : अर्थववेद हा वेदत्रयीपैकी नसला, तरी तो प्राचीन वेद आहे; व त्यात पुनर्विवाहाचा उल्लेख आहे. यावरून प्राचीन काळी ब्राह्मणवर्गात थोडीबहुत तरी चाल होती हे नि:संशय आहे. उत्तरकालीन स्मृतींतून पौनर्भव ब्राह्मणांस पंक्तिबाह्य ठरविले आहे, यावरून ब्राह्मणवर्गातही पुनर्भू म्हणजे पुनर्विवाहित स्त्रिया असत हे स्पष्टच आहे.
( आ ) क्षत्रियांत पुनर्विवाह होत असत : उलूपी नावाची नागकन्या विधवा होती, ती अर्जुनाने वरल्याची कथा महाभारतात वर्णिली आहे. त्याप्रमाणेच दमयंतीने पुनर्विवाहाचा पुकारा केल्यामुळे तिला वरण्याकरिता ऋतुपर्ण इत्यादी राजे दूरदूर देशांहून धावून आले ही कथाही त्याच ग्रंथांत आली आहे. अधर्माचा वाटला नाही हे निर्विवाद आहे. तेव्हा या सर्व गोष्टींवरून क्षत्रियवर्णात पुनर्विवाहाची चाल होती यात संशय नाही.
( इ ) मूळ कृत्याचा विधी तोच त्या पुनरावृत्तीचाही विधी : कोणतेही धर्मकृत्य पहिल्याने वर्णावयाचे असल्यास त्याबद्दलचा विधी सूत्रादिकात सांगितला असतो, तसा तो त्या कृत्याच्या पुनरावृत्तीच्या प्रसंगी सांगण्याची चाल नाही. उपनयनाचा विधी सांगितला, पण पुनरुपनयन हे प्रायश्चित्तात्मक असल्याने त्याबद्दल निराळा विधी कोठे वर्णिला नाही. त्याचप्रमाणे मूळ विवाहाचा विधी एक वेळ सांगितल्यावर प्रायश्चित्तपूर्वक होणार्या पुनर्विवाहाच्या कृत्याकरिता निराळा विधी सांगणे नको. पुनर्विवाहाचे कृत्य अथर्ववेदात आले आहे. त्या ठिकाणी अजौदनाचे प्रायश्चित्त सांगितले आहे. जो विधी प्रथम विवाहाचा, तोच विधी पुनर्विवाहाचा समजण्यास प्रत्यवाय नाही.
( ई ) पराशरमते स्त्रीपुनर्विवाहाची योग्यता : पुनर्विवाहकृत्य हे काही मोठे मंगल कृत्य आहे अशा भावनेने कोणी करीत नाही. त्याचा आश्रय केवळ निरुपाय म्हणून करावयाचा असतो. तेव्हा पराशरस्मृतीत पुनर्विवाहविधायक वचन अखेर प्रायश्चित्तप्रकरणी आले यात आश्चर्य वाटण्याचे, अगर त्यावर अश्रद्धा ठेविण्याचे काही विशेष कारण नाही.