येथपर्यंत केलेल्या विवेचनावरून, शास्त्राचा म्हणा अगर रूढीचा म्हणा, स्त्रीजातीवर केवढा जुलूम आहे याचे स्वरूप विचारी मनुष्याच्या मनात थोड्याबहुत अंशाने तरी आल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक विचारदृष्ट्या पाहू गेल्यास खरे माहात्म्य काय ते एकट्या रूढीचेच आहे, व शास्त्र केवळ आयते वेळी अंगावर ओढून घेण्याचे वाघाचे अगर सिंहाचे कातडे आहे. लोकसमाजात आजमितीस जे व्यवहार चालतात, त्यांत धर्माशी पदोपदी दृष्टीस पडणारे आहेत. ते केवळ एका रूढीच्याच जोरावर चालतात, व त्यांत काही अंश असला तरी त्याकडे समाजाचे लक्ष बिलकुल जात नाही.
पुरुषवर्गाकडून स्त्रीवर्गासंबंधाने जे अनुदार वर्तन एक वेळ सुरू झाले, तेच जनसमाजात इतके काही रूढ होऊन गेले आहे की, होणारा जुलुमही स्त्रीवर्गाच्या अंगी पक्का खिळून जाऊन, ‘ आपले जिणेच असे, व ते परमेश्वराने घडविले आहे त्याहून निराळे व्हावे अशी इच्छा करणे हे पाप होय, ’ अशा तर्हेने उद्गार प्रत्यक्ष स्त्रीसमाजाकडूनच अनेक प्रसंगी ऐकू येतात. ज्या गोष्टींचा संबंध केवळ समाजाच्या सुखाशी अगर सोईंशी, त्या गोष्टी स्त्रियांना ईश्वराच्या घरच्या धर्माप्रमाणे वाटतात, व त्यांचा विरुद्ध ब्र काढणे हे महापातक होय अशी स्त्रीवर्गाची विलक्षण दृढ समजूत झालेलीच प्राय: सर्वत्र दिसते. याचा परिणाम असा झाला आहे की, स्त्रीविवाहस्वातंत्र्यासारख्या एखाद्या गोष्टीचे त्यांच्यापुढे नुसते नाव निघाले, तरी ते त्यांना दु:श्रव होते, व प्रसंगी त्यांच्या सर्वांगावर भीतीचे शहरे उठतात.
पुरुषांची बरोबरी करणे अगर त्या बरोबरीची कल्पनादेखील मनात येऊ देणे, हे त्यांच्या समजुतीने नरकाचे साधनच होऊन बसले आहे. आपली स्थिती वस्तुत: शोचनीय आहे ही गोष्ट त्यांना कळत नाही असे नव्हे, पण कसली तरी ती ईश्वराच्या इच्छेस अनुसरून आहे या दृढ समजुतीमुळे त्यांनी दैववादाचा आश्रय पत्करला आहे. आमचे नशीबच असे, मग हातपाय हालविण्याचे कारणच उरले नाही, असे म्हणून त्या आपले संपूर्ण आयुष्य कंठण्यासही तयार, अशी स्थितीच प्राय: जिकडे पाहावे तिकडे होऊन बसलेली आढळते. ही स्थिती इतकीच राहून जर तिचा झोक पुढे आणखी निराळ्या पातकी कल्पनांकडे जाण्याचा नसता, तर ती स्थिती आहे तशीच राहू देण्यासही मोठीशी हरकत वाटण्याचे कारण न पडते. परंतु चमत्कार हा की, या स्थितीमुळे भ्रूणहत्या इत्यादी ज्या कित्येक धडधडीत अनीतीच्या गोष्टी समाजात शिरल्या आहेत, त्या घालविण्याकरिता एखादा नीतिप्रद उपाय कोणी सुचविला तर तो मत्र स्त्रीवर्गाला दु:सह होतो !