गोत्राच्या प्रश्नाचे वरील कलमात जे पोटविभाग दर्शविले, त्यांचा आता क्रमश: विचार कर्तव्य आहेअ.
( अ ) ( १ ) माहेरचे गोत्र ( पितृगोत्र ) : कन्येचे दान पुरे झाल्यावर तिचे पहिले गोत्र सुटले व ती पत्नी या नात्याने नव्या गोत्रात शिरली हे खरे आहे, तथापि दानकर्त्याने कन्येस गोत्र बदलू दिले, ते विशेष अटीवर होते. कारण दानप्रसंगी ‘ अव्यंगे पतिते श्लीबे दशदोषविवर्जिते ’ या वचनावरून ‘ वराच्या अंगी काही अपूर्णता नाही, तो पतित म्हणजे धर्मभ्रष्ट झालेला नाही, तो नपुसक नाही, व कुष्ठरोग, अपस्मार इत्यादी दहा दोषांपासून तो अलिप्त आहे ’ अशी दात्याची समजून होती. ही समजूत जर खोटी ठरली, तर केलेल्या अटीप्रमाणे वर्तन वरपक्षाचे नव्हते हे स्पष्ट होय. अर्थात कन्या आपले नवीन गोत्र सोडून पित्याच्या गोत्राकडे परत येण्यास पात्र आहे, व तिने येते म्हटल्यास कन्यादात्यास कन्येला आपल्या गोत्रात परत घेता यावे.
पराशरवचनात पतित व क्लीब हे दोन्ही दोष सांगितले आहेत. तसेच वराचे स्वाधीन कन्या करिताना ‘ प्रजोत्पादनार्थं तुभ्यमहं संप्रददे ’ या वाक्यावरून वराकडून प्रजा उत्पन्न होण्याचे अट कन्यादाता बोलला होता हे स्पष्ट दिसते. परंतु वर नष्ट झाला, अथवा मृत झाला, अर्थवा प्रव्रजित ( संन्यासी ) झाला, व त्यामुळे त्याच्याने केलेली अट पाळवली नाही; सबब दात्यास न्यायाने पर - गोत्रातून कन्येला आपल्या गोत्रात परत येऊ देण्यास अडचण पडू नये.
यदाकदाचित स्त्रीला प्रजा झाली असली, तरी क्षेत्रापेक्षा बीजाचा मान मोठा हे धर्मशास्त्राचे तत्त्व आहे, त्या आधारे प्रजा बीजाच्या ( पित्याच्या ) गोत्रात राहील. परंतु पुढे प्रजा होत राहण्याचे बंद पडण्यास वराची ही स्थिती कारणीभूत झाली हे काही खोटे नव्हे. अर्थात याची जबाबदारी स्त्रीवर्गाकडे राहण्याचे काही कारण नाही, व यावरून ते गोत्र सोडून परत पहिल्या गोत्रात जाण्याचा तिचा हक्क असला पाहिजे, व त्याप्रमाणे तिला वर्तन करण्यास मोकळीक असणे योग्य आहे.
( ब ) ( २ ) सासरचे गोत्र : वरकडून आता दर्शविल्याप्रमाणे अटी पाळवल्या नाहीत, सबब तो अगर त्याच्या गोत्रातील लोक स्त्रीस आपल्या गोत्रातून घालवू शकणार नाहीत; तथापि ती स्वत:च जाण्यास कबूल असेल तर तिचा परत जाण्याची बंदी करण्यास अधिकार त्यांजकडे राहू नये, एवढेच नव्हे, तर स्त्रीची इच्छा सासरचे गोत्र सोडून नव्या गोत्रात जाण्याची झाल्यास त्या कामी मदत देण्याची जबाबदारी वरपक्षावर रहावी.
( क ) ( ३ ) ( अ ) आणि ( ब ) पोटकलमांत लिहिल्याप्रमाणे पुनर्विवाहेच्छून स्त्रीचा हक्क माहेरच्या व सासरच्या अशा दोन्ही गोत्रांवर असून शकेल; तथापि त्य अदोहोत तारतम्याच्या दृष्टीने माहेरचे गोत्र मानणे अधिक सोईचे होईल. वस्तुत: कोणतेही गोत्र घेतले, तरी त्याचा उच्चार काय तो दानप्रसंगी एकदाच व्हावयाचा असतो; तथापि दुर्दैवाने दुसर पतिही स्त्रीस न लाभल्यास विवाहपरंपरा आणखी पुढे चालू राहणे शक्य असते. यामुळे सासरच्या गोत्राचा उच्चार करीत जाण्याचे म्हटल्यास प्रत्येक प्रसंगी गोत्रोच्चार व नामोच्चार निरनिराळे होत जातील, त यांऐवजी कायमचा एक माहेरघरचाच गोत्रोच्चार राहिलेला बरा. हा एक उच्चार कायमचा मानिला असता हल्लीच्या दानपद्धतीत ‘ अमुक गोत्रात जन्मलेली, अमक्याची नात, अमक्याची कन्या, व अमुक नावाची ’ या अर्थाचे संस्कृत भाषेतील एक वाक्य म्हणण्याचा जो परिपाठ आहे तोही कायम राहील.