आनुवंशिक पध्दती अस्वाभाविक ग्रहाची होय
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
ही अशी थट्टा होण्याचे वास्तविक कारण म्हटले आपण चुकीचे स्वीकारलेली वर्णव्यवस्थेची आनुवंशिकताच होय. यापेक्षा गुणाकर्मानुसार वर्णव्यवस्था असती, तर प्राचीन काळच्या ऋषिवर्योच्या संस्थाच्या योग्य बोज राहून समाजाचे कल्याणही अधिक होऊ शकले असते. सूर्याच्या पोटी शनैश्वर, व हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हाद, अशी विपरीत गुणांची संतती कधीच न होणे अत्यंत दुर्निवार्य आहे, यासाठी वृथा ममत्वास न भुलून आमच्या पूर्वजांनी ही आनुवंशिक पध्दती चालू केली नसती, तर फार चांगले झाले असते.
बालक जगांत प्रकट होण्यापूर्वीच ते अमुक प्रकारचे होईल असे सांगण्याचा बाणा आमचे ज्योतिषशास्त्र मिरविते. हेच शास्त्र मुलांच्या पत्रिकेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैशय व शूद्र यापैकी अन्यतम वर्णाची व्यवस्थाही दाखवून देते, परंतु त्या शास्त्रावर तरी आमचा खरा भरंवसा कोठे असतो ? दर्शनी मात्र हे शास्त्र खरे आहे असे आपण मानितो, व व्यवहारात त्याचे सहाय्य पदोपदी घेण्यासही तयार असतो. परंतु त्या शास्त्राप्रमाणे जी वर्णव्यवस्था गणण्यात येते, ती पत्करण्यास मात्र कोणी तयार नाही. शास्त्रात जर काही खरेपणा असला, तर ते आपला प्रभाव दाखविल्याशिवाय कधी रहावयाचे नाही; अर्थात या शास्त्रावरुन प्राप्त होणारी वर्णव्यवस्था ही निराळ्या कृत्रिम वर्णव्यवस्थेपेक्षा समाजाचे कल्याण अधिक प्रमाणाने करील हे नि:संशय आहे.
मुलाची जनक मातापितरे कोणत्याही वर्णाची असोत, त्याचे मूल नालच्छेदनापूर्वी जर ब्राह्मणाने आपल्या घरात आणून बाळगले, तर त्या मुलाची गणना ब्राह्मणात करण्यास आपण आजमितीसही तयार असतो. ब्राह्मण मातापितरांचे मूल नालच्छेदनापूर्वी ब्राह्मणात न करिता त्या त्या विशेष वर्णाच्या पोटी करितो. यावरुन विशिष्ट जननाशी वर्णव्यवस्थेचा काही संबंध आहे असे मुळीच मानिता येत नाही. नालच्छेदना संबंधाने जर वर्णव्यवस्था निराळी होऊ शकते, तर आनुवंशिक वर्णव्यवस्था ही मूळची नव्हे, व ती अस्वाभाविक व दुराग्रहमूलक असली पाहिजे, हे स्पष्टच होय.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP