स्त्रियांस अनेक पती होत नाहीत : येथपर्यंत केलेल्या विवेचनावरून स्त्रीजातीला विवाहाच्या बाबतील वास्तविक अडचणी काय आहेत हे स्पष्ट होण्याजोगे आहे. स्त्रियांना केव्हाच स्वातंत्र्य नसावे अशाविषयी शास्त्रकर्त्यांचा केवढा कटाक्ष आहे तो मागे सांगितलाच आहे. पित्याच्या घरातून त्या एकदा बाहेर पडल्या म्हणजे पुढे जन्मभर त्यांनी ‘ अंकित पदांबुजाची दासी ’ हे वाक्यच काय ते आपला तारक मंत्र होय असे समजावे, व निरंतर पतिसेवेत तत्पर असावे, इत्यादी अनेक प्रकारचे स्त्रीधर्म शास्त्रकारांनी वर्णिले आहेत, ते येथे सविस्तर सांगण्याचे काही कारण नाही. समंजस पती असला, तर तो पत्नीस विनाकारण छळीत नाही, व तिची संसारयात्रा नम्रभावाच्या स्थितीतच का होईना, पण सुखाची होऊ शकते.
संसारात सुखप्राप्तीस अवश्य अनेक गोष्टी आहेत, पण त्या सर्वांत श्रेष्ठ म्हटली म्हणजे पुत्रसंततीचा लाभ ही होय. हा लाभ झाला तर स्त्रीजातीस पारतंत्र्यास्थितीतही सुखाची सहसा वाण पडत नाही; पण तो लाभ दीर्घकाळापर्यंत न झाला तर मात्र उरावर सवत उभी आहेच असे समजण्याची पाळी येते. आपणाला एक स्त्री आहे, तेव्हा तिचे जीवमान आहे तोपावेतो आपण दुसरी करू नये ही कल्पनाही पुरुषाच्या मनात कधी येत नाही. “ यथैकस्मिन्यूपे द्वे रशने परिव्ययति तस्मादेको द्वे जाये विंदते । ” हा काय तो त्याचा वेदमंत्र !
या मंत्रात पुरुषाला यज्ञातील स्तंभाचे उपमा दिली आहे व ज्या अर्थी यज्ञात या स्तंभाला एका काळीच दोन दोर्यांनी वेढिता येते, त्या अर्थी त्या रूपकास अनुसरून पुरुषास एका काळीच दोन स्त्रियांची प्राप्ती होऊन शकते असा या मंत्राचा अर्थ आहे. या ठिकाणी ‘ दोन ’ म्हणजे ‘ दोनच ’ असा अर्थ न समजता, ‘ एकीहून अधिक ’, अर्थात संख्येने पाहिजे तितक्या स्त्रिया वरण्यास आपणास मोकळीक आहे, - अर्थात एकसमयावच्छेदेकरून आपणास अनेक स्त्रिया बाहूंनी वेढू शकतील, - असा अर्थ पुरुषवर्गाने ठरवून टाकून तो अंमलातही आणिला आहे. मात्र हा अर्थ अंगीकारताना त्याने आपल्या मनाची जेवढी उदारता प्रकट केली, तेवढी उदारता याच मंत्राच्या पुधच्या मंत्रभागाचा अर्थ करिताना त्याने दाखविली नाही हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. हा पुढील मंत्रभाग ‘ नैकस्यै बहव: सहपतय: ’ असा आहे व त्याचा खरा अर्थ कोणाही स्त्रीला एकाच काळी एकाहून अधिक पती असावयाचे नाहीत. अर्थात एका पतीशी असलेला स्त्रीचा संबंध संपल्यावर तिला दुसर्या पतीशी संबंध करिता येईल, असा सरळ आहे. यज्ञातील स्तंभास गुंडाळलेली दोरी नियमित लांबीची असते, व यज्ञात अनेक स्तंभही एकत्र नसतात, यामुळे एकाच दोरीने एकसमयावच्छेदेकरून अनेक स्तंभांस गुंडाळता येत नाही हे खरे, तथापि यज्ञक्रिया आटोपून गेल्यावर त्या दोरीचा नाश करण्यात येतो काय ? दोरी काय राहून पुन: दुसर्याने यज्ञ करण्याचा प्रसंग आला असता नव्या यज्ञस्तंभास तीच दोरी गुंडाळिता येईल की नाही ? जर येईल व येते, तर या स्थितीच्या अनुमानाचा लाभ पुरुषांनी स्त्रियांस का देऊ नये ? पुरुषजात स्वभावत: परबळ, व तशातून शास्त्रे करण्याचा व ती अंमलात आणण्याचा तेवढ्या पोळीवर सर्व तूप ओढून घेण्याचा यत्न केला. स्त्रीजातीने विवाह करावयाचा तो एकदाच काय तो, असा निर्बंध त्यांनी केला, व यामुळे असलेल्या एका पतीचा संबंध तरी पुढे स्त्रियांना आजन्म पतिविरहित स्थितीत राहण्याचीच पाळी आली !
न्यायानेच विचार करावयचे म्हटले, तर पुरुषाला ज्याप्रमाणे एकाच काळी एकीहून अधिक स्त्रिया असू शकतात, त्याप्रमाणे स्त्रीसही एकसमयावच्छेदेकरून अधिक पती असण्यास प्रत्यवाय असू नये. महाभारतग्रंथाची नायिका द्रौपदी ही एकाच काळी पाच पांडवांची पत्नी होती हे प्रसिद्ध आहे; परंतु हे उदाहरण दैविक संबंधाने आहे, ते तुम्हाआम्हा माणसांच्या उपयोगाचे नाही, एवढ्या साध्या कोटिक्रमावरच आमच्या समाजाचे समाधान होऊन बसते !