या योगाचा फायदा बहुतेक अशक्यच
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
स्त्रियांस ऋतू प्राप्त होण्याचा साधारण काळ त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी मानिला आहे, हे प्रसिद्धच आहे. सोईकरिता हे बारावे वर्ष पुरे होते असे मानिले, व त्यानंतर पित्याकडून आपले दान होण्याची वाट तीन वर्षे पाहावयाची असे म्हटले, तर स्त्रिया पुर्या पंधरा वर्षांच्या झाल्या म्हणजे त्या आपल्या मुखत्यारीवर स्वत:स पती प्राप्त करून घेऊ शकतात, असे सरळ अनुमान निघते. परंतु इतक्या वयात स्त्रियांना विद्येचा व्हावा तितका लाभ होऊ शकेल अगर कसे हा मोठा अवघड प्रश्न आहे. पुरुषाच्या मुंजीचा काळ व त्याच्या पुढचा ब्रह्मचर्याचा काळ मिळून त्याच्या वयाची वीस वर्षे होतात, व या इतक्या अवकाशात त्याचा विद्याभ्यास पुरा होऊ शकतो, एवढेच नव्हे, तर विवाह्य वधूपेक्षा त्याचे वय पाच वर्षांनी अधिक असले पाहिजे या वैद्यकशास्त्राच्या नियमास अनुसरून पाहू गेल्यासही पंधरा वर्षांची वधू स्वत:च्या इच्छेनुरूप करून घेण्यास तो पात्र होतो यांत संशय नाही.
स्त्रीचे वय पंधरा वर्षांचे झाले, तथापि तितक्या वयात ती मात्र विद्येच्या बाजूने कच्ची व लौकिक व्यवहाराविषयी अननुभवीच राहणार. तेव्हा एकंदरीत विचार करू गेल्यास एवढ्याशा वयात शास्त्रकारांच्या दृष्टीने ती कितीही मुखत्यारीण होत असली, तरी निदान आणखी काही वर्षे तरी तिचे दान करण्याचा अधिकार तिच्या पित्रादी वर्गाकडेच रहावा हे इष्ट होईल. पित्रादिक कदाचित हा अधिकार न वापरता तिचे वय पुरुषाप्रमाणे वीस वर्षांचे होऊ देण्यास तयार होतील, तर फ़ारच चांगले; व त्याप्रमाणे त्यांची तयारी असेल तर त्यांनी तोपावेतो तिजकडून विद्यार्जन करवावे, व नंतर तिला विवाह करणे अगर न करणे हा दोन्ही बाबतींत स्वातंत्र्य द्यावे, असे खुशाल म्हणता येईल. परंतु कन्या इतक्या वयाची होऊ देण्यात तयार होण्याचीच जेथे मारामार तेथे इतकी लांबवरची आशा करीत राहणे हेच मुळी चुकीचे म्हणावे लागेल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP