स्त्रीपुरुषांचे विवाहस्वातंत्र्य
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वरील कलमात निर्दिष्ट केल्याप्रमाणे सवर्ण विवाहांची योजना करावयाची म्हटले तरी ती करावयाची कोणी ? हिंदुस्थान देशात राहणार्या आर्यमंडळात आजमितीला ही योजना प्राय: वधूवरांच्या मातापितरांकडून अगर पालकांकडून होते; व सांप्रतकाळची बाळपणी लग्न करण्याची पद्धती जोपर्यंत आहे अशीच चालू राहील, तोपर्यंत ही योजनाही निराळ्या रीतीने होऊ शकावयाची नाही. पुरुषवर्गात ही पद्धती हळूहळू म्हटले तरी काही ठिकाणी बरीच कालावधी लागेल. विवाह हा संबंध जन्माचा पडला, तेव्हा जन्मभर होणारी सुखदु:खे भोगण्यापुरती तेवढी वधूवरे मालक, बाकी ती सुखदु:खे स्वत:च्या कृतीने घडवून आणून आयते वेळी निसटून एके बाजूस निघून जाणारी माणसे निराळीच, असा हल्लीचा प्रकार आहे. हा प्रकार सर्वथा अनिष्ट होय.
कोणतीही गोष्ट एकदा घडून आली, म्हणजे मग ती बरीवाईट कशीही असली तरी निरुपायास्तव अखेरपर्यंत ती कशीबशी तरी निभावून घ्यावी लागते. पण ही पाळीच आपणावर यावयास नको अशी वास्तविक इच्छा करणार्या माणसावर हा असा जुलूम तरी काय म्हणून असावा ? आपणास विवाहाचे जोखड मुळीच घ्यावयाचे नाही, व आपला आयुष्यक्रम अमुक एक प्रकारे निराळ्या तर्हेने राखू, अशी उमेद बाळगणार्या पुरुषास त्याच्या मनाप्रमाणे वागण्यास अडचण काय म्हणून व्हावी ? स्त्रीवर्गापैकी कोणाची इच्छा याच प्रकारची असेल, तर तिलादेखील पुरुषाप्रमाणे अविवाहित का राहता येऊ नये ? प्राचीनकाळी अशा प्रकारचे स्वातंत्र्य दोन्ही वर्गांस होते, मग ते आताच्या काळीही त्यांजकडे असून देण्यास हरकत कोणती ? त्या वेळी स्त्रियांस ब्रह्मवादिनी होता येत असे, व त्याकरिता त्यांना यज्ञोपवीत धारण करावे लागे; परंतु तशा प्रकारे विद्याग्रहणाचा मार्ग अलीकडे बंद झाला आहे. सांप्रतकाळी विद्या शिकण्याचा त्यांचा क्रम निराळ्या तर्हेचा आहे. तथापि विद्यार्जन करीत राहणे या दृष्टीने पूर्वीची व आत्ताची या दोन्ही स्थिती सारख्या मानण्यास प्रत्यवाय नाही. तशातून ज्यांना दीर्घकाळपर्यंत किंवा आजन्म विद्यादिक व्यसनात काळ घालविण्याची इच्छा अगर सामर्थ्य नसेल, त्यांना पूर्वीप्रमाणेच आताही सद्योवधू होण्यास अडचण नाही. कसेही असो; पुरुष काय किंवा स्त्री काय, उभयतांसही अशा बाबतीत स्वतंत्रता असणे जरूर आहे. विवाहस्थितीत शिरावयाचे असे ज्याच्या त्याच्या मनाने ठरविले, म्हणजे मग वराने वधूची, व वधूने वराची, आपापल्या समजुतीप्रमाणे निवड करावी हेही त्याचप्रमाणे अत्यंत इष्ट आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP