आतापर्यंतच्या विवेचनावरुन ’ सवर्ण ’ शब्दाचा सांप्रतचा अर्थ हा मूळ खरा अर्थ नव्हे, ही गोष्ट एक वेळ मान्य झाली की, हल्लीच्या स्थितीत केवळ वर्ण शब्दाच्या अर्थाच्या संकोचामुळे अस्तित्वात आलेला, ’जातिभेद हाही मूळचा खरा नव्हे ’ हे निराळे सांगण्याचे कारणच राहत नाही. जातिभेद सुटला, व गुणकर्मानुसार वर्णपध्दती एक वेळ अंगीकारण्यात आली, म्हणजे प्रारंभी काही काळपावेतो घरोघर जिकडे पाहावे तिकडे ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादि प्रकारच्या मिश्र समाजाची गर्दी भासत राहिल, व रोटी व्यवहाराची सांप्रतची कल्पना सुटून निदान कुटुंबातल्या कुटुंबात मिश्र पध्दतीची सहभोजने होऊ लागतील. कुटुंबातील व्यक्तीत वर्णभेद उत्पन्न झाल्याकारणाने पूर्वी होऊन गेलेल्या दंपत्यांत पुरुष एका वर्णाचे व स्त्रिया निराळ्या वर्णाच्या दिसू लागण्याची पाळी येईल, व निदान थट्टेपुरते तरी विवाहाचे ’ अनुलोम व ’ प्रतिलोम ’ हे प्रकार प्रचारात येऊन अंबष्ठादी अधर्मवर्णाच्या संततीचे नामघोषही प्रचारात शिरतील.
परंतु हे सर्व झाले, तथापि पर्जन्यकाळात उत्पन्न होणार्या पर्जन्यकीटकाचे जीवित असे अल्पकालिकच असते, त्याप्रमाणे आता वर्णिलेल्या प्रकारांचे आयुर्मानही अल्पकालिकच होत जातील, यात संशय नाही. उदाहरणार्थ, कुटुंबातील व्यक्तीव्यक्तीमध्ये वर्णसंबंधाने अगोदरचा मिश्रभाव काही असला, तरी नवीन होणारे दांपत्यसंबंध ’ सवर्ण पध्दतीचे म्हणजे ’ समान गुणकर्माचे ’ होऊ लागतील. ज्या व्यक्तीची गुणकर्मे भिन्न असली तरी इतर व्यक्तीच्या सुखांत व सोईस विघ्न आणणारी नसतील, अशा व्यक्ती तेवढ्या एकत्र राहून इतर प्रकाऱच्या व्यक्ती मात्र कुटुंबातून विभक्त होऊन निराळ्या राहू लागतील. आजच्या स्थितीत केवळ लोकलज्जेस्तव कुटुंबातील व्यक्तिविशेषास विशिष्ट प्रकारचे व्यवसाय अगर उद्योग करणे अवघड वाटते, ती स्थिती सुटून जो तो आपल्या अंगच्या गुणानुरुप अगर स्वेच्छेने आपल्या व्यवसायाची दिशा बदलील. प्रसंगी आपले घर सोडून दुरदेशी जाऊन राहण्याचे कोणास कारण पडेल, तर पूर्वी विवाहसंबंध न घडलेला मनुष्य तशा दूर ठिकाणीही आपल्या गुणकर्माशी जुळू शकणारा दांपत्ययोग कबूल करील; व कालान्तराने अशी भिन्न भिन्न स्थळी, विवाहित झालेली जोडपी कदाचित एकत्र राहण्यास गोळा होतील, अथवा दूर राहूनही इतर रीतींनी परस्परांच्या मित्रभाव व साहचर्य या प्रकारांचा उदय होईल. तात्पर्य मिळून इतकेच की, आजच्या स्थितीत आनुवंशिक पध्दतीहून निराळ्या पध्दतीचा अनुभव असल्यामुळे जो काही दुरुनच विनाकारण मोठा थोरला बागुलबोवा वाटत आहे, तशा प्रकारचा बागुलबोवा वाटून घेण्यासारखे दुसर्या पध्दतीत काही विशेष असेल असे मानण्यास काही कारण नाही.