वरील कलमात दर्शविलेल्या गोष्टी संभवनीय आहेत हे विरुद्ध पद्धतीचे आक्षेपक कबूल करतील, परंतु विवाहसंबंधाची धाव याच्याही पलीकडे, म्हणजे थेट परकीय राष्ट्रांपावेतोही जाऊन भिडते, ही कल्पना मात्र ते सोडणार नाहीत. मिसेस बिझांट, सिस्टर निवेदिता इत्यादिकांनी आपली मूळची राष्ट्रे सोडून नुसताच हिंदुस्थान राष्ट्राचा कायमचा आश्रय केला आहे, तेव्हा अशा प्रकारचे लोक या देशी येऊन त्यांनी एतद्देशीयांशी वैवाहिकसंबंध जोडणे हे शक्य आहे, याविषयी मतभेद असण्याचे कारण नाही.
असे संबंध जोडावयाचे, व तेही आर्यमंडळाच्या ‘ वर्ण ’ शब्दाच्या अर्थास न सोडिता आर्यधर्मास अनुसरून जोडावयाचे, या कल्पनेच्या इष्टानिष्टतेबद्दल परस्परविरुद्ध पक्षीयांमध्ये कदाचित कायमाचा मतभेद राहील; परंतु सांप्रतच्या देशस्थितीत या मतभेदाचा तात्कालिक निकाल करण्याचे कारणही काही नाही, सबब हा विषय इतकाच सोडिला असता चालेल. आमच्या पूर्वकालीन मुनींनी आपल्या ग्रंथांत कित्येक गोष्टी लिहून ठेविल्या आहेत, त्यांचा सूक्ष्म दृष्टीने विचार करू गेल्यास या मतभेदाचा निर्णय करणे बर्याच अंशी संभवनीय आहे, यासाठी निदान त्यांचा या ठिकाणी उल्लेख होणे हे अत्यंत अगत्याचे आहे. हे मुनी आनुवंशिक कल्पनेचे भोक्ते खरे, तथापि आर्यमंडळाची व्याप्ती हिंदुस्थान देशापलीकडे पुष्कळच लांबवर होती ही गोष्ट त्यांना पूर्णपणे विदित होती. मनुस्मृती, अ. १० श्लोक ४३ व ४४.
शनकैस्तु क्रियालोपादिमा: क्षत्रियजातय: ।
वृषलत्वं गता लोके ब्राह्मणादर्शनेन च ॥
पौण्ड्रकाश्चौड्रद्रविडा: काम्बोजा यवना: शका: ।
पारदा: पल्हवाश्चीना: किराता दरदा: खशा: ॥
येणेप्रमाणे असून, त्यांत पौण्ड्राक, औड्र, द्रविड, काम्बोज, यवन, शक, पारद, पल्हव, चीन, किरात, दरद, व खश या जातींचे लोक मूळचे क्षत्रिय होते; परंतु त्यांनी आपल्या क्रिया सोडल्या, व ब्राह्मण त्यांच्याजवळ राहिले नाहीत, यामुळे ते शूद्र बनले असे वर्णिले आहे. या दहा जातींच्या लोकांपैकी सात जाती हिंदुस्थानच्या उत्तर व वायव्य सरहद्दीवर राहणार्या होत्या, व बाकीच्या तीन हिंदुस्थान देशाबाहेर फ़ार लांब ठिकाणी जाऊन वास्तव्य करून राहिल्या होत्या. या तीन जातींची यवन ( अयोनियन अथवा ग्रीक लोक ), व पल्हव ( पेलवी भाषा बोलणारे प्राचीन इराणी लोक ), व चीन ( चीन देशाचे लोक ) अशी नावे असून अर्वाचीन काळच्या भाषातुलनेवरून युरोपखंडात आजमितीला प्राचीनकाळच्या आर्यमंडळाच्या शाखा म्हणवून घेणारे इतर लोकही पुष्कळ आहेत. तेव्हा मनुष्यजातीपैकी बाकीची मंडळे सोडून नुसत्या एका संपूर्ण आर्यमंडळापुरतीच गुणकर्मानुसार विवाहयोजना करावयाची म्हटल्यासही चालण्यासारखे आहे !! हे मंडळ काय किंवा बाकीची मंडळे काय, सवर्ण विवाहसंबंध कोठेही कबूल होण्यास अडचण नाही, मात्र तो या देशी प्रचलित असलेल्या आर्यमंडळाच्या रीतीस सोडून नसला म्हणजे झाले.