भगवान श्रीकृष्णांनी गीगेमध्यें सुद्धा म्हटलें आहे की:-
चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: (भ.गी.अ.४ श्लोक १३)
अर्थ:- मी गुणकर्माचे विभागापासून ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या चार वर्णांना उत्पन्न केलें आहे. या चार वर्णांचीं कर्तव्ये व गुणकर्मे पुढें दिल्याप्रमाणें आहेत: ----
अथ ब्राम्हणलक्षण ऊर्फ गुण.
" ब्रम्ह वै ब्राम्हण: " ब्रम्ह म्हणजे वेद अथवा वेद प्रतिपादित धर्म परमेश्वर यांना जाणणारा जो असतो तोच ब्राम्हण होय.
ब्राम्हणास श्रेष्ठत्व कसें प्राप्त झालें ते खालीं व्यासोक्तीमध्ये स्पष्ट दाखविलें आहे.
॥ सत्य दया क्षमा शील, मानृशंस्यं तपो घृणा ॥
दृश्यते सत्र नागेंद्र स ब्राम्हण इति स्मृत: ॥१॥
( म.भारत अ.१२४ वनपर्व)
अर्थ: - हे नागेंद्र, सत्य, दया, क्षमा, शील (प्राणिमात्रांचा द्रोह न करणें, उलट त्यांच्यावर कृपादृष्टि ठेवणें आणि यथाशक्ति दान करणें
आनृशंस्य ( दुसर्याबरोबर केव्हांही कठोर वर्तणूक न ठेवणें) तप आणि आणि घृणा (निषिद्ध कर्मांची ग्लानी करणें) हीं सात लक्षणें ज्या पुरुषाच्या अंगी पूर्णपणें असतील त्यासच ब्राम्हण असें म्हणावें. व्यासोक्तीप्रमाणें वसिष्ठोक्तिही आमचे वाचण्यांत आली आहे ती आम्ही खाली देत आहों.
॥ योगस्तपो दमो दानं सत्यं शौचं दयाशरुतम् ॥
॥ विद्या विज्ञानमास्तिक्यमेतत् ब्राम्हणलक्षणं ॥१॥
अर्थ: - योग [चित्ताची स्थिरता] तप [चांद्रायणादि व्रतें अथवा मानापमान, निंदा, स्तुति, तसेंच शीतोष्णात्वादिक द्वंद्वे सहन करणें.] दम ( मनाची स्थिरता) दान [सुपात्राला अन्नवस्त्रादिक देणें] सत्य (पाहण्यांत अथवा ऐकण्यात जें आलें असेल तेंच अक्षरश: सांगणें) शौच (अंतर्बाह्य शुद्ध राहाणें) दया [बंधु, इष्टमित्र अथवा हाडवैरी, कोणीही असो त्याला त्याच्या विपत्तीपासून यथाशक्ति बाहेर काढण्याचा प्रयत्न करणें] श्रुत (वेद, वेदांग, धर्मशास्त्र आणि इतिहास वगैरे शास्त्रे पूर्णपणे ओळखणें.) विद्या [ ब्रम्ह विद्या उपनिषदादिक जाणणें त्यास विद्या हें नाव आहे.] विज्ञान [ श्रवण, मनन, आणि निदिध्यास इत्यादिकांचे धर्म, परलोक, पूर्वजन्म, परजन्म, कर्मफल आणि मोक्ष यांचेपासून विमुख न होणें म्हणजे यांना मान देणें हीं (अकरा) ब्राम्हणांची लक्षणे आहेत. ही लक्षणे ज्या मानवाच्या ठायीं अहर्निश वास करीत आहेत त्यालाच ब्राम्हण हें नांव देणे योग्य आहे.
बुद्ध गौतम संहितेमध्येशुद्धां म्हटलें आहे की : -
॥ क्षातं दान्तं जितक्रोधं जितात्मानं जितेंन्द्रियम् ॥
॥ तमेव ब्राम्हणं मन्ये शेषा: शूद्रा इति स्मृत: ॥१॥
अर्थ:- क्षांत [ क्षमेने युक्त] दान्त [ मनाचे निग्रहाने युक्त होऊन औदार्य अंगी खिळलेला ] जितक्रोध [ क्रोधाला ज्यानें जिंकिले आहे तो ]
जितात्मानं [ आत्म्याला ज्यानें जिंकिले आहे असा ] तसेंच जितेंद्रियन् (ज्यानें आपली सर्व इंद्रिये जिंकिली आहेत असा) त्यालाच मी ब्राम्हण असें म्हणतों. आणि वर प्रतिपादन केलेल्या लक्षणांशिवाय जे राहिले तेव सर्व शूद्रांमध्ये गणले आहेत. वरील तिन्ही श्लोकांमध्ये ब्राम्हणांच्या लक्षणांचे जसें विवेचन केलें आहे. तशी लक्षणे ज्या व्यक्तीमध्यें वास करीत असतील त्याच व्यक्तीला ब्राम्हण असें म्हणावें. जन्मत: ब्राम्हण असून त्यामध्ये वर सांगितलेली लक्षणें मिळणार नाहीत तर त्याला ब्राम्हण म्हणण्याचे धाडस कोणीही करू नये.