राजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार

वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.


॥ तस्य मध्ये सुपर्याप्तं कारयेद‍गृहमात्मन: ॥
॥ गुप्तं सर्वर्तुकं जलवृक्षसमन्वितम‍ ॥१॥ मनु अ. ६ श्लो. ७६
॥ तदध्यास्योद्वहेद्भार्यां सवर्णां लक्षणान्वितामे‍ ॥
॥ कुले महति संभूतां हृयां रुपगुणान्विताम्‍ ॥२॥ मनु अ. ६ श्लो. ७०
॥ मृगयाऽक्षा दिवास्वप्न: परिवाद: स्त्रियो मद:
॥ तौर्यत्रिकं वृथाट्याच कामजो दशको गण: ॥३॥  मनु अ. ६ श्लो. ४७
अर्थ:- राजाला ऊचित आहे कीं त्याने एखाद्या दुर्गाचा आश्रय धरुन आपली राजधानी करावी व त्या दुर्गाच्या मध्यभागी सुपर्याप्त [ पृथक्‍ पृथक्‍ स्त्रीगृह, देवगृह आयुधागार, अग्निशाळा इत्यादिकांनी युक्त) असून गुप्त ( खंदक, तट इत्यादिकांनी संरक्षित) सर्व ऋतूंत उत्पन्न होणार्‍या पुष्पादिकांच्या बागांनी युक्त, चुना देऊन स्वच्छ श्वेतवर्ण, पाणीकुपादिक उदक व वृक्ष यांही करुन युक्त असें आपले गृह राजानें करावें व त्या गृहामध्यें राहून नंतर सौंदर्ययुक्त, गुणयुक्त, आपल्याला प्रिय, उत्तम कुलांत उत्पन्न झालेली, सुंदर लक्षणांनी युक्त, क्षत्रिय कुलांतील कन्या जी आपल्या प्रमाणेंच विद्यादिगुणांनी युक्त असेल, अशा एकाच स्त्रीशी विवाह करावा. दुसर्‍या कोणत्याही स्त्रियांशी विवाह संबंध - अर्थात कामसंबंध - ठेवूं नये. कारण जो राजा कामादि दुष्ट व्यसनांत फसतो, तो राज्यादिक धन व धर्म यांना मुकतो ती व्यसनें पुढीलप्रमाणें होत:-  मृगया करणें, फांसें - जुगार वगैरे खेळणें, दिवसा निजणें, कामविषयासंबंधीच्या गोष्टी व दुसर्‍याची निंदा करणे; अतिशय स्त्रीसंग करणें, मादक द्रव्याचें - अर्थात्‍ मद्य, अफीम, भांग, गांजा, चरस वगैरे पदार्थांचे-सेवन करणे, गाणें, व बजावणें, नाचणें, किंवा पहाणें; अधर्मयुक्त दुष्ट कृत्यामध्यें द्रव्याचा व्यय करणें, नेहमी कठोर भाषण करणें, अपराधावाचून कठोर भाषण किंवा शिक्षा करणें, हीं सर्व व्यसनें राजानें सोडावी व राजानें दुष्ट लोकांना शिक्षा करुन सज्जनांचे व राष्ट्राचें उत्तम रीतीनें पालन करावें जे राजपुरुष वादी प्रतिवादीकडून गुप्त रीतीनें लांच घेऊन अन्याय करीत असतील, त्यांचे सर्वस्व हरण करुन त्यांना योग्य दंड करुन व ह्द्दपार करुन द्यावें.
॥ उत्थाय पश्चिमे यामे कृतशौच: समाहित: ॥
॥ हुताग्रिर्बाम्हणांश्वार्च्य प्रविशेत्स शुभां सभाम्‍ ॥४॥ मनु अ. ७श्लो. १४५
॥ तत्र स्थित: प्रजा: सर्वा: प्रतिनंद्य विसर्जयेत्‍ ॥
॥ विसृज्य च प्रजा: सर्वा मंत्रयेत्सह मंत्रिभि: ॥५॥ मनु अ. ७श्लो. १४६
॥ एवं सर्वमिदं राजा सह संमंत्र्य मंत्रिभि: ॥
॥ व्यायम्याप्लुत्य मध्यान्हे भोक्तमंत:पुरं विशेत्‍ ॥६॥ मनु अ. ६ श्लो. २१६
अर्थ:- पहाटेची प्रहर रात्र शेष राहिली म्हणजे उठून शौच मुख मार्जन्यादि क्रिया कराव्यात नंतर स्नान करुन परमेश्वराचें ध्यान, अग्निहोत्र, धार्मिक विद्वानांचा सत्कार वगैरे करुन राजसभेमध्यें प्रवेश करावा. ॥४॥
त्या ठिकाणीं आलेल्या प्रजाजनांचा सन्मान करुन त्यांस निरोप द्यावा व नंतर मुख्य मंत्र्यासह वर्तमान राज्यव्यवस्थेविषयीं विचार करावा. विचार करावयाचा असतां एकांत जागेमध्यें बसावें. अथवा मंत्र्यासह फिरावयास जावें, डोंगरावर जाऊन बसावें, अरण्यांत जावें किंवा राजवाड्यांत अगदीं एकांतांत बसावे. तात्पर्य, जेथें एक शलाकाहि नसेल अशा एकांत जागी मंत्र्यासह विचार करावा. पुष्कळ मंडळी जमूनसुद्धां ज्या राज्याचे गुप्त बेत बाहेर फुटत नाहींत, अर्थात्‍ ज्या राजाचे विचार गंभीर शुद्ध व परोपकारमय असून नेहमी गुप्त असतात, त्या राजाजवळ जरी धन नसलें तथापि तो सर्व पृथ्वीचें राज्य उत्तम रीतीनें चालविण्यांस योग्य असतो; म्हणून मंत्र्याच्या व राजसभेच्या सभासदांच्या एकमतानेंच जें काय करणें तें करावे. व सर्व विचार गुप्त ठेवावे.
पूर्वी सांगितल्याप्रमाणे मंत्र्यासह करावयाचा तो विचार करुन, सैन्यांमध्यें जाऊन, सेनापतीशी भाषणादि करुन नानाप्रकारची व्यूहरचना कवाईत - पाहून, त्यांना उत्साहित करुन, सर्व हत्ती, गाई, घोडे यांच्या पशुशाला पाहून, शस्त्रास्त्रस्थान, वैद्यालय, धनकोश या सर्वांचे निरीक्षण करुन, या स्रर्वांमध्ये जी कांही न्य़ूनता असेल ती दूर करण्याची उपाय सुचवून, व्यायामशाळेंत जाऊन व्यायाम करुन, नंतर भोजन करण्यासाठी अंत:पुरामध्यें - जेथें पत्नी राहत असते तेथें जावें. तेथें जें भोजन करावयाचे असेल त्याची आधीं चांगल्या रीतीनें परीक्षा करुन, बुद्धिबल पराक्रमवर्धक, रोग नाशक, अनेक प्रकारचे व्यंजनपानादि, सुगंधित, मिष्टान्नादिक, अनेकरसयुक्त उत्तम अन्नाचे सेवन करावें व सुखी व्हावें, याप्रमाणे राज्यव्यवस्था नीट पाहून राज्याची उन्नति करावी. कराच्या बोजानें प्रजेला त्रास देऊं नये.

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP