नीतीचे तीन भेद आहेत. युद्धनीति, दंडनीति आणि व्यवहारनीति यांचेमधून प्रथम युद्धनीतीचा उपयोग विशेष समयावरही केला जातो. किंतु शेष उभयनीतीचा [ दंडनीति तथा व्यवहारनीतीचा ] उपयोग निरंतर केला जातो. पुढें जे संधि आदि सहा गुण सांगावयाचे आहेत. त्याचें स्वरुप याप्रकारचें आहे की, परस्पर मिळून व्यवस्था करण्याला संधि असें म्हणतात. वैराला विग्रह असें म्हणतात. शत्रुचे सन्मुख जाण्याला व्यान असें म्हणतात. शत्रुची अपेक्षा करून, आपले स्थानावर बसून राहण्याला आसन असें म्हणतात. आपल्या सैन्याला दोन भागामध्यें विभक्त करुन, स्थापित करण्याला द्वैधी भाव असे म्हणतात. तथा शत्रुच्या भयानें कोणत्याही निकटवर्ती राजाचा आश्रय घेतल्यानें त्यास आश्रय असें म्हणतात. या सहा गुणांचे चिंतन राजाने नित्य केलें पाहिजे. तथा काल आणि स्थानादिकांचा विचार करुन यथाविधी यांचा प्रयोगे केला पाहिजे. या प्रयोगाचा समय हा आहे की, जेव्हां राजाला दिसून येईल की, भविष्यकाली उत्तम लाभ होणार आहे. तेव्हां अल्पहानि सहन करुन तत्काळ संधि करणें. ज्या समयी बळ तथा प्रसन्न आपलें सैन्य व अमात्यादि तुष्ट असतील त्यावेळीं विग्रह करावा. जेव्हां नि:शंकपणें आढळून येईल कीं, आपली सेना शत्रुपक्षाचें निर्दालन करण्यास उत्साह व बल वगैरेंनी समर्थ आहे, त्यावेळी शत्रुवर चढाई करावी व ज्यावेळी आपली फौज कांही कारणांमुळे कमकुवत झाली असेल त्यावेळीं साम, दाम आणि भेद इत्यादी उपायांच्या द्वारां आसन स्वीकारावें. जेव्हां शत्रू बलिष्ठ व अजिंक्य आहे असे वाटेल त्यासमयीं आपल्या सेनेचे दोन भाग करुन सावधपणानें आपल्या किल्ल्यांत राहावें. किल्ल्यामध्यें राहूनहि संरक्षणाला धोका येईल असें वाटेल तेव्हां बळवान् व धर्मात्मा राजाचा आश्रय घेणें परंतु त्याचा आश्रय घेऊनहि कांही घातपात दिसून येईल तर त्याचाहि त्याग करुन धैर्याने संग्रामांत जाउन लढणेंच युक्त होय. विजय झालाच तर लक्ष्मी माळ घालते व मरण आलें तर पुण्य़लोक प्राप्त होतों, उपरोक्त्र सामादि जे चार उपाय जे चार उपाय सांगितले त्याचें स्वरुप पुढीलप्रमाणें : - गोड भाषणानें कार्यसिद्धि करुन घेणें यास साम व द्रव्यादिक देऊन काम साधून घेणें यास दाम म्हणतात. शत्रूपक्षाच्या कांही अधिकार्यांना वळवून घेणें किंवा त्यांच्यांत परस्परांत फाटाफूट होईल अशी क्लृप्ति लढविणें याला भेद व शत्रूला दमविणें याला दंड म्हणतात. जेव्हा साम, दाम व भेद या तीनही मार्गांनी कार्यसिद्धि होत नाहीं असें निश्चयपूर्वक कळून आल्यावरच द्ण्डासाठी शस्त्र हाती घ्यावें. दुसरी जी दंडनीति तिचे सात प्रकार पुढीलप्रमाणें आहेत. हाकार, माकार, धिक्कार, परिभाषण, गिरफदार, करणें, तुरुंगात टाकणें, अंगच्छेदन याशिवाय द्रव्यदंड हा एक आठवा प्रकार मानिला जातो. ’ किती हे वाईट तुझी काम केलें’ या शब्दांनी तिरस्कार करणें याला हाकार, ’ इत:पर असें करुं नका’ अशी आज्ञा देऊन सोडणें यास माकार, ‘या तुमच्या दुष्कृत्याबद्दल तुमचा धिक्कार असो’ अशा रागांनी छी: धू करणें यास धिक्कार, ‘ पुढें पाऊल टाकूं नको’ अशा अधिकारवाणीनें दरडावणें यास परिभाषण असें म्हणतात.