ब्रम्हचर्याच्या स्वरुपाविषयी याज्ञवल्क्य ऋषींनी म्हटले आहे की:-
॥ कर्मणा सतताचारात् सर्वावस्थासु सर्वदा ॥
॥ सर्वत्र मैथुनत्यागो ब्रम्हचर्य प्रचक्षते ॥१॥ योग याज्ञवल्क्य ५४
अर्थ:- विद्याभ्यासादि कर्म करीत निरंतर सदाचरणानें राहून सर्व अवस्थांमध्यें सर्वदा आणि सर्वत्र जो मैथुनाचा परित्याग करणें त्यालाच ब्रम्हचर्य असें म्हणतात. याचप्रमाणे महाभारतामध्येंही म्हटले आहे. कीं,
॥लिड्गसंयोगहीनं यच्छब्द्स्पर्शविवर्जितम् ॥
॥ श्रोत्रेण श्रवणं चैव, चक्षुषा चैव दर्शनम् ॥२॥
॥ वाक्सम्भाषाप्रवृत्तं यत्तन्मन: परिवर्जितम् ॥
॥ बुद्ध्या चाध्यवसीयीत, ब्रम्हचर्यकल्पपयम् ॥३॥ भारत. शा. २१४
लिंगसंयोग न करणें याला ब्रम्हचर्य असें म्हणतात. किंवा गुह्येंद्रियाला हस्तादिकांचा केव्हांहि स्पर्श न करणें, तसेंच विषयासंबंधी वाईट न बोलणें, मनानें स्त्रीविषयक चिंतन न करणें. बुद्धीनें वाईट विचार न करतां सदा अर्थज्ञानपूर्वक अध्यन करीत राहावें, यालाच उत्तम ब्रम्हचर्य म्हणतात.
॥ स्मरणं कीर्तनं केलि: प्रेक्षणं गुह्यभाषणम् ॥
॥ संकल्पोध्यवसायश्च क्रियानिष्पत्तिरेवच ॥
॥ एतन्मैथुनमष्टाड्गं. प्रवदन्ति मनीषिण: ॥४॥ दक्षस्मृति अ.७
" स्त्रीचे स्मरण करणें, तिचें वर्णन करणें, तिच्याशी खेळणें, तिला वारंवार पाहणें, गुप्त भाषण करणें, मनांत संकल्प करणें, तिचा निजध्यास करणें व मैथुन करणें हे आठ मैथुनाचे प्रकार आहेत. " यांतील एक एक प्रकारहि वीर्यनाशाला पुरे असतो. म्हणून यांपैकी कोणताही प्रकार आपणाकडून न होईल असें प्रत्येकानें प्रथम वयांत आचरण ठेवावें व ब्रम्हचर्य उत्तम पालन करुन तेज:पुंज बनावे. वीर्यभ्रष्ट होत असतां, काय हानि होत आहे हें समजत नाहीं पण त्यापासून जेव्हां निस्तेजता, कमकुवतपणा, बुद्धिमांद्य इत्यादी प्रकार वाढतात व जगाच्या जीवनकलहांत जेव्हां पीछेहाट होऊं लागते तेव्हां तोच मनुष्य "दैव" म्हणत बसतो. पण मग पश्चाताप होऊन काय उपयोग ? या साठी आरंभापासून सर्वांनी खबरदारी घ्यावी. या ठिकाणीं कोणी म्हणेल की, विद्याभ्यास न करतां जितेंद्रिय राहून वीर्यरक्षण केलें तर ब्रम्हचर्य पालन केल्यासारखे होईल की काय ? याला उत्तर असें की, तें अंशमात्राने ब्रम्हचर्य होईल. पूर्णपणें होणार नाही. कारण, शास्त्रांमध्यें " जितेंद्रिय राहून विद्याभ्यास करणें " याला पूर्ण ब्रम्हचर्य असें म्हटलें आहे. "गुप्तेंद्रिय स्योपस्थस्य संयम: ।" योगद. २।३०॥
गुप्तउपस्थ इंद्रियाचा संयम" हे ब्रम्ह्च्रर्य असें व्यासांनी योगदर्शन - भाष्यांत सांगितलें आहे. पण तो अर्थ त्या विषयापुरताच समजावयाचा. कारण -
॥ शिष्यवृत्तिक्रमेणैव विद्यामाप्नोति ? य: शुचि: ॥
॥ ब्रम्हचर्यव्रतस्यास्य प्रथम: पाद उच्यते ॥५॥ भार. उ. ४४.
" ब्रम्हचर्याचें अवलंबन करुन विद्या शिकणें हा ब्रम्हचर्याचा एक भाग आहे. " असें व्यासांनीच भारतांत सांगितले आहे.
" ब्रम्हचर्य’ शब्दाचे अर्थ काय काय होतात तें पाहू. " ब्रम्हणेवेदविद्यायै चर्यते इति ब्रम्हचर्यम् " " वेद व सर्व विद्या शिकण्यासाठी जें व्रत व जो नियम केला जातो, त्याल ब्रम्हचर्य असें म्हणतात." व जो ब्रम्हचर्यव्रत धारण करणारा असतो त्याला ब्रम्हचारी असें म्हणतात.
"ब्रम्हणि विद्यायां चरितुं शीलमस्यास्तीते ब्रम्हचारी" किंवा " ब्रम्ह वेदस्तध्ययनार्थं यदृतं तदपि ब्रम्ह तच्चरतीति ब्रम्हचारी । "
" वेदविद्या व तीपासून उत्पन्न झालेल्या इतर सर्व सद्विद्या या शिकण्यांला जितेंद्रिय झालें पाहिजे. व्यसनाधीनता सोडली पाहिजे. इंद्रियनिग्रहादिक जे नियम तेंच ब्रम्हचर्यव्रत होय व तसें ब्रम्हचर्य जो पाळतो व विद्या शिकतो तो ब्रम्हचारी समजावा. ब्रम्हचर्यामध्यें सर्व विद्या शिकावयाच्या असतांतच पण विशेषत: वेदाध्ययन हें मुख्य आहे. कारण,वेदांपासून इतर सर्व विद्यांचा व शास्त्रांचा उगम झाला आहे. ज्या अर्थी ब्रम्हचर्यामध्यें ज्ञान मिळावयाचें असतें व ज्ञानावर सर्व पुरुषार्थांची व त्यांच्या द्वारानें सर्व सुखांची भिस्त असते त्या अर्थी ऐहिक व पारलौकिक सुखांच्या प्राप्तीसाठी ब्रम्हचर्याची अत्यंत जरुरी आहे. जीवन मिळाल्यावर सुखें मिळूं शकतात. प्राणांचे रक्षण झालें असतां जीवन वाढतें व प्राणांचे रक्षण ब्रम्हचर्यानेंच होतें, म्हणू ब्रम्हचर्यव्रत स्वीकारुन विद्याध्ययन करण्यासाठी चारीहि वर्णांना अधिकार दिलेला आहे. काय म्हणतात तें पाहा.
॥ विद्यार्थं ब्रम्हचारी स्यात् सर्वेषां पालेन गृही ॥६॥ शुक्र ४।४॥
" विद्याध्ययन करण्यासाठी चारहि वर्णांनी ब्रम्हचर्य धारण करावें व सर्व मनुष्यांच्या पालनासाठी गृहस्थाश्रम स्वीकारावा. " येथें कोणी असें म्हणतील की, उपनयन केल्यावर वेद शिकण्याचा अधिकार प्राप्त होतो व शूद्राला उपनयनाचा अधिकार नसल्यामुळें त्याला वेद कसा शिकतां येईल ? याला उत्तर असें -
॥ शूद्राणामदुष्टकर्मणामुपनयनम् ॥१॥ पारस्कर गृह्यसूक्त. का. २।
॥ शूद्राणां ब्रम्हचर्यत्वं मुनिभि: कैश्चिदिष्यते ॥७॥
याज्ञवल्क्य. योग. अ. २
" सदाचरणी शूद्राणां उपनयन करण्याचा अधिकार आहे" व तसेंच " कित्येक मुनी म्हणतात की, शूद्रांनी ब्रम्हचर्य व्रतहि धारण करावें" तसेंच जसा दुष्टकर्म करणार्या शूद्राला उपनयनाचा अधिकार नाहीं तद्वतच दुराचारी ब्राम्हणालाहि उपनयनाचा अधिकार नाही.
॥ पुराकल्पे कुमारीणां मौंजीबंधनमिष्यते ॥
॥ अध्यापनं च वेदानां सावित्रीवचनं तथा ॥८॥
पूर्वी मूलीचेंही उपनयन करीत, त्यांनां वेद शिकवित व गायत्रीचा उपदेश करीत असत. पण सध्या त्यांना अज्ञ ठेवण्यांत भूषण मानलें जातें. परंतु वैदिक काली धृतव्रता, बडवा, मंदालशा, गार्गि, इत्यादि अनेक स्त्रिया सर्व विद्यांत निष्णात होत्या व वर्तमान काली स्त्रिया आपल्या वैदिक धर्मास परक्या झाल्यामुळेंच आपल्या स्त्रीवर्गाला व आपणाला ही हीन स्थिति भोगावी लागलेली आहे. तर ही हीन स्थिती घालविण्याकरितां ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्यांनी आपाआपल्या मुलाचे मुलीचे उपनयन (मौंज) संस्कार करतेवेळी आपापल्या आधीन झालेल्या शूद्र वर्णाच्या मुलामुलींचे उपनयन [मौंज] संस्कार करुन विद्या शिकविण्यासाठी आपल्या मुलामुलीबरोबर कन्या विद्यालयांत, गुरुकुलांत ठेवून त्यांना शिक्षण द्यावें असा गृह्यसूक्त व स्मृति यांचा अभिप्राय आहे,
ब्रम्हचर्याश्रमांत प्रवेश होण्याचा समय म्हटला म्हणजे उपनयन [ मौंज] संस्कार होय. या संस्काराबद्दल आश्वालायन ऋषींनी गृह्यसूत्रामध्यें सांगितलें आहे की. -
॥ अष्टमे वर्षे ब्राम्हणमुपनयेत् ॥१॥ गर्भाष्टमे वा ॥२॥
॥ एकादशे क्षत्रियम् ॥३॥ द्वादशे वैश्यम ॥४॥
॥ आषोडशाद ब्राम्हणस्यानतीत: काल: ।५। आद्वाविंशात् क्षत्रियस्य ।६।
॥ आचतुर्विशाद्वैश्यस्य ॥७॥ अतऊर्ध्व पतितसावित्रिका भवन्ति ॥८॥
अर्थ"- जन्मापासून अथवा गर्भापासून आठव्यावर्षी ब्राम्हणांनी आपल्या मुलांचें उपनयन करावें. जन्मापासून अथवा गर्भापासून अकराव्या वर्षी क्षत्रियांनी आपल्या बालकांचे उपनयन करावें ॥३॥
जन्मापासून अगर गर्भापासून बाराव्या वर्षी वैश्यांनी आपल्या मुलाचें उपनयन करावें, ॥४॥
ब्राम्हणांच्या मुलाचा सोळा वर्षापर्य़ंत उपनयन काल अतिक्रांत होत नाही. ॥५॥
बावीस वर्षापर्य़ंत क्षत्रियाच्या कुमारांचा उपनयन [मौंज] संस्कार कालातिक्रांत होत नाही. ॥६॥
वैश्याच्या मुलांचा चोवीस वर्षापर्य़ंत उपनयन काल अतिक्रांत होत नाही. ॥७॥
आपापल्या कालीं ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य हे आपल्या मुलांचे उपनयन संस्कार केल्यावांचून राहातील तर या पूर्वोक्त षोडश, बावीस वर्षादि कालानंतर ते सावित्रीपतित म्हणजे उपनयन संस्कार आणि गायत्री मंत्र देण्यास योग्य राहात नाहींत, ॥८॥
याचप्रमाणें मनुमहर्षींनी सांगितले आहे कीं.
॥ गर्भाष्टमेऽब्दे कुर्वीत ब्राम्हणस्योपनायनम् ॥
॥ गर्भादेकादशे राज्ञो गर्भात्तु द्वादशे विश: ॥९॥ मनु. अ.२ श्लो.३६
अर्थ:- ब्राम्हणाचें उपनयन (मौंजी) गर्भांपासून आठव्या वर्षी करावें, क्षत्रियाचें गर्भापासून अकराव्या वर्षी आणि वैश्याचें गर्भापासून बाराव्या वर्षी करावें ॥९॥
॥ ब्रम्हवर्चसकामस्य कार्यं विप्रस्य पंचमे ॥
॥ राज्ञो बलार्थिन: षष्ठे वैश्यस्येहार्थिनोऽष्टमे ॥१०॥ मनु. अ.२ श्लो.३७
अर्थ:- ब्रम्हवर्चस इच्छिणार्या ब्राम्हणाचे उपनयन ( गर्भापासून) पांचव्या वर्षी करावे. बलाची इच्छा करणार्या क्षत्रियाचें उपनयन ( गर्भापासून) सहाव्या वर्षी, आणि कृषि, वाणिज्य इच्छिणार्या वैश्याचें उपनयन [गर्भापासून] आठव्या वर्षी करावें. ॥१०॥
॥ आषोडशाद्ब्राम्हणस्य सावित्री नातिवर्तते ॥
॥ आद्वाविंशात्क्षत्रबंधोराचतुर्विंशतेर्विश: ॥११॥ मनु. अ.२ श्लो.२८
अर्थ:- ब्राम्हणांचा सोळा वर्षेपर्यंत सावित्री म्हणजे सावित्र्यपदेशकाल (उपनयनकाल) अतिक्रांत होत नाही, क्षत्रियाचा बावीस वर्षेपर्यंत आणि वैश्याचा चोवीस वर्षेपर्य़ंत उपनयनकाल अतिक्रांत होत नाही. ॥१॥
या चारी वर्णांचा उपनयन संस्काराचा हाच परम अवधि आहे;
॥ अतऊर्ध्वं त्रयोप्येते यथाकालमसंस्कृता: ॥
॥ सापित्रीपतिता व्रात्या भवंत्यार्यविगर्हिता: ॥१२॥ मनु. अ.२ श्लो. ३९
अर्थ :- हे तीन वर्ण [ ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य] पूर्वोक्त आपापल्या कालीं संस्कार ( उपनयन) केल्यावांचून राहातील तर, ह्या-पूर्वोक्तषोडश वर्षादि-कालानंतर ते सावित्रीपतित म्हणजे वात्यसंज्ञक झाल्याने गायत्री मंत्राचे उपदेशाला अधिकारी रहात नाहीत. याकरितां चारी वर्णांनी आपापल्या मुली व मुलांना कन्यापाठशाळेंत व आचार्यकुलामध्यें पाठविलें पाहिजे. त्या आचार्यांचे लक्षण खालील श्लोकांत सांगितलेलें आहे;
॥ उपनीय तु य: शिष्यं वेदमध्यापयेद्द्विज: ॥
॥ सकल्पं सरहस्यं च तमाचार्यं प्रचक्षते ॥१३॥ मनु. अ.२ श्लो.१४.
जो ब्राम्हण शिष्याचें मौंजीबंधन करुन त्याला कल्प ( यज्ञविद्या ), रहस्य ( उपनिषदें) यांसहित वेदाचें अध्ययन सांगतो त्याला ’आचार्य’ असे म्हणतात. ॥१३॥
॥ मातृमान् पितृमानाचार्यमान् पुरुषो वेद ॥१४॥ छांदेभ्यो.
॥ त्रय:पुरुषस्यातिगुरवो भवंति मातापिताआचार्यश्च ॥१५॥
विष्णुस्मृति अ. ३१
अर्थ:-माता पिता व आचार्य यांना वेदस्वरुप म्हणजे ज्ञानस्वरुप जाणून मुली व मुलें जन्मापासून पांच वर्षेपर्यंत मातेचे आधीन राहून मातेपासून शिक्षण ग्रहण करितात, व पांच ते आठ वर्षेपर्यंत पित्याचे आधीन राहून पित्यापासून शिक्षण ग्रहण करितात. आणि आठ पासून पुढें आचार्य गुरुकुलांत जाऊन शिक्षण घ्यावयाचें असतें, म्हणून मातापिता यांनी आपापली मुली व मुलांना आचार्यकुलांत पाठविणें. व त्यांना यथा योग्य समयपर्यंत शिक्षण देणें कारण माता, पिता आणि आचार्य हे तीन मुला मुलींचे गुरु आहेत म्हणून मुलांमुलींनी आचार्याच्या आधीन राहून यथा योग्य समयपर्यंत भिन्नभिन्न शास्त्रांचे व वेदांचे अध्ययन केलें पाहिजे. ब्रम्हचर्यवृत्तचा काल वगैरे मनु भगवानांनी सांगितला आहे की:-
॥ षटत्रिंशदाब्दिकं चर्यं गुरौ त्रैविदिकं व्रतम् ॥
॥ तदर्धिकं पादिकं वा ग्रहणांतिकमेव वा ॥१६॥ मनु. अ. ३ श्लो. १
अर्थ:- किती वर्षेपर्य़ंत ब्रम्हचर्य व्रत धारण करावें तें सांगतो - ( ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद ह्या) तीन वेदांच्या ग्रहणासाठी ब्रम्ह्चर्यव्रत [ आपल्या सूत्रांत सांगितलेले नियम] छत्तीस वर्षेपर्य़ंत (गुरुग्रही राहून) आचरण करावे. [ म्हणजे प्रत्येक वेदशाखेला बारा
वर्षेपर्यंत व्रत आचरण करावे. ] अथवा पूर्वोक्त वर्षांच्या निमे वर्षे ( अठरा वर्षे) व्रत आचरण करावें. [ म्हणजे प्रत्येक वेद शाखेला सहा सहा वर्षे व्रताचरण करावें. ] किंवा चतुर्थांश कालपर्यंत [ नऊ वर्षेपर्य़ंत ] व्रताचरण करावें. ( म्हणजे प्रत्येक वेदशाखेला तीन तीन वर्षे व्रताचरण करावें). अथवा जितक्या ( पूर्वोक्त कालाच्या अधिक किंवा न्यून ) वर्षांनी वेदाचें ग्रहण होईल तावत्पर्यंत व्रताचरण करावें ॥१६॥
तसेंचे स्त्री, पुरुषांनी एकसारखे ब्रम्हचर्यव्रत धारण करावें, असें आपस्तंब सूत्रांत म्हटले आहे. याच प्रमाणें गोपथ ब्राम्हण ग्रंथात सांगितलेले आहे.
॥ " अष्टाचत्वारिंशद्वर्षं सर्ववेदब्रम्हचर्यम् ॥ गो.पू.प्र. २ ब्रा.६
अर्थात् ४८ वर्षापर्य़ंत ब्रम्हचर्य पालन करणें हें संपूर्ण वेदांचे अध्ययन करण्याकरितां परम उत्तम मानलेलें आहे. याचप्रमाणे आपस्तंब धर्म सूत्रामध्यें सांगितलेलें आहे की,
॥ अष्टाचत्वारिंशद्वर्षाणि ॥१॥ पादोनम् ॥२॥ अर्धेन ॥३॥
आप. धर्म. सू. प्र. १ । रव. २
अर्थात् ४८ वर्षापर्यंत पादोनम् म्हणजे ३६ वर्षापर्यंत [ ब्रम्हचर्यसेवन करणें, उत्तम मानलेंलें आहें. अथवा अर्धेन म्हणजे २४ वर्षापर्यंत ब्रम्हचर्य सेवन करणे म्हणजे मध्यम मानलेंले आहे. तथा १८ व १२ वर्षापर्यंत ब्रम्हचर्य सेवन करणें अधम मानलेलें आहे. पूर्वी स्त्रियांनाही वेदाध्ययन व ब्रम्हचर्य विहित होतें, याविषयीं पुढीलप्रमाणें आधार मिळतात.
॥ यथेमां वाचं कल्याणीमावदानि जनेभ्य: ।
ब्रम्हराजन्याभ्यांशूद्राय चार्याय च स्वाय चारणाय ॥ यजु. २६।२।
अर्थ:- परमेश्वर म्हणत आहे की, [ तथा] ज्याप्रमाणें मी [ जनेभ्य:] सर्व मनुष्यांसाठी (इमाम्) या कल्याणीम् संसार व मुक्ति यांतील सुखें प्राप्त करुन देणारी [ वाचम्] ऋग्वेदादि चारहि वेदरुपी कणी आहे, तिचा (आवदानि) सर्वांस उपदेश केला त्याचप्रमाणे तुम्हीही करावा. [ या ठिकाणी कोणी असा प्रश्न विचारील की, स्मृतिग्रंथांमध्यें ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य या ती वर्णांतील लोकांस वेदाचा अधिकार आहे असें सांगितलें पण शूद्रादिकांला ? कोठें आहे ? उत्तर:- स्वत:परमेश्वर म्हणतों मी (ब्रम्हराजन्याभ्याम्) ब्राम्हण, क्षत्रिय [ अर्याय, वैश्य, [शूद्राय] शूद्र [स्वाय] भृत्य, स्त्री इत्यादिक व [ अरणाय ] अति शूद्रादिक यांच्यासाठी-या सर्वांसाठी वेदाचा प्रकाश केला आहे. म्हणून सर्वांनी वेदांचे अध्ययन व अध्यापन करुन आपलें ज्ञान वाढवावे. त्याचप्रमाणे वेद मंत्रार्थांचे श्रवण मननहि सर्वांनी करावे. सर्वांनी चांगल्याचें ग्रहण व वाईटाचा त्याग करुन, दु:खापासून मुक्त होऊन आनंदीत व्हावें. आतां सांगा बरें. परमेश्वराचा उपदेश आम्ही मानावा की तुमचे मत ? परमेश्वराचाच उपदेश अवश्य मानला पाहिजे. जर वेदांतील परमेश्वराचा उपदेश कोणी मानला नाही तर त्याला नास्तिक असें म्हणावें, " नास्तिको वेद निन्दक:" वेदाची निंदा करणारा; व त्यांना प्रमाण न मानणारा नास्तिक आहे असें समजावें. परमेश्वर शूद्रांचे हित व्हावें असें इच्छित नाही काय ? परमेश्वर पक्षपाती आहे काय कीं, तो द्विजांनीच वेद शिकावे व शूद्रांनी शिकूं नये असे म्हणेल; परमेश्वराचा अभिप्राय शूद्रांनी शिकूं नये असा जर असता तर शूद्रांना त्यानें वागिन्दिय कान वगैरे अवयव कशाला दिले असते ? परमेश्वराने ज्याप्रमाणें पृथिवी, जल, अग्नि, चंद्र, सूर्य, अन्न वगैरे पदार्थ सर्वांसाठी केले आहेत त्याचप्रमाणें त्याने वेद हेहि सर्वांसाठीच प्रसिद्ध केले आहेत. ज्या कोणत्या ग्रंथांत " शूद्रांनी वेद म्हणू नये" असा निषेध केला असेल, तेथें त्याचा असा अभिप्राय समजावयाचा की,शिकले व शिकविलें असतां ज्याला काहीच ज्ञान होत नाहीं अशा निर्बुद्ध शूद्राला शिकविणें व्यर्थ आहे म्हणून त्यांना ते शिकवूं नयेत" पण [ क्षत्रिय वैश्यादिकांनी त्यांना आपल्या आश्रित ठेवून राजनीतीचें व्यापाराचें शिक्षण देऊन त्यांना नीतिवंत बनविणें ] ज्यांना ज्ञानग्रहण शक्ति आहे अशा स्त्री शूद्रांना न शिकविणें ही न शिकविणार्यांची मूर्खता, स्वार्थपरायणता व निर्बुद्धता आहे असें समजावें.
पूर्वोक्त परमेश्वरांची आज्ञपालन करण्याकरितां चारिहि वर्गांतील स्त्री व पुरुषाला विद्या हें भूषण आहे. तें गुप्तधन आहे. विद्येच्या योगानें भोग,यश, सुख ही प्राप्त होतात. अडचणींच्या वेळी विद्येच्या साह्यानें उत्तम सल्ला मिळतो. परदेशी विद्या ही सहाय्यकर्ती आहे. विद्वानांना राजाही मानमान्यता देतो म्हणून सर्वांनी विद्या शिकावी. जो विद्या शिकत नाही तो खरोखर पशूच होय. "ज्याला विद्या येत नसेल त्यांची संपत्ति वगैरे साधनें असून नसल्यासारखीच होत" कित्येक वेळी असें आढळून येतें की, अविद्वानाला संपत्ति मिळाली असतां त्याचा वास्तविक फायदा कोणताही न होता. तिचा उपयोग वाईट कामांकडे करुन आपलाच नाश करुन घेतो. पण विद्वान संपत्तिपासून आपला व दुसर्याच्या फायदा करतो म्हणून सर्वांनी विद्या शिकावी. त्या विद्यांची व शस्त्रांची नावें. व्याकरणशास्त्र, पदार्थविद्या, दर्शनानुशासनशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भविद्या, कृषिकर्मविद्या, वास्तुविद्या, अनेक भाषापरिज्ञान, काव्यशास्त्र, अलंकारशास्त्र, छंद शास्त्र, चित्रविद्या, वक्तृत्वविद्या , गायन,वादन, नाट्य, अर्थशास्त्र, धनुर्विद्या, सैन्यपद्धतिशास्त्र,राजनीति, खगोलशास्त्र,वैद्यक, औषधें तयार करणें, विमानबंधन, नौकाबंधन, आकृतिविद्या-सामुद्रिक मस्तुलुगेंद्रियशास्त्र, सृष्टिक्रमशास्त्र, लोकव्यवहारशास्त्र, संपत्तिशास्त्र. वनस्पतिशास्त्र, इत्यादि सर्व शास्त्रें मानवी जातीच्या फायद्याची आहेत म्हणून त्यांचे यथाशक्ति अध्ययन ब्रम्हचर्यपर्यांत करणे सर्वथैव इष्ट आहे.
॥ वेदानधीत्य वेदौ वा वेदं वापि यथाक्रमम् ॥
॥ अविप्लुतब्रम्हचर्यो गृहस्थाश्रममावसेत् ॥२॥ मनु.अ.३ श्लोक २
अर्थ:- ब्रम्हचारिणीनें व ब्रम्हचारींनें अखंडित ब्रम्हचर्य व्रत धारण करुन (स्वशाखाध्ययनपूर्वक) तीन वेदांचें किंवा दोन वेदांचें अथवा एका वेदाचें [ मंत्र, ब्राम्हण अशा] क्रमाने अध्ययन करुन गृहस्थाश्रम (गृहस्थाश्रमधर्मसमूह) आचरण करावा ॥२॥
॥ ब्रम्हचर्येण कन्याम् ३ युवानं विदंते पतिम् अर्थव ११।२४।३।१८
"ब्रम्हचर्यव्रत समाप्ति नंतर कन्येनें पूर्वोक्त गुण कर्म स्वभाव संपादन करुन, आपल्या समान युवावस्थेला प्राप्त झालेल्या कुमाराबरोबर विवाह करावा". हें संक्षेपाने ब्रम्हचर्यक्रमाविषयी सांगितलेलें आहे. विशेष वर्णन वेद मनुस्मृतीमध्यें पहा.