पूर्वोक्त विधीनीं आयुष्याच्या दुसर्या भागापर्य़ंत गृहस्थाश्रमामध्यें निवास करुन आयुष्याच्या तिसर्या भागापर्यंत वनामध्ये वास करुन म्हणजे एकांत स्थानामध्यें जाऊन आत्म स्वरुपाच्या प्राप्ती करितां विक्षेप व नानाप्रकारच्या चंचल भावाला प्राप्त झालेल्या मनाचें जें दमन करणें आहे, त्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात हा आश्रम चतुर्थ संन्यासाश्रमाचा परमसहाय्यक आहे कारण की, ह्या आश्रमामध्यें जेव्हां मनुष्य इंद्रिय आणि मन यांवर विजय मिळवितो तेव्हां चित्ताची वृत्ति स्थिर होऊन जाते व संन्यासाश्रम पाळणें त्यास कठिण जात नाही.
या आश्रमाचें विषयामध्यें मनु भगवान म्हणतात कीं : -
॥ गृहस्थ्स्तु यदा पश्येद्वलीपलितमात्मन: ॥
॥ अत्पत्यस्यैव चापत्यं तदारण्यं समाश्रयेत् ॥१॥ म. अ. ६ श्लो. २
॥ संत्यज्य ग्राम्यमाहारं सर्वं चैव परिच्छदम् ॥
॥ पुत्रेषु भार्यां निक्षिप्य वनं गच्छेत्सहैव वा ॥२॥ मनु. अ. ६ श्लो. ३
॥ अग्निहोत्रं समादाय गृह्यं चाग्रिपरिच्छदम् ॥
॥ ग्रामादरण्यं नि:सृत्य निवसेन्नियतेंद्रिय: ॥३॥ मनु. अ. ६ श्लो. ३
॥ मुन्यन्नैर्विविधैर्मेध्यै: शाकमूलफलेन वा ॥
॥ एतानेव महायज्ञान्निर्वपेद्विधिपूर्वकम् ॥४॥ मनु. अ. ६ श्लो. ५
अर्थ:- गृहस्थाश्रमी आपल्या देहाचे त्वचा शिथिल झाली, केश पांढरे झाले, पुत्राला पुत्र झाला असें ज्या काळी पाहील तेव्हां त्यानें [ विषयांविषयी वैराग्य धरुन] वनांत प्रवेश करावा ॥१॥
ग्राम्य आहार [ व्रीहि, गहू, यव इत्यादिक], आणि सर्व परिच्छद [ गाई, घोडे, शय्या, संपत्ति इत्यादि उपभोग सामग्री ] ह्या सर्वांचा त्याग करुन आपली स्त्री पुत्रांच्या स्वाधीन करुन अथवा स्त्रीसहीत वनांत गमन करावें ॥२॥
अग्निहोत्र (श्रौताग्नि) गृह्याग्नि आणि अग्नींची सर्व सामुग्री [ स्रुक, स्त्रवादिक पात्रें] ग्रहण करुन गावांतून अरण्यांत जाऊन इंद्रियें आधीन ठेवून राहावें॥३॥
नानाप्रकारची पवित्र अशी मुनींची, बुद्धि वाढविणारी, अन्नें अथवा अरण्यांतील शाक, मूल, फलें यांहीकरुन वानप्रस्थानें प्रूर्वोक्त पंचमहायज्ञ यथाविधि प्रत्यहीं करावे ॥४॥
॥ वसीत चर्म वीर वा सायं स्नायात्प्रेग तथा ॥
॥ जटाश्च बिभृयान्नित्यं श्मश्रुलोमनखानि च ॥५॥ मनु. अ. ६ श्लो. ६
॥ नक्तं चात्रं समश्नीयाद्दिवा बाहृत्य शक्तित: ॥
॥ चतुर्थकालिको वास्यात्स्याद्वाऽप्यष्टकालिक: ॥६॥ मनु. अ. ६ श्लो. १९
॥ स्वाध्याये नित्ययुक्त: स्याद्दांतो मैत्र: समाहित: ॥
॥ दाता नित्यमनादाता सर्वभूतानुकंपक: ॥७॥ मनु. अ. ६ श्लो. ८
॥ चांद्रायणविधानैर्वा शुक्ले च वर्तयेत् ॥
॥ पक्षांतयोर्वाऽप्यश्नीयाद्यवागूं क्वथितां सकृत् ॥८॥ मनु. अ. ६ श्लो. २०
मृगादिकांचे धर्म किंवा वीर [वस्त्रखंड, वृक्षाचें वल्कल] पारधाने करावें सायंकाळी व प्रात:काळीं स्नान करावें. जटा, दाढी, मिशा, लोम नखें ही नित्य धारण करावीं ॥५॥
जटा आदि धारण करणें वानप्रस्थाश्रमाचें मुख्य चिन्ह व लक्षण आहे. । आपल्या सामर्थ्यानुरुप अन्न आणून प्रदोषकाळी भोजन करावें किंवा दिवसा भोजन करावें, अथवा एक दिवसामध्यें भोजनाचे काल दोन या न्यायानें चवथ्या भोजनकालीं [ एक दिवशीं उपवास करुन दुसर्या दिवशीं सायंकालीं भोजन करावें किंवा आठव्या भोजनकालीं [तीन दिवस उपोषण करुन चवथ्या दिवशी रात्रौं] भोजन करावें ॥६॥
वेदवेदांताभ्यासाविषयी नित्य तत्पर असावें, शीत व उष्ण सुख व दु:ख इत्यादि द्वंद्वे सहन करणारा; आणि सर्व भूतांवर दया करणारा असें व्हावें ॥७॥
आपल्या तपाची वृद्धि होण्यासाठी ग्रीष्मऋतूंत चार दिशांला चार अग्नि व वर सूर्य या पांचांच्या सेवनानें आपल्या शरीराल ताप द्यावा वर्षाऋतूंत जेथें पर्जन्य पडत असेल तेथें अंगावर वस्त्रादिक कांहे न घेतां राहावें. हेमंतऋतूंत [ शीत काळांत] ओलें वस्त्र परिधान करुन राहावें ॥८॥
॥ तप:श्रद्धे ये हयुपवसन्त्यरण्ये शान्ता विद्वांसो भैक्ष्यचर्यांचरन्त: ॥
॥ सूर्यद्वारेण ते विरजा: प्रयान्ति यत्रामृत: स पुरुषो ह्यव्ययात्मा ॥
॥९॥ मुण्ड. ॥ २।११॥
॥ उपस्पॄशंस्त्रिषवणं पितृन्देवांश्च तर्पयेत् ॥
॥ तपश्चरंश्चोग्रतरं शोषयेद्देहतात्मन: ॥१०॥ मनु. अ. ६ श्लो. २४
॥ अग्नीनात्मनि वैतानान्समारोप्य यथाविधि ॥
॥ अनग्निरनिके: स्यान्मुनिर्मूलफलाशन: ॥११॥ मनु. अ. ६ श्लो. २५
॥ अप्रयत्न: सुखार्थेषु ब्रम्हचारी धराशय: ॥
॥ शरणेष्वममश्चैव वृक्षमूलनिकेतन: ॥१२॥ मनु. अ. ६ श्लो. २६
अर्थ:- जे शान्त व विद्वान लोक वनामध्ये राहून, तप व धर्मानुष्ठान करुन व सत्यावर श्रद्धा ठेवून, भिक्षावृत्तीचा अवलंब करुन वनामध्यें राहातात, ते त्या ठिकाणी निर्मल होऊन प्राणाच्या द्वारानें अविनाशी, हानिलाभरहित, पूर्णपुरुष अशा प्ररमात्म्याला प्राप्त करुन घेऊन आनंदित होतात. ॥९॥
अर्थ त्रिकाल स्नान करुन देवपितरांचें तर्पण करावें. या वाचून अन्यहि अतिशय उग्रतप आचरण करुन आपल्या देहाचें शोषण करावें. ॥१०॥
अग्निहोत्र संबंधी [ वैखान सशास्त्राचे विधीनें] अग्नीचा समारोप यथाविधी आत्म्याचे ठायी करुन पश्चात् अग्निरहित असें मौनव्रत धरुन मुळें, फळे, मात्र भक्षण करुण राहावें. ॥११॥
सुख उत्पन्न करणारे जे पदार्थ यांविषयी यत्नशून्य रहावें ब्रम्हचारी (स्त्रीसंभोगरहित) होऊन तृणांनी आच्छादित भूमीवर शयन करावें. निवासस्थानाविषयी ममता सोडून वृक्षांच्या मूळी वास करावा. ॥१२॥
॥ तापसेष्वेव विप्रेषु यात्रिकं भैक्षमाहेरत् ॥
॥ गृहमेधिषु चान्येषु द्विजेषु वनवासिषु ॥१३॥ मनु.अ.६ श्लो.२७
॥ ग्रामादाहृत्य वाश्नीयादष्टौ ग्रासान्वने वसन् ॥
॥ प्रतिगृह्य पुटेनैव पाणिना शकले न वा ॥१४॥ मनु.अ.६ श्लो.२८
॥ एताश्चान्याश्व सेवेत दीक्षा विप्रो वने वसन् ॥
॥ विविधाश्वौषनिषदीरात्मसंसिद्ध्ये श्रुति: ॥१५॥ मनु.अ.६ श्लो.२९
॥ वनेषु च विहृत्यैवं तृतीयं भागमायुष:
॥ चतुर्थ मायुषो भागं त्यक्त्वा संगान् परिव्रजेत ॥१६॥ मनु.अ.६ श्लो.३३
अर्थ:- ( फळ, मुळे न मिळतील; तर) वानप्रस्थीयांनी यात्रा [ शरीर निर्वाह ] चालेल इतकी भिक्षा आणावी. ( वानप्रस्थांचा असंभवसतां ) वनांत वास करणार्या अन्य गृहस्थाश्रमी द्विजांपासून ( ब्राम्हण,क्षत्रिय वैश्यापासून ) भिक्षा आणावी ॥१३॥
[ बनांत गृहस्थाश्रमी द्विजांचा असंभव असतां) गावांतून भिक्षा आणून त्यांचे आठ ग्रास वृक्षांच्या पानांवर हातानें अथवा परळांत घेऊन भक्षण करावे ॥१४॥
वानप्रस्थाने हे नियम व इतर बानप्रस्थ वेदोक्त नियम धारण करावे. आणि उपनिषदांत सांगितलेल्या नानाविध श्रुतींचा [ ब्रम्हप्रतिपादक वाक्यांचा ] आत्म्याला ब्रम्हसिद्धि करितां अभ्यास करावा ॥१५॥
या रीतीनें आयुष्याचा तिसरा भाग ( ७५ वर्षे अथवा विषयप्रीतीचा क्षय होईपर्यंत आयुष्याचा काळ वनामध्यें घालवून संगांचा परित्याग करुन आयुष्याच्या चतुर्थ भागांत संन्यास ग्रहण करावा ॥१६॥