श्रीनाथलीलामृत - अध्याय १ ला
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
॥ श्री गणेशाय नमः ॥
मूर्धान्मायगुरोः पदं भगवतश्वोंकारसिंहासनम् । सिध्दाचारसमस्तवेदमथनं षट्चक्रसंचारणम् ।
अद्वैतस्फुरणप्रसादरमणं पूर्णप्रभाशोभितम् । शांतं सद्गतिदायकं भज मनश्वैतन्यचंद्रोदयम् ॥१॥
ॐ नमो जी आदि परात्परा । सर्ववंद्या अगोचरा । वेदप्रतिपाद्या निर्विकारा । आदिवंद्या जगत्पते ॥१॥
तूंचि गणेश चित्समुद्र । तरंग ब्रह्मास्मीति साचार । तेचि ब्रह्मतनया सुंदर । मूळमाया प्रकृति जे ॥२॥
तूं आदिमायेचा नियंता । त्रिगुणात्म देव निर्मिता । अनंत ब्रह्मांडें रचिता । तूंचि होसी सर्वदा ॥३॥
जगन्मंगल मंगलमूर्ति । मंगळनामीं मंगळकीर्ति । मंगळाधीशा मंगळस्फूर्ति । मंगळप्रदा मंगळा ॥४॥
जयजयाजी गजवदना । सुत्सुखसदना विघ्नकदना । बिबुधवंदना शिवनंदना । दासानुमोदना तूं होसी ॥५॥
अरुणसंध्यारागवर्ण । गजानना तुझे कोमल चरण । रुणझुणीत पदभूषण । शुभ्रवसन शोभलें ॥६॥
विशाळ दोंद चतुर्भुज । हसतभूषणांकित सतेज । परशांकुश तेजःपुंज । मुक्तमाळा डोलती ॥७॥
ह्रदयपदक चंद्रापरी । मुक्ताक्षेणिया नक्षत्रसरी । शुंडा सरळ साजिरी । गंडस्थळें मिरवतीं ॥८॥
मणिमय मुकुट झळाळ । रत्नश्रेणी फांकती किळ । इंद्रनीळ मुकुटीं तेजाळ । दुर्वांकुरें विखुरलीं ॥९॥
सर्वांगी सिंदुर चर्चिला । अरुणोदयरंगी रंगला । भाळी स्त्रकूचंदन शोभला । मृगमदतिलक त्यावरी ॥१०॥
द्वितीयांबर शुभ्र तगट । तडित्प्राय लखलखाट । कंठी नागबंध सुभट । एकदंत झळके पैं ॥११॥
गजास्याचें पाहोनि तांडव । तोषोनि प्रसन्न अपर्णाधव । टाळ घेती सकळ देव । उभे ठाकती तत्पर ॥१२॥
ऐसी तूं वरद मूर्ति । वर देई ग्रंथाप्रति । सदयह्र्दय तूं गणपति । म्हणोनि प्रार्थी अनन्य ॥१३॥
श्रीमान् सिध्दिबुध्दिरमण । प्रसन्न झाला मजकारण । अभय देऊनियां पूर्ण । ग्रंथ करवी मज हस्तें ॥१४॥
आतां वंदूं वेदजननी । ब्रह्मचित्कळा ब्रह्मास्मि ध्वनि । ते प्रकृति प्रणवरुपिणी । शारदावेष अवगमी ॥१५॥
हंसगमनी हंसवाहिनी । हंससोऽहंस्वरुपिणी । अहंसोऽहं भास दोन्ही । नाशी जननी माझी हे ॥१६॥
कुंदेंदुतुषारहारधवल । शुक्लांबरधारिणी सोज्वळ । वीणापुस्तक करयुगल । लीलाकमल हस्तकीं ॥१७॥
पद्मासनी पद्मनयनी । पद्मपद्मि पद्मभूषणी । पद्माननी पद्मोद्भवनंदिनी । पदपद्मीं मूर्ध्नी ठेवितों ॥१८॥
शुभ्र अळंकार शुह्र वसन । शुभ्र आसन शुभ्र भूषण । शुभ्र सौंदर्य शुभ्र वहन । शुभ्र यश तव असे ॥१९॥
ब्रह्मा विष्णु शंकर । त्रिदशसह पुरंदर । तूंतें वंदिती निरंतर । वंद्य वंदून तिष्ठती ॥२०॥
तुझें ऐकोनियां गायन । देव दानव तल्लीन । किन्नर गंधर्व अप्सरा मौन । धरोनि तिष्ठती तव सेवे ॥२१॥
तव पादपद्म जेथें पडे । वसंतवृंद सुरवाडे । रुंजी घालितों वाडेकोडे । तुझें रुपडें अनुपम्य ॥२२॥
तुझी कृपादृष्टि कल्पतरू । मी होईन सुरगुरु । दरिद्री लाभे सुवर्णमेरु । जन्मांध परीक्षी रत्नातें ॥२३॥
यावरी नमूं वागेश्वरी । शब्दब्रह्मसिंधुलहरीं । तूं चहूं वाणींची ईश्वरी । ग्रंथाभिमान तुज असे ॥२४॥
माझी जडबुध्दि विध्वंस करी । सुरसाळ वदवी वैखरी । काय न करिसी तूं निर्धारी ॥ जगन्माये तुज नमो ॥२५॥
आतां जिव्हाग्री बैस निरंतर । श्रोतयां विद्वज्जनां पाहुणेर । मजकरवीं तूंचि देणार । श्रवणशृंगार लेववी ॥२६॥
जननी तुझ्या अभयें करुन । श्रोतयां देत आमंत्रण । न्यूनपणाचा अभिमान । भार तूंतें असे पैं ॥२७॥
आतां वंदूं श्रीगुरु भैरव । तुझे वाक्यामृतें गौरव । अनेक जीवांचे रौरव । नाममात्र चुकवी जो ॥२८॥
तो सद्गुरुनाथ समर्थ । त्याचे प्रसादें की कृतार्थ । मम मानसमनोरथ । बैसोनि सारथ्य करी तो ॥२९॥
ज्याची समुद्रवलयांत कीर्ति । मी काय वर्णूं अल्पमति । स्वस्वार्थाचे आर्ति । करी स्तुति यथाबुध्दि ॥३०॥
तो सदगुरु भैरवाख्य मूर्ति । माता माझी आदिशक्ति । तो आदिपुरुष प्रकृति । माता पिता वंदिली ॥३१॥
आधीं सुवर्ण वरी सुगंध । पिता तो गुरु प्रसिध्द । ज्याचें सामर्थ्य अगाध । भूमंडळी जाणती ॥३२॥
जो अद्वेष्टा भूतमात्रीं । मातृवत् मानी परस्त्री । हेम लोष्ट समान नेत्रीं । सबाह्यदृष्टि सारखी ॥३३॥
क्षमाशांतीचा समुद्र । अघसंहरणीं प्रतापरुद्र । दयेचा शीतळ चंद्र । धैर्यत्व धर्ता धरोपम ॥३४॥
योगसाधनाचा मेरु । औदार्यविषयीं कल्पतरु । निर्लोभ माझा सद्गुरु । ग्रंथतरु वाढवी जो ॥३५॥
आतां वंदूं कुळदेवता । श्रीमार्तंड भैरव तुळजा समर्था । त्यांसि विनयें शरण जातां । अभय ग्रंथ तयाचा ॥३६॥
याव्री वंदितों ऋषिजन । वाल्मीक दिव्यांश भगवान । वेदांतनिपुण पुराण । ग्रंथकर्ते वंदितों ॥३७॥
मीमांसाजैमिनी वसिष्ठ । गौरमादि शिष्ट । सांख्यशास्त्र -कपिल वरिष्ठ । दंडप्राय वंदितों ॥३८॥
पतंजलि सहस्त्रशीर्ष । वदला स्वयें शेष विशेष । भाषाचातुर्य-उत्कर्ष । विशेष सिंधूसारिखा ॥३९॥
गौडपाद श्रीआचार्य । श्रीधर आणि विवरणाचार्य । टीकाकारांत चातुर्य । भर्तृहरि प्रणामी ॥४०॥
मुद्गल रघुनाथपंडित । ज्यासी पावन गंगा करीत । जयदेव जगविख्यात । अष्टपदीं पैं गाती ॥४१॥
प्राकृतांमाजीं आचार्य । मुकुंदराज ग्रंथवर्य । विवेकसिंधूचें ऐश्वर्य । जयत्पाळचि लाधला ॥४२॥
जो षड्गुण-ऐश्वर्य भगवाअन । तो महाराज श्रीकृष्ण । गीता स्वयें उपदेशून । विजय करवी जयातें ॥४३॥
निर्वाणसमयीं उध्दव बोधिला । दीनवत्सला बाध आला । म्हणोनि अवतार धरिला । ज्ञानेश भगवान श्रीविष्णु ॥४४॥
गीतार्थ हा गूढ फार । करी उघड ज्ञानेश्वर । छ्प्पन्न भाषेचा संभार । अर्थ चतुर जाणती ॥४५॥
श्रीशुक सांगती परीक्षिती । श्रीमद्भागवत निगुती । परि जगदोध्दाराचे आर्ति । एकनाथ अवतार ॥४६॥
एकनाथें एकादशावरी । टीका केली सविस्तरीं । रामायण रुक्मिणीस्वयंवरीं । आर्त पुरतई आर्ताचे ॥४७॥
कवनकुशळ मुक्तेश्वर । परमरसाळ भारत सुंदर । नवरसांचें मंदिर । चतुर तेथें विसांवती ॥४८॥
रामदासें निजबोध । प्रसिध्द केला दासबोध । ज्याचा महिमा अगाध । शिवाजीसी लाधला ॥४९॥
पंडितांमाजी अग्रगण्य । वर्णिताती वामन । अर्थगौरवचातुर्य कवन । दासोपंतही महान् प्रसिध पैं ॥५०॥
तुळसीदास रामायण ग्रंथ । तद्देशभाषामथितार्थ । नाभाजी संतचरितार्थ । पूर्वभाषा अपूर्व ॥५१॥
श्रीधरकवि नाझरेकर । रामकृष्णविजय परिकर । पांडवप्रताप शिवलीला सुंदर । केले ग्रंथ तयांनीं ॥५२॥
महीपतिबावा भक्तिरस । भक्त-इतिहास अतिसुरस । भक्तचरित्रें असमास । वर्णिते झाले आवडी ॥५३॥
ब्रह्मांडातें गवसणी । घालवेल काळेंकरुनी । सत्पुरुषमहिमावाग्वाणी । मौन राहे श्रेष्ठाची ॥५४॥
वसिष्ठें दर्भे धरिली धरणी । सूर्यरथीं छाटी समतरणी । साक्षी शेष वासरमणी । आणिता झाला प्रतापें ॥५५॥
येकीं केशवेंकरोनि अपांपती । ज्ञानेशें चालविली भिंती । वेद वदवी पशूहातीं ॥ अगाध कीर्ति जयाची ॥५६॥
एकनाथें पितर आणिले । नामयानें देऊळ फिरविलें । अनेक चरित्रांतें दाविलें । महानामी महान ॥५७॥
काय न करिती महापुरुष । प्रत्यक्ष केला स्त्रीचा पुरुष । महिमा ज्याचा उत्कर्ष । शेष अशेष होतसे ॥५८॥
एके दिवशीं तुळसीदास । आनंदें असतां मठास । तंव चरित्र वर्तलें कैसें । तें उल्हासें निवेदी ॥५९॥
कोणी स्त्री शय्यागमनीं । जातसे ते कामिनी । साळंकारवस्त्राभरणी । दर्शना येत तयाचे ॥६०॥
येरी करी नमन । सौभाग्यपुत्रवंती म्हणोन । आशीर्वाद ऐसा वदून । नकळत वचन बोलिले ॥६१॥
येरी वदे विनयोत्तरीं । मानसिक कीं जन्मांतरीं । शय्यागमनार्थ निर्धारी । जातसें मी स्वामिया ॥६२॥
जासी तरी कायसी खंती । कुणप आणवी सत्वरगती । तात्काळ उठवी स्वहस्ती । दीनवत्सल म्हणोनी ॥६३॥
अघटित घडे एक वेळ । सोमसूर्यमंडळ । हेंही निश्वळ परि चळ । न चळे वचन साधूचें ॥६४॥
नसतां प्रारब्ध संचित । नवें निर्मिती साधुसंत । जे आलिया शरणागत । अघटित देती तयांसी ॥६५॥
ऐसें माहात्म्य जाणोन । संतांसि आले शरण । देऊनि मज कृपेचें दान । पोसणा म्हणवी तुमचा ॥६६॥
संत-श्रोतयां विनवणी । विनयपदीं मूर्ग्धी । सभागर्भी आवाहनीं । तुम्हांसी पै ॥६७॥
काया वाचा मी किंकर । आज्ञाधारक पादुकाधर । मुद्रांकित सेवाधिकार । असें तत्पर स्वामीचे ॥६८॥
तुम्ही विद्वज्जन श्रोते । माझें वाक्य करा सरतें । अरुष शब्दें तुम्हांतें । प्रार्थित असें निजभावें ॥६९॥
मुद्रांकित प्रसादमुद्रा । मुद्राभिमानी गुरुनरेंद्रा । मोलें उणीं पत्र परि मुद्रा । अभद्र भद्रा करीतसे ॥७०॥
अनुग्रहठसा ठसाऊनी । ठसावी श्रोतयां श्रवणीं । ठसे विविध पद्यरचनीं । ठसावी हे श्रोतियां ॥७१॥
मानससरोवरवेष्टित । मरालश्रेणी विराजित । तैसे श्रोते तुम्ही समस्त । असमास तेथें बैसलां ॥७२॥
रत्नपरीक्षे परीक्षक । तुम्ही महान पुण्यश्लोक । जीववस्तूचे ग्राहिक । अमौल्य मौल्य जाणती ॥७३॥
जीर्णकवि संत महान । त्यांसी मागून भिक्षादान । सुरस चरित्र पक्वान्न । अन्नछत्र श्रवणाचें ॥७४॥
विचारश्रेष्ठ ज्ञानसंपन्न । बुध प्रबुध्द विद्वज्जन । भगवद्भक्तिपरायण । श्रवण -मनन जाणते ॥७५॥
अगाध तंतु गुणवर्णन । वोवी वोविली सुमनें सुमन । प्राकृत छंदांत गुंफोन । मनोहर श्रोतियां ॥७६॥
कर्णभूषित भूषण । मुक्तकथा वर्ण सुवर्ण । यथामति करावें ग्रहण । श्रवणीं श्रोतियां अर्पितों ॥७७॥
कथानुसंधान सूत सुंदर । नसे गीर्वाण रेशमी वस्त्र । सबाह्य घडी पदर । महाराष्ट्रपद धडोती ॥७८॥
ग्रंथलीला महदाकाश । उड्डाणीं व्यासादि हंस । पारावार न पवे त्यास । तेथें मशक मी किती ॥७९॥
नाना कवि नाना मति । नाना युक्ति । नाना भक्त नाना भक्ति । नाना ग्रंथी वर्णिले ॥८०॥
मी तो मतिमंद आळसी । मज हस्तें ग्रंथ करविली । पिपीलिका कनकाद्रीसी । उचलील कैसी सांग पां ॥८१॥
टिटवीचे चंचूपुटीं । समुद्र कैसा घोटवेल घोटी । अकाश सांठवण पात्रपेटी । कोठोनियां आणावें ॥८२॥
कर्ता करविता गुरु समर्थ । मूर्खहस्तें करवी ग्रंथ । वानराहाती रघुनाथ । लंका घेत साह्य पैं ॥८३॥
माझें मुख्य निमित्त करुन । करिसी आपुलें गुणवर्णन । शिशुहस्तेकरुन । माता भोजन करवित ॥८४॥
विजयादशमी विजयदिन । सर्व करिती सीमापूजन । अपटा शमी आणिती सुवर्ण । येरयेरां देताती ॥८५॥
सीमोल्लंधनाचे सुवर्ण । नोहे त्या म्हणेल कोण । बाजारीं द्रव्य देईल कोण । तोल मोल त्या कैंचे ॥८६॥
तैसें तुमच्या अभयेंकरुन । नाही तरी मज पुसे कोण । मस्तकी हस्त म्हणोन । मान्य होय जगातें ॥८७॥
तुम्हां श्रेष्टांचे अभयवचन । निर्भय झालें अंतःकरण । अजा सिंहाश्रयेकरुन । आरुढे गजमस्तकीं ॥८८॥
प्राकृतकविप्रसादोत्तरे । प्रसाद भाऊनि वक्त्रें । कृपायुक्त परिसिजे श्रोत्रें । सर्वच श्रोतयां वंदितों ॥८९॥
बिल्व तंदुळ जळ । भावें पूजिती पयःफेनधवले । कनकपुष्पीं जाश्वनीळ । विमल भावें पूजिती ॥९०॥
शुध्द द्वितीयेचे दिवशीं । आबालवृध्द वाहाती दशी । काष्ठदीपिकें दिनकरासी । वोवाळावें पैं जैसें ॥९१॥
गंगोदकें गंगेप्रती । अर्ध्य पाद्य अर्पिती । तेविं शब्दसुमनें तुम्हांप्रती । तुमचें तुम्हां अर्पितों ॥९२॥
छंद घेवोनि अर्भक । मागतसे प्रसादभातुकें । श्रोते म्हणती निके । ग्रंथ कौतुकें करी हा ॥९३॥
साधु वदती वक्तयालागून । तृप्ति झाली आमंत्रणें । आतां करवी कथामृतपान । श्रवणपात्रीं वोगरी ॥९४॥
तेव्हां अष्टभाव दाटून । सद्गद कंठ रोमांचस्फुरण । प्रेमाश्रु स्त्रवती जीवन । प्रत्यंग अंगीं नमीतसे ॥९५॥
महाप्रसाद ते वेळी । मग शकुनग्रंथी बांधिली । तुमचे अभयोक्तीनें ग्रंथवल्ली । डवरली सपुष्प फळें ॥९६॥
तुमचे कृपें अभयोत्तरीं । जी जीं शब्दी शब्दोत्तरीं । आतां निर्भय बाह्मांतरीं । निःशक मन जाहलें ॥९७॥
मनोवाजी धांवे सैरा । यास्तव आवरुन वाद्गोरा तुमची प्रार्थना हरित चारा । गुंतोनि राहिलों पाहें पां ॥९८॥
आतां आलस्य निद्रा नासिजे । ग्रंथ भावार्थे परिसिजे । संतापातें विसरिजे । श्रवण कीजें साधकीं ॥९९॥
श्रोतियांतें नवरस सुरस । श्रवणीं परिसा इतिहास । सर्व सुखाचा सारांश । भोळे भाविक लाभती ॥१००॥
नूतन कवन म्हणून । अव्हेरितील विचक्षण । गुरुआज्ञेवरुन । प्रवर्तलों या ग्रंथीं ॥१॥
स्वयंभू काय होय शिव । पूजूं नये काय पार्थिव । तसा ग्रंथार्थी भेदभाव । धरुं नय सर्वथा ॥२॥
मार्कंडेय शिवार्चनीं । पार्थिवी प्रकटे शूळपाणी । दंड करोनि दंडपाणी । बिरुदाभिमानि दासांचा ॥३॥
शब्दब्रह्म आब्रह्मस्तंब जाण । प्रणवापासोनि गीर्वाणवर्ण । छप्पन्नभाषादि वर्ण । कविजन ग्रंथी वर्णिती ॥४॥
धेनु असती अनेकवर्ण । दुग्धामाजी नसे भिन्न । तसे महाराष्ट्र गीर्वाण । अर्थपूर्ण येकचि ॥५॥
आतां असो हा विस्तार । सांप्रत झाला बौध्दावतार । कलींत प्रवर्तला अनाचार । यास्तव अवतार साधूंचा ॥६॥
जगदोध्दारानिमित्त । कलींत अवतरती सिध्दसंत । यासि प्रमाण श्रीमद्भागवत । श्लोकार्थ श्रोती परिसावा ॥७॥
कलौ खलु भविष्यन्ति नारायणपरायणाः कृतादिषु प्रजा राजन् कलाविच्छन्ति सम्भवम् ॥
कृतयुगापासोन । महर्षि करिती अनुष्ठान । कलींत व्हावें आम्हां जनन । घडेल भजन या हेतु ॥८॥
नाना यातींत अवरतोन । भजनी लावूं सर्व जन । होऊं नारायणपरायण । इच्छा होती तयांची ॥९॥
आतां असो ह विस्तार । कलींत झाला बौध्दावतार । स्वधर्मलोप अनाचार । म्हणोनि साधु अवतरती ॥११०॥
पूर्वी जे दैत्य मदोन्मत्त । मदांध जन्मले बहुत । देव द्विज साधु दुःखित । पुन्हा उद्भवत असुर ॥११॥
युगपरत्वें सज्जन दुर्जन । पुनःपुन्हा संभवोत । जळमाळान्याय फिरवोन । येती जाती मागुती ॥१२॥
दुर्मद दैत्य दुराचारी । युगायुगी पिडिती भारी । दश अवतार धरोनि मुरारि । दुष्ट असुरां निवटिले ॥१३॥
द्वापर सरतां श्रीकृष्णमूर्ति । निजधामा गेला श्रीपति । कलिराज्याची प्रवृत्ति । होती झाली अनायासें ॥१४॥
राक्षस होती ब्रह्मराक्षस । यक्षयक्षिण्या बहुवस । झोटिंग महिषासुर तामस । पिशाचसृष्टि उद्भवली ॥१५॥
मुंजे मारके ग्रह दुर्धर । समंध समंधें अतिक्रूर । धुमस घालिती निर्भर । यवनपिशाच माजले ॥१६॥
भूंतांमाजीं नृपवर । अग्निवेताळ अतिक्रूर । धुमस घालिती निर्भर । भयानक भयभीति ॥१७॥
सप्तअप्सरा जळवासिनी । सटवीत्रय मायाराणी । जाखनी शाकिनी डांकिणी । पिशाचश्रेणी त्रासिती ॥१८॥
साबरी मंत्र मंत्रचळ । उच्छिष्टचांडाळी कुश्विळ । चेटक नाटक इंद्रजाळ । कवटाळ मुष्टीकरण ॥१९॥
कुश्वितमंत्रेंकरुन । उग्रदेवते करी दीन । वीरनृसिंह हनुमान । भैरववीर बोलती ॥१२०॥
एक स्मशान जागविती । एक प्रेतासनीं बैसती । एक वटयक्षिणी साधिती । यवनबीर इत्यादि ॥२१॥
विद्यामदें मस्त झाले । पाखंड थोतांड उभविलें । नास्तिकांचें प्राबल्य झालें । मत स्थापिती भलतेंचि ॥२२॥
मद्यमासांचें सेवन । भ्रष्टाभ्रष्ट आचरं । वर्णसंक्दर माजवून । स्वधर्म बुडविला ॥२३॥
षड्दर्शनांची सिराणी । सत्त्वस्थीं धर्म सांडिला जनीं । राजस तामस आचरणीं । निद्यमार्ग स्थापिती ॥२४॥
श्रवण मनन अध्ययन । अर्चन वंदन दास्य भजन । कीर्तन शास्त्रपठण । देवदर्शन नावडे ॥२५॥
यवनांचें राज्य झालें । गोब्राह्मण त्रासले । गोहिंसक मार्गघ्न झाले । भारें डोले कुंभिनी ॥२६॥
ऐसी कलीं दुराचारी । दुराचरणें पृथ्वीवरी । तेणें पीडिली धरित्री । धेनुरुपें वदतसे ॥२७॥
कमलोद्भवा सावित्रीवरा । रसातळा जातसे धरा । दुराचरणी डांगोरा । भुवनत्रयीं न समाये ॥२८॥
विधि ललाटपटलेखना । परिसी ही विज्ञापना । भार झाला साहवेना । सोसवेना पातक हें ॥२९॥
अभक्ष्यभक्ष्य पीतापीत । अगम्या गमन करीत । वेदबाह्य मतें स्थापीत । पाप अद्भुत जाहलें ॥१३०॥
विरंची वदे वसुंधरे । तूं पीडिलीस दुष्टभारें । पूर्वीच योजिलें रमावरें । स्वस्थ राहें स्वस्थानीं तूं ॥३१॥
विधि म्हणे अविधिनाशार्थ । अवधि नसे अवतार होत । खेद न धरावा मनांत । निर्भय अभय तुज असे ॥३२॥
हें वदोनि पृथ्वीतें । विधि पातला वैंकुंठातें । निर्जर पुरंदर देखिले तेथें । परम संतोष मानिती ॥३३॥
ग्रंथ भवार्णवीचें जहाज । भावघन सधन सहज । अमौल्य वस्तु तेजःपुंज । श्रोतयांतें अर्पितों ॥३४॥
कथा पवित्र सुरस सुधा । भवरोगाची नाशी बाधा । दुरित जाय आपदा । अचल संपदा पावेल ॥३५॥
पवित्र मंदाकिनीचें उदक । हेमपात्रीं मृण्मयादिक । ते रीतीं होय पुण्यकारक । पुण्यश्लोक वंदिती ॥३६॥
तुम्ही सर्वज्ञ देखणे । द्वेष नसे वर्णावर्ण । अभेद चंडकिरण । तिमिर नेणे कदाही ॥३७॥
शूर्पन्यायें त्यजिजे दोष । ग्रंथार्थ घ्यावा सारांश । गुणग्रहण उत्तम पुरुष । पल्लोरीसम कूजन तें ॥३८॥
तुम्ही साह्य होणे मजप्रति । अगाध न धरवे धरिलें चित्ती । जेविं वानरांचे हातीं । सेतु बांधवी रघुवीर ॥३९॥
सिंधुजळ अंजुळी न साठे । ब्रह्मांड नुचली अळिका नेटें । तुम्ही शेष होवोनि गोमटे । साह्य होणें मजप्रति ॥१४०॥
वारंवार काय म्हणावें । न लगे श्रोतयां कडसावें । क्षारोदक मेघस्वभावें । मिष्ट करणें प्राप्त पैं ॥४१॥
क्षिप्रेनें काय विनवावें । मजप्रति गोड करावें । शर्करेनें मेळवावें । हें काय लागे सांगणें ॥४२॥
सुरस आदिनाथलीलामृत ग्रंथ । श्रोतयां अमरां अमृत । अभाविक जे नवज्वरित । क्षीर वावडें नावडे ॥४३॥
भैरववरप्रसादेंकरुन । आदिनाथ निमित्त करुन । सुरस कथा वदवी आपण सूत्रधार तो स्वयें ॥४४॥
श्रीमन्नाथलीला सुरस । पुढें रसाळ इतिहार । श्रवण करीत सावकाश । प्रथमोऽध्याय गोड हा ॥१४५॥
संमतिश्लोक ॥१॥ ओव्या ॥ १४५ ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 06, 2020
TOP