श्रीनाथलीलामृत - अध्याय ६ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
नमो श्रीआदिनाथ मत्स्येंद्रा । श्रीगोरक्षा चित्समुद्रा । भवनाशका प्रतापसमुद्रा । भद्रकारका सद्गुरु ॥१॥
शिवावतार मत्स्येंद्र स्वयें । गोरक्ष तो विष्णु निश्चयें । चतुरानन चौरंगी अंशमय । विश्वोध्दारा प्रगटले ॥२॥
धन्य धन्य ते महीमाझारीं । योगी जनविजनविहारी । निमग्न सदा अभ्यंतरीं । जगदोध्दारी विचरती ॥३॥
जो सद्गुरुभक्तिपरायण । तेथें भुक्ति मुक्ति कल्य़ाण । दुर्घट संकटें नासतीं दारुण । अकाळमरण न बाधी ॥४॥
जयाचा गुरुपदीं विश्वास । प्रारब्धें नेलें विषमस्थानास । तेथें जया पावोनि यश । मान्य होय सर्वातें ॥५॥
पाहे उत्तंक गुरुआज्ञेन । प्रवेशल पाताळभुवन । आणूनियां कर्णभूषण । पुण्याहवाचनीं अर्पित ॥६॥
असो गतकथाध्यायीं इतिहास । विजय नृपासीं दीक्षाउपदेश । देऊनियां गोरक्षपुरास । येते झाले स्वभावें ॥७॥
ऐका श्रोते सज्ञान नर । रुद्रपुरीनामाख्य नगर । तेथें भुलेश्वरनामा नृपवर । परम प्रतापी भूभुज तो ॥८॥
चंद्रावती तयाची प्रियकांता । चंद्रानना पतिव्रता । सुंदर चातुर्यलावण्यसरिता । प्रीति उभयतां अद्वय ॥९॥
दुष्टदमनीं वैश्वानर । प्रजेविषयीं करुणासमुद्र । धीर वीर प्रतापसमुद्र । शीतळ चंद्रासारिखा ॥१०॥
औदार्यविषयीं जेवीं कर्ण । योध्दा जेवीं प्रतिअर्जुन । सुखी रक्षी गोब्राह्मण । साधुसेवनीं अतितत्पर ॥११॥
कोणे एके दिवशी जाण । वनविहारा करी गमन । चतुरंगसेना सिध्द करुन । चमूसंपन्न जातसे ॥१२॥
नगरगर्भागूनि मिरवत । जातसे संभारसमवेत । नगरस्त्रिया विलोकित । मंदिरीं गोपुरीं वळंघुनी ॥१३॥
आधींच सौंदर्यरुपाथिला । अळंकारसुवस्त्रीं अति डौरला । पाहावया स्त्रियांचा पाळ । मेळा मिळाला सत्वर ॥१४॥
सुस्वरुप दैदीप्यमान । स्त्रिया निरखिती रतिरमण । मनोमृग दिधला पंचबाण । कटाक्षमार्गे मूर्छित ॥१५॥
तुष्ट पुष्ट बळसौंदर्य । ऐश्वर्य आणि वीर्य शौर्य । पाहोनि दीपपतंगन्याय । झेंपाविती परपुरुषीं ॥१६॥
एक वदे धन्य जननी । ऐसें रत्न प्रसवली मेदिनी । एक निरखोनि नयनीं । सोमकांतापरि द्रवे ॥१७॥
एक वर्णी स्वरुपसौंदर्य । एक वदे धन्य ऐश्वर्य । एका म्हणती कळाचातुर्य । याचे देहीं विसावलें ॥१८॥
एक वदे जन्मांतरीं । अर्चिली शिवगौरी । तरी जोडा निर्धारी । ऐसा वर लाधिजे ॥१९॥
एक म्हणे अहो बाई । आपुलें प्राक्तन शुध्द नाहीं । पतिसुखावीण पाही । सदा दाही चिंताग्नि ॥२०॥
प्रपंच सुघड असावा सांग । याहून भलें मग वैराग्य । ईश्वरी धरुन अनुराग । जन्म सार्थक करावें ॥२१॥
एक वदे ऐसें नोहे । आपुला भ्रतार ईश्वर होय । त्यावेगळें ऐश्वर्य काय । असोनियां जाळावें ॥२२॥
कुळाभिमानी सत्कुळस्त्रिया । कुळीं न वर्तती ऐशा जाया । कुळावंतसंपत्तिऐश्वर्या । मानून वर्ते कुलांगना ॥२३॥
पूर्वार्जितें अर्चिला ईश्वर । तोची ईश्वररुप भ्रतार । त्याचें सेवन निरंतर । ते कुळोध्दारी पतिव्रता ॥२४॥
आपुला पति सर्वोत्तम । आपुला पति पुरुषोत्तम । पतिव्रतेचा हाचि धर्म । नेम निःसीम सेवेचा ॥२५॥
भ्रतार मानावा सर्वोत्कृष्ट । ऐश्वर्ये नृप जरी श्रेष्ठ । कांचनापुढें जेवीं लोष्ट । तेवी दृष्टीं पाहावा ॥२६॥
हो कां समर्थांचीं मंदिरें । आणि आपुली तृणागारें । परि वास्तव्यासी तेंचि बरें । काय इतर करावीं ॥२७॥
असो आपुल्य़ा नगरीचा भूप । आपुल्या प्रजेचा मायबाप । विवेकदर्पे कंदर्पसर्प । विवेकमंत्रें आकळावा ॥२८॥
असो मृगयेस राकचूडामणि । जातां पाहती पौरजश्रेणी । पुढें धांवती वेत्रपाणी । सत्कीर्ती वर्णिती तयाची ॥२९॥
नगरप्रदेशीं दळभार । जातसे सेनासमुद्र । पुढे अरण्य अटवी दुर्धर । घोर कंदर देखिलें ॥३०॥
तंव मृगसावजें देखिलीं दुरी । वीरांतें नृपति आज्ञा करी । हे मृग वधोनि सत्वरी । नगरीं जाऊं आपुल्या ॥३१॥
अश्व धांवडिती मृगपृष्ठीस । ते पळाए चौदिशेस । प्राणभय होऊनि पशूंस । पळोन जाती दशदिशा ॥३२॥
त्यांतून एक कुरंग । रायें उजू जाय सवेग । हांवे भरोनियां मृग । पाठलाग करी नृप ॥३३॥
वलय सारोनि स्वहस्तें । ग्रीवा थापटोनि पादांघ्रिसंकेत । हय पवनवेगें गमन करीत । मृगपृष्ठीं सत्वर ॥३४॥
किराण मारुन जाय सत्वर हरिण । मागें राजा मारीत बाण । त्याचें चुकवोनि संधान । पुढें गमन करीतसे ॥३५॥
जवळ पाहतां जाय दुरीं । हावें धांवे वनगव्हारी । अकस्मात देखिली पुढें दरी । जाय भीतरी तो मृग ॥३६॥
चमू गेली एकीकडे । राजा जाय तयापुढें । आवेशला हावेढें । वन निबिड देखोनि ॥३७॥
तंव जाळींतूनि निघे मृग । रायें करोनि पाठलाग । बाणीं खोंचला सर्वांग । परत पवला मृग तो ॥३८॥
राव तृषाक्रांत श्रांतला । अशोकवृक्षी विश्रांतिला । तो ऋषिपुत्र एक देखिला । समिधार्थ आला त्या वनीं ॥३९॥
रायें नमस्कारोनि तयातें । म्हणे दुरळ वनीं पातला येथें । येरु वदे तो तयातें । समिघाग्रहणी हवनार्थ ॥४०॥
तयास वदे नृपनंदन । येथून समीप कीं वर जीवन । येरू तर्जनीसंकेतें करोन । जवळी आहे हे पाहे ॥४१॥
तेथून निघे राजकुमर । तों अरण्य देखिलें सुंदर । रम्य आराम मनोहर । पक्षी वृक्षी बैसले ॥४२॥
निबिड वृक्ष सफळ फळले । चूत चंपक चिंचिणी आवळे । न्य़ग्रोध औदुंबर रसाळे । वायुवेगें डोलती ॥४३॥
ताल तमाल व्याळसरळ । पोफळी बकुळी नारिकेळ । सुवर्णकर्दळी सदाफळ । दाळिंबी सफळ इत्यादी ॥४४॥
चंदन रातांजन देवदार । फणस आणि मांदार । अश्वत्थ कपित्थ केतकी सुंदर । जंबु जंबीरेसीं घन ते ॥४५॥
शुक पिक पिंगळें अनुवादती । सहंस शिखी बोलती । चक्रवाक बक उड्डाण घेती । कारंडवादि विहंगम ॥४६॥
समीप तडागजळ सुंदर । आंत जळ असे पुष्कळ । नीळवर्णी अतिसोज्वळ । कमळें जळीं विकासतीं ॥४७॥
सहस्त्रदळें रातोत्पळें । चंद्रोत्पळें निखिल ढवळीं । रुंजी घालिती अलिकुळें । झंकारशब्दीं बोलत ॥४८॥
तडागतट पाटांगणें । पुष्पवाटिका सुगंद्धसुमनें । अळीं भरलीं संपूर्ण जीवनें । परिमळ पवनें कोंदला ॥४९॥
बकुळी पाटली सेवंती । नाग पुन्नाग आणि मालती । जाई जुई सुगंधसेवंती । मुक्तमोगरे विराजती ॥५०॥
असो रायें केलें उदकपान । जळ्स्पर्शे नेत्र पुसोन । वृक्षातळीं बैसोन । विश्रांती घेत क्षणभरी ॥५१॥
तंव नगरस्त्रिया येती जीवना । लावण्य देखिल्या दिव्यांगना । विलोलनेत्री चंद्रानना । भूपसौंदर्या वेधल्या ॥५२॥
सायक सोडोनि कामेश्वर । पंचबाणी वेधलें शरीर । खोंचोनियां ह्र्दयजिव्हार । मनोहरणीं वेधल्या ॥५३॥
राया पुसती कोठोनि गमन । कोठें जाणें काय कारण । नाम नगर देशस्थान । श्रवण केलें पाहिजे ॥५४॥
अन्योन्य बोलती सख्यांप्रति । छप्पन्न देशीचें चक्रवर्ति । आले विवाहा धरोनि आर्त्ति । परि न पावती सरी याची ॥५५॥
राजगृहीं विवाह आहे । परि राजकन्येस वर योग्य होये । जरी प्रारब्धें तीसी लाहे । तरी थोर दैवें दैवाची ॥५६॥
उदयीक लग्नसमय तेव्हां । माळ घालील कोणास दैवा । पाणिग्रहण कोणासि तेव्हां । ब्रह्मसूत्र कळेना ॥५७॥
नगरजनां पुसे भूप । त्या नगराचा कोण नृप । पुसता झाला अतिसाक्षेप । नगरलोकां ते काळीं ॥५८॥
ऐका एकाग्र सविस्तर । चंद्रावती हे नामे नगर । येथें सुभद्राख्य राजेश्वर । परमप्रतापी भूमंडळी ॥५९॥
त्याची कन्या भुभावती । तिचे स्वयंवरा पातले नृपति । स्वरुपलावण्याची ख्याति । विश्ववदनीं वदतसे ॥६०॥
उदयीक असे लग्नसोहळा । सर्वत्र पाहूं पातले डोळां । माळ घालील कोणा भूपाळा । जाणवेल सर्व तें ॥६१॥
जेवीं दमयंतीस्वयंवरासी । देव मानव समारंभेंसी । येते झाले त्या स्थळासीं । परम उत्साही पैं ॥६२॥
असो सख्या भरोनि जीवन । जात्या झाल्या न लगतां क्षण । राणीवसांत येऊन । राजकन्येसी बोलती ॥६३॥
उदयीक तुझ्या प्राक्तनाची । परीक्षा नेमिळी असे साची । वर योजिला योजनेची । ईश्वर सिध्द करो तें ॥६४॥
उदंडा पुरुष पृथ्वीवर । ब्रह्मसृष्टीं चराचर । परि ऐसा शोधितां दुजा नर । भूमंडळींही दिसेना ॥६५॥
अति दैदीप्य दिव्यदीप्ति । गौरवर्ण सुप्रभकांति । मुक्तालंकारें मिरवती । रतिपति दुसरा ॥६६॥
ऐकोन वेधली अंतःकरणीं । केव्हां मी पाहेन नयनीं । ऐकिला ऐसा असेल चिन्ही । प्राप्त होईल मज कैसा ॥६७॥
नकळत पुरुषवेष घेतसे । अश्विनीआरोहण करीतसे । सर्व नृपांतें पाहतसे । गुप्तरुपें करोनी ॥६८॥
मग येवोनि तडागनिकटीं । राजयातें निरखिलें दृष्टीं । हाचि होय निश्चय पोटीं । करिती झाली शुभांगी ॥६९॥
परस्परें पाहोन नयनीं । खूण बाणली अंतःकरणीं । रायें वोळखोनि स्त्रीचिन्हीं । मौनमुद्रा अवलंबी ॥७०॥
हास्य करोनि परस्परीं । सलज्ज पाहे हे सुंदरी । विनवीतसे मधुरोत्तरी । अर्धांग इच्छी मानस ॥७१॥
रायास पुसे४ कोठील कोण । येरु म्हणे काय कारण । नामगोत्रास पुसोन । काय लग्न लावणें ॥७२॥
नृपलावण्य परिमळचंदन । वेधें वेढी जेवीं सर्पीण । तेवी संल्लग्न होऊनि मन । भूपवेधें वेधली ॥७३॥
विषयांध होऊनि नृपवर । तीतें वदे शपथोत्तर । तुजवीण मज प्रियकर । पदार्थ प्रिय असेना ॥७४॥
तये संधीं वदे वचन । मज देई भाष्यदान । राव पुढें सरसावून । भाष्य देत तयेतें ॥७५॥
ईश्वरमायेचें कौतुक । कदा न चुके आवश्यक । कैकयीतें वचन देख । जेवीं दशरथ देतसे ॥७६॥
होणार होतसे अनायास । कांही न करितां प्रयास । देहप्रारब्ध न चुके कोणास । सत्य सत्य त्रिवाचे ॥७७॥
जाणते पुरुष आचरती अविधी । पूर्वसंचित जे प्रारब्धीं । जो नेम नेमिला विधीं । होय अविधि तयांसी ॥७८॥
मोहिनीनें मोहिला पिनाकधर । मोहिनीनें मोहिला रुक्मांगद वीर । तैसाच झाला प्रकार । वचनीं नृपवर गुंतला ॥७९॥
असो उदयीक या संकेतें । रंगमंडपी येऊन तेथें । माळ घालीन स्वहस्तें । पर्णून न्यावें मजप्रति ॥८०॥
अन्योन्य खूण परस्परें । सांगोन पातली अंतःपुरें । मंगळध्वनी वाद्यगजरें । निरंतर होतसे ॥८१॥
तो सुवर्णाग्रज उदय । दैन्य सरतां अभ्युदय । तमनाशक ज्ञानसूर्य । प्रकाशत ज्यापरी ॥८२॥
असो मंडप उंच दीर्घ सुंदर । मखरें तोरणें मनोहर । शोभे समबिडौजमंदिर । चित्रविचित्र चित्रादि ॥८३॥
ऐसा शृंगारिला सभामंडप । मिळाले छ्प्पन्न देशीचें भूप । वधू देखोनि ज्योतिरुप । झेपावें पतंग ज्यापरी ॥८४॥
नृत्यांगना नृत्य करिती । उदकें कारंजी रंजवितीं । सुगंध उपचार अर्पिती । परिमळ भूषणें पुष्पादि ॥८५॥
नृप एकाग्र वेधिले चित्तें । अरुची उपचार न रुचते । जेवी पय नवज्वरितातें । तेवी उपभोग तयांसी ॥८६॥
ऐसे संधी सिध्द जाण । भुलेश्वरचमू मिळाली येऊन । सर्व समुदाय सज्ज होऊन । सभामंडपीं पातले ॥८७॥
राव सामोरा जाऊन त्यांस अतिसत्कारें आणितसे । अभ्युत्थान तयास । देते झाले सर्वही ॥८८॥
सिध्द होऊन नृपवर । तीतें न्याहाळित एकसर । म्हणती कृपा करील जगदीश्वर । तयास प्राप्त हें रत्न ॥८९॥
हस्तीचे शुंडे माळा । नेणो घालील कवणाचे गळां । भूपाळ झाले सर्व गोळा । डोळा तिकडे लावोनी ॥९०॥
तये काळी हारावली । तात्काळ राजकंठीं सूदली । सर्वत्रांसी भुली पडली । राजे पाहती तटस्थ ॥९१॥
ओंपुण्याह म्हणोनि लग्न । यथाविधी पाणिग्रहण । नृपें अर्पिलें अपार आंदण । दासदासी गजवाजी ॥९२॥
एवं चार्‍ही दिवस लग्नसोहळा । जामात पाहोनि नृप तोषला । द्रव्य कोश मुक्त केला । धर्म झाला याचकां ॥९३॥
यावरी वधू साध्य नरेशा । श्वशुरा पुसोनि जाय स्वदेशा । सर्व नृपांची अतृप्त आशा । जाती स्वनगरा आपुल्या ॥९४॥
बाह्य गजरें नगरांतूनि । जाता झाला सहकामिनी । रायें जामाता बोळवुनी । राजालयीं प्रवेशला ॥९५॥
राव आला ऐकोनि नगरा । प्रधान पातला सामोरा । आनंद नगरजननारीनरां । होता झाला सर्वांतें ॥९६॥
नगरीं रंगमाळा रेखिती । ध्वज उंच मंडप उभारिती । अक्षयवाणें मृगाक्षी करिती । नितंबिनी नगरींच्या ॥९७॥
मंगळ वाद्यें मंगळ गाणी । वारांगनानृत्यध्वनि । शोभायमान मंगळजननी । होती झाली तेधवा ॥९८॥
असो यापरी लग्नसमारंभ । नृपें मानूनि कृतार्थलाभ । वल्लभा आणि वल्लभ । प्रीती उभय अद्वय ॥९९॥
ज्येष्ठ भगिनीसी करोनि नमन । राहती झाली प्रीतीकरुन । कांही दिवस लोटतां जाण । तों विचित्र वर्तलें ॥१००॥
सापत्नबुध्दि संताप । संतप्त होय तीव्रताप । उत्तरोत्तर होय सकोप । द्वेषवल्ली उदेली ॥१॥
परि चंद्रावतीचे मनीं । द्वेष नसें अंतःकरणीं । जेवीं गंगा सोज्वळजीवनीं । अणुमात्र मळ असेना ॥२॥
कोणे एके दिवसीं जाण । राजा करीत असे भोजन । तों चंद्रावतीचेंही अन्न । पक्वान्न आणवी प्रीतीनें ॥३॥
आवडी देखोनि ज्येष्ठेची । द्वेषबुध्दि उदेली साची । प्रीति देखोन उभयतांची । नेणें क्षोभे अंतरीं ॥४॥
चिंताग्निज्वाळा तीव्र भारी । द्वेषें वेढली ते सुंदरी । उद्विग्न सदा विचारविवरीं । संतापें व्याप्त होतसे ॥५॥
खदिरांगारशेजेसी । सुखनिद्रा येईल कैसी । ते तळमळीत अहर्निशीं । पैशून्य लक्षी तियेचें ॥६॥
परि ते महासत्त्व अद्वेष्टी । द्वैत न पाहेचि दृष्टीं । कृत्रिम कापटय नसे पोटीं । स्वधर्मराहटीं वर्तत ॥७॥
रायें केला द्वितीयसंबंध । म्हणोन न करी तियेस विरोध । पतिसेवा निरंतर अगाध । पतिप्रिय तेंचि वर्तत ॥८॥
एके दिनीं एकांतस्थानीं । कांतकांता रमती दोन्ही । अलिंगन चुंबन मैथुनी । क्रीडा करिती आनंदें ॥९॥
हर्षानंद क्रीडारस । त्यांत कालविती झाली विष । बोलों सरसावली सरोष । त्रास उद्भवे जयातें ॥११०॥
तुम्ही धीर वीर सर्वज्ञ । कीर्तिध्वज उभविला जघन्य । परि चंद्रन्यायलांछन । जनीं दिसोन येतसे ॥११॥
तुमचा प्रियपदार्थ तो उच्छिष्ट । दृष्टिस आला अतिभ्रष्ट । तेथें प्रीति तरी उत्कृष्ट । दुष्ट अदृष्ट उदेलें ॥१२॥
ऐकोनि चटपटीत सवेगीं । जेंवी वृश्चिक वेधें सर्वांगीं । कारागृहाचे विवरदुर्गी । पडता झाला भूपति ॥१३॥
राव पडे संशयावर्ती । मौनस्थ ग्रहणीं न चले स्फूर्ति । क्षीन होऊनियां नृपति । मनोवाजी थोकला ॥१४॥
न करावा कोणाचा विक्षेप । म्हणोन करी हा साक्षेप । धर्मशास्त्रीं महत्पाप । म्हणे गौप्य असावें ॥१५॥
प्रिय पट्टराणी पट्टांगना । तिची नसावी दुष्ट वासना । प्रियपात्र तुमचें आवडे मना । परि प्रीति तिची परपुरुषी ॥१६॥
उदयीक कळेल हें चरित्र । परि गुप्त असावा गुह्यमंत्र । वाच्यांश न करावा अणुमात्र । अदृश्य चरित्र दृश्य होय ॥१७॥
ऐकोनियां रायासी चढल क्रोध । आतां कैचा इजसी संबंध । दुष्टापराधें इचा वध । प्रधानाहातें करवितों ॥१८॥
राव प्रधाना आज्ञापित । चंद्रावती न्यावी अरण्यांत । तीतें वधोनि यावें त्वरित । आज्ञा करितों त्रिवाचा ॥१९॥
मदांध अविवेक अविचार । विषयासक्त झाला नृपवर । स्त्रैण होऊनि दुर्धर । न्यायअन्याय न पाहे ॥१२०॥
प्रधानें आज्ञा वंदोनी । निघता झाला तत्क्षणीं । राणीवसा राजभुवनीं । येता झाला ते वेळीं ॥२१॥
तों चंद्रावती स्वलीलेंकरुन बैसली असतां पाहे प्रधान । त्यासी म्हणे किमर्थ गमन । आज केलें प्रभातीं ॥२२॥
प्रधान म्हणे माहेराप्रति । जावें आज्ञापी नृपति । तंव विचार करीतसे चित्ती । अपराध कांही नाढळें ॥२३॥
स्वामी आज्ञा प्रमाण । उठती झाली त्वरें करुन । रथीं करोन आरोहण । सारथी प्रधान होतसे ॥२४॥
मनी विचारी पूर्वप्राक्तन । कांही अपराध नसोन । काय रायास आलें दिसोन । हेंही न कळे मजप्रति ॥२५॥
नगरनागरिक नरनारी । म्हणती पतिव्रता हे सुंदरी । जेवीं सुलोचना हे दुसरीं । कीं कयाधु वाटतसे ॥२६॥
जेवीं कैकेयी वचनेंकरोन । रामजानकीतें अजनंदन । करविता झाला वनीं गमन । तेवीं दिसोन येतसे ॥२७॥
घडघडाट वेगेंकरुन । चंचळत्वें जातसे स्यंदन । जातां देखिलें घोर कानन । माध्यानकाळ होतसे ॥२८॥
वृक्षपक्षी नसे जीवन । घोर कांतार भयंकर विपिन । प्राप्त झालीं तृषें करुन । उदकपान मज करी ॥२९॥
षष्ठम मासाचा गर्भ उदरीं । सत्वर मज जळपान करी । प्रधान म्हणे ते अवसरीं । उदकशोधा जातसें ॥१३०॥
चित्ती विचारी प्रधान । ही अन्नदाती मातेसमान । तशांतही आहे गर्भीण । स्त्रीहत्या न करवे पैं ॥३१॥
असो इचे प्रारब्धी असेल जैसें । होणार न चुके घडेल तैसें । सुखदुःख प्राप्त आपैसें । देहप्रारब्ध टळेना ॥३२॥
यापरी दृढ करोनि विचार । वृक्षातळीं बैसवी स्थिर । उदकार्थ नेतसे रहंवर । त्व्रें करोनि जावया ॥३३॥
मागें पाहोनि धांवडी रथ । दुःख आठवूनियां मनांत । ही एकली अरण्यवासी । विधी प्रारब्धी लिहिलें ॥३५॥
रुदन करुन करी गमन । वारंवार वस्त्रें नेत्र पुसोन । त्या वनाचा त्याग करुन । जाता झाला पुढारी ॥३६॥
इकडे मार्ग मेघचातकन्याय वारंवार पाहोनि बोभाय । हे जगन्निवासा करिसी काय । उपाय योजिसी मजलागीं ॥३७॥
पळ निमिष घटिका प्रहर । मार्ग लक्षी वारंवार । परी न दिसें कोठें रहंवर । परम व्याकुळ होतसे ॥३८॥
मार्ग पाहतां शिणले नयन । तशांत होतसे अस्तमान । वृकव्याघ्रांचे भयेंकरुन । चरणचाली चामके ॥३९॥
आहा प्राक्तन विचित्र गहन । कधी न पाहे सूर्यकिरण । एकटी हिंडे घोर विपिन । अडखळोनि पडतसे ॥१४०॥
ईश्वरसत्तेचा विचित्र खेळ । संचित बळोत्कर्ष पूर्ण सबळ । ब्रह्मसूत्रें ही केवळ । न सुटे भोगिल्यावीण पैं ॥४१॥
पडिली भवार्णवप्रवाही । येथें त्राता सर्वही नाही । काय करुं न सुचे कांही । म्हणोनि बोभाये पतीतें ॥४२॥
हे प्राणप्रिया प्राणनाथा । उपेक्षा केली माझी आतां । येवढा कोप कां मज अनाथा । किमर्थ करिसी कळेना ॥४३॥
कायावाचामनेंकरुन । तुझी दासी मी अनन्य । ऐसें असतां कठिण मन । कां झालें कळेना ॥४४॥
साक्षी देव ब्राह्मण । माझें केलें पाणिग्रहण । तरी ह्रदय कठिण । कां झाले कळेना ॥४५॥
आपणां वेगळें क्षणभरी । ठेविलें नाही कदा दूरी । तरी कठोर आज अंतरी । कां झाले कळेना ॥४६॥
तुजवरी ठेवूनि प्राण । मी विसरलें दुःख सापत्न । तरी स्वहस्तें जाईं वधोन । तरी मी धन्य परत्रीं ॥४७॥
वनीं वृकव्याघ्र घेती प्राण । यांचे हस्तें कां दुर्मरण । तरी अपकीर्तिभार्या वरोन । सत्कीर्तिभाजा त्यागिसी ॥४८॥
भयंकरवनीं श्वापद घोर । निशा प्रवर्तली अंधकार । न फुटे मार्गही अणुमात्र । दुःख दुस्तर प्राप्त हें ॥४९॥
इहपर मज तुझी आशा । तरी कां करिसी हे दुर्दशा । माझिया प्राणप्रिया प्राणेशा । ऐसे समयीं धांवें कां ॥१५०॥
 जातां अडखळोनि पडे रडे । भयें विलोकी मागें पुढें । मोठें वोढवलें सांकडें । कपाळ फुटे पैं झालें ॥५१॥
फणीमस्तकाचा मणि । प्रकाश विचरतां धरणीं । त्या उजेडें हंसगमनी । करी गमन पुढारा ॥५२॥
चरण पडे कोठें न पडे । वळंघूं जाय गिरिकडे । मूर्च्छा येऊन तेव्हां पडे । अशुध्द वाहे भडभडां ॥५३॥
खडे काटे सराटे रुपत । तेणें चित्त कासावीस होत । धांव पाव गा उमाकांत । किती अंत पाहसी हा ॥५४॥
तिची ऐकोनि दुःखग्लांती । पशुपक्षी रुदन करिती । जेवीं दुरळ वनीं ते दमयंती । त्यागून पति जातसे ॥५५॥
इच्छिते काळीं कार्य साधे । तरी तें उदेलें प्रारब्ध । चंद्रबृध्दीं सुख अगाध । उत्तरोत्तर होतसे ॥५६॥
प्रारब्ध उदया येत । विपरीत तें होय सुपरीत । तैसें तेथें अकस्मात । गंधर्वनगर देखिलें ॥५७॥
दिव्य मंदिरें दामोदरें । सुंदर दिसती एकसरें । सुवर्णमय दुर्ग गोपुरें । रम्य शोभें शोभलीं ॥५८॥
रत्नदीपांचे लखलखाट । चौहाट वस्तूंचे संघाट हाट । तडागतटीं शिवालयांचे थाट । सुभट गोमटे प्रासाद ॥५९॥
कासारनिकटीं कंजनेत्री । उदकपान करी करपात्रीं । देवालयीं मुमूर्षुगात्री । विकल सुंदरी पडियेली ॥१६०॥
स्वकरांची करोनि उसी । निद्रिस्त झाली अतिश्रमेंसी । उपोषित योषा लावण्यराशी । निद्रा तियेसी न येचि ॥६१॥
तों वीरसेननामें गंधर्व । त्याची कन्या चित्कळा अपूर्व । शिवदर्शना सख्या सर्व । समुच्चयें येतसे ॥६२॥
षोडशोपचारें शिवपूजन । बिल्वाक्षता सुवर्णसुमन । धूप दीप नीरांजन । दिव्य दीप प्रज्वळिती ॥६३॥
नैवेद्य अर्पूनि सत्वर । चतुर्विध वाद्ये वाजती गजर । मुखी वदती शिव हर हर । दक्षिणा अर्पिती ॥६४॥
चित्कळेसी म्हणती सहचरी । शिवमंडपी कोण नारी । रंभा मेनका तिची सरी । न पावती निश्चयें ॥६५॥
सुकृत शब्द पडतां श्रवणीं । तेथें जाय त्वरेंकरोनि । तीतें म्हणे मधुर वचनीं । तूं कोण कोठील कोणाची ॥६६॥
येरी वदे वचन साचार । भुलेश्वरनामें नृपवर । भार्या तयाची निर्धार । अरण्यवासा दवडिलें ॥६७॥
परिसोन सदय सद्गद अंतर । म्हणे करी वस्त्रांतर । हेमतगटी पीतांबर । परिधान करवी तियेतें ॥६८॥
मग रत्नताटी दिव्यान्न । नाना परी दिव्य पक्वान्न । तिजवरी होऊनि प्रसन्न । तांबूल देत आवडीनें ॥६९॥
तीतें वदे परि गोरटी । तुज सांगतें गुह्य गोष्टी । मत्स्येंद्रव्रत अतिसंकटी । आचरतां क्लेश न बाधी ॥१७०॥
तेव्हां लागोनियां चरणीं । म्हणे कृपा करी वो साजणी । सतत वर्ते ते अर्चनीं । कैसें आचरूं तें सांगें ॥७१॥
मग देतसे मत्स्येंद्रमंत्र । यथानुक्रमें क्रम पवित्र । आणोनियां कमळपत्र । पदमुद्रा कुंकुमें रेखिजे ॥७२॥
ऐसें तीनसप्तकें पूजन । येणें होतसे सर्व निर्विघ्न । आणि तुज मत्स्येंद्रदर्शन । अविलंबे होईल ॥७३॥
ऐसे सांगून सत्वरगती । जाती झाली सदनाप्रति । स्वल्प निद्रा लागोनि सती । जागृत होय सवेंचि ॥७४॥
तंव ते पाहे सभोवती । रात्रीची नसेचि संपत्ति । दृश्य पदार्थ क्षणिक पाहती । ब्रह्मवेत्ते ज्यापरी ॥७५॥
कीं दृश्य इंद्रजाळ । कीं सायखडियांचे खेळ । कीं विजूगिरी जेवीं चपळ । असे नसे जाण पैं ॥७६॥
कैचें गृह कैचा संसार । कीं मरीचिजळन्याय अस्थिर । कीं स्वप्नी सार्वभौमसमग्र । जागृतीसीं नसेचि ॥७७॥
कीं क्षणिक तळपे सौदामिनी । कीं जळबुद्बुदन्यायेकरोनि । की जीवित्व क्षणिक पाहती ज्ञानी । तेवीं मनी भासतो ॥७८॥
ऐसी सरतां यामिनी । जाती झाली ते भामिनी । पुढें जातां दिनमणि । उदया येतां देखिला ॥७९॥
मत्स्येंद्रमंत्र करी स्मरण । पुढें देखिलें रम्य कानन । गगनचुंबित तरु सघन । भूमीं लता पसरल्या ॥१८०॥
सरिताप्रवाह मनोरम । तटीं ऋषीश्वर आश्रम । तेणें संतोष पावली परम । रम्यस्थळ देखोनियां ॥८१॥
शुचिश्रवा नामें ऋषीश्वर । तयाचा आश्रम अति पवित्र । तेथें पावली ते सकुमार । कुरंगनेत्री तन्वंगी ॥८२॥
ऋषि गेला गंगास्नाना । आश्रमीं होती त्याची अंगना । तीतें नमस्कारोन्नि शुभलोचना । उभी ठाके संकोचें ॥८३॥
ऋषिभार्या पुसे साजणी । तूं आतां सकुमार लावण्यखाणी । एकटी कैसी अससी वनीं । आणि गर्भिणी दिसतेसी ॥८४॥
म्हणे कठिण समय प्राक्तनें प्राप्त । तेथें कोण कोणाचा आप्त । अज्ञातवास क्रमूनि गुप्त । भोग भोगी आपुला ॥८५॥
यावरी वदे ऋषिभार्या । तुझी राजपत्नीची दिसे चर्या । लावण्य पाहोनि तुझ्या सौंदर्या । रति उणी तुजपुढें ॥८६॥
कोण गोत्र कोण वर्ण । कोण ग्राम नाम कोण । हें करी मज श्रवण । तुज आप्तभावें पुसतसें ॥८७॥
येरी वदे अत्रिगोत्र । क्षत्रियवर्ण भुलेश्वर भ्रतार । रुद्रपुर नामनगर । चंद्रावती मम नाम ॥८८॥
षण्मासांची मी गर्भीण । कांतें कांतारी सोडिली जाण । दुःख दिवस काळ कठिण । भोगिल्यावीण न सोडी ॥८९॥
आतां द्वैत करोनि परौतें । कुटुंबामाजी करी सरतें । याची धरोनि आर्त । प्रार्थीतसें तूंतें मी ॥१९०॥
अहर्निशीं सत्संगति । परिणामीं होईल उत्तम गति । याची धरोनियां आर्ति । सांभाळ करीं जननिये ॥९१॥
ऐसें संवादतां पाहीं । ऋषि पातले लवलाही । दृढ मिठी घालोन पायीं । पदांगुष्ठ करी पान ॥९२॥
ऋषि पुसती स्त्रियेप्रति । कोणा सभाग्याची युवती । येरी साकल्य निवेदन करिती । झाली तेव्हां तयांतें ॥९३॥
वदले तेव्हां मुनिसत्तम । तूं न धरी येथें द्वैतभ्रम । कृपा करील सर्वोत्तम । उत्तम पुत्र तुज हो कां ॥९४॥
अवश्य राहे माये येथें । त्यागूण तूं चिंतेतें । कन्या माझी निश्चयातें । लडिवाळ तू माझें ॥९५॥
कन्येपरी पाळण । कांहीं पडो नेदी न्यून । ऋषिकुमरी वदती जघन्य । मान्य होय सर्वांतें ॥९६॥
असो नवमास भरतां पूर्ण । प्रसवती झाली पुत्ररत्न । ऋषींते आनंद झाला पूर्ण । रात्र वर्ग संपादी ॥९७॥
जातकर्म नाम सांग । न पडे कांहींच व्यंग । ऋषीचे आशीर्वाद अभंग । पुत्र विजयी होईल हा ॥९८॥
चंद्राशेखर नामाभिधान । ठेविते झाले महर्षिजन । द्वादश दिन होतां पूर्ण । द्विजभोजन होतसे ॥९९॥
ऋषिपत्न्या अन्योन्य । हरिद्राकुंकुमें देती वायन । नारी करिती अक्षय वाण । आनंद परम होतसे ॥२००॥
शुक्लचंद्रन्याय वृध्दि । बाळ वाढूं लागे गुणाब्धि । वेदविद्यादि संपादी । धनुर्वेद अनुष्ठी ॥१॥
जेवीं वाल्मीकाचे सदनी । अज्ञातवासीं जनकनंदिनी । तेवीं तेथें भूपकामिनी । पुत्रादिकरोनि ऋषिगृहीं ॥२॥
गंगेतीरीं मत्स्येंद्रव्रत । यथासांग संपादित । कमळपत्रीं पूजा करीत । पादपद्म रेखुनी ॥३॥
व्रत अनुष्ठितां एक मंडळ । तों मत्स्येंद्र प्रगटले तात्काळ । भिक्षार्थ पातले दीनदयाळ । पूर्वपुण्येंकरोनी ॥४॥
अलखोच्चार होतां द्वारीं । भिक्षा घेवोनि येत बाहेरी । अनन्यभावें नमस्कारी । भिक्षा अर्पी समर्था ॥५॥
पाचारोनि पुत्र सद्गुणी । आर्पिती झाली मत्स्येंद्रचरणीं । तेव्हां झाली वरदवाणी । चिरंजीव पुत्र हो तुझा ॥६॥
यापरी देवोनि वरदवचन । नंतर पावले अंतर्धान । येरु भावी दिवस सुदिन । दर्शन झालें नाथाचें ॥७॥
ऋषिकुमर सहचरमेळीं । क्रीडताति एकमेळीं । कंदमूळ पत्रीफळी । जाति वनीं आणावया ॥८॥
राजपुत्र खणितां स्वलीलें । तों द्र्व्यघटातें देखिलें । द्विजपुत्रातें अर्पिलें । आनंदले ते सर्वही ॥९॥
विभाग घेई म्हणोन । आग्रह करिती सर्व मिळोन । तो म्हणे काकविष्ठेसमान । परधन आणि परनारी ॥२१०॥
असो भुलेश्वर नृपवर नगरीं । ऋतु होतसे ते अवसरीं । कुंडमंडप उभवोनि द्वारीं । शृंगारिलें नगरही ॥११॥
स्वाहा स्वधा वदती वदनीं । ऋत्विज आहुती होमिती हवनी । धूम्र कोंदोनि गेला गगनीं । संतत धारा घृताच्या ॥१२॥
मंगळ वाद्यें मखर तोरण । वेदघोष करिती ब्राह्मण । लक्षावधि द्विज भोजन । मखअध्वर्या आणिले ॥१३॥
पातले शुचिश्रव्याचे शिष्ये । त्यांत तो राजपुत्रही येत असे । येते झाले स्वसंतोषें । आशीर्वाद वदताती ॥१४॥
शांतिरस्तु पुष्टिरस्तु । धनसमृध्दि तुष्टिरस्तु । पुत्रपौत्रादि वृध्दिरस्तु । तथास्तु म्हणे नृपवर ॥१५॥
राया नमस्कारोनि तयां । बैसविलें यज्ञसाह्या । कृतकृतार्थ मानोनियां । धनवसन अर्पित ॥१६॥
चार्‍ही दिवस मंगलोत्सव । ऋषि गौरविता झाला राव । तेथें वर्तलें अपूर्व । होणार न चुके सर्वथा ॥१७॥
राजकांता उपरीवरी । उभी असतां ते सुंदरी । तों पाहिलें बाजारीं । मुलें खेळती ऋषींची ॥१८॥
अर्भके छंदकौतुकें । खेळतां पाहती जन कौतुकें । नृपकुमार पाहोनि कौतुक सुरेख । लोक होती तन्मय ॥१९॥
आणिक असती ऋषिनंदन । परि त्यांत निवडे दैदीप्यमान । जेवी भोवते उडुगण । मध्यें चंद्र डौरला ॥२२०॥
जन वदती परस्पर । आपल्या रायासी नसे कुमर । राजायोग्य ऋषिपुत्र । दैवें होय तरी बरें ॥२१॥
असो सापत्नमातेनें पाहून नयनी । ह्रदय वेधलें पंचबाणीं । परमसकुमार सुलक्षणी । वेध लागला तयाचा ॥२२॥
दासीस आज्ञापी नृपकामिनी । कंदुक आणा गे उचलोनी । म्हणजे येईल स्वयें स्थानी । युक्ति केली यावया ॥२३॥
दासी गेल्या सत्वर तेथें । खेळ आला रहस्यातें । तों कंदुकचिन्ह हातोहातें । राणीपासीं दिधला ॥२४॥
राजपुत्र निघाला तेथूनि । सत्वर पातला राजभुवनीं । तो कंदुक कंचुकीं आच्छादोनी । निवांतपणें बैसली ॥२५॥
येरू म्हणे किमर्थ । कंदुक आणिला माझा व्यर्थ । येणे होईल अनर्थ । स्वल्पस्वार्थेकरुनि ॥२६॥
 राजकांता वदे वचन । असत्य कां घेसी व्हरण । कैसा कंदुक तूं कवण । काय कारण आमचें ॥२७॥
तो अकस्मात पाहिले दृष्टीं । कंदुक देखिला ह्र्दयपुटीं । निगूढ कंचुकीचे पोटीं । देई माझा सत्वर ॥२८॥
हा होय म्हणोन घेत कंदुका । झिंझाटूनि म्हणे र मूर्खा । झोंबला म्हणोनि मारी हाका । तंव सेवका जाणवलें ॥२९॥
सेवकें धरुनि बंदिशाळे । बंदी घातला कुमार बाळ । तये संधी मंदिरी नृपाळ । येता झाला स्वभावें ॥२३०॥
तंव राणी करीतसे रुदन । केश मोकळे विगलितवसन । कंचुकी फाटून छिन्नभिन्न । दशा अवदशा अवगमी ॥३१॥
घाबरा होऊन राजेश्वएर । पुसता झाला समाचार । येरी वदे द्विजाचें पोर । मजसीं येऊनि झोंबलें ॥३२॥
परान्नें होऊन तुष्टपुष्ट । न जाणती श्रेष्ठ कनिष्ठ । मदोन्माद उन्माद दुष्ट । चेष्टा करिती श्रेष्ठांच्या ॥३३॥
भिक्षुकयोनि अति करंटी । दुष्टप्रतिग्रह पापगांठी । त्या पातकी हे कारटीं । आचारराहाटी राहाटतीं ॥३४॥
तरी ज्या चरणें येथें केलें गमन । ते पाद करावे छेदन । ज्या हस्तें आंदोलन । ते उभयपाणी छेदावे ॥३५॥
हें जरी न घडे सत्य । तरी आपला करीन प्राणघात । वचनस्मृति तुम्हांतें । साक्ष असेल मन तुम्हां ॥३६॥
या नरदेहीं प्रियत्रय । राज्य पुत्र आणि देह । भाष्यदानें दशरथें पाहें । तीन्ही अर्पिली ज्या वचनें ॥३७॥
आतां असो बहुसाल युक्ति । तया मारवीं शस्त्राघाती । जरी असेल मजसीं प्रीती । परीक्षा कळेल आतां ते ॥३८॥
तत्काळ प्रधान पाचारुन । याचे हस्तपाद खंडून । चतुर्दिशे द्यावे झुगारुन । तरी शांति मज तेव्हां ॥३९॥
आतां जाई न लगतां क्षण । कळेल तुझें शहाणपण । माझी आज्ञा तुजप्रमाण । वेदवाक्य ज्यापरी ॥२४०॥
राजा अविवेकी मूर्ख प्रधान । तेथें धर्मशास्त्राचें काय कारण । न्याय कैंचा अन्यायप्राधान्य । तेथें अनर्थ रोकडा ॥४१॥
दूरी जाऊन सप्तशृंगातें । हस्तपाद छेदूनि ययातें । न कळत यावें त्वां सत्वर येथें । प्रधानाते आज्ञापिलें ॥४२॥
ऐसें बोलतां प्रधानाप्रति । तेव्हां तो बाळ वाहून रथीं । जाता झाला अरण्यपंथी । दूरी नेला तयानें ॥४३॥
बाळ पुसे कोठें गमन । मूर्खा पुससी काय कार्ण । तुझे करावया हनन । राजाज्ञा मज झाली ॥४४॥
येरु म्हणे माझी जननी । आतां कैंची पाहीन नयनीं । दूर आणिलें दुरळ वनीं । येथे उपाय कायसा ॥४५॥
माता पुत्रा देत विष । पिता विकी बाजारास । नृप हरण करी सर्वस्वास । तरी शरण जावें कोणातें ॥४६॥
नसे पूर्वार्जित माझें शुध्द । म्हणोनि दुष्ट उदेलें देहप्रारब्ध । पातकाचें बळ अगाध । आतां खेद कासया ॥४७॥
सप्तशृंगगिरिवरशिखरीं । प्रधान नेतसे दुराचारी । बाळास वदे स्नान करी । शुचिर्भूत होय तूं ॥४८॥
स्नान करोन भस्म चर्चून । म्हणे इष्टआराध्य करी स्मरण । अंतकाळ समयीं निर्वाण । साधन करीं आपुलें ॥४९॥
तंव बाळ बोले तयातें । तुजविणे माझें कोण येथें । परि दया न ये दुर्जनातें । दुष्टा दुष्काळ दयेचा ॥२५०॥
रज्जूनें आकर्षिले हस्तचरण । दैदीप्य शस्त्र करुन नग्न । मारिता झाला निर्दयपण । नग्न केली चतुरांगे ॥५१॥
उभय हस्त उभय चरण । छेदितां झाला गतप्राण । येरें वस्त्रें शस्त्र पुसोन । जाता झाला निर्दय ॥५२॥
पशुपक्षी रुदन करिती । म्हानती विधातिया प्रजापति । ऐसें दुःख याचे संचिती । काय लिहिसी निर्दया ॥५३॥
मध्यान्हप्रहर कळकळीत । विकळ अरंबळे तळमळीत । गीध काक येऊन तेथ । रक्तपाना तिष्ठती ॥५४॥
दुर्धर यातनेंद्त दीनावाणी । मत्स्येंद्रनाथ वदनी ध्वनि । ऐसें स्मरतां झाली रजनी । तों मत्स्येंद्र इच्छें जातसे ॥५५॥
मत्स्येंद्रध्वनि पडतां श्रवणीं । निकट पातले तये स्थानीं । भग्न अवयव पाहोनी । ह्र्दय द्रवलें स्वामींचें ॥५६॥
पाहाते झाले कृपादृष्टी । करचरण फुटले उठाउठी । व्योमीं पुष्पकांची दाटी । निर्जर वृष्टि करिताती ॥५७॥
भग्न अवयव होता अंगी । म्हणोनि नाम ठेविलें चौरंगी । मत्स्येंद्र घेवोनी वोसंगी । मौळीं पाणी स्पर्शित ॥५८॥
तयास आणिलें ऋषिगृहीं । मातेस भेटवी लवलाही । जननी कवळी उभयबाहीं । प्रेमाश्रु नयनीं लोटले ॥५९॥
राया कळलें वर्तमान । मारिला पुत्र आपुला म्हणोन । तोही येतसे धावून । कळवळोनि ते वेळीं ॥२६०॥
मस्तक ठेवूनि मत्स्येंद्रचरणीं । प्रार्थी उभय जोडोनि पाणि । मी पुत्रहत्यारी म्हणोनी । शिक्षा करावी गुरुवर्या ॥६१॥
पुत्रकलत्रराज्यस्वप्नें । यांत गुंतलों विषयांधपणें । शरणागता उचित देणें । परत्रसाधन न घडे ॥६२॥
मत्स्येंद्र म्हणे राजपुत्रातें । राज्य भोगून करी परमार्थ । चौरंगी म्हणे मज शपथ । राज्य नको मज कल्पांती ॥६३॥
दृढनिश्चय ध्रुव चौरंगी । वृत्ति झाली योगानुरागीं । तयातें मत्स्येंद्र योगी । योगदीक्षा देतसे ॥६४॥
कर्णी मुद्रा शृंगीशैली । भस्मलेपनें तनु डौरली । तुंबी फावडी घेऊनि झोळी । अलक्ष उच्चार करीतसे ॥६५॥
गुरुवदनीं वरदवाणी । चिरंजीव राहे यावत्तरणी । जयजयकारें मंगळध्वनि । होता झाला ते वेळां ॥६६॥
यावरी आज्ञापिती नृपति । स्वनामें स्थापी पशुपति । सवें घेऊन चंद्रावती । बदरिकाश्रमास जाय तूं ॥६७॥
चौरंगीनाथ मत्स्येंद्रमुनि । निघते झाले तेथुनी । भुलेश्वरलिंग स्थापुनी । स्वनाम ठेवी तयातें ॥६८॥
मत्स्येंद्रवरदें अद्यापि पाहे । जया भुलेश्वरदर्शन्ब होये । तया अंतकाळी भुली न ये । प्रत्यय जाणती अद्यापि ॥६९॥
हा षष्ठम अध्याय षडानन । अंगना न घेती तयाचें दर्शन । तेवीं आशा तृष्णा जाती पळोन । हें महिमान जयाचे ॥२७०॥
कीं योगवल्ली षडससुधा । षडविकाररोग नव्हे बाधा । षट्‍चक्र भेदोनि परमपदा । श्रोते वक्ते पावती ॥७१॥
अध्याय हा करितां श्रवण । त्यास पुतबंधु भेटती स्वजन । कारागृहीं असतां जाण । मुक्त होऊनि भेटती ॥७२॥
आदिनाथलीला हे अविमुक्ती । श्रवणमनन जे स्नान करिती । तयां नसे पुनरावृत्ति । अंती कैलास प्राप्त पैं ॥७३॥
अपुत्रा पुत्रसंतान । निर्धना धन संपूर्ण । रोग दरिद्र पराभवोन । श्रवणपठणें जातसे ॥७४॥
आदिनाथलीला मुक्ताफळ । श्रवणाननीं श्रोते मराळ । उड्डाण घेती नभमंडळ । ब्रह्मानंदी विचरती ॥७५॥
श्रीमत्‍ आदिनाथलीला ग्रंथ । ग्रंथकर्ता भैरव समर्थ । तत्प्रसादें आदिनाथ । षष्ठमोऽध्यायीं वंदिला ॥२७६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP