श्रीनाथलीलामृत - अध्याय २८ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.



श्रीगणेशाय नमः ॥
श्री नमो आदिनाथ त्रितापहरा । परब्रह्मा परात्परा । प्रणवरुपा परमेश्वरा । चित्प्रकाशा परमात्मा ॥१॥
तूं अखिलचिध्दनस्वप्रकाशा । भवभयमोचना अविनाशा । निरंजन निर्विकार पुराणपुरुषा । निगमवंद्या निर्गुणा ॥२॥
तूं जगज्जीवन जगदात्मया । जगदानंदकंदा निरामया । जगद्भासा न येसी आया । श्रुतिस्मृति तुज ध्याती ॥३॥
तुझें कृतयुगीं करिती ध्यान । त्रेतायुगीं यज्ञयागादि साधन । द्वापरीं परिचर्या तीर्थाटण । कलींत कीर्तन प्रत्यक्ष ॥४॥
व्यासोक्त अष्टादश पुराण । वदला परि शांत नव्हें मन । शेवटीं येऊन ब्रह्मनंदन । म्हणे हरि गुणवर्णन करावें ॥५॥
भागवतधर्म भगवद्भक्ति । भगवत्परायण धरावी वृत्ति । विष्णुलीला वर्णी श्रीभागवतीं । निष्कामत्वेंकरुनियां ॥६॥
जो श्रीमत्‍ आदिनारायण । कमळासना दिव्यज्ञान निरोपिलें जें निरोपण । तें श्रीमद्भागवत चतुःश्लोकी ॥७॥
तें व्यासमती करोन । विस्तारिलें जगत्पावन । तेणेंचि पावला समाधान । सत्यवतीनंदन स्वयें जो ॥८॥
असो आचार्ये कर्म स्थापिलें । तेणें कर्मठपणें कर्माथिलें । भक्तिज्ञान दुरावलें । परम नाडिले अभिमानें ॥९॥
अल्पविद्या मदोत्कर्ष । तेणें परिणामीं ब्रह्मराक्षस । दुष्टयोनी अतितामस । क्लेश बहुवस भोगिती ॥१०॥
जे विद्याविनयसंपन्न । तयांसीच घडे श्रवणमनन । निजध्यासें स्मृतिस्मरण । साक्षात्‍ स्मरणें पैं ॥११॥
मुख असावी सत्संगतीनें होय उपरति । उपरतीनें आत्मस्थिति । सुखविश्रांति पाविजे ॥१२॥
तरी सत्समागमाचा महिमा । न वर्णवेचि निगमागमा । परि सद्गदकंठी असावा प्रेमा । हे नामगरिमा कलियुगीं ॥१३॥
कलींत न घडे इतर साधन । मंत्रयंत्रादि आराधन । योगादि परम कठिण । चंचळमन होय पैं ॥१४॥
कली प्रवर्तला दुर्धर । सन्मार्ग बुडाला समग्र । धर्मस्थापनादि अवतार । भक्तरुपें प्रगटले ॥१५॥
इकडे वैकुंठवासी जगजेठी । तंव दर्शना पातला परमेष्ठी । इंद्रचंद्रादि धूर्जटी । असती थाटी ऋषींच्या ॥१६॥
सभे बैसले भक्तवृंद । ध्रुव प्रर्‍हाद रुक्मांगद । सनक सनंदन शुक नारद । सिध्दसमुदाय मिळाला ॥१७॥
इंदुशेखरा इंदिरावर । वदे कलिप्रवृत्ति झाली फार । याची निवृत्ति करा सत्वर । निवृत्तिरुपें प्रगटावें ॥१८॥
अज्ञानें वेष्टिले नारीनर । यास्तव मी होईन ज्ञानेश्वर । सोपानमार्ग चतुर्वक्त्र । स्वयें सोपान होईल ॥१९॥
अविद्यें बध्द झाले प्राणि । यास्तव चित्काळाचि प्रणवरुपिणी । ते मुक्ताबाई ये मेदिनी । अवतरेल निजांगें ॥२०॥
उध्दवा वदे श्रीभगवान । तुज म्यां निवेदिलें पैं भक्तिज्ञान । तेणें उध्दरी सकळ जन । नामया तूं उपदेशीं ॥२१॥
जें जें जगत्कल्याणकारक । त्या नामाचा तूं धारक । तेणें पावती बध्दलोक । ते वंद्य देख त्रिभुवनीं ॥२२॥
तूं माझें परम लडिवाळ । तुझे पुरवीन अखंड लळे । सदा सर्वदा सर्वकाळ । तव सन्निध राहीन उध्दवा ॥२३॥
उध्दवा तूं अवधारीं । मजसवें नृसिंहावतारीं । प्रर्‍हाद झालासी निर्धारीं । कुब्जा जेथें पद्मिणी ॥२४॥
त्रेतायुगीं तूं अंगद । कुब्जा मंथरा प्रसिध्द । तेचि तुम्ही स्वतःसिध्द । उध्दव कुब्जा द्वापरीं ॥२५॥
आतां नामया अवतरोन । नामें करीं जगपावन । कुब्जाही सवें घेऊन । जनी होईल तव संगें ॥२६॥
साधुदास्यत्व भगवद्भजन । हेंचि मुख्य कलींत साधन । तेंचि साधीं आराधन । तया बंधन नसेचि ॥२७॥
जे गुरु अंजनी जनीं विजनीं । जें निरंजनीं आत्मपूजनीं । दिवारजनी सदा भजनीं । ते जनी सज्जनीं वंदिली ॥२८॥
पाहतां नीच दासी जनी । परि जगज्जीवन ये भोजनी । दुजी अन्य दावितां तर्जनी । ती अन्य त्रिभुवनीं असेना ॥२९॥
असो उध्दव म्हणे जगदोध्दारा । कासया ह्या जन्ममृत्युयेरझारा । तव सान्निध्य असतां गदाधरा । तरी कां गर्भवास आमुतें ॥३०॥
तुझे स्मरणें जन्ममरण । क्षणांत जाय वितळोन । शेखीं म्हणसी जन्म घेणें । आश्चर्य हेंचि पैं ॥३१॥
ऐक उध्दवा प्रत्युत्तर । मी अंबऋषीचा कैवार । घेऊनियां दशावतार । जळचर वनचर मी झालों ॥३२॥
काय योनी नसती इतर । स्वयें झालों निंद्य सूकर । मी संभवे निरंतर । भक्तास्तव उध्दवा ॥३३॥
मी भक्तांचा दासानुदास । भक्त माझें परमउपास्य । मी सर्वस्व तयां वश्य । मज अवश्य पैं यांचें ॥३४॥
ते तुम्ही माझे प्राणसखे । निर्वाणसंकटीं पाठिराखे । रामावतारीं वानर लंके । होऊन दशमुख मारिला ॥३५॥
तुम्हीं गोकुळीं होऊनि गोपाळ । गोवर्धन उभविला निजबळें अचळ । आश्रयानें रक्षिलें निश्वळ । केलें पाळण सर्वांचें ॥३६॥
म्या सारथ्य करोनि अर्जुनाचें । निर्मूळ केलें कौरवांचें । मज सर्वस्व बळ पांडवांचें । त्यांचेमुळें मी द्वारके ॥३७॥
जेवीं गोडीवीण अमृत । कीं किरणांवीण आदित्य । कीं नक्षत्रांवीण नक्षत्रनाथ । तेवीं मी तुम्हांवीण एकटा ॥३८॥
परब्रह्म निर्गुण । मज पुसत होते कोण । तुम्हीं ध्यानांत आणितां सगुण । मजही होणें प्राप्त पैं ॥३९॥
प्रर्‍हादें मज हाक फोडिली । मी स्तंभातोनि उडी घातली । दैत्य वधोनि ते काळीं । वचन पाळी भक्तांचें ॥४०॥
पुंडलीकवचनरेषा । अद्यापि नुलंघवेचि सहसा । कटीं कर ठेवूनि द्रारप्रदेशा । भीमातटीं तिष्ठतों ॥४१॥
मातापितरांचें सेवन । पुंडलीकें केलें म्हणून । त्याचें व्हावया उत्तीर्ण । द्वारकेहून येतसें ॥४२॥
तरी उध्दवा तुवां निरंतर । करावा माझा कीर्तनगजर । येरु वदे प्रत्युत्तर । तेंचि सज्जनीं परिसावें ॥४३॥
उध्दव वदे परिसा वचन । आम्हां कासया पुनर्जनन । कर्मभूमीं गर्भागमन । न करीं आतां श्रीहरि ॥४४॥
मग अभय देत उध्दवास । आतां तूं न करीं गर्भवास । अयोनिसंभव उभयांस । तुज आणि शुकातें ॥४५॥
यावरी बोले व्यासनंदन । मज गर्भवास नको निश्चयमन । द्वादश वर्षे तेथींचें ज्ञान । मजही स्मरे अद्यापि ॥४६॥
शुका आज्ञापी मधुसूदन । तुवां वाराणसीं प्रगटोन । जडजीवांतें करी पावन । मी अवतरेन सवेंचि ॥४७॥
शुक प्रकटे भागीरथीं । उध्दवा उद्भव भीमरथीं । तुमचे इच्छित मनोरथ । इच्छितार्थ पुरवीन ॥४८॥
गर्भवासाचा तुम्हां त्रास । तरी न पडती सायास । अयोनिसंभव निर्दोष । भक्तवैडूर्य प्रगटती ॥४९॥
शुक्तिकरंडा अनर्ध्य रत्न । भीमरथीं प्रगटसी यत्न । दामाशेटीचें पुण्यप्रयत्न । साध्य होती पंढरीं ॥५०॥
श्रोते करिती संशयप्रश्न । हीनयातींत कां साधुजन । श्वपच शुद्र अंत्यज यवन । काय कारण कळेना ॥५१॥
नीचयातीत व्हावया जनन । याचें परिसावें प्रमाण । नसे कर्मठपणाभिमान । निरभिमान शरण पैं ॥५२॥
निरभिमानें घडे वंदन । भूतमात्री जे अनन्य । तयां वश्य श्रीभगवान । अन्यथा वचन नसेचि ॥५३॥
धर्मव्याध गणिका गज । यांते पाव्ला गरुडध्वज । दीनदयाळ तो  महाराज क। ब्रीद गाजे तोडरीं ॥५४॥
श्रोती अग्निहोत्री स्मार्त वैष्णव । परि गौळीगृहीं वासुदेव । कळे भक्तीचें लाघव । अगाध भाव जयाचा ॥५५॥
मुक्तमुमुक्षु विषयी जन । तेही झाले परमपावन । सलोकसमीप स्वरुपीं लीन । सायुज्यसाम्राज्य भोगिती ॥५६॥
असो उध्दवास म्हणे मुरमर्दन । अवतार घेई म लगतां क्षण । न करीं सहसा अनुमान । हें मम वचन पाळिजे ॥५७॥
तूं अनामिया नाम ठेविसी । तूं गुह्यमंत्र प्रगटविसी । विठठलनामाख्य विरुढविसी । जें श्रुतिशास्त्रासी अगम्य ॥५८॥
मी अवतरेन ज्ञानदेव । तुवां व्हावें नामदेव । भक्तिरस भजनवैभव । भक्तराया प्रगटवीं ॥५९॥
दिंडीपताका नृत्यकीर्तन । श्रवणस्मरणें उध्दरीं जन । जडजीवांतें करीं पावन । अनेक वर्ण बोधवी ॥६०॥
मी निर्विकल्पतरुवर । पुंडलीकास्तव आलों महीवर । मुमुक्षांसी फळसंभार । द्यावयातें तिष्ठतों ॥६१॥
निरंजनवनींचा निवृत्यंकुर । शाखा सपल्लव ज्ञानेश्वर । सोपान सघन सुमन सुंदर । विज्ञानफळ मुक्ताई ॥६२॥
नामयाचेंचि नामफळ । परमसुरस सुरसाळ । परिमळ याचा अहळबहळ । ब्रह्मांड पाताळ भेदलें ॥६३॥
रसालय सुस्वाद मिष्ट बहुत । नामया जनी जनविख्यात । प्रेमळातें प्रेमाद्भुत । विठ्ठलफळ भूलोकीं ॥६४॥
चोखा म्हणे चोखटरस । परब्रह्मींचा हा महारस । विठ्ठलनाम सुधारस । भाविक निर्जरा प्राप्त जो ॥६५॥
आतां असो हा विस्तार । ग्रंथीं होईल अतिप्रसर । गताध्यायीं सविस्तर । आचार्यकथन जाहलें ॥६६॥
यावरी परिसा महदाख्यान । अवतारचरित्रनिरोपण । श्रोतीं करावें एकाग्र श्रवण । करितों नमन साष्टांगीं ॥६७॥
आपेगांव गंगेतटीं । गोविंदनामाख्या ये परिपाठीं । ग्रामलेखक गृहस्थराहाटी । परि आत्मदृष्टीं नेटका ॥६८॥
ब्रह्मनिष्ठ भगवत्परायण । शीलसुशील सदाचरण । सदा करी श्रवणमनन । हरिस्मरण आननीं ॥६९॥
निरानामें तयाची भार्या । सगुण सौंदर्यगुणैकवर्या । जिची पाहोनियां चर्या । दुजी अनसूया प्रत्यक्ष ॥७०॥
उभय प्रीतीं सामरस । ऐसे लोटतां कांही दिवस । तों गहिनीनाथ माध्यान्हभिक्षेस । गोरक्षशिष्य पातले ॥७१॥
अलक्ष शब्द अकस्मात । गोविंदपंतां झाले श्रुत । प्रार्थोनि आणिले स्वगृहांत । म्हणे कृतार्थ धन्य मी ॥७२॥
अर्ध्य पाद्यादि करी पूजन । धूपदीप परिमळसुमन । सुगंधद्रव्य स्त्रक्‍ चंदन । पात्रीं पक्कान्न वाढिलें ॥७३॥
भोजनानंतर सकळ । मुखशुध्दी दिधलें तुळसीदळ । उभय जोडोनि करयुगुळ प्रार्थीतसे नाथातें ॥७४॥
त्रितापें संतप्त झालों पूर्ण । दैवें वोळलासी कृपाघन । उपदेश द्यावा आर्तालागुन । मी अनन्यशरण स्वामीतें ॥७५॥
चातकाचा पाहून आर्त । तोषोनि वोपी चंद्रामृत । तंव करुणार्णव हेलावत । उपदेश देत ते काळीं ॥७६॥
वदती सद्गुरु वरदोत्तर । तुझा झाला कुलोध्दार । उदरीं होईल गुणकुमर । ब्रह्मनिष्ठ श्रेष्ठ तो ॥७७॥
तयातें होती पुत्रत्रय । हरिहरविधि अंशमय । चित्कळा कन्या स्वयमेव । ज्ञानवैडूर्य पैं चौघें ॥७८॥
ऐसा देवोनि आशीर्वाद । जाते झाले महासिध्द । उभयांसी होऊन परमानंद । आल्हादसिंधु उचंबळे ॥७९॥
सिध्दवरद होतां निश्चिती । निरा झाली गर्भवती । नवमास भरतां महासती । पुत्र सुपुत्र प्रसवली ॥८०॥
तया लोटतां द्वादशदिन । ठेविते झाले नामाभिधान । रात्रवर्गादि संपादून । बारसें केलें आवडीं ॥८१॥
उत्तरोत्तर लोटतां दिन । तयाचें केलें मौंजीबंधन । वेदविशारद झाला निपुण । विठठ्ल नाम जयाचें ॥८२॥
जनकजननीतें वंदून । विठ्ठल करी तीर्थाटण । वैराग्यअनुतापेंकरुन । देहदंडण करीतसे ॥८३॥
वासुदेव हरि नारायण । अच्युत जनार्दन रामकृष्न । गोविंद गोपाळ मधुसूदन । सदा स्मरण आननीं ॥८४॥
प्रथम जातां द्वारावती । मार्गी देखिली सरस्वती । गुप्तप्रयाग जया वदती । स्नानपानें तोषला ॥८५॥
तेथून निघाला अतिसत्वर । तंव देखिलें द्वारकानगर । तेथें देखिले शारंगधर गदाग्र्ज श्रीकृष्ण ॥८६॥
नमन पूजन करोनि त्यातें । गमन केलें पिंडारकातें । सवेंचि येत रैवताचळातें । दत्तात्रेयातें वंदिले ॥८७॥
तेथोनि निघे तो तांतडी । पुढें देखिली गोरक्षमठी । स्वानंदाची उभवूनि गुढी । मत्स्येंद्रगोरक्ष नमीतसे ॥९०॥
स्नानसंध्या तेथें सारून । करीत बैसला देवतार्चन । तेथील ग्रामलेखक जाण । सिध्दोपंत या नामें ॥९२॥
तों ब्रह्मयज्ञास पातला तेथें । तयानें पाहून विठ्ठलातें । प्रार्थोनि नेत स्वगृहातें । आग्रहातें करोनियां ॥९३॥
भोजन सारोनियां तेथ । पुसोन तया साकल्यवृत्त । आजि क्रमणा करा येथ । उदईक मार्गस्थ होइजे ॥९४॥
अवश्य वदे येरु वचनीं । निद्रा केली वृंदावनीं । तंव सिध्दोपंताचे स्वप्नी । पंढरीनाथ पातला ॥९५॥
तुझी कन्या लावण्यसगुण । तीसीं वर योजी हा ब्राह्मण । माझि आज्ञा तुजप्रमाण । कुलोध्दारण होय तुझें ॥९६॥
गणक ज्योतिषीं पाचारुन । तिथि नेमुनी लाविलें लग्न । सालंकृत कन्यादान। सत्पात्रपात्रीं अर्पिलें ॥९७॥
वधूवरवोहरें पंढरीसी । सकुटुंबे पातले दर्शनासी । हर्षे पूजिला ह्र्षीकेशी । परम मानसीं सुख झालें ॥९८॥
यात्रा झालिया संपूर्ण । श्वशुरा विनवी कर जोडून । म्हणे प्रार्थना करोनि मान्य । आज्ञा देणें मज आतां ॥९९॥
माझे उत्कंठित मानस । करोनि यावें दक्षिण मानस । सिध्दोपंत म्हणती अवश्य । शीघ्र आलें पाहिजे ॥१००॥
मग श्वशुरातें नमस्कारुन । घेऊन देव धोत्र मृगाजिन । करिते झाले दक्षिणेस गमन । विष्णुस्मरण आननीं ॥१॥
इकडे सिध्दोंपंत रुक्मिणी कुमरी । कुटुंब आले अळंकापुरीं । कांही दिवस लोटल्यावरी । विठोबा पुन्हा येतसे ॥२॥
साधु श्वशुरातें वंदित । म्हणे झालें दक्षिणतीर्थ । आतां राहिला एक आर्त । मातापिता पाहावीं ॥३॥
ऐकोन आनंदले सिध्दोपंत । सवें घेऊन कन्या जामात । येते झाले गंगातीरातें । आपेगांवातें सहर्षे ॥४॥
साधोनियां संजीवनी । कच पातला आपुले सदनीं । बृहस्पतीचे चरणीं मूर्ध्नि । ठेविता झाला आदरें ॥५॥
पुत्रें करोनि नमस्कार । व्याही भेटती परस्पर । गोविंदपंतां हर्षसमुद्र । पुत्रचंद्र देखोनि ॥६॥
आज्ञा मागून सत्वर । निघते झाले सिध्देश्वर । विठ्ठल रुक्मिनी सासूश्वशुर । परमानंदे राहिलीं ॥७॥
ऐसें लोटतां कांही दिन । मातापिता पावली निधन । सिध्दोपंतासी वृत्तश्रवण । होतां नेई स्वगृहीं ॥८॥
कन्याजामातां गृहीं आणून । पुत्रवत्‍ करी उभयपाळन । परि विठोबाचे उदासमन । प्रपंचभान असेना ॥९॥
जो साधनचतुष्टय संपन्न । आणि अमानित्व समाधान । भगवंतसेवनीं आराधन । हरिस्मरणीं रत सदा ॥११०॥
ब्राह्मी मुहुर्ती व्हावे जागृत । शय्यास्थानीं बैसे निवांत । अपरोक्षज्ञानाचा धरोनि आर्त । अनुभव स्थित वर्ते जो ॥११॥
ब्रह्मरंध्र सहस्त्रदळ । परमात्मस्थान केवळ । ध्यान धरोनि निश्वळ । मानस पूजन करीतसे ॥१२॥
करी अजपाजपनिवेदन । तदनंतर प्रातःस्मरण । स्नानसंध्या एकाग्रमन । यथापूर्वक करीतसे ॥१३॥
यावरी करी विष्णुपूजन । गंधतुळसी सुगंधसुमन । धूपदीपनैवेद्य अर्पून । पुष्पांजुळी समर्पी ॥१४॥
मग समकाय स्वस्थासनीं । शिरोग्रीवा धारयतूधारणी । दिशा न पाहे अवलोकुनी । अर्धोन्मीलनीं पाहे पां ॥१५॥
तया अचिंत्याचे चिंतन । चिंतनें रोमांचस्फुरण । स्वेदकंप अष्टभावेंकरुन । सद्गुरुध्यान करीतसे ॥१६॥
ऐसें प्रत्यही हें आचरण । नैवेद्य वैश्वदेव अतिथिपूजन । कांही करितां अल्पभोजन । मग शयन अल्पही ॥१७॥
भ्रतारसीवा करी रुक्मिणी । सदा सादर दिनरजनीं । परी न संतति तिजलागोनी । कांही दिवस लोटले ॥१८॥
विठ्ठल कांतेतें वदे वचन । आज्ञा देई मजलागून । करीन आश्रमसंपादन । सार्थक जेणें देहाचें ॥१९॥
येरी सलज्ज संकोच मनीं । कांही न वदे मौनाननीं । ऐसा परिपाठ प्रतिदिनीं । होतां निवेदी जनकातें ॥१२०॥
पिता म्हणे ऐक सुजाणे । अनुचित संन्यास पुत्राविण । पुत्र झालिया स्त्रियेचें रीन । उत्तीर्ण शास्त्र वदतसे ॥२१॥
एके दिनीं निशी अवसरीं । रुक्मिणी असतां निद्सुरी । गंगास्नानार्थ निर्धारी । जातों मज आज्ञा देई ॥२२॥
होणार भविष्य बलवत्तर । अवश्य म्हणे निद्राभर । जेवीं जरत्कारीस जरतकार । पुसोन सत्वर जाय पैं ॥२३॥
निद्रिस्त त्यागोनि दमयंती । नैषध जाय वनाप्रति । तेवीं निघे तो सत्वरगतीं । वैराग्य अनुराग जयातें ॥२४॥
कीं धनुष्यापासोनि सुटे शर । तेवीं पातला जान्हवीतीर । पाहोनि भागीरथीचे नीर । हर्ष अंतरी कोंदला ॥२५॥
॥तटीं होती महापुराणें । तेथें भगवद्गीता केली श्रवण । त्यांत संन्यासधर्माचें महिमान । ऐकोन मन वेधलें ॥२६॥
मठीं रामाश्रमयतिवर । नमोनि जोडिले उभयकर । म्हणे त्रितापें पोळलें अंतर । प्रेषोच्चारें शांतवा ॥२७॥
श्रीपाद तयातें पुसत । कुटुंब काय तें करी श्रुत । म्हणे माता पिता कन्या सुत । मित्रकलत्र मज नसे ॥२८॥
वैराग्यशील अनन्यशरण । पाहून स्वामी सुप्रसन्न । प्रेषोच्चार करवून । चतुर्थाश्रम दिधला ॥२९॥
परस्परें कळला वृत्तांत । परम उद्विग्न सिध्दोपंत ल। कन्येस देखुनि चिंताक्रांत । अहर्निशीं होतसे ॥१३०॥
काळ न घालवावा वृथा । यास्तव सेवा करी अश्वत्था । यावीण साधन न पाहतां । दुजें आतां असेना ॥३१॥
जयाचिये तपसिध्दीं । प्रत्यक्ष प्रगटे महासिध्दि । निशांतीचे संधी । भानुउदय होतसे ॥३२॥
सतीचें उग्र अनुष्ठाण । देवत्रय झाले सुप्रसन्न । अकस्मात श्रीपाद येऊन । अश्वत्थीं श्रांत बैसला ॥३३॥
परि नमस्कारोनि यति । तीतें वदे हो पुत्रवंती । मंदहास्य होवोनि सती । बध्दहस्तीं विनवीतसे ॥३४॥
मानसपुत्र कीं पुनर्जन्मीं । हा अभिप्राय कळावा स्वामी । तंव शोधितां अंतर्यामी । सन्यासधर्मी लागत ॥३५॥
नामगोत्र करोनि श्रवण । वोळखोन पुन्हा करिती गमन । वाराणशीतें येऊन । चैतन्याश्रम पुसत ॥३६॥
अरे चैतन्या म्हणून । हाक मारितां करी नमन । म्हणत पूर्वाश्रमीं तुझे कोण । सत्य प्रमाण वदे तूं ॥३७॥
सकोप देखोनि आरक्तनेत्र । सकंप जाहलीं सकळगात्रें । निर्वाण पाहोनि गुह्यमंत्र । निवेदी यथार्थ पैं ॥३८॥
अवज्ञा न करीं माझी आतां । गृहस्थाश्रम संपादी मागुतां । परम सुशीळ तुझी कांता । पतिव्रता सगुण ते ॥३९॥
आज्ञा वंदूनियां तदुपरीं । सवेगें पातला अळंकापुरीं । सिध्दोपंतास हर्ष अंतरीं । परमलाभ मानिला ॥१४०॥
जनापवाद झाला थोर । परि सद्गुरुवचनींच निर्धार । निंदक निंदिती वाकशस्त्र । परि क्षमावोढण वोडवीं ॥४१॥
तया घालिती वाळींत । परि तो क्षमासमुद्र सदा शांत । भिक्षा मागूण निर्वाह करीत । योगक्षेम संपादी ॥४२॥
अरण्यांत गुहा एकांतस्थान । तेथेंच राहे स्त्री घेऊन । दिवनिशीं भगवद्भजन । परमप्रीती उभयतां ॥४३॥
प्रथम ऋतुस्नात होतां रुक्मिणी । उदरी आले शूळपाणि । उभयांसी स्वानंद मनीं । गर्भछाया उदेली ॥४४॥
जेवीं धवलेदु उत्तरोत्तर । पौर्णिमेचा पूर्ण चंद्र । तेवीं पूर्णमास भरतां सुपुत्र । देदीप्यमान प्रसवली ॥४५॥
दुसरेनि गर्भस्थ ते अबळा । ज्ञानवैराग्यें ती सबळा । सबाह्य स्वरुप पाहे डोळां । तो सोहळा न वर्णवे ॥४६॥
याचा हाचि अभिप्राय । नवविधभक्ति मास नव । उदरीं जाहले ज्ञानदेव । प्रतापसूर्य प्रगटले ॥४७॥
यावरी तिसरेनि ती गर्भवती । परमपवित्र जे महासती । अनसूयेसम जिची कीर्ती । देवत्रयातें निपजवी पैं ॥४८॥
जेवीं पळपळ रवि चढे । तेवीं मासपरत्वें गर्भ वाढे । पूर्वपुण्याचें फळ गाढें । रोकडें पुढें फळ लाभे ॥४९॥
जो चतुरानन परमेष्ठी । तो संभवे जियेचे पोटी । नवमास भरलिया पाठीं । जेवी किरीटी तिसरा ॥१५०॥
ऐसा प्रगटे चतुर्वक्त्र । अति सकुमार कोमळगात्र । मातेचे तृप्त होती नेत्र । पुत्रमुखातें देखोनि ॥५१॥
कीं ते धर्मअर्थकाममोक्ष । उदया आले कीं प्रत्यक्ष । जे अपरोक्षज्ञाते ज्ञानदक्ष । स्मरणें मोक्ष जयांच्या ॥५२॥
त्रिगुणाहूनि पर जे चौथी । जे अर्धमात्रा प्रणवशक्ति । तेचि गर्भस्थ आली व्यक्ति । जीतें ध्याती योगींद्र ॥५३॥
कीं अनुष्ठानाचे परिपाठीं । महासिध्दि प्रगटे शेवटी । तेवीं प्रगटली कन्या गोमटी । ते चिच्छक्ति चिन्मात्रा ॥५४॥
चित्ती म्हणे जाहली निवृत्ति । यास्तव ज्येष्ठपुत्रा नाम निवृत्ति । दुजा तनय सत्त्वस्थिती । ज्ञानेश म्हणती या हेतु ॥५५॥
तिसरा शांत समाधान । त्यास नांव ठेविलें सोपान । चौथी मुक्ताबाई गुणनिधान । पाहून प्रसन्न जनक पैं ॥५६॥
कुमारदशेंत येतां कुमर । माता चित्तीं चिंतातुर । भ्रतारा वदे सत्वर । व्रतबंध यांचा करावा ॥५७॥
ऐसें कांतेचें ऐकोन वचन । विठ्ठ्ल पातला विप्रां शरण । म्हणे विनंती करा मान्य । करा उपनयन ययांचे ॥५८॥
परिसोनि क्षोभले द्विजवर । तुम्हांस कैचा हा अधिकार । लज्जा न वाटें वदतां उत्तर । दुराचरणें करोनी ॥५९॥
कोणते शास्त्रीं यतिसंतति । कैसे आहे ती सांग आम्हांप्रति । कांहीं संकोच न येतां चित्तीं । आम्हांप्रति पुससी ॥१६०॥
यास एकचि प्रायश्चित्त । निग्रहें करावा देहांत । यावीण दुसरा शास्त्रार्थ । निश्चितार्थ असेना ॥६१॥
एक वदती असे प्रमाण । मुख्य पश्चात्तापचि कारण । होतां शुध्द अंतःकरण । कीं वैराग्य सघन श्रेष्ठ तें ॥६२॥
यापरी होता संभाषण । पश्चात्तापचि कारण मन । अनुतापें वैराग्य होऊन । करी नमन द्विजवृंदा ॥६३॥
अनुतापाची धरोनि संगति । निघता जाहला सत्वरगतीं । पुत्रदारा त्यागून मागुतीं । आनंदवनीं जातसे ॥६४॥
पिता गेलिया त्यागून । अट्टाहास्यें करिती रुदन । हें मायाप्रवर्ती महिमान । करुन वृत्ति शांतवी ॥६५॥
निवृत्ति येवोनी द्विजांपासी । साष्टांग नमस्कारोनि त्यांसी । म्हणे आमुची गति कैसी । आम्हां आज्ञा करावी ॥६६॥
माता पिता गेलीं त्यागुन । आम्ही निराश्रय हीनदीन । तुम्हीं धरोनि अभिमान । संगोपन करावें ॥६७॥
ऐकोन वदती द्विजजन । तुम्हांसीं न करावें संभाषण । तुमचें झालिया दर्शन । सचैल स्नान करावें ॥६८॥
यापरी परिसोनि उत्तर । चौघांसी दाटला गहिवर । तूं विश्वसृजिता सर्वेश्वर । आम्हां कासया निर्मिलें ॥६९॥
विधातया म्हणती विधि । कां ललाटीं लिहिला अविधि । आम्हीं वर्तावें कोणते विधी । विलक्षण प्रारब्धीं निर्मिलें ॥१७०॥
विप्र म्हणती एक विचार । प्रतिष्ठानीं देऊं पत्र । यथानुक्रमें येतां उत्तर । तदनुसार क्रम करुं ॥७१॥
सवेंचि प्रवर्तली शर्वरी । विप्र गेले घरोघरीं । निवृत्ति विचारी अंतरीं । कोण ये अवसरीं धांवेल ।\७२॥
जेवीं कडकडोन पडे गगन । कल्पांत वोढवे चहूंकडोन । कठिण मांडलें निर्वाण । दीन दैन्य दिसती ॥७३॥
आतां प्रारब्ध प्राधान्य धरोन । विवेकें वर्तावें धैर्य धरोन । ईश्वरी सत्ता विलोकून । होष्य दिसोन येईल ॥७४॥
असो सर्वोपरी निराधार । आम्हां कर्मक्रियेस आधार । जरी धावे गुरु दीनोध्दार । निश्चय निर्धार गुरुपदीं ॥७५॥
जे पितामहाचे श्रीगुरु समर्थ । संकटीं पातले गहिनीनाथ । निवृत्ति मस्तकीं देऊन हस्त । उपदेश देत तयातें ॥७६॥
म्हणती वत्स पाहे पाहे । तुम्हांस नसे भवभयाचे भय । माझें सुप्रसन्न वरदभय । त्रैलोक्यविजय पावाल ॥७७॥
श्रीआदिनाथमत्स्येंद्रगोरक्षपर्यंत । माळिका निवेदिली तयातें । सद्गुरु आज्ञापिती निवृत्तीतें । उपदेश त्रिवर्गातें देईजे ॥७८॥
शास्त्राश्रय न देचि तयाप्रति । तेचि वंद्य केले येचि त्रिजगतीं । नाथसांप्रदायाची धन्य ख्याति । तेथें श्रुतिशास्त्र मौनावे ॥७९॥
अविद्येची निशा सरतां । ज्ञानोदयप्रभात होतां । तेवीं उदया येतां सविता । जाती तत्त्वतां सभेसी ॥१८०॥
शुचिर्भूत भव्य विभूति । आंगीं चर्चोनि पातले निवृत्ति । ज्ञानसोपान सवें असती । आदिशक्ति मुक्ताई ॥८१॥
विप्रसभेचे अंगणीं । उभे ठेले बध्दपाणि । विनय नम्र मधुरवाणीं । विनविते झाले द्विजांतें ॥८२॥
कालीं विदित केला अर्थ । तुम्हां सर्वस्व शरणागत । स्वामीआज्ञा जे उचित । तेचि भिक्षा इच्छितों ॥८३॥
एक म्हणे ऐक विचार । आम्ही प्रतिष्ठानीं देतों पत्र । तें घेवोनि तुम्हीं सत्वर । प्रत्युत्तर आणावें ॥८४॥
अवश्य आज्ञा शिरसा म्हणून । निवृत्तिनाथ करिती गमन । चौघे निघाले तेथून । प्रतिष्ठान देखिलें ॥८५॥
विष्णुकन्येचें निर्मळनीर । निरखुनी निवृत्ति हर्षोत्तर । स्नानें सारुनी सर्वत्र । क्षेत्रप्रवेश मग करिती ॥८६॥
वेदविशारद वैदिक । शास्त्रशास्त्रज्ञ पौराणिक । ऐसे द्विजवर मुख्य मुख्य । सभानायक बैसले ॥८७॥
सभेस पातले बंधुत्रय । वैराग्यसिंधु ज्ञानवर्य । मुक्ताबाई जगन्माय । उभी राहे पाठीसीं ॥८८॥
भूदेव तुम्ही धरामर । म्हणोन करिती नमस्कार । उभय जोडोनियां कर । पुढें पत्र ठेविलें ॥८९॥
विप्र पुसती कोठील कोण । म्हणे येरु करा पत्रावलोकन । जाणवेल वर्तमान । मग पत्र वाचिती ॥१९०॥
वेदमूर्ति वेदपरायण । सकळशास्त्रसंपन्न मान्य । समस्त द्विजवृंद क्षेत्र पैठण । असो सादर सेवेसीं ॥९१॥
विद्यार्थी सकळ आळंदीकर । साष्टांग वेदोक्त नमस्कार । विनंती विज्ञप्ति सविस्तर । कुशळवृत्त ल्याहावें ॥९२॥
विशेष येथील मजकूर । संन्यासिया झाले कुमर । ज्येष्ठ निवृत्ति दुजा ज्ञानेश्वर । तिसरा सोपान जाणावा ॥९३॥
चौठी मुक्तानामें कुमरी । धर्म पाहून शास्त्रांतरीं । मुंजी विवाह कैसेपरी । आज्ञा करावी समर्थे ॥९४॥
ऐकोनि पिटिती टाळिया टाळी । खदखदां हासती कुटिळमंडळी । भली देखिली आजि नव्हाळी । कुचिष्ट चेष्टा करिती पैं ॥९५॥
यावरी वदती बुधजन । सर्वांस वेदाज्ञा प्रमाण । परि कोठेंही नसे वचन । स्मृतिआधार दिसेना ॥९६॥
धर्मशास्त्रादि अनेक ग्रंथ । बहुमतांचे वचनार्थ । परि न निघेचि हा भावार्थ । संपूर्ण शास्त्रें शोधितां ॥९७॥
आतां एक असे उपाय । सद्भावें गुरुतें रिघावें शरण । सर्वात्मक वासुदेव अद्वय । पाहे समान समदृष्टीं ॥९८॥
परिसोनि पंडितांचे शब्द । निवृत्ति मनी परम सद्गद । हर्ष मानोनि परमानंद । सद्बोधवाक्य परिसोनी ॥९९॥
शुनी श्वपच चतुरानन । आत्मत्वें पाहावें समसमान । सम लोष्ठाश्मकांचन । शीतोष्ण मानी समसमान पैं ॥२००॥
कोणी म्हणे निंदकजन । ज्ञानेश्वर हे ज्ञानसंपन्न । तरी कां पैठणीं आले शरण । परमाश्वर्य हें आम्हां ॥१॥
येरयेरांसी करिती भाषण । नामावरी काय प्रमाण । तों अकस्मात जळवाहक जाण । महिषीपुत्र देखिला ॥२॥
त्याचें नाम ज्ञान्या म्हणून । प्रतोद मारी रक्षक जाण । ज्ञानेश्वर तिरस्कारोन । विष्णुस्मरण करीतसे ॥३॥
निंदक वदती तदुपरीं । हा पशूचि नामधारी । उभयांची एकसरी । कैसी होईल पैं येथें ॥४॥
यावरी वदती ज्ञानदेव । उभयतां नसेचि भेदभाव । पिपीलिकेपासून सर्व जीव । चैतन्य एक चेष्टवी ॥५॥
द्विज पुनरुक्ती ज्ञानेश्वरासी । एक असतां प्रचीति कैसी । त्याचे दंडितां शरीरासी । कैची वेदना तुम्हातें ॥६॥
पशूंत तुम्हांत भेद नसे । हे आम्हां कळे कैसें । तुम्ही संवाद करितां आम्हांस । तरी कैसा रेडा वदेल ॥७॥
आंगावरीचें काढोनि वसन । पृष्ठी दाविती प्रतोदचिन्ह । पशुमस्तकीं हस्त ठेवून । वदे बापा निगम तूं ॥८॥
आज्ञा होतांच ते अवसरीं । वदे वदे पशु वैखरीं । विधिउपन्य़ास उपनिषद सत्वरी । वेदगुरु पैं बोलत ॥९॥
विमानीं निर्जरांचे संभार । सुमनें वर्षती वारंवार । करावया विश्वोध्दार । म्हणती अवतार विष्णूचा ॥२१०॥
चारी वेद बोलतां वाणीं । विप्रवृंद ऐकतां श्रवणीं । म्हणती अगाधा देखिली करणी । म्हणोनि चरणीं लागती ॥११॥
निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान । त्यासी विप्र करिती नमन । अन्योन्य उचलोनि वदन । क्षेमालिंगन पैं देती ॥१२॥
झाला एकचि जयजयकार । पाहुं पातले पौरजनभार । गर्वहत होऊनि धरामर । धिक्कार म्हणती आम्हांतें ॥१३॥
आम्ही वेदशास्त्र पढलों पाहीं । परि आमुचें सामर्थ्य ऐसें नाहीं । सान लेकुरें कुमारदेही । तरी हे नवलाई तयांची ॥१४॥
कलीमाजीं त्रिविधजन । करिती निंदास्तुतिस्तवन । कोणी चमत्कारें येती शरण । कोणी उपहास करिताती ॥१५॥
असो एक द्विजगृहीं करितां वास । तया निंदिती ठेविती दोष । एके दिवसीं पितृतिथीस । कोणी न येती भोजना ॥१६॥
ज्ञानदेवास म्हणे ब्राह्मण । आज द्विज न घेती आमंत्रण । अपंक्त म्हण्ती मजकारण । तरी श्राध्ददिन प्राप्त हा ॥१७॥
परमसंकटीं पडतां द्विजवर । जाणोनि वदती ज्ञानेश्वर । पाकनिष्पत्ति करीं सत्वर । येतील पितर स्वर्गीचे ॥१८॥
वचनीं धरोनि विश्वास । सिध्दता करी परमउल्हास । रवि येतां माध्यान्हास । तंव चरित्र केलें अभिनव ॥१९॥
द्विज म्हणे झाली सिध्दता । तंव ज्ञानदेव म्हणती पाचारीं आतां । पितरां म्हणतां आगता । तंव ते नभमार्गीं उतरले ॥२२०॥
ग्रामस्थें पितर देखिले लोचनीं । मग साष्टांग येती लोटांगणीं । ऐसी विचित्र दावोनि करणी । मग तेथून निघाले सत्वर पैं ॥२१॥
पशु सवें मागून घेतला । तो अळेखिंडींत समाधिस्थ झाला । मग येऊनि अळंकावतिला । अवतारपुरुष पुरुषार्थी ॥२२॥
इकडे शक्रशापेंकरुन । मरुद्गण पावता झाला पतन । चांगदेव नामाभिधान । जघन्य कीर्ति जयाची ।\२३॥
तों गोरक्षाचे शृंगीवर । तेथून प्रगटे चांगदेव । आंगी सिध्दीचें वैभव । काळ जिंकिला जयानें ॥२४॥
तेणें ज्ञानेश्वरमहिमान । श्रवण होतां पातले शरण । सवें शिष्य व्याघ्रवाहन । चाबुक हाती सर्पाचा ॥२५॥
कोरें पत्र देवोनि करीं । शिष्य प्रेषी अळंकापुरीं । अवलीळें बैसलें भिंतीवरी । भित सामोरी नेतसे ॥२६॥
ऐसें सामर्थ्य देखोनि नयनीं । चांगया आला लोटांगणी । तो मुक्ताबाई बोधोनी । स्वानंदसदनीं बैसला ॥२७॥
आषाढीची यात्रा लक्षुन । निवृत्ति ज्ञानदेव सोपान । मुक्ताबाई गुणनिधान । येती झाली पंढरिये ॥२८॥
घेवोनि पांडुरंगाचे दर्शन । तों नामयाचें ऐकिलें कीर्तन । परम पावून समाधान । नमन करुनि आलिंगिती ॥२९॥
ज्ञानेश्वराचा धरोन हात । नामदेव गुह्य पुसत । अगाध तुमचें सामर्थ्य । वेद बोलला पशुमुखें ॥२३०॥
तरी कोण तुमचा सांप्रदाय । कळवा कुळयाति अभिप्राय । यावरी वदती ज्ञानदेव । ऐक तूंतें सांगतों ॥३१॥
आम्हांस नसे कुळयात । आदिनाथ सांप्रदायपंथ । आम्ही वर्णाश्रमाविरहित । स्वरुपीं निवांत वास पैं ॥३२॥
मत्स्येंदगोरक्षगहिनीचा उपदेश । सद्गुरुकृपें निवृत्तीस । त्याचा अनुग्रही त्रिवर्गास । ब्रह्मई समरस पैं केलें ॥३३॥
आम्हां निंद्य केलें जनीं । परि गुरुकृपें वंद्य त्रिभुवनीं । जेवीं वोहळ गंगाजीवनीं । मेळविलें प्रतापें ॥३४॥
तूं होसी नामया नामरुप । अगाध कलींत नामप्रताप । नामें जळत महत्पाप । अगाध महिमा नामाचा ॥३५॥
नामामृत हें संजीवनी । कीर्तन प्रगटविलें ये अवनीं । जे परमदुर्लभ त्रिभुवनीं । जगजीवनी प्रिय सदा ॥३६॥
धन्य धन्य तूं वैष्णवीर । विष्णुपरायण निरंतर । करावया जगदोध्दार । अवतरलासी उध्दवा ॥३७॥
नामा ज्ञानेश्वरा वंदित । तंव तत्काळ प्रगटे पंढरीनाथ । शंखचक्रगदावरदहस्त । मस्तकीं ठेविती उभयांचे ॥३८॥
उभय वंदिती पादारविंद । परस्परेंसी परमानंद । देवभक्तसमरस अभेद । ते प्राप्त वंद्य पर्वणी ॥३९॥
हा प्रयाग निश्चिती । गंगायमुनासरस्वती । तिहीं एकत्र संगम होती । तेवीं मजप्रति भासलें ॥२४०॥
नामयास वदे इंदिरावर । माझा अवतार हा ज्ञानेश्वर । चारीही हे अंशधर । परत्रीहुनि पातले ॥४१॥
असोखना शून्यगगन । ते खेचरी मुद्रा नाम खूण । विसावा करी तेथें विचरण । खेचर नामया हेतू ॥४२॥
गुरुमुख नसे म्हणोन । नामया गेला तयासी शरण । तंव शिवलिंगावरी चरण । विसोबाचे देखिले ॥४३॥
उपानहस्त्रेहें स्निग्ध स्त्रवत । पाहून नामया मनीं विस्मित । शिवमस्तकीं पदा अनुचित । परमविपरीतार्थ विलोकी ॥४४॥
नामया म्हणे हे काय । लिंगावरी ठेविशी पाय । हर हर म्हणोनि त्राहे त्राहे । सद्गद होय अंतरीं ॥४५॥
म्हणे विश्व संचला विश्वनाथ । तयावीण स्थळ कोणतें रिक्त । जेथें नसेल तेथें निवांत । पाय ठेवीं सद्भक्ता ॥४६॥
पद उचलोनि दुसरे स्थळीं । ठेवितां तेथेंही चंद्रमौळी । नामा विस्मित ह्र्दयकमळीं । म्हणे आश्चर्य देखिलें ॥४७॥
मग खेचराचे लागोनि चरणीं । तंव उपदेशिला तेचि क्षणीं । नामयाचे मस्तकीं ठेवूनि पाणि । आश्वासिला तेधवां ॥४८॥
सद्गुरुचे कृपेंकरुन । नामया झाला ज्ञानसंपन्न । जेणे स्वर्गी करुन नमन । कीर्तनें निर्जर तोषवी ॥४९॥
प्रचीत दाविली कीर्तनीं । ध्वजा आणिल्या स्वर्गाहूनी । ऐसी जयाची अघटित करणी । किती म्हणोनि वदावी ॥२५०॥
ज्ञानदेव आणि नामदेव । तीर्थयात्रेसी जाती उभय हस्तिनापुरीं उठवी गाय । नृपवर्य धरीतसे ॥५१॥
पाहा आडांत नसतां जीवन । जळ वाहविलें कूपावरून । अद्यापि पाहती सर्व जन । हा महिमा जाण जयाचा ॥५२॥
कीर्तनीं फिरविलें शिवालय । अद्यापी साक्ष तेथें आहे । पाषाणमूर्ति जेविली पाहें । हे सामान्य काय कलियुगीं ॥५३॥
जो निरंजनवनीचा वृक्ष थोर । पुंडरीकास्तव आला महीवर । मुमुक्षुपक्ष्यासी फळसंभार । द्यावयातें तिष्ठत ॥५४॥
निवृत्ति ब्रह्मीचा बीजांकुर । शाखापल्लव ज्ञानेश्वर । सोपान सुमन मनोहर । मुक्त परिपक्व मुक्ताबाई ॥५५॥
नामयाचेंचि नामफळ । परम सुरस सुरसाळ । परिमळाचा अहळबहळ । ब्रह्मांडपाताळा भेदला ॥५६॥
रसालय सुस्वाद मिष्ट बहुत । विठ्ठल नामया जनीं विख्यात । प्रेमळातें प्रेमाद्भुत । सकळ फळ हे तयासी ॥५७॥
चोखा म्हणे हा चोखटरस । विठ्ठलनाम हें सुधारस । परि अभाविक वायस । नेणत पैं वैष्णवमहिमा ॥५८॥
नामदेवें नाममहिमा । प्रसिध्द केली कीर्तनगरिमा । पावावया परंधामा । नामदेवचि यापरी ॥५९॥
पाहा पाहा महाद्वारीं । नामदेवाची पायरी । सदा उच्चारी जयाची वैखरी । तया श्रीहरी प्रत्यक्ष ॥२६०॥
महाजन गेले याचि पंथें । नामपरायण भगवद्भक्त । हे नारदी क्षेत्र विख्यात । अद्भुत महिमा नामाचा ॥६१॥
याचि मार्गेकरुन । कलींत अनेक गेले उध्दरोन । धन्य नामसंकीर्तन । गणना नोहे शेषातें ॥६२॥
ज्याचे स्मरणें आवेश रसने । तोचि अवश्य मजलागून । ध्वनित परिसा नामाभिधान । पुण्यवर्धन पैं होय ॥६३॥
जो जगदानंदकंद मुकुंद । तो मुकुंदराज जगविख्यात प्रसिध्द । जयदेवस्वामी परमवंद्य । पद्मावतीरमण जो ॥६४॥
जनार्दन एकनाथ दासोपंत । चंद्रबोध परिसा भागवत । बहिरभट दामाजीपंत । गणेशनाथ नाथजी ॥६५॥
तुळसीदास भानुदास । रामदास कृष्णदास । माधवदास कूर्मदास । सुरदास जगमित्र पैं ॥६६॥
रामानंद परमानंद पूर्णानंद । कबीर सांवता वडवाळ प्रसिध्द । रंगनाथ शेखमहंमद । सोनार नरहरि जसवंत ॥६७॥
केशवस्वामी तुकया वामन । अत्यास्वामी कान्हया जाण । संतोषबा पवार कसाई सजन । केशव राघव चैतन्य ते ॥६८॥
नारायण माधव गोविंद्र विठ्ठल । राजाई गुणाई अतिप्रेमळ । मिराबाई कान्हो लडिवाळ । कर्माबाई भागीरथी ॥६९॥
प्रथमध्यायीं आवाहन । सभामंडपीं श्रोत्रेजन । पूजा केली वाकसुमनें । तया नमन साष्टांगी ॥२७०॥
तुम्ही श्रोते विद्वज्जन संत । सज्जन संभावित सभासंत । वैदिक पुराणिक पंडित । विचारवेते सर्वही ॥७१॥
मी केवळ मतिमंदबुध्दि । न पाहिली कोशकाव्यकौमुदी । परि सज्ञान तुम्ही उदधि । अंगिकारिलें थिल्लरा ॥७२॥
अगाध तुमचे सामर्थ्य । मूढाहातीं करविला ग्रंथ । नेणें गीर्वाण गुह्यार्थ । परि वरदहस्त तुमचा ॥७३॥
ज्या पुराणप्रसिध्द नसती नद्या । परि समुद्र संगमीं परमवंद्या । कीं कल्पतरुतळीं बैसतां सद्या । दैन्यापदा जाय पैं ॥७४॥
कीं जान्हवीस मिळतां वोहळ । तत्काळचि तें गंगाजळ । लोह परिसीं झगडतां केवळ । सुवर्ण सुढाळ करी की ॥७५॥
पाहा मृगमद मृत्तिके जरी । तरी ते त्वरितचि होय कस्तुरी । कीं तुळसीवृंदावनीं निर्धारीं । कंदर्पपूजा घडे पैं ॥७६॥
तेवीं तुमचा वरदहस्त । ग्रंथसिध्दि पावला समस्त । अगाध समर्थाचे सामर्थ्य । किती म्हणोनि वदावें ॥७७॥
आतां गुरुरत्नमाळिकस्मरणी । निर्गुणगुणीं हे अनर्ध्यमणी । स्मरणी सदा अंतःकरणीं । तें सादर परिसिजे ॥७८॥
जो पुराणपुरूष पुरातन । जो परब्रह्म सनातन । जो चैतन्यघन निरंजन । तो अदिनाथ जगद्गुरु ॥७९॥
मुख्य श्रीआदिनाथ उमारमण । तेथून मत्स्येंद्रा प्राप्त गुह्यज्ञान । मत्स्येंद्रे गोरक्षा उपदेशून । नाथपंथ विरुढविला ॥२८०॥
जेणें नव्याण्णव कोटि भूप । उध्दरिले निजप्रतापें । तेणें होऊन सकृप । उपदेशिलें गहिनीतें ॥८१॥
गहिनीनथाचे उपदेशें । स्वप्रकाशा केले समरस । त्याचा परिसावा इतिहास । कांही सारांश सांगतों ॥८२॥
जयजयपुरनामेंकरुन । तेथील नृप सोमाभिधान । त्याचा स्वप्रकाश नंदन । तो प्रतिमदन दुसरा ॥८३॥
तयाची भार्या सगुणलक्षण । परमपतिव्रता स्वरुपसंपन्न । पतिसेवनीं प्रीतिवर्धन । शुक्लपक्ष ज्यापरी ॥८४॥
पाहा कोणी एके अवसरीं । तो मृगयेस गेला वनविहारीं । तंव प्राप्त होतां शर्वरीं । त्वरीत मंदिरी येतसे ॥८५॥
कोणा न करितां जागृत । राव पातला अकस्मात । स्वयें एकटा निकट एकांत । कपाटशब्दें जाणवी ॥८६॥
कांता पुसे आहे कोण । येरू मी म्हणोन देत प्रतिवचन । ती पुसे मी कोण । मीपणलक्षण निवेदीं ॥८७॥
कीं सत्यभामेचिये सदनीं । रात्रीं पातले चक्रपाणि । कपाटा अंगुलीप्रहार करोनी । परस्परें भाषणीं बोलती ॥८८॥
राव पस्तावोनि अंतरी । पश्चात्तापें तिरस्कारी । तत्काळ स्त्रियेसी नमस्कारी । निघे ते अवसरीं तेथुनी ॥८९॥
तेणें शक्ति करोनि सुप्रसन्न । देवी वदे वरदवचन । राव म्हणे मी कोण । सांग मातें जननिये ॥२९०॥
देवता म्हणे रे त्रिशुध्दि । मी देणार ऐहिकसिध्दि । हें ज्ञान देणार सद्गुरु उदधि । एक गोरक्ष कलियुगीं ॥९१॥
राव म्हणे तयाचें दर्शन । कैसे होईल मजलागून । देवी म्हणे तें कारण । सांगतें ऐक खूण पैं ॥९२॥
मी कपोत होईन निर्धारी । छाया धरीन जयावरी । तयातें तूं नमस्कारीं । अनन्यभावेंकरोनी ॥९३॥
यापरी करोनि दृढसंकेत । शक्ति कपोती झाली त्वरित । मनकर्णिकेचे स्नानार्थ । गोरक्ष येती अनायासें ॥९४॥
भागीरथीचें करोनि स्नान । तटीं करिती भस्मलेपन । अकस्मात मस्तकीं छाया धरुन । पाहोन नृप नमीतसे ॥९५॥
गोरक्ष अवलोकिती ऊर्ध्व गगनीं । शक्तितें वदती तुझी करणी । देवता होऊन भयभीत मनी । मधुरवचनीं बोले ती ॥९६॥
भूपासी झाला बुध्दिभ्रंश । मी कोण हें पुसतसे । यासी करावें सामरस । मीतूंभास हरावा ॥९७॥
तों पक्वपत्रन्यग्रोधपतन । गगनमार्गी अधोवदन । तें ऊर्ध्व लक्षी नृपनंदन । तरी हेंचि अवलोकन करी तूं ॥९८॥
हस्त मस्तकी ठेवून । तेथून गोरक्ष पावले अंतर्धान । रायासी दृढसमाधि लावून । मनोन्मन पैं केलें ॥९९॥
समाधि लागतां दिनत्रय । गहिनीसी आज्ञापिती जा लवलाहें । उपदेशदीक्षा देऊन पाहे । प्रकाश नाम ठेविजे ॥३००॥ग
गहिनी करिती अलक्षोच्चार । तंव राव आला देहावर । मीतूंपण भेद समग्र । द्वैतभाव विराला ॥१॥
सकृप होऊन गहिनीनाथ । प्रकाशनाथातें उपदेशित । तेणें अनुग्रहिला चिद्रंजननाथ । अद्भुत प्रताप जयाचा ॥२॥
जयसिंधनामें नृपनाथ । तेणीं अश्वमेध केला कलीत । त्याचे राज्यांत अकस्मात । चिद्रंजननाथ पातले ॥३॥
वृक्षवृंद सघन सुंदर । तेथें समाधिस्थ योगेश्वर । होती पशुपक्षी समग्र निर्वैर । परस्परें विचारीत ते स्थळीं ॥४॥
रायासी श्रुत होतां वर्तमान । राव पातला अनन्यशरण । सुवर्णमुद्रा अनर्ध्य रत्न । करी समर्पण नाथातें ॥५॥
पूज्यपूजा नमस्कार । पूजोनि करी नमस्कार । तिरस्कारोनि नमस्कार । म्हणे हा संस्कार मज नको ॥६॥
धिक्कारोनि जाय ते क्षणीं । नृप सप्रेम लागे चरणीं । मग मस्तकीं ठेवूनि वरदपाणि । उपदेशून जातसे ॥७॥
पुढें जातां विप्रपुत्र । तया उपदेशिला गुह्यमंत्र । तो चित्सुखा निमग्न अहोरात्र । चिद्रंजन नाम या हेतु ॥८॥
जो सच्चिदानंदचिध्दन । तो चातक उत्पत्तीस वर्षे जीवन । त्या उत्पत्ति नाथापासून । प्रवृत्तिनाथ लाधले ॥९॥
प्रवृत्तिपासाव हंसनाथ । हंसें निरंजना केलें सनाथ । तेथूनि सिध्दनाथा निजगुह्य प्राप्त । पुढें भैरव निजगुरु ॥३१०॥
तो भैरव सद्गुरुनाथ समर्थ । ज्याचा पराक्रम महिमा अद्भुत । कीर्ति जघन्य सिंधुवलयांकित । अगाध सामर्थ्य जयाचे ॥११॥
तेणें करविला हा ग्रंथ । परि ग्रंथापूर्वी तो समाधिस्थ । त्याचाच मस्तकी वरदहस्त । ग्रंथ समस्त समाप्त हा ॥१२॥
पाहतां तृणाचा पुतळा । तो वायुवेगें हाले अवलीळा । तेवीं ग्रंथ हा दीनदयाळा । सिध्दि पावला तव सत्य ॥१३॥
कीं अंध डोळसासवें विचरत । कीं यजमान असतां श्रीमंत । आश्रिया प्रपंची नसे ददात । तेवी तव सत्य ग्रंथ हा ॥१४॥
की समर्थ दाता धनसंपन्न । याचका करी धनसंपन्न । तेवीं सद्गुरु तव सत्तेनें । ग्रंथ सिध्दि पावला ॥१५॥
मी स्वामीचा काय होऊ उत्तीर्ण । मूर्खमुखें वदविला ग्रंथ पूर्ण । जेवी परिसें केलें लोह सुवर्ण । तेवी महिमान नाथाचें ॥१६॥
पौरजप्रवाह नाथपंथ । जो जगद्वंद्य जगविख्यात । जनी जन्मावें या वंशांत । जेवीं पशूंत सिंह पैं ॥१७॥
वराज भारद्वाजाचा सानुकूळ । पाहतां पशुपक्षीच ते केवळ । परि दर्शनें तयांचे महत्फळ । भक्ष्य निंद्य परि वंद्य ॥१८॥
तें कीटकमांस वायस भक्षिती । न पाहती गुणदोषयाति । परि बुध्दजन जयाचा शकुन घेती । परमप्रीतीकारणें ॥१९॥
कीं अष्टादश वर्ण । त्यांत श्रेष्ठ जेवीं ब्राह्मण । तो भ्रष्ट असो परि श्रेष्ठ जाण । तया नमनचि करावें ॥३२०॥
धन्य धन्य नाथसांप्रदाय । केवळ कामदुहा हे जगन्माय । जडजीवां होऊन सदय । पान्हावलीई जननी हे ॥२१॥
मुमुक्षातें अर्थतृप्ति । निराधारिया कैवल्याप्राप्ति । जीवातें शिवचि करिती । कैवल्यसंपत्ति देऊनी ॥२२॥
असो कळसा आलें निरोपण । हें प्रासादाशिखर प्रसादवचन । नाना इतिहास जडितरत्न । श्रवणनेत्रें विलोका ॥२३॥
प्रथमाध्यायीं मंगलाचरण । गणेशसरस्वतीगुरुनमन । ग्रंथकर्ते प्राकृत गीर्वाण । आणि संतश्रोते वंदिले ॥२४॥
दुष्टभारें दुःख पावोन । पृथ्वी प्रार्थी कमळासन । विधिसह रमारमण । येते झाले कैलासा ॥२५॥
द्वितीयांत उपदेशिली हैमवती । मकरोदरीं मत्स्येंद्रोत्पत्ति । दीक्षानुग्रहण मत्स्येंद्राप्रति । आदिनाथें दिधलें ॥२६॥
तृतीयांत हेंचि कथन । गोमयीं गोरक्ष प्रगटोन । चतुर्थात पाताळीं जाऊन । पातंजळी साधिला ॥२७॥
आणिक गोरक्षप्रश्न । मत्स्येंद्रें निवेदिलें योगगुह्यज्ञान । पंचमाध्यायीं हेंचि वर्णन । सद्बोधातें उपदेश ॥२८॥
नाथ वरदप्रसाद । यासी करोनि अनुग्रहबोध । गोरक्षपुरी निर्मोनि प्रसिध्द । नाथवरद स्थापिल ॥२९॥
षष्ठमांत चौरंगी जन्मकथन । बदरिकाश्रमीं भुलेश्वरगमन । सप्तमांत चक्रधरख्यान । पिशाच गोरक्ष उध्दरी ॥३३०॥
सवाशेर पिठावरी ज्ञान । मस्त्येंद्र सांगतां न मानी जन । सिंदुरपुरीचा नृपति जाण । भाळचंद्र उध्दरिला ॥३१॥
अष्टमाध्यायीं हेंचि कथन । विप्रपुत्राचे चिरिले श्रवण । झोळी घाली द्विजनंदन । अपरोक्षज्ञान वदला तो ॥३२॥
आणवी वटाक्षभिक्षा मागून । अक्ष केला गुरुसमर्पण । नवव्य़ांत ब्रह्मांडसमाधि पूर्ण । सुदर्शनलीलावत्ती पैं ॥३३॥
दशमांत हाचि इतिहास । बत्तीस शिराळीं नागपंचमीस । दंदशूक असमास । उत्पन्न केले गोरक्षें ॥३४॥
सोमदत्तनृपवर उध्दार । आणि विश्वश्रवा ऋषिपुत्र । उमाभार्या परमपवित्र । गोमंतकीं व्याघ्रादि उध्दरिली ॥३५॥
एकादशांत हेंचि कथन । चंद्र्चूडसुप्रभआख्यान । चर्पटी उपदेशदीक्षा करी ग्रहण । सुभद्रा गोरक्ष उध्दरी ॥३६॥
पुष्करयात्रा बाराव्यांत । गोरक्षें जेवविले सिध्दमहंत । तेराव्यांत चौरंगीनाथ । नंदनवनीं पैं गेले ॥३७॥
चतुर्दशापासून सत्रापर्यंत । भर्तृहरिआख्यान बहुत । चिरंजीव केला भर्तृहरिनाथ । गोरक्ष समर्थ जगद्गुरु ॥३८॥
अष्टादशापासून क। पंचाध्यायीं गोपेंदुकथन । कानीफजालंदरी महदाख्यान । रसिक रसाळ परम तें ॥३९॥
तेविसाव्यांत गोरक्ष मारुति । संवाद झाला परमप्रीतीं । नंतर मल्लाळ देशाप्रति । गोरक्ष जाती स्वइच्छें ॥३४०॥
चोविसाव्यांत मत्स्येंद्रदर्शन । पंचविसाव्यांत मेनी उत्पन्न । अनेक प्रगटविले हें महिमान । अगाध माहात्म्य जयाचें ॥४१॥
सव्विसाव्यांत अनुसंधान । दत्तात्रेयगोरक्षअनुवाद गहन । ज्ञानमेघ वर्षले सघन । आर्तचातक तृप्त पैं ॥४२॥
सत्ताविसाव्यांत कथासार । शंकराचार्य शंकरावतार । तिहीं पराभवूनि मंडणमिश्र । धर्म स्थापिला कलियुगीं ॥४३॥
हस्तामलकसंवाद सुरस । भैरवगोरक्षवेदव्यास । प्रेषिले आचार्यपरीक्षेस । चांडाळवेषेंकरुनी ॥४४॥
अठ्ठाविसाव्या अध्यायीं जाण । ज्ञानेशाउत्पत्ति स्थिति कथन । वेद वदविले पशुमुखांतुन । अघटित विंदान दाविलें ॥४५॥
सद्गुरुकृपेचें सामर्थ्य । पंगु लंघिती महापर्वत । मुका वाचस्पति होत । जन्मांध परीक्षी रत्नातें ॥४६॥
असो कली दुर्मद दुर्धर यास्तव विष्णु बौध्दावतार । परि भक्तमहिमा प्रताप थोर । न चले निर्धार भक्तांपुढें ॥४७॥
एके जेवविला बोलविला भक्तीं । गृहीं राहविला परमप्रीतीं । भक्तांवश झाला श्रीपति । अद्भुत कीर्ति भक्तांची ॥४८॥
कलींत पाहा निश्चितीं । वर्णसंकर धर्म लोपती । ये विषयीं श्लोक व्यासोक्त । तोचि श्रोतीं परिसावा ॥४९॥

कलौ दशसहस्त्राणि विष्णुस्त्यजति मेदिनीम् । तदर्ध जान्हवीतोयं तदर्ध ग्रामदेवताः ॥१॥

कलींत विष्णु व्यासवचनीं । दशसहस्त्र वर्षे राहील मेदिनीं । पंचसहस्त्र वर्षे स्वर्धुनी । या कलियुगीं असे पैं ॥३५०॥
करोनियां सगरोध्दार । सामान्य दैवतें समग्र । लोपतीं झाली निरंतर । तदर्धवर्षे पैं जातीं ॥५१॥
पुढें पुढें गोरक्षजागृति । होईल ऐसी ही मत्स्येंद्रोक्ति । जीव पातकी पावन होती । नाथप्रतापें करुनी ॥५२॥
सांप्रत पाहतां अळंकापुर । पंढरीहून सुलभ क्षेत्र । जगदोध्दारार्थ ज्ञानेश्वर स्फुरद जागृत अद्यापि ॥५३॥
हे अठ्ठावीस अध्याय परिकर अनर्ध्यमणि । सद्भावें वोवीं एका गुणीं । हा अठ्ठाविसावा मेरु अग्रणी । सदा स्मरण असावा ॥५४॥
की हें अठ्ठावीस खणांचें मंदिर । अठ्ठाविसावा मुकुट शिखर । वरी कीर्तिध्वज फडके सुंदर । आर्ता पदरें पालवी ॥५५॥
कीं अठ्ठवीस अध्याय हे नक्षत्र । अठ्ठाविसावा पूर्ण चंद्र । त्रितापें संतप्त जे कां नर । त्यां शांत शीतळ करवी जो ॥५६॥
एवं अध्याय हे अठ्ठावीस । हेचि साहा चार अष्टादश । यांचा मथितार्थ सारांश । रहस्य जाणते श्रेष्ठ पैं ॥५७॥
जया सत्ताविसांमाजी बाविसावा । तयासाठीं माजीं अठ्ठाविसावा । तया द्वादशामाजीं प्राप्त नववा । लाभवैभव पाविजे ॥५८॥
की अठ्ठवीसयुगेंपर्यंत । भीमातटीं तिष्ठे पंढरीनाथ । तेवीं हे ग्रंथी आदिनाथ । उमेसहित स्थिर सदा ॥५९॥
जेवीं गौतमें आणिलें गंगेप्रति । कीं भगीरथें आणिली भागीरथी । पुंडलीकें आणिला रुक्मिणीपति । दीनोध्दार करावया ॥३६०॥
तेवीं भवानीचे प्रयत्नयत्नीं । नानापंथें प्रवाहे देवतटिनी । जे जवजीव बध्दपाणि । त्यांतें उध्दरणीं चिद्गंगा ॥६१॥
हे भवरोगातें दिव्यौषधि । स्मरणेंचि नाश आधिव्याधीं । सदा ओळंगती सकळ सिध्दि । हे भवाब्धितरणी सुनौका ॥६२॥
जेवीं व्रताचें उद्यापन । तेवीं हा अध्याय करितां श्रवण । कीं केलिया अनुष्ठान । देवता सुप्रसन्न होतसे ॥६४॥
की मंत्रपुरश्वरणाचिया पाठीं । सिध्दि साधे पैं शेवटीं । तेवीं अध्याय ऐकतां श्रवणपुटीं । उठाउठीं निजलाभ ॥६५॥
अपुत्रिया पुत्रसंतान । धर्मोर्थियां प्राप्त धन । विद्यार्थीं विद्यासंपन्न । ग्रंथपठणेंकरोनी ॥६६॥
योगसिध्दि वाकसिध्दि । मंत्रयंत्र अनेक औषधि । पारायणीं यथाविधी । अष्टसिध्दि वोळंगती ॥६७॥
ज्याचे गृहीं नाथग्रंथ । त्यास संरक्षी गोरक्षनाथ । तेथें न राहाती भूतप्रेत । दरिद्रदुरितां पळ सुटे ॥६८॥
ते गृहीं नवग्रह सुप्रसन्न । रोगगंडांतरें जातीं पराभवून । असत्य नव्हे गोरक्षवचन । सत्य सत्य त्रिवाचा ॥६९॥
हा ग्रंथ पयतोयसमरस । निवडूं जाणती सुजन हंस । जे मानसवासी परमहंस । ते सोऽहंहंस अविनाशी ॥३७०॥
केवळ हा ग्रंथ नोहे सामान्य । या इतर न जाणती सामान्य । हा परब्रह्मरसा परम मान्य । अतिमहान जो महान्ना ॥७१॥
जो श्रीमान्‍ सद्गुरु भैरव । सदा सुप्रसन्न वरदो भव । तत्प्रसादें ग्रंथवैभव । अभिनव लाभ ये हातां ॥७२॥
हे भैरवागुरुचें वरदपुस्तक । तत्पदीं ठेवून दृढ मस्तक । वारंवार जोडोनि हस्तक । वर मागोनि घेतसें ॥७३॥
नर्मदेचे उत्तरतीरीं । विक्रमशकाचे माझारीं । श्रीभैरववरदें वैखरी । आदिनाथ नमीतसे ॥७४॥
संवत्‍ अठराशें नव्वद । विश्वावसु संवत्सर प्रसिध्द । विटपक्षेत्रीं ग्रंथ अगाध । सिध्द झाला गुरुकृपें ॥७५॥
शके सतराशें छप्पन्न । गुरुवासर परम सुदिन । जयंति संवत्सर नामाभिधान । ध्रुवजपद श्रोतयां ॥७६॥
मासोत्तम चैत्रमास । रामजयंति पुण्य दिवस । शुध्द पक्ष माध्यान्हास । ग्रंथ समाप्त पैं झाला ॥७७॥
श्रीमत्‍ आदिनाथ प्रसन्नो भवतु । श्रीरस्तु कल्याणमस्तु । राजद्वारे विजयोऽस्तु । शुभं भवतु सर्वत्र ॥७८॥
श्रोते सज्जन सद्गुरुमूर्ति । आदिनाथ वंदोनी करी विज्ञप्ति । तुम्ही श्रीगुरु भैरवमूर्ति । आदिनाथा विश्रांति तत्पदीं ॥७९॥
इति श्रीआदिनाथलीलामृत ग्रंथ । आदिनाथ विरचित । अध्याय अष्टविंशति समाप्त ॥ श्रीआदिनाथार्पणमस्तु ॥

समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP