श्रीनाथलीलामृत - अध्याय १३ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीनमो आदेश आदिनाथ । सच्चिदानंदा अपरिमिता । पूर्णब्रह्म सत्य शाश्वत । अव्यक्तव्यक्ता जगदीशा ॥१॥
तूं अज्ञानजलदनिवारणा । सद्बोधा बोधप्रभंजना । ज्ञानांजना । भवतिमिरनाशना । प्रदर्शन करिसी तूं ॥२॥
तूं मायाकाननदहना । निष्प्रपंचा निरंजना । निर्विकारा सनातना । निराभासा सद्गुरु ॥३॥
जया देशीं अभयवर । मस्तकीं ठेविसी अभयकर । तया त्रैलोक्या गतिविहार । ( लीलया घडे तुझेनि ) ॥४॥
गतकथाध्यायीं इतिहास । समुदाय जेविला पुष्करास । ते कथा परम सुरस । पुढें रहस्य परियेसा ॥५॥
तेथून पातले तोरणमाळीं । समुच्चयेसीं नाथमंडळी । चौरंगी विनवी तये काळीं । गोरक्ष आणि मत्स्येंद्रा ॥६॥
समुद्रवलयांकित अवनी । तीर्थे देखिली समग्र नयनीं । आतां जावें स्वर्गभुवनीं । ऐसें मनीं वाटतें ॥७॥
आज्ञा घेऊन ते समयी । जाते जाले स्वर्गालयी । नंदनवनीम स्वभावी । येते झाले स्वभावें ॥८॥
नंदनवनीं आनंदयुक्त । चौरंगी योगाभ्यास अभ्यासित । अनेक तरुलता डोलत । सुमणीक वृक्ष ते ॥९॥
हेमवर्णी तरु निखळ । पुष्कराज शाखा सोज्वळ । पाचुवर्णी पत्रें सकळ । माणिक्यवर्णी साजिरीं ॥१०॥
नवरत्नरंगी सुमनें शोभती । नक्षत्रप्राय भासे दीप्ति । उंच डाहाळिया नभ चुंबिती । रम्य दिसती पाहतां ॥११॥
जैसे योगभ्रष्ट उतरती मही । वृक्षडाहाळिया तैशा पाही । जेवीं सज्जनाचे ह्र्दयी । शांतिक्षमा वसतसे ॥१२॥
पाचूचे रावे उड्डाण घेती । इंद्रनीळमयूर नाचती । हिर्‍यासमान हंस चमकती । शाखे बैसती आनंदें ॥१३॥
पत्रीं पुष्पीं फळीं सघन । निबिड छाया डवरलें वन । पाहतां होय समाधान । बिडौजस्थान क्रीडेचें ॥१४॥
मर्गजा परिघ सोज्वळ । वैडूर्य जडियेले फांदती किळ । अमृतोदकाचे पाट तुंबळ । माजी कमळें विराजतीं ॥१५॥
माणिकसम रातोत्पळ । त्यांत नीळवर्णी गुंजे अलिकुळ । एक चंद्रकीळसुप्रभ धवळ । चामीकराचें एक पैं ॥१६॥
दीपकळिकेचिये परी । कुसुमकळिका अति गोजिरी । विकसत सुमनें जेवीं तमारी । बाळार्क भावी भाविती ॥१७॥
नक्षत्रान्वय सफळ घोष । आकाशवर्तुळ सुप्रकाश । परम रसाळ सुरस पीयुष । पूर्ण होती परिपक्व ॥१८॥
नाना वल्ली अहळबहळ । प्रसवती प्रसर मुक्ताफळ । एक प्रवाळवेली सुढाळ । आरक्तवर्णी असती ॥१९॥
ठायीं ठायीं जळ तुंबळ । तडागतोय तुंडुंबे शीतळ । मत्स्य तळपती अतिचपळ । विकसित कमळें माजी पैं ॥२०॥
शतपत्रें सहस्त्रपत्रें । अनेकवर्णी चित्रविचित्रें । प्रफुल्लित प्रसन्न वक्त्रे । पाहतां नेत्रें स्वानंद ॥२१॥
हेमकोंदणी पाटांगणें । भिन्नभिन्न अभिन्नरत्नें । अभिनव शोभतीं प्रभाती किरणें । प्रकाश घन दिसती ॥२२॥
कल्पतरू सुरतरू एकसरे । पार प्रकार प्रशस्त पसरे । रत्न पुष्कराज चहूं फेरे । अनर्ध्यमणि सुप्रभ ॥२३॥
नवश्रीसौभाग्यसंपन्न । सदा प्रसवे सफळ सुमन । अति सुशोभित तें स्थान । परिमळसुगंधेकरुनि ॥२४॥
यापरी वनवधूचा शृंगार नीळवर्णी पिक सुस्वर । कामिकां तेथें कामविकार । परि योगियांची निजजननी ॥२५॥
तेथें चौरंगी उठाउठी । वज्रासनीं बैसले हठीं । तों वनरक्षक नेटे पाठीं । येते झाले जवळिके ॥२६॥
मृत्युलोकीचें मनुष्य । केवीं पातलें या स्थळास । पाहून करिती उपहास । अन्योन्यभावें सर्वही ॥२७॥
देवदूत विनोदें वदती । याची पाहूं योगस्थिति । भ्रूसंकेतें खुणविती । तर्जनीतें उभवुनी ॥२८॥
पिटीत परस्परें टाळी । कोलाहल गदारोळी । परी न हाले कदाकाळीं । दारुप्रतिमा ज्यापरी ॥२९॥
ब्रह्मरंध्री होऊन लीन । एकाग्र झालें जयाचें मन । तेथें देहादिइंद्रियभान । नसे सर्वथा तयासी ॥३०॥
निश्वेष्टाची चेष्टा करिती । श्रेष्ठप्रतिष्ठा नेणती । कुचिष्ट उच्छिष्ट फळें झोंकिती । अष्टदिशेंकरुनि ॥३१॥
सेवक पातले तेथून । देवेंद्रा सांगती वर्तमान । वनीं मानवी आला म्हणून । करिती निवेदन स्वामीतें ॥३२॥
काषायमेखळाभूषित । भव्यभाळी भस्म चर्चित । कर्णी मुद्रा विराजत । आकर्ण नेत्र साजिरे ॥३३॥
आम्ही केली तया उपाधि । परि ते न भंगे जयाची समाधि । क्षोभोनि शापिले त्रिशुध्दी । म्हणून सांगू पातलों ॥३४॥
शक्रें वक्रता धरोनि मनीं । सक्रोधें आरक्तलोचनीं । काय सांगूं पातला वदनीं । मानवाचें माहात्म्य ॥३५॥
मनुष्या दुर्लभ स्वर्ग भुवन । केवीं पातला तो काय कारण । कैचा कोठील न कळे कोण । कैसा येथें पातला ॥३६॥
येरु वदती प्रत्युत्तर । तो तेजस्वी योगेश्वर । कपिल वामदेव कीं अत्रिपुत्र । किंवा शुक नेणवे ॥३७॥
ऐकूनि म्हणे शचीरमन । कलींत कांता आणि कांचन । साधकातें महाविघ्न । छळण हेळण करुं तया ॥३८॥
तत्काळ पाचारिलें रंभेसी । उर्वशीसह । मिश्रकेशी । तुम्ही जाऊनि त्या वनासीं । योगियातें जिंकावें ॥३९॥
स्वर्गभ्रष्टता तया करुनी । तुम्ही जावें प्रतिज्ञावचनीं । आज्ञापितों सर्वांलागोनी । कार्यसिध्दि करावी ॥४०॥
जैसें विश्वामित्रातें छळिलें । तैसेंच पाहिजे कार्य साधिलें । तुमचे दर्शन कित्येक नाडले । भ्रष्टविलें श्रेष्ठांतें ॥४१॥
इंद्रपदाचा अभिलाष । धरोनि पातला तो तापस । तया करोनि विध्वंस । स्वर्गच्युत करावा ॥४२॥
ऐसें वदतां पुरंदर । मेनिका देत प्रत्युत्तर । आम्हीं निर्जर केले जर्जर । कटाक्षबाणेंकरुनि ॥४३॥
कायसी मानवाची मात । आम्ही करूं त्यातें तपोहत । जेवीं पृथ्वीवरी अकस्मात । सौदामिनी कोसळे ॥४४॥
पाहा अतृप्त्मी सहस्त्रनयनें । लावण्य न वदवे सहस्त्र वदनें । तेथें मानवाचे उभयलोचन । काय पदार्थ तुजपुढें ॥४५॥
मग वंदोनि शक्रपादुकां । निघत्या झाल्या लावण्यलतिला । जयांच्या पाहून वदनशशांका । तपी तपस्वी वेधती ॥४६॥
तया मुखसरोजभ्रशें । षट्‍पदाचेनि मिषें । रुंजी घालिती संतोषें । मनोवेधें वेधक ॥४७॥
कुंदेंदुवदना गौरवर्णी । नक्षत्रप्राय भूषणें श्रवणीं । नेत्रकटाक्ष चपळ हरणी । वनीं विहरणा जाती पैं ॥४८॥
हंसगमनी लोलनयनी । हरिमध्या भुजंगवेणी । उपमा न पवती पद्मिणी । तुंगस्तनी सुस्वरुपा ॥४९॥
नवयौवना प्रसन्नानना । हंसगमना मृगलोचना । देवललना इभगमना । प्रीतिवर्धना सुप्रिया ॥५०॥
कुचकुड्‍मलें कुंकुंमें रेखिले । पीनपयोधर अति शोभले । मृगमदांकित वरी बिंदु दिधले । ठसे उमटले सुप्रभ ॥५१॥
सुगंध तनूचा पंच योजन । वसंत वसे शीतळ पवन । दशदिशे गेला भेदून । षट्‍पदवृंद वेष्टिती ॥५२॥
वदनाब्ज देखोन अभिनव । झुंकारिती स्तुतिगौरव । पाहून मुखारविंद अपूर्व । वेढा देऊनी वेष्टिती ॥५३॥
शर्करेची अनुपम्य चवी । जेवीं उपमा तीसीच द्यावी । देवांगनेचे सुवैभवी । तरी त्या प्रत्यक्ष असती ॥५४॥
शृंगारसज्ज सालंकारी । येत्या झाल्या ते अवसरीं । संतोषमिषें वनविहारीं । स्वलीलेंकरुनि स्वईच्छे ॥५५॥
परमरमणीक कासार । कांचनांकित प्रशस्त प्राकार । कनककमळें मनोहर । सहस्त्रद्ळीं विकसित ॥५६॥
सरोवरीं करिती स्नान । परस्परें शिंपिती जीवन । रहस्यविनोदेंकरुन । क्रीडताती आनंदे ॥५७॥
नंतर करुन वस्त्रांतर । करुं जाती वनविहार । फळपुष्पें अपार । ग्रहण करित्या जाहल्य़ा ॥५८॥
चतुर्द्वाराचें विहारसदन । नवरत्नांकित जडित कोंदण । तें निर्जरांचे विलासस्थान । काय वर्णन करावें ॥५९॥
पंचमस्वरें आलापिती । राग उपराग गायनें करिती । तेथें पिकस्वर स्तब्ध होती । मंजुळ शब्द परिसोन ॥६०॥
वनचर पशुपक्षी ऐकती । वैर त्यागून निर्वैर बैसती । तों उर्वशीतें झाली स्मृति । विबुधपतीची ते वेळी ॥६१॥
उर्वशी वदे सखियांप्रति । मी पाहूं जातसें योगीस्थिति । तया जिंकूनि मी निश्चिती । येतें सत्वर पैं आतां ॥६२॥
जाऊन पाहे जंव नयनीं । तंव तो सक्त समाधिभुवनीं । भोग भोगूनि उन्मनी । तुच्छ भोगविषयादि ॥६३॥
तयाची चित्तवृत्ति पाहुनी । गायन करी मंजुळध्वनीं । ब्रह्मरंध्री नाद परिसोनी । विदेह देही येतसे ॥६४॥
नेत्र उघडोन जों पाहे । तों दिव्यांगना उभी आहे । तीतें वदे जननी साहे । पयपानार्थ पातली ॥६५॥
तुझें कुचकमंडला पय । तें पान करवी मजसी माय । येरी नेत्रविकारी हावभाव । दाविता न पाहे तिजकडे ॥६६॥
तंव तो वदे वसिष्ठजननी । मज तोषवी तव स्तनीं । येरी संकोच पावोनि मनीं । काय वचनी बोलतसे ॥६७॥
अगा योगिया म्हणविसी । मत्सुखातें न जाणसी । तीव्र अनुष्ठानें ऋषि । तपें पावती आम्हातें ॥६८॥
तूंतें काया वाचा मी अनुकूळ । तूं कां मजसी होसी प्रतिकूळ । प्रारब्धाचा विचित्र खेळ । स्वीकारिसी कां मूर्खत्वें ॥६९॥
तूं मृत्युलोकींचा मानव । काय जाणसी स्वर्गवैभव । पशुपाळक राजगौरव । नेणे मूर्ख ज्यापरी ॥७०॥
कीं कुरुप क्लीबा राजकुमरी । माळ घाली आपुले करीं । निर्दैव तीतें अव्हेरी । मूर्ख कीं धूर्त म्हणावा ॥७१॥
गर्भाधा रत्नालय । चक्षुहीना काय होय । की नवज्वरितासी पय । विषप्राय होतसे ॥७२॥
ऐसें ऐकोनि उत्तर । वदता झाला योगेश्वर । आम्ही स्वस्त्रियेसीं निरंतर । भोग भोगूं स्वइच्छें ॥७३॥
आमुचें एकपत्नीव्रत । आम्हां परस्त्री मातृवत । उन्मनीसीं सदा निरत । हा स्वधर्म आमुचा ॥७४॥
षोडश खणांचें दामोदर । माजी पंचखणी अतिसुंदर । त्यांत तीन खणांचें मंदिर । मनोहर दुखणी ॥७५॥
तीनशेंआठ हिरेजडितरत्न । बावन्न कोणांचें निकेतन । दशद्वारें भोभायमान । षट्‍चक्र ठसे त्यामाजीं ॥७६॥
शून्यभुवनी डोल्हारियांत । संयोगयुग्में असो निवांत । तेथील सुखाची सुखविश्रांत । अनुपम न ये सांगता ॥७७॥
स्वानंदविलास सुखोल्हास । सहस्त्रतरणींचा प्रकाश । सहस्त्रदळ कमळें परिपूर्ण विकाश । सामरस्य तये स्थळीं ॥७८॥
तेथें सुगंधीचा परिमळ । जेथें मन होय अलिकुळ । सत्रावीचें जळ शीतळ । कारंजाचे ते स्थळी ॥७९॥
होत नृत्यांगनांचें नृत्य । निर्जर होवोनि तिष्ठती भृत्य । सर्व सुखांचे सुखसाहित्य । जेथें विस्मित हरिहर ॥८०॥
होती अनुहतनाद चतुर्विध । तंत वितंत घन सुस्वर प्रसिध्द । काय सुख सांगूं अगाध । अनुपम महिमा असती ॥८१॥
ऐसें आमुचें ऐश्वर्य । सर्वोत्कृष्ट भोगवर्य । ऐहिक सुख तुच्छ नैश्वर्य । ते काय मातेम झकविसी ॥८२॥
तुझा परात्पर भ्रतार । त्यागून करिसी व्यभिचार । यापुढें काय हे निर्जर । सुख मानिसी नेणतां ॥८३॥
तरी स्वात्मसुखापुढें । स्वर्गसुख पाहा बापुडें । क्रतूतें होऊन वरपडे । स्वर्गसुख इच्छिती ॥८४॥
यज्ञादिक सर्व साधन । स्वर्गप्राप्तीसी कारण । तेथें होतां क्षीणपुण्य । मृत्युलोकीं येतसे ॥८५॥
ज्या सौख्यांबुधिलेशलेश । शक्रादि होती स्वर्गाधीश । परी विरंची दिवसीं चतुर्दश । होती जाती निश्चयें ॥८६॥
ऐसें सुखें सदा निमग्न । स्वयें आदिनाथ आदिनारायण । आणि योगी मुनिजन । स्वात्मसुखें डुल्लती ॥८७॥
तेचि परात्पर महाद्वार । तेथें परब्रह्म पुरुष भ्रतार । त्यासी भोगी निरंतर । सुख अपार पावसी तूं ॥८८॥
यापरी परिसोन वचन । सद्गद झाले अंतःकरण । परि मस्तक आंदोलन । तर्जनीतें हालव ॥८९॥
जेवी रंभेचा गर्वहत । करिता झाला व्याससुत । दिव्य भोगातें धिक्कारीत । तेवीं मज गमतसे ॥९०॥
जया सुवर्ण शेण एकसरी । शुनी आणि सुंदर नारी । नृपति आणि पैल दरिद्री । एक पाहे समदृष्टीं ॥९१॥
विधिपिपीलिकापर्यंत । आत्मतत्त्व एकविलोकित । हे चिन्हीं जो मंडित । तरी तो ईश्वर जाणावा ॥९२॥
यापरी बोधोनि उर्वशी । अष्टभाव दाटले तीसी । रोमांच उठले गात्रासी । कंठ झाला सद्गद ॥९३॥
मग मौनमुद्रें वंदून तया । जाती झाली शक्रालया । निवेदी तेथील चर्या । म्हणी साध्य नव्हे साधितां ॥९४॥
शक्र चिंताक्रांत मनीं । श्वास टाकून वदे वचनीं । म्हणे माझे सिंहासनीं । आरुढेल ऐसें वाटतें ॥९५॥
येरी वदे तो योगींद्र । वरप्रसादें करणार भद्र । इच्छामात्रें अनेक इंद्र । उत्पन्न करील दिसतसे ॥९६॥
ऐसें परिसोन विबुधपति । विस्मित होय आपुले चित्ती । आतां पाहूं तयाप्रति । दर्शन उद्देश धरियेला ॥९७॥
विबुधांसवें विबुधनाथ । येते झाले अतित्वरित । पाहूं पातले चौरंगीनाथ । तों अद्भुत प्रवर्तले ॥९८॥
सहस्त्रावधि सहस्त्रनेत्र । तेथें तिष्ठती एकसर । पाहून ऐसा चमत्कार । तटस्थ उभा ठाकला ॥९९॥
जेवीं आदर्श आयतन । एक अनेक दिसती भिन्न । स्तब्ध पाहे अवलोकूण । जे प्रतिमा देखे शिवालया ॥१००॥
सलज्ज होऊन बिडौज । म्हणे धन्य योगीराज । येणे अनेक शक्र तेजःपुंज । स्वप्रतापें निर्मिले ॥१॥
कोणा देईल माझें स्थळ । मनी वाहातसे तळमळ । योगमायेचा खेळ । ब्रह्मादिक नेणती ॥२॥
मघवा होऊनि नष्टगर्व । म्हणे सिध्द्चरित्र अभिनव । जें स्वसंवेद्य स्वयमेव । अनुपम उपमा जयासी ॥३॥
मग मौनेंचि करी गमन । तों अदृश्य झालें द्वैतभान । जेथें मीतूंपण गेलें हरपोन । तो एकाएकी एकला ॥४॥
अहंपणाचा विटाळ गेला । तो सोऽहंपणासी संचला । अवाच्य स्वयें सरला । मग उरला आभास ॥५॥
यावरी वदती योगींद्र वचन । आम्हां लोष्ठवत्‍ तुझें भुवन । गुरुकृपें मज निरंजनस्थान । व्यर्थ अभिमान धरी तूं ॥६॥
बिडौज वदतसे कांहीं । मज आज्ञा करा लवलाहीं । नाथ म्हणती सद्गुरुगृहीं । उणें नाहीं आम्हातें ॥७॥
तुजसी आमुचें हेंचि मागणें । तपस्वियांचें न करी छळण । होय कृतकल्याण येणें । भिक्षा देणें आमुतें ॥८॥
अवश्य वदोनि वज्रपाणि । प्रार्थितसे मधुरवाणीं । स्वमंदिरी ये क्षणीं । गमन केलें पाहिजे ॥९॥
येरू वदती काय कारण । येथेंचि झालें तव दर्शन । परस्परें समाधान । आतां उपरोध कासया ॥१०॥
राहे आत्मत्वीं सदा निमग्न । येणें पावसी सामाधान । करीं सर्वांचे रक्षण । उपमर्द न करीं साधुंचा ॥११॥
शरण आलिया अनन्य । त्याचा न धरितां अभिमान । मग तुम्हां देव म्हणेल कोण । निर्जरेशा तुजप्राति ॥१२॥
तरी तूं जीवमात्राचें जीवन । तुज प्राप्त करणें उदरभरण । पर्जन्य पिकविती धनधान्य । तवाज्ञेनें देवेंद्रा ॥१३॥
यापरी इंद्रयोगेंद्रसंवाद । तो बहु रसिक अनुवाद । तो निवेदितां विशद । ग्रंथ वाढे बहुतचि ॥१४॥
आज्ञा मागोनियां सर्वांतें । चौरंगी जाती कैलासातें । आर्त धरोनि श्रीशिवदर्शनातें । परमप्तीति करोनी ॥१५॥
त्रयोदशगुणी तांबूल । हा अध्याय होय केवळ । उभय जोडोनि करयुगुळ । सद्गुरुतें अर्पितों ॥१६॥
कीं हे ज्ञानधनत्रयोदशी । कीं हे शिवपूजनीं प्रदोषनिशी । तेवीं अध्याय हा परियेसी । धर्मार्थकाममोक्षादि ॥१७॥
श्रीमत् आदिनाथलीला सुरस । भैरवकृपेचा वाग्विलास । आदिनाथ नमो श्रोतयांस । त्रयोदशोऽध्यायीं अक्षयीं ॥११८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP