श्रीनाथलीलामृत - अध्याय २५ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
जो ज्योतिर्मय शुध्दचैतन्य । जो आदिबीज पुरातन । तो आदिनाथ उमारमण । जो सच्चिद्धन चिदात्मा ॥१॥
पाहतां विश्वचि जयाचा भास । परि याहूनि वेगळा चिदाभास । जया म्हणती निराभास । तो भासाअभासावेगळा ॥२॥
गताध्यायींचा इत्य़्र्थ । गोरक्षा बोधिती मत्स्येंद्रनाथ । तूं विषय भोगी समस्त । आज्ञापिती निजपुत्रा ॥३॥
परि जयाचा निःसीम निश्चय । गुरुसेवा हेंचि ऐश्वर्य । गुरुपादाब्ज हें सुखालय । मग विषय तुच्छ तयासी ॥४॥
स्त्रीसंगें बहुत बुडाले । विश्वामित्रादिक नाडले । शुंभनिशुंभ मृत्यु पावले । रावणा झालें तैसेंचि ॥५॥
देवऋषि जो नारदमुनि । तो तरी झाला स्वयें कामिनी । साठी संवत्सर प्रसवोनी । परम मनी लज्जित ॥६॥
तरी धन्य धन्य तोचि पुरुष । विषयभोगी मानी त्रास । जो देहस्थितीं उदास । तो मूर्तिमंत ईश्वर ॥७॥
एकांतें एकटा निकट । प्रार्थी कामिनी सौंदर्यसुभट । शुनीसमान मानी विट । तो मूर्तिमंत ईश्वर ॥८॥
कीं द्रव्यघट दुरळ वनीं । साध्या झालिया न पाहे नयनीं । आशा तृष्णा नसती स्वप्नी । तो मूर्तिमंत ईश्वर ॥९॥
तया मानसत्कार होतां जनीं । दंडप्रहार मानी मनीं । ऐसा जो मंडित चिन्हीं । तो मूर्तिमंत ईश्वर ॥१०॥
जो परोपकारास्तव पाहीं । चंदनापरी झिजे देहीं । रावरंक समान भावी । तो मूर्तिंमंत ईश्वर ॥१२॥
कांता कांचन मानी वमन । परलाभें अतिसंतुष्ट मन । परदुःखें दुखवे अंतःकरण । तो मूर्तिमंत ईश्वर ॥१३॥
इतरपासाव अपराध जरी । तोही आपण क्षमा करी । तोचि जाणावा निर्धारी । मूर्तिमंत ईश्वर ॥१४॥
गुरुसेवे सदा सन्मुख । जो परनिंदेसीं सदा मुक्त । परस्त्रीसीं नपुंसक । तो मूर्तिमंत ईश्वर ॥१५॥
असो मत्स्येंद्र गोरक्षा बोधित । परि न मानी जयाचें चित्त । की रंभा छळितां शुकातें । कदा वश्य नोहे पैं ॥१६॥
कीं देवयानी शुक्रकन्या । सौंदर्यसंपन्न गुणैकमान्या । कचासी वश्य अनन्या । परि अव्हेरी तयेतें ॥१७॥
गुरुसेवे गोरक्ष तत्पर । न सांगतां जाण अंतर । बध्दहस्तें अहोरात्र । तिष्ठे समोर गुरुचे ॥१८॥
मारुति कीं खगेश्वर । कीं शिवासन्निध नंदिकेश्वर । गुरुदास्य महिमा थोर । एक जाणे गोरक्ष ॥१९॥
आसन शयन उदकपान । गुरु न करिती गोरक्षावीण । विहार आणि गमनागमन । अनुदिनी असे सन्निध ॥२०॥
मत्स्येंद्राचे अंकासनीं । मेनी बैसलासे कौतुकेंकरुनी । बालभातुकें घेऊनि पाणी । क्षणक्षणीं खुणावी ॥२१॥
लडिवाळ बाळ निकट जवळ । मेनीनाथ परमस्नेहाळ । लळें पाळिती त्याचे सकळ । चपळ खेळ खेळत ॥२२॥
सवेंचि जाय परिमळेकडे । गोरक्षा दाविती वाकुडें । बाळभासें बोले बोबडे । परम आवडे उभयांसी ॥२३॥
जेवीं गजानन षडानन । पाहोन तोषे उमारमण । तेवी उभयांतें लक्षून । मत्स्येंद्रामनीं सुख वाटे ॥२४॥
प्राणाहूनि प्रिय मेनीनाथ । बाळभाषे बुझावीत । वारंवार मुख चुंबीत । आनन कुरवाळी तयाचें ॥२५॥
कोणें एके दिवसीं जाण । निधी प्रवर्ततां माध्यान्न । जननीजनकापुढें शयन । मेनीनाथ करीतसे ॥२६॥
तंव शौच लागला म्हणून । बाळ उठून करी रुदन । तेव्हा गोरक्षा पाचारुन । आज्ञापिती सद्गुरु ॥२७॥
मेनीस नेई बाह्यप्रदेसीं । शौचशुध्दि करवीं यासी । गोरक्षें उचलोनी तत्समयासी । कडिये उचलोनि जातसे ॥२८॥
बहिर्भूमीं त्या बैसवूनीं । नासिकीं ठेऊनि तर्जनी । सदर्प दावी त्यालागोनी । अधर रोवी दशनें पैं ॥२९॥
तूं मूत्र करिसील जरी । कर्ण छेदीन मी निर्धारी । प्रदीप्त काढोनियां सुरी । मळशुध्दि करीं तूं सुखें ॥३०॥
मूत्रावीण न होय मळ । बाळ भयें करि तळमळ । सवेंचि म्हणे उतावेळ । शौच नसे मजप्रति ॥३१॥
तत्काळ आणितां शय्येवरी । भयें निज तो क्षणभरी । शौचवेग पुन्हा शरीरीं । आरबळोनि उठतसे ॥३२॥
पुन्हा गोरक्षनाथाप्रति । सद्गुरु स्वयें आज्ञापिती । तुवां नेवोनि मेनीप्रति । स्वच्छ्शौच करवीजे ॥३३॥
मागुती मत्स्येंद्र्नंदन । आणिला बाहेर बाळ सान । तयाप्रति सदर्प वचन । लघवी न करी म्हणतसे ॥३४॥
पाहा पाहा मूत्राविण । कैसें होईल मळशोधन । दीर्घस्वरें बाळरुदन । करितां शस्त्रें भेडसावी ॥३५॥
काकुळती येत बाळ । मज नसे म्हणे मूत्रमळ । भयें कांपत चळचळ । उतावेळ जातसे ॥३६॥
यापरी एक वेळ दोन वेळां । बाहेरोनि बाळ आणिला । भयें जननीपुढें शिरला । कांपूं लागला सर्वांगी ॥३७॥
परमभीतीकरोन । मंचकी निजे बाळ जाऊन । वेगे न साहे बाळ सान । धीर न धरवे शौचातें ॥३८॥
भयें मळमूत्र रोधिला बहुत । तंव शौच झाला अकस्मात । विष्ठामूत्र आस्तरणांत । वस्त्रे पलंगी माखलीं ॥३९॥
उभयांग विष्ठेनें भरलें । तिरस्कारोन तये वेळे । गोरक्षातें हाक फोडिले । मत्स्येंद्रनाथें अविलंबे ॥४०॥
सद्गुरु वदती आज्ञावचन । मेनीसहित आस्तरण । परिमार्जी न लागतां क्षण । वाळवोनि आणावें ॥४१॥
अवश्य आज्ञा म्हणून । बाळ घेतला उचला उचलोन । गाद्या पडगाद्या आस्तरण । आवरोन घेत मस्तकीं ॥४२॥
निरखोन नदीनीर निर्मळ । तीरी शिळा विस्तीर्ण विशाळ । तेथें ठेविला वस्त्रगोळ । मेनी धरिला तळहातीं ॥४३॥
वस्त्रें वेष्टूनि कटिमंडळ । चरणयुगळीं धरोन बाळ । चंडशिळेवरी तत्काळ । आपटोनियां मारिला ॥४४॥
तुंबिणीचें जेवीं पक्वफळ । भग्न होतां न लगे वेळ । तेवीं मेनीनाथाचें मौळ । छिन्नभिन्न जाहलें ॥४५॥
आशुध्दें आरक्त झाले जळ । अस्थि मज्जा मांसगोळ । काठोनि झुगारिलें सकळ । चर्म सोज्वळ धूतलें ॥४६॥
जेवीं पशुघ्न पशू विदारिती । तेवीं तयाच्या काढोनि अस्थि । त्वचा काढोनियां निगुती । घेतसे हाती गोरक्ष ॥४७॥
कीं शंकरं मारविला चिल्लाळ । तैसाचि मारिला मेनी बाळ । महानाचा महान खेळ । ब्रह्मादिकां नेणवे ॥४८॥
शय्यावसनें धौत समग्र । ग्रंथीं बांधोन घे सत्वर । मेनीचर्म स्कंधावर । घेऊन जाय मंदिरी ॥४९॥
उपरीवरी मंचकवस्त्र । वाळूं घाली मत्स्येंद्रपुत्र । मेनीचेंही कलेवर । वस्त्रासह वाळवी ॥५०॥
सवेंचि येवोन गुरुसमोर । उभा तिष्ठें जोडूनि कर । मत्स्येंद्र म्हणती कोठें कुमर । येरु म्हणे वाळतसे ॥५१॥
पळनिमिष भरतां प्रहर । कां तो न येचि सकुमार । गुरु पुसती वारंवार । अद्याप कैसा वाळतो ॥५२॥
तंव परिमळा जावोनि पाहे । वस्त्रांत चर्म वाळताहे । भूमीवरी तत्काळ देह । टाकिती झाली शुभांगी ॥५३॥  
एकचि हाहाःकार माजला । दुःखाब्धीचा पूर दाटला । कल्पांत प्रळय वोढवला । भूगोळ खचला वाटतो ॥५४॥
धबधबां पिटिती वक्षस्थळ । दुःखें त्राहाटिती भूमीं मौळ । लावण्यलतिका पडती विकळ । वदनीं धुळी घालिती ॥५५॥
दीर्घस्वरें करिती रुदन । बोभाविती म्लानवदन । आतां कासया राजसदन । मारिला नंदन पैं माझा ॥५६॥
अरे निर्दया चांडाळा । मारिलें कैसें माझ्या स्नेहाळा । काय अपराध तुझा केला । तेहीं मजला सांग पैं ॥५७॥
बाळहिंसका कृतघ्ना । दावाग्नि लाविला वंशवना । दुःखानळीम आहाळती अंगना । कोण कोणा सावरी ॥५८॥
जयाचे भय होतें मनीं । तोचि उघड देखिला नयनी । प्रारब्धाची विचित्र करणी । होष्य भविष्य चुकेना ॥५९॥
हिंसकास कैची करुणा । मारिला माझा बाळ तान्हा । स्तनीं दाटून फुटला पान्हा । पाजूं कवणा मी आतां ॥६०॥
माझी वंशवल्ली खंडण । झाली वाटे पूर्वप्राक्तनें । हा काळरुपी झाला निर्माण । कंसच कैसा प्रकटला ॥६१॥
माझा आणा गे राजहंस । उडोन गेला कोणे दिशेस । माझें विघडिलें पाडस । माझा राजस मज दावा ॥६२॥
मज धेनूचे वत्सास । हा मानवरुपें व्याघ्रभास । कोमळ कोवळा करोनि ग्रास । ढेकर देऊन तोषला ॥६३॥
जळो याची योगदीक्षा । कळों आली पूर्ण परीक्षा । आतां लावोनि यातें शिक्षा । दंड करणें उचित ॥६४॥
चंद्रकळा म्हणे ऐक वचना । गेली गोष्ट न येचि पुन्हा । आतां धैर्य देवोनियां मना । विचार विवेक करी कां ॥६५॥
मत्स्येंद्रनेत्री अश्रुपात । कंठ दाटोन सद्गदित । म्हणती दावा रे मेनीनाथ । प्राणप्रिय मज आतां ॥६६॥
माझें एकुलतें आवडतें । गोरक्षा मारिलें त्वां निघातें । दया कैसी न ये तूंते । बाळहत्येतें न भीसी ॥६७॥
परिमळा म्हणे तये समयी । गोरक्षा बाळ आणून देई । नाही तरी पडसी अपायीं । दुःखार्णवीं जाण पां ॥६८॥
गोरक्ष म्हणे ऐक माते । मी तों पापपुण्याविरहित । गुरुकृपेनें दुःखारहित । जन्ममृत्यावेगळा ॥६९॥
मी न जळे कल्पांती । मज मृत्यु ना पुनरावृत्ति । मीचि स्वयें परंज्योति । कूटस्थस्थिती वर्तत ॥७०॥
मज कैचें जन्मकर्म । मज कैचेम नामरुपधर्म । मी स्वसंवेत्ता परब्रह्म । देहसंबंध मज कैचा ॥७१॥
मी चहूं शून्यांहूनि पर । चहूं वाचेसी मी अगोचर ।  मज नसेचि आपपर । परात्पर मी स्वयें ॥७२॥
मी न मारिता न तारिता । चराचरी माझीच सत्ता । मी तों असे त्रिगुणापरता । नसे अन्यथा मद्वाक्या ॥७३॥
यावरी परिमळा वदे वचन । ब्रह्मज्ञानाचें काय कारण । समयोचित वर्तती विचक्षण । व्यर्थ शीण शब्दार्थ ॥७४॥
बाळहिंसका करोनि घात । तूं काय सांगसी वेदांत । अरे निर्लज्जा तुझें चित्त । कैसा संकोच न पावे ॥७५॥
काळसर्पाची गरळ निर्मळ । परि तें काळकूटचि केवळ । कीं मैदमुखीचें शब्द रसाळ । परि अनर्थप्रद रोकडे ॥७६॥
राजा यम आणि पावक । तस्कर वारांगना भाळक । परदुःख जाणे भिक्षुक । ग्रामकंटक आग्रही ॥७७॥
गोरक्ष वदती तदोत्तर । परिसे माते ममोत्तर । दारापत्य धनागार । क्षणभंगुर सर्वही ॥७८॥
यांतें वायां मानिसी प्रमाण । पाहों जातां व्यर्थ शीण । प्रबोध नव्हेचि अंतःकरण । मृषा भ्रांति मृगजळ ॥७९॥
तूं किमर्थ श्रमें करिसी रुदन । श्रमसाध्य काय भेटे नंदन । जरी देसी भाष्यदान । तरी अवश्य पुत्र आणितों ॥८०॥
तुझा आणून देईन सुत । परि मी नेईन सद्गुरुनाथ । हाचि झालिया नेमार्थ । पाहे प्रचीत आताचि ॥८१॥
ऐसी परिसोनि वचनोक्ति । हरुषली परिमळा परम चित्ती । न कळे ईश्वरची गति । परि केवी अघटित घडे हें ॥८२॥
परिमळा म्हणे आणिल्या तनय । नेई आपुला श्रीगुरुवर्य । सत्य त्रिवाच निश्चय । असत्य नव्हे कल्पांती ॥८३॥
गोरक्ष म्हणती त्रिवार बाहे । हाच सांगतों सुगम उपाय । तूं कदा न धरी संशय । तरीच गुरुपुत्र गुरुचा ॥८४॥
मग म्हणे धावें कां राजसा । तुजवीण उदास दाही दिशा । माझ्या प्रियकरा डोळसा । कैसा गेलासि त्यागुनी ॥८५॥
मनमोहना मत्स्येंद्रनंदना । मेनीनाथा दावी वदना । कोठें गेलासी कोणे स्थाना । माझ्या सगुणा ये वेगीं ॥८६॥
गोरक्षें मारिलें म्हणोन । क्रोधें बैसलासी रुसून । तरी मजवरी कां कठिण मन । प्राणविसाव्या धावे कां ॥८७॥
भक्ष्य भोज्य भक्षी भातुकें । मी स्वहस्तें करवीन कौतुके । मग तूं जाई यथासुखें । खेलावया सहचरीं ॥८८॥
तुझें पेहेरण कुंचीकुंचडें । घेऊनि तिष्ठें द्वारापुढें । तुझे शब्द कानडे बोबडे । वाडेकोडें आवडे पैं ॥८९॥
रुणझुणतीं तुझी पदभूषणें । ऐकावया आतुर माझे श्रवण । भाळीं अनर्ध्य पिंपळपान । तेंचि आनन मज दावी ॥९०॥
अधर इच्छिती तव चुंबन । पाहे आतुर झाले लोचन । बाहु इच्छिती आलिंगन । तुंतें घेईन कडियेसी मी ॥९१॥
सापत्न भाव धरोनि चित्ती । गोरक्षें वधिलें तुजप्रति । तोचि कळवळोनि अतिप्रीतीं । पाचारित तुजलागीं ॥९२॥
ऐसें वदतां तये संधी । मेनी प्रगटले लक्षावधि । जो सदय दयेचा उदधि । उचंबळला सकृप ॥९३॥
तिळतुल्य नसे न्यूनाधिक । अगाध जयाचें कौतुक । पाहूं पातले त्रिदशादिक । विमानारुढ होऊनी ॥९४॥
सुमनवृष्टीचा संभार । दुदुंभीचा होय गजर । नादें दुमदुमिलें अंबर । जयजयकार जाहला ॥९५॥
गोरक्ष वदती ऐक जननी । आपुला पुत्र घे वोलखोनी । तयाचा हस्त दृढ धरोनी । एकीकडे घेई कां ॥९६॥
जैसा तैसा असेल तोचि । घे परीक्षोनि तुझा तूंचि । इच्छा असेल जी जयाची । तोचि वोळखी आपुला ॥९७॥
हंसांत वोळखावा कोणता कोण । की सूर्यरश्मीत कोणते किरण । कीं परिसामाजी आपुला कोण । निवडोनि कैसा घेईजे ॥९८॥
एक अमृततरुची फळें । कोणतें निवडावें वेगळें । भ्रांती होवोनि परिमळे । पाहे बाळें सारिखी ॥९९॥
सारे दिसती सारिखे । त्यांमाजी कोण तो वोळखें । परिमळा आनंदे तेणें सुखें । गेली दुःखें वितळोनी ॥१००॥
एकटासा एक वर्ण । एक सारिखा एक सगुण । एकासारिखे वस्त्रभूषण । सारिखीं भाषनें सर्वांची ॥१॥
जेवीं गोकुळीं चतुरानन । गोपगोधनें नेली हरोन । मग सर्वही नटला श्रीकृष्ण । तेवी महिमान हे केलें ॥२॥
कीं यशोदेपासी भगवान । अनंतरुपें प्रगटे जाण । गोपी झाल्या निरभिमान । कळे विंदान तयाचें ॥३॥
धन्य धन्य गोरक्षचरित्र । पाहोन विस्मित सहस्त्रनेत्र । अगाधा जयाचें न कळे सूत्र । दाविले पुत्र परिमळे ॥४॥
अनिवार मोहसमुद्र । पुत्रमोहें नाथ मत्स्येंद्र । सद्गदकंठ सजलनेत्र । होते जाहले तेधवा ॥५॥
जेवीं शिवइच्छें तत्काळ । असंख्य प्रगटलें चिल्लाळ । परमसगुण श्रियाळ । तेवीं परिमळे मत्स्येंद्रा ॥६॥
बाळ उचलोनि सत्वर । मत्स्येंद्रें घेऊनि सकुमार । चुंबन देत वारंवार । परिमळे जवळी देतसे ॥७॥
जेवी जलदभास उदेला गगनीं । परि सवेंचि जाय वितळोनी । तैसे गुप्त जाहले असंख्य मेनी । एक उरला जवळिके ॥८॥
की उदया आलिया मित्र । अदृश्य होत सर्व नक्षत्र । तेवीं मेनी मत्स्येंद्रपुत्र । एकचि उरला पाहतां ॥९॥
मग करोनि जिंतवण । स्त्रिया करिती अक्षयवाण । मंगळतुरें मंगळ गायन । होती झाली ते वेळीं ॥११०॥
मत्स्येंद्रइच्छेंकरुन । माये प्राप्त झाला तुज नंदन । आतां आम्ही करितों गमन । देई आज्ञा जननिय ॥११॥
संतोषसंशयाब्धिप्रवाही । परिमळा पडिली ते समयीं । नेमवचनें गोविली पाही । मौनमुद्रे शशांक ॥१२॥
सिध्दि पावला मनोगत । आतां सांभाळी आपुला सुत । हा मत्स्येंद्रांश मेनीनाथ । पाहोनि स्वस्थ असावें ॥१३॥
मेनी म्हणे हा भरवसा । मी न राहें येथें सहसा । मज नसे ऐहिकी आशा । सवें सेवेसी येईन ॥१४॥
गोरक्ष वदती ममानुजा । जननीस वेध अगाध तुझा । ईतें लाभ तुजविणे दुजा । कोन असे मज सांग ॥१५॥
कैची जननी कैचा जनक । हा देहसंबंध मायिक । विसरोनियां स्वात्मसुख । प्रपंचदुःख मज नको ॥१६॥
मी करीन परत्र साधन । मज तुच्छ दारा धन । करू सद्गुरुआराधन । यमबंधन चुकवूं पैं ॥१७॥
मी मातृवत्‍ मानी परांगना । काय करुं या राज्यसदना । नको मज जन्ममृत्युवेदना । पुरे पुरे मज आतां ॥१८॥
ऋणानुबंधें सर्व घ्यावें । पशु पत्नी राज्यवैभवें । मित्र पुत्र आणि आलयें । लाभालाभ प्रारब्धें ॥१९॥
की अनुकूळ प्रतिकूळ काळ । जेवी सजल रिक्त आभाळ । येती जाती सर्वकाळ । परि ते निराळ शाश्वत ॥१२०॥
जेवीं स्वप्नी देखती सुखदुःख । परि जागृतीं पाहतां क्षणिक । तेवीं संसार हा मायिक । हर्षशोकाकारणें ॥२१॥
जो त्रिकाळज्ञानी मत्स्येंद्रांश । वैराग्य झालें कुमारद्शेस । सकुमार राजस डोळस । अतिरुपस बाळ तो ॥२२॥
पाहून निश्चय निर्धार । सकृप झाले श्रीमत्स्येंद्र । मस्तकीं ठेविला अभयकर । उपदेशदीक्षा दिधली ॥२३॥
वीरगुंठी भस्म भाळीं । मुद्रा तळपती श्रवणयुगळीं । भगवी मेखळा सरळ शैली कुक्षे झोळी विराजे ॥२४॥
अलक्ष करोनि ब्रह्मशब्द । मंजुळशृंगी सिंहनाद । नाथपंथमहिमा अगाध । भुवनत्रय़ीं न समाये ॥२५॥
परिमळेचि वदती तदोत्तर । तुझा झाला शापोध्दार । स्वपदीं स्वरुपीं निरंतर । राहे आतां स्वानंदी ॥२६॥
परिमळा वदे जोडोनि कर । स्वामी मज देऊनि अंतर । ह्र्दय वज्रापरी कठोर । कां निष्ठूर झालांसी ।\२७॥
मनीं माझे दृढ निर्धार । सेवे सादर निरंतर । असतां करिता अव्हेर । हेंचि आश्चर्य मज वाटे ॥२८॥
तनमनधन अनन्यशरण । पंचप्राण वोवाळीन सांडण । ऐसें असतां मन कठिण । केवीं झालें कळेना ॥२९॥
काया वाचा आणि इंद्रिय । सर्वस्वें अर्पण केला देह । ऐसियाचें कठिण ह्र्दय । केवीं झाले कळेना ॥१३०॥
माझा धरोनि त्रास । काय जोडियेलें लाभयश । ऐसें असोनि चित्ती उदास । केवीं झालें कळेना ॥३१॥
अहा कैसें पूर्वप्राक्तन । पतिपुत्रादि राज्यासन । शाश्वत असतां उदेलें स्वप्न । केवी झालें कळेना ॥३२॥
अवचट लाभ अकस्मात । मज हे चरण झाले प्राप्त । तरी मनोरथ राहिले अतृप्त । सुस्वार्थ कांही दिसेना ॥३३॥
ऐसें बोलोनियां त्वरित । तत्काळ पातले अश्रुपात । नेत्रोदकें अश्रु स्त्रवत । परमसखेद होतसे ॥३४॥
यावरी वदती नाथ मत्स्येंद्र । नरेंद्र आणि योगींद्र । हे न होती कोणाचे मित्र । काळत्रयीं जाण पां ॥३५॥
योगियाचा मार्ग अवधारी । एक स्थळीं जो विहार करी । तया लांछ्न निर्धारी । निश्चयेंसी जाणिजे ॥३६॥
होणार होष्याप्रमाणें । तेथें ऋणानुबंधाचें काय कारण । तुझें झालें शापमोचन । परत्रसाधन साधावें ॥३७॥
सत्सुख असोनि तुजजवळीं । त्या त्यागोनि होसी तूं वेगळी । पाहतां तरंग आणि जळीं । अभेद वसे ज्यापरी ॥३८॥
सकृप होऊन वरदहस्त । ठेवितां झाली समाधिस्त । वृत्ति एकाग्र जाहल्या समस्त । स्वस्थ विश्रांत पाहोनी ॥३९॥
यावरी वदे लावण्यलतिका । माझी फेडिली भेद्शंका । आतां लाधलें स्वानंदसुखा । या भवदुःखा विसरलें ॥१४०॥
आतां विनंती हेचि पाही । माझी भिक्षाग्रहणाप्रतीही । जेथें असाल तेथे पाही । सेवन करावें अखंड ॥४१॥
मग करिती झाली पूजन । वस्त्राळकारभूषण । सुवर्णपात्रीं पक्वान्न । भोजन करिती त्रिवर्ग ॥४२॥
जेवीं हरि हर चतुरानन । तिघे दिसती ज्ञानसंपन्न । परिमळा मानीत परमधन्य । आजिचा दिन देखिला ॥४३॥
नाथपात्राचें पूजन । गुप्त भिक्षा अनर्ध्यरत्न । आच्छादिलें दिव्यवसन । देती झाली त्रिवर्गा ॥४४॥
मत्स्येंद्रनाथातें न कळत । कांचनविटा जड बहुत । परिमळा अर्पीं आपुल्या हातें । परमप्रीतीकरोनी ॥४५॥
मेनी म्हणे श्रीगुरुमूर्ती । शीघ्र आज्ञा द्यावी मजप्रति । तीर्थे करावी यथानिगुती । त्रिभुवनीचीं वाटतें ॥४६॥
आणि करावें योगसाधन । सदा असावें मनोन्मन । मीनमार्ग मीनासन । मेनी म्हणे मज सांग ॥४७॥
योगयुक्तिप्रवीण । मेनी केला न लगता क्षण । आंगी बाणलें योगचिन्ह । मत्स्येंद्रकृपें ते वेळीं ॥४८॥
मराळाचे बाळासी । काय शिकविजे उड्डाणासी । मत्स्याचे पिल्यासी । पोहू न लगे शिकवणें ॥४९॥
तेवीं मत्स्येंद्रकृपेंकरुन । मेनी झाला सुप्रसन्न । जो प्रत्यक्ष अवतरे गजवदन । मत्स्येंद्रोत्तरीं अवलीळे ॥१५०॥
मत्स्येंद्र निघे तदुपरी । बोळविती नरनारी । जेवीं मथुरेस जातां कंसारि । होती वज्रनारी दुःखीत ॥५१॥
एक वदे जेवी अक्रूर । घेऊनि गेला यादवेंद्र । कीम कौशिकें नेला रामचंद्र । तेवीं गोरक्ष मत्स्येंद्रा ॥५२॥
प्रलाप करिती समग्र युवती । अंग धरणीवरी टाकिती । स्तवती सजल नेत्रपाती । दुःखें विलपती आक्रोशे ॥५३॥
ललनाविलाप देखून । मोहें कवळिलें मत्स्येंद्रमन । कंठ सद्गद दाटोन । नेत्री जीवन लोटलें ॥५४॥
गोरक्ष विलोकिती सिंहदृष्टी । मत्स्येंद्रा उदेला मोह पोटीं । तंव भस्म फुंकिलें उठाउठीं । मायामोह उडाला ॥५५॥
निर्मोह निर्विषय कामिनी । होत्या झाल्या तये क्षणी । मग मत्स्येंद्र निघती तेथोनी । शीघ्रगती अविलंबें ॥५६॥
तों मार्गी देखिलें सुरम्य नगर । नगर रमणीय सुंदर । प्रशस्त देखून समुद्रतीर । तेथें मत्स्येंद्र उतरलें ॥५७॥
मार्गी देखिला एक श्रावक । नीमचंद्र नामें नास्तिक । गोरक्षमत्स्येंद्रपदीं मस्तक । ठेविता झाला सद्भावें ॥५८॥
पाहा लाभवेळा दैवाची । भेटी झाली गोरक्षाची । परि तो बहिर्भूमीचा अशुचि । शरण गेला गोरक्षा ॥५९॥
न करितां हस्तपादप्रक्षाळण । तैसेंच घेत नाथदर्शन । गोरक्ष तया अवलोकून । काय करिते जाहलें ॥१६०॥
मेनीचें चर्म होतें स्कंधी । तया देतसे कृपानिधि । म्हणे याचे पावसी सिध्दि । सिध्दशाबर सिध्द पैं ॥६१॥
शेवडा- मस्तकीं ठेवितां कर । तत्काळ जाहलें दिव्य शरीर । निरालंब दिगंबर । धर्मदंड हस्तकीं ॥६२॥
पारुषचर्मापासून उत्पन्न । पारसनाथ हें नामाभिधान । परमसिध्दि हे निर्माण । ऋषभदेवासारिखा ॥६३॥
तेथून करिती मत्स्येंद्र गमन । मार्गी गोरक्षा करिती प्रश्न । हें भय किंवा निर्भयस्थान । वारंवार पुसती ॥६४॥
मत्स्येंद्र वदती विचारदक्षा । सांगे भय निर्भय गोरक्षा । गोरक्ष म्हणे काळा लावूं शिक्षा । सद्गुरुचे प्रतापें ॥६५॥
गोरक्ष विचारी आपुले चित्तीं । मत्स्येंद्रातें कायसी भीती । पुन्हा पुन्हा मज पुसती । काय कारण कळेना ॥६६॥
मग न कळत गोरक्षनाथ । झोळी सद्गुरुची विलोकित । तंव सुवर्णविटा देखिल्या बहुत । आश्चर्य करी मानसीं ॥६७॥
अनेक साधने धनार्थ । धनार्था न जोडे परमार्थ । धनामागे होती अनर्थ । नृप तस्कर अग्नि पैं ॥६८॥
वित्तास्तव होती आघात । वित्तास्तव देहासी घात । वित्त पातकांचा संघात । वित्तें भ्रांत होताती ॥६९॥
द्रव्य साधिती दीर्घ उपायें । द्रव्यास्तव अनेक अपाय । द्रव्यास्तव वेचिती देह । मित्रपुत्र धनइच्छें ॥१७०॥
जो धनदारेतें थुंकला । तोचि ब्रह्मी पैजा जिंकिला । परब्रह्मीचा अंकिला । सुखास लाभला तो एक ॥७१॥
जेणें कनककांता त्यागिली । त्यासीच मोक्षश्री माळ घालीई । जेणें वित्ताशा सोडिली । सुखी झाली निजवृत्ति ॥७२॥
धन दुःसह म्हणोन । विटा दिधल्या झुकारुन । उदकीं टाकिल्या संपूर्ण । झोळीत पाषाण घालीत ॥७३॥
पुढें जातां एक योजन । पुन्हा वदती श्रीगुरु वचन । येथें भय असे काय म्हणोन । वेळोवेळां पुसती पैं ॥७४॥
गोरक्ष म्हणे कैसें भय । भय त्यागोनि झाले निर्भय । आतां झाला त्रैलोक्य विजय । मागें भयत्याग पैं केला ॥७५॥
मग झोळी चाचपोन पाहती । तंव ते पाषाण लागती हाती । परम चाकटोन मत्स्येंद्र चित्तीं । क्रोधें बोलाती गोरक्षा ॥७६॥
गोरक्षा तूं परम अज्ञान । कैसें त्यागिलें त्वा सुवर्ण । सुवर्ण त्यागून पाषाण । वायांचि झोळी भरियेली ॥७७॥
सुवर्ण सुखातें कारण । सर्वाश्रय तें कांचन । कांचन नसतां भोगवी दैन्य । हेंही तूं काय नेणसी ॥७८॥
नाथद्वारी नाथसमुदाय । तो हा मग तूं करिसील काय । सिध्दभोजनाचा समुच्चय । कैसेनि होईल सांग पां ॥७९॥
ऐसें परिसोनि त्वरित । गोरक्ष ऋक्षपर्वत । वरी वळंघोन अकस्मात । लघवी करी तयावरी ॥१८०॥
झाला तो जांबुनदगिरिवर । कीं उदयाचळीम जेवीं दिनकर । कीं द्रोणाचळीं वल्लीसंभार । प्रदीपत दीप्ती डवरली ॥८१॥
सहस्त्रविद्युल्लतेचे पडिपाडें । एकदाच कोसळती जुबाडे । प्रकाशमय ते चहूंकडे । दीप्ति फुटे नभगर्भी ॥८२॥
मत्स्येंद्रा न माये आनंदउदधि । म्हणे गोरक्ष हा अष्टही सिध्दि । परिस चिंतामणि हा नवनिधि । कल्पतरु पैं माझा ॥८३॥
म्हणे गोरक्ष प्रत्यक्ष रमेश । कीं योगावतंस हा रमेश । जयाचिये पाषाण पादस्पर्शे । रत्नमणि पैं होती ॥८४॥
मग गोरक्षा देवोनि आलिंगन । तुझेनि सर्व कृतकल्याण । तुझे नामें न राहे दैन्य । ऐसें महिमान पैं तुझें ॥८५॥
गोरक्ष प्रार्थी विमळ वचनीं । मत्स्येंद्रचरणीं ठेवोनि मूर्ध्नि । स्वामी तव कृपेंकरोनी । अष्टसिध्दि तिष्ठती ॥८६॥
आदिनाथलीलामृततरुवर । सघन सफळ दाटला संभार । मुमुक्षुपक्षी भक्षी मधुर । कुतर्कवायस न पवती ॥८७॥
आदिनाथलीलाग्रंथ सुंदर । हें पंचवीस खणांचें मंदिर । कीम पंचविसावें तत्त्व मनोहर । पंचविसावा अध्याय हा ॥८८॥
आदिनाथलीलाग्रंथप्रौढी । भक्ति सरस्वतीची थडी । प्रत्यक्ष गोरक्षप्रतापमठी । वैराग्यगुढी उभविली ॥८९॥
हा पंचविसावा अध्याय । हें पंचविसावें परम तत्त्व । हें निजगुह्याद्गुह्य । जाणती योगी अनुभवी ॥१९०॥
श्रीमत् आदिनाथलीलाग्रंथ । ग्रंथ करविता भैरव समर्थ । आदिनाथ शरणागत । पंचविसावा वंदिला ॥१९१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP