श्रीनाथलीलामृत - अध्याय ७ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
नमो आदिनाथ आदिपुरुषा । मायाविपिनदहनहुताशा । सच्चिदानंद जगदीशा । जगन्मंगला सुखाब्धि ॥१॥
आदिबीज प्रणव ओंकारा । आदिनाथपंथतरुवरा । शाखागोरक्ष मत्स्येंद्रा । चर्पटचौरंगी सपत्री ॥२॥
मीनभर्तृहरिपुष्पसोज्वळ । कानीफजालंदरमोक्षफळ । निवृत्ति ज्ञानेश्वररसाळ । सुरंगसोपानमुक्त ते ॥३॥
धन्य गुरुभक्तिमहिमान । ज्यांचे सत्कीर्ती भरलें त्रिभुवन । अहर्निशीं गुरुसेवन अध्वर्य । अनन्यभावेकरुनि ॥५॥
गुरु आज्ञापिती अरुणी । केदारखंड आणी बांधोनी । मार्गी जातां फुटलें पाणी । शरीर बांधोनि पडियेला ॥६॥
बहुत दिन झाले म्हणून । गुरु करिती शिष्यशोधन । तों जळप्रवाह स्तब्ध करुन । शरीर रोधोनि पडियेला ॥७॥
गुरुंनी सावध करुनि तया । सत्वर आणिलें आपुल्या ठायां । म्हणे धन्य धन्य शिष्यवर्या । गुरुआज्ञेतें रक्षिसी ॥८॥
आतां उपमन्यु दुसरा शिष्य । तो करीतसे गोशुश्रूष । धर्मकाननी संतोष । धेनू चारी स्वईच्छे ॥९॥
गुरु वदती तया वचन । कैसी करिती क्षुधाहरण । येरु म्हणे मधुकरी अन्न । पिंड रक्षीं आपुला ॥१०॥
गुरु वदती निंद्यकर्म । गुरुवंचन हा अधर्म । आजिपासोनि धरी नेम । गुरुअर्पण धर्म करावा ॥११॥
मग अर्ध देऊनि गुरुनाथा । अर्धे शांतवी क्षुधाव्यथा । गुरुसेवेसी तत्त्वता । अवंचिकभिक्षा मज द्यावी ॥१२॥
मागुती दुसरी भिक्षा करी । न करी म्हणे ते दुःखकारी । पुन्हा वत्सा ऐसें न करी । द्विवार भिक्षा निंद्य हे ॥१३॥
मग पत्रपात्रीं गोक्षीर । अल्पग्रहणीं रक्षी शरीर । गुरु म्हणे उच्छिष्ट समग्र । हवना निंद्य होय तें ॥१४॥
अवश्य आज्ञा म्हणून । धेनुवत्स पीतां वदनी फेन । तोचि करीतसे ग्रहण । पुन्हा वदती शिष्यातें ॥१५॥
यावरी गुरु पाहती डोळां । तुष्टपुष्ट दोंदिल देखिला । म्हणती बाळा क्षुधानळा । शांतविसी केवीं पैं ॥१६॥
येरु वदे सत्यवचनी । वत्समुखीचें फेनपाणी । तेणें जठराग्नि शांतवूनी । शरीररक्षण करीतसें १७॥
गुरु म्हणे हें अनुचित । वत्सफेनी धेनु शापित । किती सांगूं बाळा तूंतें । ऐसें सर्वथा न करावें ॥१८॥
अवश्य म्हणून लागे चरणीं । पुन्हा क्षोभली क्षुधासर्पिणी । अर्कदुग्ध तिचे शांतवनी । आहारातें अर्पीत ॥१९॥
कटुक्षारअग्नीकरोन । त्यानें गेले उभयनयन । तों प्राप्त झाला अस्तमान । धेनु आणी स्वगृहीं ॥२०॥
अंधत्व प्राप्त उभयलोचनीं । म्हणोनि वत्सपुच्छकरग्रहणीं । गृही येतां प्राक्तनेंकरुनि । अकस्मात कूपी पडियेला ॥२१॥
सायंकाळ अस्तमानु । अद्याप गृही न येती धेनु । कीं उबग मानून उपमन्यु । आजि राहिला कळेना ॥२२॥
शिष्यशोधा ऋषि जाय । उपमन्या बाळा बोभाय । अरे वत्सा झालें काय । न येसी काय अझूनि ॥२३॥
तंव कूपांतूनि प्रतिध्वनि । वदता झाला शिष्य सद्गुणी । स्वामी पडिलों कूपव्यसनीं । अंधत्व प्राप्त मज झालें ॥२४॥
ऐकोनि सकृप सद्गद मनीं । नाभी अभयवरदपाणि । तूं स्मरण करीं देवाश्विनी । ते कृपा करिती तुजवरी ॥२५॥
स्मरणमात्रीं उभयदेव । येते झाले स्वयमेव । घृतपाचित अपूप अपूर्व । देते झाले दयाळु ॥२६॥
दिव्य दैदीप्य प्रदीप्त दीप्ति । अश्विनीदेव तया वदती । अपूप भक्षी तूं निश्चिती । नेत्र येती पैं तुझे ॥२७॥
येरु वदे न करीं ग्रहन । गुरुसी न करितां अर्पण । देव म्हणती धन्य धन्य । सच्छिष्य सत्य होसी तूं ॥२८॥
प्रसन्नवदनें वर देती । होई वेदशास्त्रविशारदस्फूर्ति । ऋध्दिसिध्दि तिष्ठती । द्वारप्रदेशीं अक्षयीं ॥२९॥
मग तया काढोनि कूपांतून । देव पावले अंतर्धान । मग गुरुतें करोनि नमन । पदांघ्री मिठी घालित ॥३०॥
संतोषोनि गुरु समर्थ । सप्रेम तया आंदोळित । म्हणें सर्वस्वें मी कृतार्थ । मनोरथ तुझे पुरती ॥३१॥
असो तिसरा शिष्य वेद । गुरुभजनी सावध । गुरुसेवेसी अभेद । ह्र्दयीं जाणे मनीचें ॥३२॥
न सांगतां कार्य करी । न मागतां वस्तु पुढें करी । न बोलतां ओळखे अंतरीं । सारासारतत्पर ॥३३॥
गुरुतें आवडे जो पदार्थ । तो तात्काळ सिध्द करीत । न रुचे त्यासी त्यागीत । मनोगत जाणे गुरुचें ॥३४॥
जरी प्राप्त झाला प्रसंग कठिण । तरी न करी मर्यादा उल्लंघन । तनमनधन गुरुअर्पण । सदैव ध्यान गुरुचें ॥३५॥
जेवीं अग्रापासोनि ऊंस । पूर्वपरत्वें अतिसुरस । कीं शुक्लपक्षीचा चंद्रदिवस । शशि पावे वृध्दीतें ॥३६॥
तैसा गुरुसेवेसी रत । उत्तरोत्तर प्रेमा बहुत । करणी करोनि लपवीत । विख्यात लौकिकी न मिरवी ॥३७॥
गुरुहुनि दुज देव । ऐसा न करी भेदभाव । गुरु इष्ट आराध्य सर्व । व्रत तप मंत्र गुरुनाम ॥३८॥
जे ऐसे मंडितचिन्ही । माझी मस्तक तयांच्या चरणीं । स्वशरीराच्या पादुका करोनी । पदीं राहीन तयांच्या ॥३९॥
गतकथा ध्यायीं निरुपण । चौरंगीनाथ महदाख्यान । उत्पत्ति आणि दीक्षाग्रहण । मत्स्येंद्रसेवन करीतसे ॥४०॥
द्वीपांतरीचें नृपनंदन । तेथें श्रीगोरक्ष जाऊन । उपदेशिलें न करवे गणन । त्यांचा यमदंड खंडिला ॥४१॥
तो इतिहास सविस्तर । सांगतां ग्रंथीं होईल प्रसर । केवळ मतिमंद मी पामर । महिमा न वदवे तयाचा ॥४२॥
मागध देशाचा समंध । जरासंध नगरसंनिध । गोरक्षगिरि प्रसिध्द । अद्यापि वरी बोलती ॥४३॥
त्या पर्वती गोरक्षनाथ । येते झाले अकस्मात । तो ब्रह्मराक्षस देखिला तेथ । क्रूर भयानक कृतघ्न ॥४४॥
कज्जलवर्ण शरीर सबळ । खदिरांगारासम नेत्रयुगुळ । विक्राळ दाढा जिव्हा सरळ । सेंदूर भाळी चर्चिला ॥४५॥
लोहार्गळ घेऊन करीं । धांविन्नला नाथावरी । ऊर्ध्वहस्त निशाचरी । वरचे वर राहिला ॥४६॥
भस्म टाकितां अणुमात्र । राक्षस झाला दिव्य शरीर । जेंवी अभ्र टाकोनि मित्र । दैदिप्यमान निघतसे ॥४७॥
नाथ पुसती त्यालागून । या तामसयोनीचें काय कारण । येरु वदे पूर्वकथन । श्रवण करावें स्वामी त्वां ॥४८॥
मी आनर्तदेशीचा नृपवर । नाम माझें चक्रधर । परम दुष्ट दुराचार । जारकर्मी रत सदा ॥४९॥
देशोदेशीं प्रेरी हेर । स्त्रिया आणवी अतिसुंदर । नवयौवन परमसकुमार । नित्यनूतन भोगीत ॥५०॥
नीचयातीत उत्तम कामिनी । ऐकतां आणावी बळात्कारेंकरुनि । ऐसा रतलों दुराचरणी । धर्माधर्म न पाहें ॥५१॥
कोणे एके अवसरीं । येता झालों वनविहारी । तों लावण्यलतिका सुंदरी । भार्या देखिली ऋषीची ॥५२॥
कुरंगनयनी लावण्यखाणी । हरिमध्य ते गजगमनी । भुजंगप्राय सलंबवेणी । ऋषिआश्रमीं देखिली ॥५३॥
कोणी गृही  नसतां जाण । बळात्कारें करी मैथुन । तये संधी द्विज येऊन । द्वारप्रदेशीं थोकला ॥५४॥
परमभयें करी गमन । तापसी वदे क्रोधेकरुन । दुष्टा केलें दुराचरण । आचरतां केवीं जासी तूं ॥५५॥
ऋषिपत्नी भयेंकरुन । जिह्या आसडोन त्यागी प्राण । क्षनीक विषय अवलंबून । परिणामीं दुःख दुस्तर ॥५६॥
सिंहवदनीं घालोनि हात । कैसा वांचेल तो निवांत । कीं जाणोनि विष प्राशित । मृत्यु तयातें न सोडी ॥५७॥
तूं चांडाळ दुष्ट दुर्जन । घेईं माझें शापवचन । भयानक राक्षस होऊन । वनीं फिरसी कृतघ्ना ॥५८॥
सद्गद होऊनि भयाभीत । प्रार्थून उःशापातें सांगत । ब्रह्मह्र्दय कोमळ बहुत । नवनीतापरी द्र्वतसे ॥५९॥
अरे तूं नृपचूडामणि । आचरसी निशाचर आचरणीं । तरी तीच निशाचरयोनि । प्राप्त होईल तुजलागी ॥६०॥
परि गोरक्ष फिरतां द्वीपांतरी । येथें येती ते अवसरी । तुज उध्दरितील दर्शनमात्रीं । ऐसा उःशाप मज होता ॥६१॥
तो प्राप्त झाला आजिचा दिवस । सायास न करितां अनायास । अभ्युदय उदय उत्कर्ष । लाभवेळा दैवाची ॥६२॥
अनंत जन्मीचें सुकृत । तरीच नाथदर्शन मज प्राप्त । येणें पुरले सर्वार्थ । मन इच्छित जें होतें ॥६३॥
लोह परिसा स्पर्श करोन । तात्काळ होतसे कांचन । कीं सुरतरुचे छाये बैसोन । इच्छित फळ लाहिजे ॥६४॥
कीं अमृताचिये प्रवाही । बुडतां मृत्यु सर्वथा नाहीं । की स्वानंद सुखाचें डोही । दुःखवार्ता नसेचि ॥६५॥
हेचि विनवी स्वमीप्रति । आतां नसावी पुनरावृत्ति । अखंड निमग्न आत्मस्थिति । सदा सर्वदा मज असो ॥६६॥
नाथ वदते झाले तयासी । तूं कोण स्थळीं वास करिसी । वैकुंठीं किंवा कैलासी । आवडे स्थळ तुज देतों ॥६७॥
येरु वदे सत्यवाचा । वियोग नसावा गुरुपायांचा । पिंड आणि ब्रह्मांडीचा । मार्ग मज दाविजे ॥६८॥
निकें वदोन तयातें । देते झाले उःशापातें । सकृत होऊन दीक्षेतें । अर्पिते झाले दयाळू ॥६९॥
मस्तकी ठेवून अभयकर । जाई स्वईच्छें करी व्यवहार । त्रिलोकीची तीर्थे समग्र । करोनि येई पुढारी ॥७०॥
याव्री तेचि स्थळी । मत्स्येंद्र पातले उतावेळी । गोरक्ष मौळी चरणकमळीं । ठेविते झाले संतोषें ॥७१॥
गोरक्षासी ते क्षणीं । अस्थीची काढोनि स्मरणी । म्हणती महाफणीचे मणि । अनर्ध्य मोलाआगळे ॥७२॥
आणिक परिस चिंतामणि । गजमुक्तें गिरिमस्तकमणि । आणिले हे तुजलागुनी । भूषणीं मिरवी आपुले ॥७३॥
गोरक्ष वदती कर जोडून । म्हणे कासया आणिले हे पाषाण । सबाह्य असती जडत्वेंकरुन । काय कारण पैं यांचें ॥७४॥
ऐसें वदोनिया जाण । झुगारिली समग्र रत्नें । चिंतामणि परिसादिकरुन । भिरकाविलें सर्वही ॥७५॥
जेवीं सकृप जानकीवर । मारुतीस देत रत्नहार । तो दर्शनी फोडी सत्वर । नसे रघुवीर यामाजीं ॥७६॥
तैसेंच करी गोरक्षमुनि । म्हणे काय संग्रह हा करोनि । मग मत्स्येंद्र वद्ती क्रोधेकरुनि । मुर्खा नेणसी रत्नांतें ॥७७॥
जें असाध्य न मिळे साधनें । दुर्लभ दुर्गम वस्तु जाण । त्या प्राप्त प्राक्तनेंकरुन । धिक्कारीसी नेणतां ॥७८॥
गोरक्ष वदती वचन । या परिसाचे काय प्रयोजन । आणि चिंतामणीची काय खूण । रत्नें उपयोग कोणता ॥७९॥
मत्स्येंद्र म्हणती यत्नेंकरुन । रत्नें करावी बहु जतन । प्राप्त झालिया समय कठिण । याचा उपयोग पडतसे ॥८०॥
चिंतामणि चिंतित पुरवी । परिस लोहाचें सुवर्ण करवी । रत्नमणि अमौल्य ऊर्वी । नृप गौरविती ययोगें ॥८१॥
मत्स्येंद्रकृपें चिंतित पूर्ण । समग्र मनोरथ सफळ जाण । स्वयें परिसा गुरुदास्येंकरुन । प्राक्तन दग्ध त्वां केलें ॥८२॥
मत्स्येंद्र अभयवरदहस्त । साम्राज्य करी अखंडित । सर्व नृपति होऊन भृत्य । मोक्षदीक्षा इच्छिती ॥८३॥
मत्स्येंद्र वदती एक गोष्टी । द्रव्याधीन सर्व सृष्टि । द्रव्य नसतां होती कष्टी । अति हिंपुटी बापुडे क॥८४॥
द्रव्यास्तव जगत वश्य । द्रव्यास्तव करिती दास्य । द्रव्य सर्वांचे उपास्य । द्र्व्यउपहास करिसी तूं ॥८५॥
गोरक्षें ऐकोन वचन । जळें गंडूष थुंकितां जाण । सर्वांगपर्वत सुवर्ण । केला महिमान जयाचा ॥८६॥
अनेक रत्नांची उघडूनि खाण । गिरिदरींत प्रकाशघन । चिंतामणीपरिसेकरुन । अरण्य भरिले सर्वही ॥८७॥
मत्स्येंद्र अवलोकितां दृष्टी । हर्ष वाटला बहु पोटीं । वोसंडोनि कंठी मिठी । गोरक्षाचे घालीत ॥८८॥
अद्यापि त्या पर्वतापासोन । प्रसवतसे दिव्यसुवर्ण । गोरक्षगिरि अभिधान । पुराणप्रसिध्द जाणती ॥८९॥
तेथून निघाले लागवेगें । मत्स्येंद्र जाती सवेगें । गोरक्षही असती संगें । पश्चिम दिशा क्रमिताती ॥९०॥
पुढें जातां दिव्यवन । निरखिते झाले रम्यस्थान । जेवीं शक्राचें नंदनवन । वृक्ष सघन डौरले ॥९१॥
कावेरीतट वाळवंट । घाट पाटांगणें अति सुभट । जळसंघाट प्रवाह पाट । स्थळ नेटकें लक्षिलें ॥९२॥
गोरक्षातें आज्ञापिती । आम्ही जातसों भिक्षेप्रती । तुवां राहोन निश्चिती । आस्न करी उत्तम ॥९३॥
अवश्य आज्ञा प्रमाण । गोरक्ष निर्मिती मृत्तिकासन । गोमयकर्दमलेपन । निर्माण केलें स्वहस्तें ॥९४॥
सवेंच गेले नगरांत । तो अपराण्हसमय प्राप्त । कोणी न देती भिक्षेतें । उन्मत्त विषयी मदांध ॥९५॥
फिरता श्रमलें मत्स्येंद्र । भिक्षा न अर्पिती अणुमात्र । फिरोन आले समग्र नगर । त्रासयुक्त होवोनि ॥९६॥
विषाद वाटोनि हांवेभर । धनाढय पाहोनियां नर । त्यासी म्हणती ब्रह्मसाक्षात्कार । सत्वर करवितों पैं आतां ॥९७॥
वरी पिष्ट द्यावें सवाशेर । त्वरित पाहा चमत्कार । ते हेळसोनि वद्ती उत्तर । पिष्टावरी ब्रह्म कैचें ॥९८॥
ब्रह्म न फिरे दारोदारीं । ब्रह्म न मिळे हाटबाजारी । ब्रह्म कैचें घरोघरीं । न मिळे व्यापारी विक्रीतें ॥९९॥
जयासी ब्रह्मसाक्षात्कार । तो काय फिरे घरोघर । तया अवश्य काय दुर्भर । नसे प्रतिकूळ अन्नाचें ॥१००॥
अन्नासाठीं नाना प्रकार । खटाटोपादि भयंकर । उदरनिमित्त बहुवेषधर । सोंगेंढोंगें करिताती ॥१॥
काषायवस्त्र परिधान । एक नरकपाळ करी ग्रहण । एक करिती केशलुंचन । एक नास्तिक स्थापिती ॥२॥
एक जटाजूट भस्म चर्चिती । एक नग्न दिगंबर विचरती । एक कवित्व पांडित्य व्युत्पत्ति । उदरभरणाकारणें ॥३॥
ऐसे नाना मतांचे जन । नेणती मत्स्येंद्र महिमान । गृही प्राप्त झालें निधान । प्राक्तन अंधत्व अवलंबिती ॥४॥
कामधेनु आली अंगणी । तीतें धिक्कारी वोढाळ म्हणोनी । परिस गोफणिला गोफणीं । चिंतामणी झुगारिले ॥५॥
ऐसे अज्ञानजन प्राकृत । नाथमहिमा नेणत । पडोनियां भ्रांत । आत्मस्वार्था दुरावले ॥६॥
सत्य वदतां मानिती असत्य । असत्यावरी अगाध प्रीत । जेवीं पयघृतातें न पुसत । मद्य प्रार्थूनि स्वीकारिती ॥७॥
असो ऐशापरी समग्र नगर । फिरतां न मिळे पिष्ट अणुमात्र । पूर्वस्थळी येतां सत्वर । वृत्तांत गोरक्षा सांगत ॥८॥
परिसोत वदती गोरक्षनाथ । अजारक्षकां काय वेदांत । वृषभापुढें सुगंध अर्पित । व्यर्थ होय ज्यापरी ॥९॥
कीं क्लीबापुढें दिव्य कामिनी । कीं दिवाभीता वासरमणि । कीं चंद्रोदय वायसालागोनी । काय उपयोग तयासी ॥११०॥
रोगियां कडू दिव्यौषधि । निर्दैवां केवीं साधे निधि । दुर्जना न होय सद्बुध्दि । प्रारब्ध निर्मित तैसाचि ॥११॥
विषयीं जना न रुचे ज्ञान । जेवीं प्रेतहस्तीं देतां रत्न । की दैवापुढें न चले यत्न । केवीं चाले धूर्ताचा ॥१२॥
यावरी गोरक्ष योगमायेतें । आज्ञापिती जळअग्नि करी गुप्त । एकचि हाहाःकार झाला प्राप्त । तृषें व्याप्त जन होती ॥१३॥
कोणी म्हणती देवताकोप । कोणी म्हणती प्रजेचें पाप । कीं कोणी अतिथीचा संताप । भूपें शोध न केला ॥१४॥
जीवन सर्वांचे जीवन । गतप्राण होती जन । प्राणिमात्र होऊन दीन । तृषा प्राप्त जाहलीई ॥१५॥
जेवीं जीवनावीण मीन । तळमळीत पुलिन । तेवीं प्रजेचे सलिलावाचोन । प्राण जाऊं पाहती ॥१६॥
प्रबुध्द्जनीं तर्क केला । कोणी ब्रह्मनिष्ठ क्षोभला । भिक्षा न मिळतां रिक्त गेला । म्हणोनि वोढवला प्रळय हा ॥१७॥
मायालाघवी गोरक्षनाथ । एक गुजडीचें सूत्र श्वेत । ऊर्ध्व आकाशीं भिरकावीत । अग्नीं बैसती आसनीं ॥१८॥
पौरजनांच्या असंख्य थाटी । पाहती चमत्कार सर्व दृष्टीम नृपश्रवणीं उठाउठी । वार्ता गेली सत्वर ॥१९॥
ऐकोन धांवे नृपवर । करी वारंवार नमस्कार । प्रदक्षिणा करोनि त्रिवार । बध्दहस्तें तिष्ठत ॥१२०॥
सुवर्णमुद्रा असंख्यवरी । पत्रीं पुष्पीं फळसंभारीं । धांवोनियां नरनारी । अर्पिती तेव्हां सर्वही ॥२१॥
कोणी पय घृत शर्करा । पात्रें अर्पिती एकसरा । पूजा करिती षोडशोपचारा । अर्ध्यपाद्यादिकरुनि ॥२२॥
धूप दीप नीरांजन । करार्तिका करोद्वर्तन । श्रीफळें पूगीफळें अर्पण । करिती सर्वत्र सद्भावें ॥२३॥
एक अर्पिते झाले धान्य । एक वस्त्रें भूषणें आमान्न । एक होऊनि अनन्यशरण । स्तुतिस्तोत्रें स्तविताती ॥२४॥
प्रार्थना करी नगरनाथ । चातकें जेवीं मेघ इच्छित । तेवीं जळेंविणें प्राणहत । प्राणदान द्या आम्हांसी ॥२५॥
ऐकोनि नाथ झाले सकृप । तात्काळ भरिले तडागकूप । आनंदे निर्भर झाला भूप । राजा विचारी मनांत ॥२६॥
राजा विवेक करी मनांत । धन्य योगियांचें सामर्थ्य । आतां शरण जाऊन यातें । स्वहित आपुलें संपादूं ॥२७॥
ऐसें वदतां झाली रजनी । तंव बोलते झाले गोरक्षमुनि । सर्वही जावोनियां स्वसदनीं । यथासुखें असावें ॥२८॥
आज्ञा वंदोन सर्व जन । पावते झाले सदन । मग गोरक्ष येऊन आपण । धरी चरण गुरुचे ॥२९॥
भला रे भला शिष्यराया । जनां दाविली योगमाया । तुझा प्रताप न ये आया । ब्रह्मादिकां नेणवे ॥१३०॥
ऐकोनि मत्स्येंद्रमुनीचें बोल । गोरक्ष वदे गुरुकृपेचें बळ । जी कृतनिश्चय कळिकाळ । कृपा अढळ स्वामीची ॥३१॥
मत्स्येंद्र वदती भिक्षेसाठीं । मी झालों रे परमहिंपुटी । ब्रह्म दृश्य उठाउठी । तरी सत्य कोणी न मानी ॥३२॥
गोरक्ष वदती हेंचि कारण । क्रोध प्राप्त मजलागून । क्षणमात्रें भस्म करीण । हें त्रिभुवन गुरुकृपें ॥३३॥
नरककुंडाचे कीटक । तयां कासया द्रव्य सुगंधिक । दुर्गंधीनें माखलें देख । सुगंध सुख काय तया ॥३४॥
असो नृप येऊन ते वेळां । प्रार्थिता झाला दीनदयाळा । उपदेशूनि तये वेळां । सनाथ करी गुरुनाथा ॥३५॥
मृगजळवत्‍ राज्यादि व्यवहार । तृष्णानदी भरली अपार । उभयतट तुंबळ मायापूर । आवर्त कुवर्त दुस्तर हे ॥३६॥
भवावर्तीं गुंतलों थोर । तरी वेगीं होई कर्णधार । सत्वर उतरोनि मजपार । करोनि ब्रीद संरक्षी ॥३७॥
शरणागताचा अभिमान । म्हणोनि नाम पतितोध्दारण । तरी तें ब्रीद साच करोन । उध्दरावें मज आतां ॥३८॥
आलों चौर्‍यांशीं लक्ष योनी फिरोन । कांही न केलें साधन । आतां मज करीं पावन । दीनबंधु गुरुराया ॥३९॥
वृथैव देह गेह धन । वृथैव वर्णाश्रम अभिमान । माझे माझें म्हणून । मीपणेंचि बुडविलें ॥१४०॥
जग विषयाचा कर्दम । निवडूं जाणती महाउत्तम । जैसा पयतोय एक भ्रम । सद्गुरु हंस निवडिती ॥४१॥
तुम्ही परात्पर परमहंस । बुध्दमुक्तांचा आहारग्रास । उड्डाण तुमचें महदाकाश । मानसकर्ते जे ॥४२॥
अहंब्रह्माचा पडोनि भ्रंश । अहंदेह मी म्हणतसें । अविद्याफळोल्हासें । अविनाशपद चुकलों ॥४३॥
अज्ञनबुध्दीं अंध होऊन । चुकलें माझें निज ठेवणें । आतां लेववी ज्ञानांजन । निधान जोडे तें करी ॥४४॥
त्रुटींत मात्र लागे समाधी । ऐसें करावें कृपानिधि । तत्काळ निरसे देहबुध्दि । बुध्दिबोध बांधावा ॥४५॥
ऐकोनि जगद्गुरु बोलत । राज्य त्यागून योग किमर्थ । वायां कासया धरिसी स्वार्थ । दुर्धर पंध हा होय ॥४६॥
हटी तटी वज्रालंगोटी । द्वारोद्वारीं भिक्षेसाठीं । भस्मोध्दूलित जटाजूटी । फिरणें तुज अयोग्य ॥४७॥
राज्यास्तव करिती तप । राज्यास्तव व्रतसाक्षेप । राज्यास्तव करिती जप । त्या प्राप्त राज्यत्यागीं ॥४८॥
तरी स्वामी वदती सर्व निकें । तरी राज्यांतीं प्राप्त नरक । तरी तें क्षनीक स्वप्नसुख । असिपत्रादि चुकेना ॥४९॥
राज्यांत घडे तरी साधन । तरी कां त्यागितां पुरंजन । सेवोनियां निरंजन । योगसाधन कां केलें ॥१५०॥
यावरी वदती श्रीमत्स्येंद्र । तूं होसी नृपाति भाळचंद्र । सिंदुरपुरीचा राजेंद्र । किंमर्थ ऐश्वर्य त्यागिसी ॥५१॥
निश्चय देखोनि तदोत्तर । मस्तकीं ठेविला अभयकर । उपदेशिला राजेश्वर । योगमार्ग दाविला ॥५२॥
ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मरंध्रीं । ते परेहून परते अवधारी । खेचरीमुद्रेतें निर्धारी । स्वरुप पाहे आपुलें ॥५३॥
चिदाब्धीमध्यें रम्य बेट । स्थूळ त्यागूनि सूक्ष्म वाट । गुरुकृपेची फुटतां पाहाट । लखलखाट चहूंकडे ॥५४॥
सर्वस्वाचा संकल्प । होऊन सद्गद पश्चात्ताप । अखंडध्वनि अजपाजप । सोहंस्मरणीं रंगला ॥५५॥
गुरुदास्यातें विनटला । नाथदीक्षे स्वयें नटला । शैली श्रृंगी भस्म मेखला । केला उच्चार अलक्ष ॥५६॥
खेचरी मुद्रा वज्रासन । मूळबंध कुंभकावलंबन । काकीमुखातें भेदून । ब्रह्मरंध्री स्थिरावे ॥५७॥
समाधि साध्य झाली पाठीम । मत्स्येंद्रपदीं घातली मिठी । गुरु वदती उठीं उठीं । कृपादृष्टीं पाहती ॥५८॥
यावरी साधून समाधि । प्राप्त झाली योगसिध्दि । नष्ट झाली आधिव्याधि । अक्षयपदीं समरस ॥५९॥
सत्यव्रत नामें पुत्र । तया अर्पूनि भद्रछत्र । नगरनागरिक सर्वत्र । पाहों तेथें पातले ॥१६०॥
ऐसा साधूनि योगोपदेश । सद्गुरुतें करोनि आदेश । तीर्था जाय देशविदेश । आशापाश त्यागुनी ॥६१॥
सप्तम अध्याय हा सुरस जाणा । पारायणीं घडे प्रदक्षिणा । सप्तद्वीपींचीं तीर्थे मार्जना । अगाध पुण्य श्रोतयां ॥६२॥
सप्तम अध्याय करिती श्रवण । तयां सप्तसमुद्रीचें घडे स्नान । आणि सप्तऋषींचें घडे दर्शन । फळ लाभे सुकृतें ॥६३॥
श्रीमत्‍ आदिनाथलीला ग्रंथ । सिध्दसिध्दांतमथितार्थ । भैरवचरणीं आदिनाथ । सप्तमाध्यायीं वंदिला ॥१६४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP