श्रीनाथलीलामृत - अध्याय १५ वा
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
श्रीगणेशाय नमः॥
श्री नमो जी आदिनाथ विश्वंभरा । लीलाविग्रही मृडानीवरा । मायविपिन दहनवैश्वानरा । कर्पूरगौरा विश्वाद्या ॥१॥
तूं द्विजजनह्रदयमांदुसा । योगीजनमानसहंसा । परब्रह्मव्योमकेशा । जगद्वंद्या जगद्गुरु ॥२॥
पडिला अज्ञानतिमिरांधार । प्रबोधबोधें तूं भास्कर । सद्गुरुरुपें अंशवतार । होऊनि जागवी जगातें ॥३॥
झाली अविद्येची रजनी । निद्रिस्त जागृत न होती कोणी । जे जागृत तयांलागोनि । तस्करभय न पवती ॥४॥
निशी प्रवर्तली घोर । कामक्रोध हिंडती तस्कर । यांनी नागविलें अवघें नगर । श्वानें भुंकतां नेणती ॥५॥
गाढ मूढ निःमुमूर्ष । त्यांतही भासती स्वप्नभास । पुत्रदाराविषयविलास । सक्त होवोनि राहिले ॥६॥
परधनपरदाराभिलाष । सदा वाहती दृढ हव्यास । परि मृत्यु वोढिल काळपाश । हेंही कळोनि नेणती ॥७॥
रम्यसदनीं होती निमग्न । परि केव्हां लागेल गृहा अन्न । जागृत झालिया कूपखनन । व्यर्थ काय करोनि ॥८॥
वासना मनीषा महतजारिणी । स्वपती त्यागून व्यभिचारिणी । जरासी रमती अनुदिनी । निश्चय न राहे एकासी ॥९॥
साहा चार अष्टादश । जागृत करिती निदसुर्यास । परि निद्रिस्ता न उपजे त्रास । बोधवाद्य ऐकोनी ॥१०॥
एक त्रितापें तापले । एक तापत्रयें अहळले । एक ते चिंतेनें जाळिले । भस्में केले जिवंत ॥११॥
सक्त त्यां केवीं घडे उपरति । ते जन्ममृत्युप्रवाही पडती । प्राप्तप्राक्तन अधोगती । सत्संगति त्यां कैची ॥१२॥
संसारी घडे जरी साधन । तें कां सेविती निरंजनवन । रोग जाय शर्करेंकरुन । मग निंबसेवन कासया ॥१३॥
प्रपंची परमार्थ घडेल । परि मनाच्या वोढी परमचंचळ । कीं स्यंदनीं आरोढोनि निश्चळ । केवीं राहे निवांत ॥१४॥
प्रपंच हा दुःखमूळ । रात्रंदिवस जीवा तळमळ । सदा कंठी वाहे हळहळ । कदा तळमळ न सोडी ॥१५॥
मिष्टान्न आवडे रसने । वासना इच्छी सुवासवसनें । सालंकारी रत्नभूषणें । ललनांदोलन विषयादि ॥१६॥
आतां परिसा कथा सुरस । रसिकशृंगारादि नवरस । भर्तृहरिआध्यान सुधारस । श्रवणपात्रीं घेईजे ॥१७॥
गताध्यायाचे संगतीं । विक्रमें प्रसन्न केली शक्ति । राजपुत्र उठवोनि निश्चिती । स्वराज्यासी स्थापिला ॥१८॥
तेथूनि आपले स्वचमूतें । पाठवी नृप अवंतीतें । एकटा एकांत उत्तरपंथें । परोपकारी जातसे ॥१९॥
परदुःखाची वेदना । तेचि साधु जाणती खुणा । इहीं चिन्हीं विक्रम जाणा । परदुःखभंजनीं सज्जन तो ॥२०॥
अपंग अनाथ दीन केवळ । पाहून जयासी कळवळ । तो मूर्तिमंत जाश्वनील । नररुपेंसी अवतरे ॥२१॥
तो क्षमाशांतीचा अचळ अढळ । कृतोपकाराचा ध्रुव निश्वळ । सदयह्र्दय उदधि केवळ । तो विक्रम नृपाळ एक पैं ॥२२॥
परोपकारार्थ शोधी अवनी । राजा हिंडे वनोपवनीं । ऐसा दुजा भूमंडळी । भूप कुंभिनी न देखे ॥२३॥
गिरिगुहा सुस्थळ स्थानें । शोधून घेत सिध्ददर्शनें । पाहो जाता अटव्यवनें । निःशंकमनें वीर तो ॥२४॥
तो माध्यान्हीं पातला वासरमणी । रायासी झोंबली तृषासर्पिणी । तंव अकस्मात देखिलें नयनीं । सरोवर विस्तीर्ण एक पै ॥२५॥
कमळें माजीं रक्त पीत श्याम सुनीळ । एक चतुर्दळ एक षड्दळ । एक द्वादशदळ आणि द्विदळ । सहस्त्रदळ तेजस्वी ॥२६॥
तंव तडागातटी पर्णकुटी । तेथें देखिला तपस्वी हटी । राजा जाऊनि उठाउठीं । दर्शन घेत तयाचें ॥२७॥
साष्टांग करोनि नमन । बध्दहस्तें विनवी वचन । कायसें निग्रह अनुष्ठान । कारण काय कळावें ॥२८॥
धनापेक्षा कीं राज्यापेक्षा । पुत्रापेक्षा कीं कांतापेक्षा । कन्यापेक्षा विद्यापेक्षा । निरपेक्ष कीं सापेक्ष ॥२९॥
तपस्वी वदे ऐक राया । व्यर्थ पुससी मज कासया । विरुपाक्ष प्रत्यक्ष व्हावया । घोर तप आचरलों ॥३०॥
द्वादश्यत्रय संवत्सर । अनुष्ठान केलें अतिउग्र । तरी न होय साक्षात्कार । भविष्य जाणे विधाता ॥३१॥
प्रथममासीं निराहार । द्वितीयांत करी फलाहार । तृतीयमासीं गलितपत्र । वायुआहार पैं चौथा ॥३२॥
पंचमांत करी धूम्रपान । षष्ठमांत पंचाग्निसाधन । सप्तममासीं शीतोष्ण । समान पाहे देहासी ॥३३॥
विक्रम विस्मित होऊनि चित्तीं । परम दीनदयाळ पशुपति । भोळा उदार चक्रवर्ति । परि कां न भेटे द्विजासी ॥३४॥
ऐसें ऐकोन वचन । नृप करी निग्रह अनुष्ठान । तंव प्रसन्न झाला उमारमण । म्हणे वर माग इच्छित ॥३५॥
कर्पूरगौर गौरीरमण । वदे कां करिसी तीव्र अनुष्ठान । येरु वदे कर जोडून । हा ब्राह्मण श्रम पावे ॥३६॥
राव म्हणे देई भेटी । शिव म्हणे कां घालिसी संकटी । राव वदे धूर्जटी । परम कष्ट द्विज पावे ॥३७॥
अवश्य म्हणे कैलासनाथ । विप्रास तेव्हा दर्शन देत । तपस्वी म्हणे सकळ आर्त । पूर्ण केलें नृपवरें ॥३८॥
नीलग्रीवआज्ञावचन । सत्वर जावें त्वां येथून । प्रपंच करीं होईल नंदन । वेदपारायण सुपुत्र ॥३९॥
शास्त्रविशारद पितृभक्त । ब्रह्मवेत्ता परमविरक्त । ऐसें वदोनि उमाकांत । गुप्त होत ते क्षणी ॥४०॥
नृपें पत्र देऊन द्विजासी । पाठवीत अवंतीसी । अग्रहार देऊनियां विप्रासी । अवंतीसी ठेविलें ॥४१॥
श्रोते आशंका घेती मनीं । कां द्विजास न भेटे शूळपाणि । आणि विक्रमाचे योगेंकरुनी । दर्शन दिल्हें तत्काळ ॥४२॥
विक्रम वीरभद्रावतार । करावया जनां परोपकार । तो शिवअंश निर्धार । विचरतसे भूमंडळीं ॥४३॥
तपस्वी होऊन कृतार्थ । विक्रमाचें यश वर्णित । धन्य धन्य तूं नृपनाथ । औदार्य कर्णासारिखें ॥४४॥
धन्य ते सुजन जननीउदरीं । परदुःखभंजन परोपकारी । इहपरकीर्तिध्वज निर्धारी । उभविला तेणें अक्षयीं ॥४५॥
विक्रम विप्रचरणीं ठेवी मूर्ध्नि । जाता झाला तये क्षणीं । सवेंचि द्विज निघे तेथुनी । अवंतीसी पातला ॥४६॥
यापरी विक्रमाचीं चरित्रें अद्भुत । वर्णितां वाढे विस्तीर्ण ग्रंथ । यालागीं निवेदिलें ध्वनित । श्रोतयांतें यथामति ॥४७॥
जे सप्तपुरियांत महाक्षेत्र । क्षिप्रा वाहे अतिपवित्र । ज्योतिर्लिंग महाकाळ त्रिनेत्र । स्मरतां त्रिताप हरपती ॥४८॥
असो अवंतीस आला तो ब्राह्मण । सारुन स्नानसंध्यादेवतार्चन । घेतां महाकालेश्वरदर्शन । जननमरणनाशक जो ॥४९॥
सवेंच जाय राजसदनीं । सुभटवीर्यास पत्र देउनी । तेणे पत्रिका मस्तकीं वंदोनी । विप्रा स्वागत पुसिलें ॥५०॥
मग बांधून दिधलें तया सदन । द्विजा देत धनधान्यवसन । भावें करोनि साष्टांगनमन । आशीर्वाद घेतसे ॥५१॥
असो भर्तृहरि राजाविषयीं कथन । स्त्रीसक्त झाला तिज आधीन । अंतःपुरीं राहे अनुदिन । तिचे छंदे वर्ततसे ॥५२॥
चंद्रकांताचए उच्च मंदिर । वरी काश्मीराचें दामोदर । सुवर्णकलश मनोहर । नक्षत्रप्राय दिसती ॥५३॥
वैरागरीमाजीं रत्न सुमन । कीळा स्फुटकलिचंद्रकिरण । पाचूंच्या वेली रेखिल्या सघन । हेमकोंदणीं मिरवल्या ॥५४॥
हरितवर्ण वृक्षसपल्लव । मणिक्यपुष्पें वरी अभिनव । पुष्कराचीं फळें अपूर्व । रावे उडती पाचूचे ॥५५॥
नीळमयूरें शब्द करिती । हरियांचे हंस उड्डाण घेती । कोकिळा नीळवर्णी कूजती । बक डोलती मुक्तांचे ॥५६॥
खणोखणीं पुतळी नाचती । एक पिकस्वरें आलापिती । कोणी आलिया नमस्कार करिती । अभ्युत्थानें देउनी ॥५७॥
ऐसें तें सुरम्य सदन । दुजें भासे शक्रभुवन । तेंचि रायाचें क्रीडास्थान । अनुपम्य स्थळ पैं ॥५८॥
रत्नमंडपीं शय्या अरळ । सुमनसुवास अहळबहळ । सुगंधोदकाचें सुवर्णमराळ । सुरताश्रमीं सिंचिती ॥५९॥
लावण्यपुतळया लघुचीरें । वारा घालिती एकसरें । एक करीं घेऊन पुष्पहार । गळां घालिती नृपाच्या ॥६०॥
एक तांबूल स्वकरें देती । एक पिकपात्र पुढें करिती । एक नेत्रसंकेतें खुणाविती । रायाप्रति पुतळया ॥६१॥
एक रत्नदीपिका घेऊन करीं । रायाच्या चाल्ती पुढारी । एकांतस्थळीं अंतःपुरीं । पुतळयांवीण नसेचि ॥६२॥
असो एकांती कांतकामिनी । क्रीडाविलासी सक्त मैथुनीं । अन्योन्यसंवाद मधुरवचनीं । प्रियप्रीतीं प्रियेंसीं ॥६३॥
जेवीं गळीं मत्स्य गुंतला । तेवीं नृप सर्वस्वें वश्य झाला । कीं सुगंधा फणी भुलला । चंदनीं वेष्टिला ज्यापरी ॥६४॥
फळ तांबूल उदकपान । कदा न करी कांतेवीण । अशनविहारादि शयन । न करी तिजवीण सर्वथा ॥६५॥
वासना पोसी विषयामिष । गुंतले मनमीन नृपमानस । संपूर्ण आकर्षिलें इंद्रियांस । भुली पडली मोहाची ॥६६॥
अनेक विलास क्रीडा करीत । परि कामकृशान नव्हे शांत । स्त्रिनेत्रकटाक्षघृतसिंचित । तेणे प्रज्वलित सर्वदा ॥६७॥
यावरी श्रोतयांचा प्रश्नादर । शिववरदें तो द्विजवर । पुढें कैसा तो विस्तार । सविस्तर निवेदी ॥६८॥
जी जी आज्ञा वंदून वक्ता । तरी अवधारा तेचि कथा । तुमची आज्ञा वंदूनि माथा । आदरेंकरोनि परिसावें ॥६९॥
तुम्ही केला उत्तम प्रश्न । आतां तेंचि कथेचें कारण । जेवीं इष्टगृहीचें आमंत्रण । परमहर्ष ज्यापरी ॥७०॥
देवशर्मा नामें द्विजवर । सुभटवीर्याश्रय निरंतर । तयास झाला एक कुमर । सुपुत्र पुत्र पवित्र जो ॥७१॥
झाला वेदशास्त्रपरायण । स्वसंवेत्ता परमसज्ञान । नित्यनैमित्तिक संपादून । श्रौतस्मार्ती नेटका ॥७२॥
सुमंत नामक परमसुशीळ । अति सज्ञान नैष्ठिक विमळ । चतुर्दशविद्या करतळामळ । भूतमात्रीं अद्वेष्टा ॥७३॥
स्नान संध्या जप हवन । स्वाध्याय आणि देवतार्चन । वैश्वदेव अतिथि पूजन । या षट्कर्मी रत सदा ॥७४॥
कोणे एके दिवसीं जाण । टकूं जातां जंव बलिहरण । म्हणे येथें अतिथि कोण । तों चर्पटी उभे दिसती ॥७५॥
अलक्ष उच्चार करिती तेथें । पाहून हर्ष झाला द्विजातें । प्रार्थूनि आणिले स्वगृहातें । षोडशोपचारें पूजितसे ॥७६॥
नाथें भिक्षा करुन ग्रहण । जाते झाले तंव तेथून । द्विजें करोनियां नमन । विनत होऊनि विनवीत ॥७७॥
म्हणे स्वामी आर्तचित्तीं । सदेह किंवा मानसगतीं । गमन सत्यलोकाप्रति । प्रत्यहीं व्हावें पैं माझें ॥७८॥
मग वदती चर्पटीनाथ । बापा कली दुर्घट झाला प्राप्त । केवी घडे हें अघटित । बाळभावें तूं वदसी ॥७९॥
मुळीं करावा आसनजय । वासनाक्षय मग मनोलय । मनोलय झालिया पाहें । सर्वत्र विजय पावसी ॥८०॥
मृगाजिनाचें करी आसन । तरी सर्व सुखाचें कारण । मोक्ष तो व्याघ्रचर्म जाण । ज्ञानप्राप्ति कुशासनीं ॥८१॥
सर्वसिध्दीतें कंबळ । तरी मन करोनियां निश्वळ । अचळसिध्दीं होय सकळ । संशय न धरी सर्वथा ॥८२॥
यम नियम दृढ आसन । प्राणापानीं धरावे ध्यान । धारणाबळेंकरुन । समाधिसिध्दि पावसी ॥८३॥
लोभ हें पातकांचें मूळ । अनेक व्याधि हे रसमूळ । स्नेहमूळ दुःख केवळ । समाधिसुख त्रयत्यागें ॥८४॥
यावत् शरीरस्वस्थसिध्दि । यावत् ज्वरेसीं अवधि । यावत् इंद्रियें सावधी । तावत् सिध्दि सर्वही ॥८५॥
तरी त्वरित करावें आत्मसाधन । कीं गृहीं लागलिया अग्न । मग व्यर्थ काय कूपखनन । तें मूर्खपण जाणिजे ॥८६॥
सकृप होऊनि सदय उदधि । तत्काळ लाविली त्या समाधि । योगयुक्तीं कुंचिकासिध्दि । सिध्दि झाली क्षणार्धे ॥८७॥
नाथ करिती तेथून गमन । सुमंत करी साष्टांगनमन । विप्र म्हणे पुनर्दर्शन । कर जोडोनि विनवीत ॥८८॥
अवश्य म्हणून तये वेळ । जाते झाले दीनदयाळ । ते महाराज भक्त केवळ । विश्वोध्दारा विचरती ॥८९॥
यावरी तो द्विजराज । वेदनिपुणसमुद्र । करिता झाला देशावर । सत्कार करिती तयाचा ॥९०॥
वेदविशारद विद्वज्जन । बध्दहस्तकें करिती वंदन । दर्शना येती नृपनंदन । धनवसनें अर्पिती ॥९१॥
विद्या नराचें रुपधन । विद्या करवी यशवर्धन । विद्या करवी सुखसंपन्न । विद्या मान्य सकळातें ॥९२॥
विद्याभांडवल बांधून गांठीं । हिंडता झाला पृथ्वीतटीं । परी ग्राहींक न दिसे दृष्टीं । परम हिंपुटी होतसे ॥९३॥
विद्या सधन धनाची पेटी । तया तस्कर कैचा लुटी । विद्या पाठीराखी संकटीं । विद्या गौरव करवीत ॥९४॥
विद्या हे विदेश जननी । विद्या सुफळवर्धनी । विद्या वंद्य त्रिभुवनीं । विद्याविहीन पशु ते ॥९५॥
बंधु नसे विद्येसमान । नसे रिपु व्याधिसमान । नसे धर्म सत्यासमान । नसे ज्ञानासम तप ॥९६॥
जया चार्ही वेद मुखोद्गत । जो सकळशास्त्री पारंगत । अष्टादशपुराणांसहित । चतुदर्शविद्या जयातें ॥९७॥
विद्याविशारद परि चिंतातुर । परीक्षा द्यावया होय आतुर । अपर नसे पृथ्वीवर । यास्तव विकल सर्वदा ॥९८॥
द्विज करी मनीं विचार । विबुधगुरु बृहस्पति थोर । तयां दावूं विद्याभांडार । हाचि प्रयत्न करुं पईम ॥९९॥
मग योगबळेंकरुन । पाहूं गेला स्वर्गभुवन । निर्जरीं द्विज अवलोकून । त्या देखून उभे सभे ॥१००॥
पुरंदरें करुन अत्यादर । अभ्युत्थानादि सत्कार । बध्दहस्तें नमस्कार । करिते झाले सर्वही ॥१॥
त्या बैसवूनि दिव्यासनीं । पूजिता झाला पाकशासनीं । अर्ध्यपाद्यादि दिव्यरत्नी । पूजा करोनि प्रार्थित ॥२॥
यावरी वदे अंगिरासुत । दुर्घट मार्ग क्रमूनि पंथ । पातलां तें मनोगत । कळलें पाहिजे द्विजवर ॥३॥
ऋषि वदतसे प्रत्युत्तर । तपसिध्दि झालियानंतर । जसा भेटे पिनाकधर । तेवीं लाभ तुमचा ॥४॥
अनंतजन्मीचें तपाचरण । यास्तव झालें गुरुदर्शन । कृतार्थ होऊन मी धन्य । मान्य़ होईन त्रिलोकीं ॥५॥
विद्यामांदुसीं अनर्ध्य रत्न । तुमचे पदीं करीन अर्पण । होतें उत्कंठित माझें मन । तें आजि पूर्ण झालें ॥६॥
अन्यत्र आर्त नसे मन । व्हावें स्वामीचें दर्शन । हेंचि धरोनि कारण । श्रीगुरुचरण पाहावे ॥७॥
बहुत शोधिली कुंभिनी । परीक्षाग्रहणीं नसे कोणी । आतां अर्चू विद्यासुमनीं । विबुधगुरु गुरुवर्या ॥८॥
विद्याभांडारीचें धन । समग्र केलें गुरुअर्पण । तेणे होऊन सुप्रसन्न । अभयवर देतसे ॥९॥
संतुष्टपणें सुप्रसाद । अर्पिते झाले फळ अगाध । जें मृत्युलोकीं असाध्य । तेंचि अर्पी तयातें ॥११०॥
तारारमण वदे तयासी । हें फळ भक्षिल्या अमर होसी । कौमारदशा पावे देहासी । जरामरण नसेचि ॥११॥
महाप्रसाद म्हणून । सुमंत करी साष्टांगनमन । कृतार्थ कृतार्थ हें वचन । हर्षे निर्भर होतसे ॥१२॥
यापरी गौरवोनि विप्र सद्गुणी । येता झाला आपुले सदनीं । विचार विवरीं तो अनुदिनीं । संशयसमुद्रीं पडियेला ॥१३॥
स्वयें भक्षावें जरी फळ । तरी वांचोनियां काय फळ । भिक्षुकाचा जन्म निर्फळ । भिक्षा मागणीं चुकेना ॥१४॥
भिक्षुक तृणाहुनि हळुवट । याचना करोनि भरावे पोट । सदा विकसित करपुट । सदा उपार्जन करावें ॥१५॥
द्विजें दृढनिश्वळ करुनी । आपुला नृप रावचूडामणी । पुण्यश्लोक विचारखाणीं । तयासी अर्पण करुं हें ॥१६॥
करील प्रजेचें पाळ्ण । सुखी रक्षील गोब्राह्मण । महापुण्यपरायण । स्वधर्मनिष्ठें नेटका ॥१७॥
धरामरें अमर फळ । अमरलोकींचें जें रसाळ । रावदर्शना तत्काळ । सवें घेऊन जातसे ॥१८॥
विप्रा देखूनि उठली सभा । नृप नमस्कारोनि राहे उभा । मानूनियां कृतार्थलाभा । हर्ष उत्कर्ष मानसीं ॥१९॥
जेवीं जनमेजय करितां यज्ञ । आस्तिक ऋषि बाळ सान । कीं बळियागीं वामन । बाळभानु जैसा पैं ॥१२०॥
तैसा पातला तो द्विजवर । राव करी अति सत्कार । पूजोनियां षोडशोपचार । उत्तमासनीं बैसवी ॥२१॥
विप्र देतसे आशीर्वाद । फळ सुफळमन देत प्रसाद । भूपासी झाला परमानंद । अगाध लाभ म्हणोनि ॥२२॥
अनर्ध्य वस्तु अप्राप्तप्राप्ती । कैसी झाली सदयमूर्ति । हें फळ दिव्यदीप्ति । प्राप्त झालें मज सांगे ॥२३॥
येरु वदे सत्यवचन । पाहूं गेलों स्वर्गभुवन । तेथें गुरु होऊनि प्रसन्न । अमरफळ हें अर्पिलें ॥२४॥
राव देतसे अपार द्रव्य । परि तो न घे निःस्पृह । नृपासी पुसोनि लवलाहें । स्वसदनातें जातसे ॥२५॥
अंतःपुरीं शीघ्र भूपाळ । स्त्रीस म्हणे ऐक निश्वळ । महत्फळें जन्म सफळ । प्राप्तकाळे लाभलों ॥२६॥
निगूढ देवी लावण्यसरिते । निशींत सेवूं एकांतातें । ऐसें सांगोनियां निरुतें । सभेस भूप पातला ॥२७॥
पाहा प्रारब्धाची कैसी गति । होणार न चुके कल्पांतीं । ते स्वजाराप्रति फळ देती । राजकांता प्रीतीनें ॥२८॥
त्यागोनियां गंगोदक । स्वीकारी जेवी थिल्लरोदक । मृगमद त्यागोनि घेतली राख । त्याग केला दुर्दैवें ॥२९॥
रायकेळें सोडून । अर्कफळें केली ग्रहण । टाकोनि जांबुनद सुवर्ण । लोष्ट घेत हस्तकीं ॥१३०॥
सोडोनियां राजहंस । आवडी रक्षिला वायस । झुगारिला हातींचा परिस । पाषाण घेत करपुटीं ॥३१॥
असो यापरी राजपत्नी । तीतें दुष्टबुध्दि दुष्टप्राक्तनीं । ते फळ दासालागोनी । स्वजारातें अर्पिलें ॥३२॥
राजपत्नी लावण्यराशी । तिजहुनि प्रिय त्यासी दासी । फळ घेऊनि देतसे तिसीं । दुर्दैवबुध्दि उदेली ॥३३॥
दासी विचारी आपुले चित्ती । पूर्वदोष जन्मविपत्ति । तशांत दासी कलंक मजप्रति । हास्यत्व नीच परम हें ॥३४॥
जळो जळो दास्यत्वाचें जिणें । जरी हें फळ करुं सेवणें । तरी चिरकाळ दास्यत्वचि करणें । दुःखभोगणें चुकेना ॥३५॥
तरी सुमंतनामें द्विजोत्तम । तयासी अर्पिता पुण्य परम । हाचि निश्चय करोनि निःसीम । विप्रसदनीं पातली ॥३६॥
तंव ते ऋषि नसती आश्रमीं । तेणें उद्विग्न होतसे मनीं । मग विप्रपत्नीतें प्रणामी । विनयोत्तरीं विनवीत ॥३७॥
म्हणे माये ऐक वचन । मी पातलें आर्त धरुन । परि न झाले मुनिदर्शन । दैवहीन मी असें ॥३८॥
असाध्य हें अमरफळ । हें द्विजा देतां जन्म सफळ । धरुन निश्चय निश्चळ । वदून ऐसें फळ वोपी ॥३९॥
यापरी बोलोनि फळ अर्पित । साष्टांग करी प्रणिपात । येणें होईल कृतकृतार्थ । हें फळ देतां ऋषीतें ॥१४०॥
तेव्हां वंदून जाय दासी । ऋषि भार्या अवश्य म्हणे तिसी । सवेंचि पातले ऋषि । तंव फळ देखिलें स्त्रीहस्ती ॥४१॥
वोळखोनि भार्येसी पुसिलें । येरी साकल्य निवेदिलें । मुनीतें आश्चर्य वाटलें । फळ निरखूनि ते वेळीं ॥४२॥
ही अमोल्यवस्तु दासीपासीं । नेणो प्राप्त झाली कैसी । परमक्षोम पावून मानसीं । म्हणे रायासी पुसावें ॥४३॥
मग त्वरित जाय राजालयीं । नृपास पुसे तयें समयीं । फळ भक्षिलें किंवा नाही । प्रमाण वदे नरेंद्रा ॥४४॥
स्मृतिविस्मृत होऊनि मनीं । अंतःपिउरीं जाय सदनीं । स्वस्त्रीस पुसे तये क्षणी । परि ते मौन स्तब्ध न बोले ॥४५॥
मग पाचारोनि द्विज कामिनी । तीतें वदे रावचूडामणि । येरी निवेदी यथार्थवचनीं । वर्तला जो वृत्तांत ॥४६॥
मग आणविलें दासीतें । राव पृच्छा करी तीतें । ते वदे हें फळ मातें । सेवकानें अर्पिलें ॥४७॥
परि कोठील उत्पन्न कैसें प्राप्त । हें सहसा नेणें मी निभ्रांत । तदुपरी भूपें सेवकास । बोलावूनि आणिलें ॥४८॥
राव वसे सेवकालागीं । तंव अन्याय सेवीतला आंगी । यास्तव वाग्देवता राहे उभी । स्वअपराध जाणूनी ॥४९॥
शरीरीं पावूनि म्लानता । सद्गद कंठ मुखीं ग्लानता । सर्वांगीं रोमांच तत्त्वतां । होते झाले तयाचे ॥१५०॥
विषयसुख वाटे अति गोमटें । परि परिणामीं दुःख मोठें । की बचनाग खातां गोड वाटे । तो प्राणहर्ता शेवटीं ॥५१॥
राये विश्वासोन आश्वासन । देता झाला दासालागुन । तूं वदसी जरी सत्यवचन । तरी निर्भय पैं माझें ॥५२॥
राव विश्वास धरोन पोटीं । वदता झाला गुह्य गोष्टी । तव भार्येनें मज संकटी । नेमवचनें गोविलें ॥५३॥
तीतें वदे मी यथार्थ । मातेपरी तूं राजकांते । सहसा कर्म न घडे माते । हे अमर्यादा न करी मी ॥५४॥
म्हणे आज्ञा तुज प्रमाण । न ऐकतां शिक्षा लावीन । मी राजकांता रायासमान । दंड करवीन नृपहस्तें ॥५५॥
यापरी वदोनि उत्तर । मजसी करी बळात्कार । अपराधी मी दुराचार । शिक्षा करणीं उचित ॥५६॥
भूप विस्मित होऊनि मनीं । म्हणे न कळ्व ईश्वरकरणी । विरंचीलिखित जें प्राक्तनीं । कदाकाळी चुकेना ॥५७॥
लक्ष्मी लक्षहीनाप्राप्ति । कुळहीनातें सरस्वती । कुपात्रीं कुलांगनासक्ति । पर्वतीं मेघ पैं जैसा ॥५८॥
यां चिंतयामि सततं मायि सा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः ।
अस्कतकृते च परितुष्यति काचिदन्या धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥१॥
मी चिंतीत सदा जियेसी । ती तों सक्त परपुरुषीं । तो रत सदा दासीसी । धिक्कार करी सर्वस्वा ॥५९॥
धिक्कार तीसी धिक्कार त्यासी । धिक्कार मदनासी धिक्कार मजसी । ऐसा राअ होऊनि उदासी । त्रासिता झाला
राज्यातें ॥१६०॥
नृपें स्वस्त्रीतें वंदोन । परमार्थासी माये तूं कारण । मी काय होऊं उत्तीर्ण । तुझेनि धन्य त्रिभुवनीं ॥६१॥
जेवीं स्त्रिया सहगमनी । जाती गृहपुत्र त्यागुनी । तैसें रायें मानूनि मनीं । वना गमन करीतसे ॥६२॥
रायें घेऊन वैराग्य । देहगेह मानी अयोग्य । भवव्याधी त्यागून आरोग्य । योगमार्ग धरियेला ॥६३॥
प्रधान धावोन धरी चरण । म्हणे स्वल्प अपराधा वज्रासन । तूं सुबुध्द आणि सर्वज्ञ । विचारश्रेष्ठा विचारी ॥६४॥
क्षुधा लागली जयाकरण । यास्तव टाकिसी उदर चिरुन । कीम श्मश्रू वाढती म्हणून । मस्तकछेदन करावें ॥६५॥
तरी क्रोध न धरीं राया । दुष्टा दंडी प्रतापवर्या । शरणागता होसी सदया । उचितानुचिता विचारी ॥६६॥
प्रजा प्रार्थिती भूपाळ । जेवीं जननी त्यागूनि जाय बाळ । तेवीं प्रजेचा वरवाळ । होत असे नरेंद्रा ॥६७॥
परि तो नेणोनि जाय पुढारीं । राव भूदेवातें नमस्कारी । प्रार्थना करी बध्दकरीं । लोभ मजवरी असों द्या ॥६८॥
प्रजा वदती हे जगन्निवास । दुःखप्रद उदेला दिवस । अष्टही दिशा दिसरी वोस । नगर उद्वस नृपावीण ॥६९॥
विद्या चातुर्य वेदांत । सद्गुण अभ्यासिती बहुत । परि मर्म जाणती क्वचित । तैं वैराग्य घेती निश्चय ॥१७०॥
ऐसा भर्तृहरि सर्वज्ञ । जेणें शतकें त्रय केलीं निर्माण । परम गुह्यार्थ गहन । चातुर्य आणि वैराग्य ॥७१॥
प्रथम केलें नीतिशतक । द्वितीय तें शृंगार रसिक । तृतीय वैराग्य सर्वाधिक । स्वयें अनुभव घेतसे ॥७२॥
यापरी राव वैराग्यसंपन्न । सेविता जाहला निरंजन । यापरी करी फळसेवन । चिरकाळ वैराग्य असो हें ॥७३॥
शुक्लपक्षीं आद्यापासून । पूर्णिमेचा पूर्णदिन । पूर्णकाळ रोहिणीरमण । तेवीं जाण अध्याय हा ॥७४॥
श्रीमत् आदिनाथलीलाग्रंथ । सद्गुरु भैरव वरद समर्थ । तत्प्रसाद आदिनाथ । पंचदशोऽध्याय हा ॥१७५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 07, 2020
TOP