श्रीनाथलीलामृत - अध्याय १८ वा
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
श्रीगणेशाय नमः ॥
श्री नमो अलक्ष निरंजना । सर्वव्याप्त चैतन्यघना । निर्विकारा पुरातना । आदिनाथा जगदीशा ॥१॥
तूं अचळ निश्चळ परात्परा । निगमागमा गोचरा । विश्वाद्या विश्वंभरा । विश्वेश्वरा तुज नमो ॥२॥
निःसीम गुरुभक्ताचा सद्भाव । पाहून प्रगटसी स्वयमेव । सद्गुरुरुपें स्ववैभव । शरणागतातें देसी तूं ॥३॥
गुरुभक्तीचा महिम विशेष । आचरतां तरले स्त्रियापुरुष । येचिविषयीं इतिहास । श्रोतेजनीं परिसावा ॥४॥
कांचनपुरीचा अधिपति । गौडबंगालाख्य देश वदती । त्रैलोक्यचंद्र तेथें नृपति । अद्भुतकीर्ति जयाची ॥५॥
जेवीं हरिश्चंद्र आणि नळ । तेवीं पुण्यश्लोक भूपाळ । अरिमर्दनीं कृतांतकाळ । दीनदयाळ प्रजेसीं ॥६॥
स्वरुपें सुंदर विजयकीर्ति । दुजा भासे रोहिणीपति । यास्तव त्रैलोक्यचंद्र तया वदती । लौकिकांत भूमंडळीम ॥७॥
धनुर्धारी प्रतिअर्जुन । समरी योध्दा जेवीं कर्ण । गोधांगुळी करत्राण । अपेक्षवृक्ष शरदृष्टीं ॥८॥
तयाची भार्या सुद्गुणखाणी । स्वरुपरुपें जेवीं पद्मिणी । सर्वलक्षणीं सुलक्षणी । विक्रमाचे पाठीची ॥९॥
गोरोचनासम गौरवर्ण । कीं बावन्नकसी तप्तसुवर्ण । सुप्रभराकेंदुकळापूर्ण । तेवीं वदन जियेचें ॥१०॥
कंजपत्राक्ष तळपती मीन । सरळ नासिक भोभायमान । अधर पक्वबिंब फळसमान । वदनीं दश्म सुप्रभ ॥११॥
श्रवणीं भूषणीं नक्षत्रघोषें । कृत्तिकापुंज भासती सरिसे । तेजःपुंज प्रगटे प्रकाश । किळा दशदिशां फांकती ॥१२॥
मत्तमातंगमस्तकींचीं । मुक्ताफळें इंदुकळेची । वंशोत्पन्नी गिरिमौळीची । देदीप्य आभा नभातें ॥१३॥
हंसालंकार मराळ । सुढाळ आणि मुक्ताफळ । श्रवनाग्रीं बैसले अचळ । सालंकारी मिरवले ॥१४॥
महाफणीचे सदीप्त मणि । एकावळीच्या अपार श्रेणी । सुप्रभा उदेली अपार प्रभातरणी । प्रकाश कोंदे दशदिशां ॥१५॥
हरिमध्या भुजंगवेणी । हंसगती गजगामिनी । विलोलनयनी पीनस्तनी । रति केवळ दिसतसे ॥१६॥
रंभास्तंभवत् रंभोरु विलसत । जीसी रंभा सलज्ज होत । सारांश मैनावती अतिरुपस । अपरप्रतिमा भूलोकीं ॥१७॥
तनूचा सुवास अहळबहळ । वसंतोन्मत्त होऊन लोळ । पिकस्वरीं शब्द मंजुळ । परमरसाळ भाषणीं ॥१८॥
पवित्र पतिव्रतेचे पंक्ती । अनुसया कीं अरुंधती । तारामती दमयंत्ती । स्मरावें प्रतिदिनीं जयातें ॥१९॥
कोठें रुप कोठें गुण । एक असे एक न्यून । कोठें चातुर्य कोठें दैन्य । न्यून पाहतां चहुंकडे ॥२०॥
तैसी नसे मैनावती । चातुर्य ऐश्वर्य जेथें वसती । विश्ववदनी सरस्वती । स्तुति करिती जियेची ॥२१॥
इंदिरा कीं इंदिरावर । तैसा जोडा अतिसुंदर । प्रिया प्रिय प्रियकर । परस्परें असतीं ॥२२॥
उभयलावण्य अद्भुत । म्हणोन अनंग उदरा येत । गोपेंदु नामें अवतार घेत । सौंदर्यासी आगळा ॥२३॥
जो कामेश कमनीयतनु । सुप्रभ प्रभाती उदयभानु । अपरप्रतिमा काय वर्णू । स्तब्ध होत मंद्गिरा ॥२४॥
गोपेंदुसौष्ठव अवशिष्ट । कन्यारुपें होय प्रगट । चंपावती नामें उत्कृष्ट । स्वरुपें गुणें आगळी ॥२५॥
उभयसंततीचा संतोष । हर्षोत्कर्ष तो नरेश । पुढें होणार जें भविष्य । कदाकाळीं चुकेना ॥२६॥
अकाळकाळीं मृत्युकाळ । मृत्यु पातला उतावेळ । अनळमुखीं नवनीतकवळ । हुताहुत ज्यापरी ॥२७॥
मृत्यूस नसे काळवेळ । मृत्यू पातल्या न राहे पळ । मृत्यूस कैची कळवळ । काळा दुष्काळ दयेचा ॥२८॥
मृत्यूस नसे रावरंक । कृतांत विकसित सदामुख । काळ स्वयें जगभक्षक । चक्री कानन ज्यापरी ॥२९॥
मृत्यु न म्हणे वृध्दतरुण । मृत्यु न म्हणे कुरुप-लावण्य । मृत्यु पेटल्या प्रळयाग । शुष्क आर्द्र न पाहे ॥३०॥
त्रैलोक्यचंद्रा प्राप्त ग्रहण । एकवटती पंचप्राण । तये संधीं वदे वचन । मैनावती ते काळीं ॥३१॥
ऐकें वो चातुर्यद्रमपक्षिणी । मममानससरोवरहंसिणी । मी पडिलों मृत्युव्यसनीं । वैवस्वतसदनीं जातसें ॥३२॥
विषयांध राजमदेंकरुन । कांहीं न केलें आत्मसाधन । न केलें हरिहर-आराधन । कैसेनि परत्र पावे मी ॥३३॥
मज न दिसे गुरुमुख । ऐश्वर्यमदें मानी सुख । आतां आलें मृत्युदुःख । पूर्ववयांत मजप्रति ॥३४॥
आतां परिसे वचन । कन्यापुत्र करी जतन । सदा राहें समाधान । आत्मसाधन करावें ॥३५॥
यापरी निर्वाण बोधून । सवेंचि होत निर्याण । पंचप्राण प्राणोत्क्रमण । तंव एकचि हाहाःकार माजला ॥३६॥
जेवीं पंडु पावतां निधन । कुंती विलापें करी रुदन । तेवीं प्रळयाग्नि पेटला चहुंकडून । प्रजाजन हे आहळती ॥३७॥
परमदुःखमूळ प्रपंचसमुद्र । जीव प्रवाही पडिले साग्र । महावर्त परमदुर्धर । येणें बुडाती सर्वही ॥३८॥
मैनावतीची पाहून ग्लांती । पशुपक्षी रुदन करिती । सख्या तीतें सावरिती । तो शोक किती वदावा ॥३९॥
मैनावतीचें शांतवन । विनयें प्रार्थी प्रधान । त्रैलोक्यचंद्राचा अस्तमान । परि गोपेंदु किशोर द्वितीयेचा ॥४०॥
बाळचंद्रापरी शुक्लपक्ष । वृध्दि पावेल दिवसेंदिवस । आम्हां चकोरां परमहर्ष । पीयूष आर्त आमुतें ॥४१॥
सखिया वदती सखियेप्रति । धन्य धन्य देवकी सती । अनंतजन्मीचे तपांतीं । तरीच अनंत अवतरला ॥४२॥
तैसे तुझे सुकृतेंकरुन । माये प्रसवलीस पुत्ररत्न । जेवीं अंबरीं चंद्रकिरण । एकचि जैसा सुप्रभ ॥४३॥
असो यापरी समाधान । करिते झाले मुख्यप्रधान । राजदेह केला दहन ॥ उत्तरकार्य सर्व पैं ॥४४॥
तनय उपनयन-संस्कार । जननी विवाह करी गजर । मद्रदेशीचा राजेश्वर । सुव्रत नाम जयाचें ॥४५॥
तयासी नसे पुत्रसंतती । तेणें आराधिली महाशक्ती । प्रसन्न होऊन तयाप्रति । देती झाली वरदान ॥४६॥
उभयकुमार एक कुमरी । होईल निश्चय तुझे उदरीं । दुजी रतिसम सरी । कन्यारत्न लाभसी ॥४७॥
उमावरें प्राप्त जाण । यास्तव औमा नामाभिधान । लावण्यचातुर्य गुणसंपन्न । दमयंती जेवीं नळाची ॥४८॥
तीतें योजिला गोपेंदुसीं । समान जोडा लावण्यराशी । लग्न लावून वधूवरांशीं । आंदण अपार दिधलें ॥४९॥
चार दिवस सोहळा । जामात पाहून नृपें डोळां । आनंदाब्धि उचंबळला । पूर दाटला सुखाचा ॥५०॥
मत्तमातंग-तुरंग पदाती । कोशभांडारें नेणो किती । अनर्ध्य रत्न सुप्रभदीप्ति । कनकरत्न शिबिकादि ॥५१॥
सदुग्धधेनु वृषभ म्हैशी । देशपट्टणें दासदासी । गिरिदुर्ग जामातासी । आंदण बहुत देतसे ॥५२॥
शाण्णवकुळीचे राजकुमर । छप्पन्न देशींचे राजेश्वर । स्वयंवरा पातले समग्र । वर देखिला गोपेंदु ॥५३॥
वरसौंदर्य देखोन । विचार करिती एकवटून । म्हण्ती सांडणें कोटिमदन । स्वरुपावरुन जयाच्या ॥५४॥
कन्याभगिनी असती जया । पाहोन अर्पाव्या या सौंदर्या । ऐसा वर प्राप्त जिया । ते थोर दैवें दैवाची ॥५५॥
ब्रह्मसृष्टींत प्रतिपुतळा । न ऐकिला पाहिला डोळां । संपूर्ण नृप झाले गोळा । दुजा निवडून दाविजे ॥५६॥
अंतःपुरीं राजभार्या । पाहूं ठेल्या सभाचर्या । तों विलोकिलें वरवर्या । वीर्यशौर्ये आगळा ॥५७॥
म्हणे धन्य तूं चतुरानन । ऐसें रुपडें निर्मिसी रत्न । त्रैलोक्य गाळून हें निधान । निर्मिलें ऐसें वाटतें ॥५८॥
रतिपति कीं रोहिणीपति । माद्रीपुत्र नकुळ व्यक्ति । याचे सौंदर्याची ख्याति । भुवनत्रयी न समाये ॥५९॥
हें तों ऐकिलें पुराणीं । तो हा प्रत्यक्ष पाहिला नयनीं । धन्य धन्य जयाची जननी । ऐसें रत्न प्रसवली ।\६०॥
छप्पन्न देशीचें भूपति । सकुटुंबे संभ्रमा येती । सवें लावण्यकन्या असती । विवाह करिती तेथें पैं ॥६१॥
मांडलिक रायांच्या कुमारी । लावण्य असती उपरी । मंगळा लाहे सुंदरी । अर्पिते झाले वरातें ॥६२॥
षोडशशत आणि सत्तावीस । स्त्रिया वरिल्या अतिरुपस । संभ्रमें पातले स्वनगरास । मंगलोत्साहें सहर्ष पैं ॥६३॥
आणीक द्वीपांतरीचे नृप । पाहूं येती अतिसाक्षेप । स्वरुपसौंदर्ये कंदर्प । दुजा भाविती भावनें ॥६४॥
कमनीय रुप अत्यद्भुत । पाहून अर्पिती स्वकन्येतें । वरवरिष्ठ जामात । रुपें गुणें आगळा ॥६५॥
कांहीं आणिल्य पर्णोनी । कांहीं आणिल्या जिंकूनी । कांहीं स्वरुपीं वश्य होऊनी । स्वयें वरिती वरातें ॥६६॥
एवं द्वादशशत विवाहभार्या । सोळा शत त्या उपस्त्रिया । परि पट्टांगना मुख्य जाया । औमा वामांगवा़सिनी ॥६७॥
प्रत्यंगविवाह इतिहास । निवेदितां प्रसर ग्रंथास । होईल म्हणोनि सारांश । श्रोतयांतें निवेदिलें ॥६८॥
जेवीं द्वारकेंत श्रीकृष्ण । षोडशसहस्त्र क्रीडे भगवान । तेवीं दिव्य भोगी नृपनंदन । उडुगणीं शशी ज्यापरी ॥६९॥
मुख्य व्योमा व्योमापरी । इतर भार्या नक्षत्रसरी । रम्य सुशोभ वेष्टिल्या शरच्चंद्रीं । सकळकळेंसीं जाणिजे ॥७०॥
यथा प्रवाहे राज्यभार । चालवीतसे निरंतर । स्वपराक्रमें करभार । युध्दीं जिंकोनि घेतसे ॥७१॥
मातृसेवेसीं सदा विनय । जननी संतुष्ट पाहून तनय । समस्त असतां राज्यवैभव । परि गुरुमार्ग नसे उभयतां ॥७२॥
तंव ते नगरीं जालंदरी । शुकवामदेवप्रतिसरी । जगदोध्दारार्थ महीवरी । दीनोध्दारी विचरती ॥७३॥
महायोगी योगावतंस । छायामाया नसे भास । जनीं विजनीं जगन्निवास । अद्वय पाहे समदृष्टीं ॥७४॥
गगनीं निमग्न सघन ज्योति । तेथें अनंत शशिसूर्यदीप्ति । तेथें उन्मनीचे एकांतीं । भोग भोगी योगिया ॥७५॥
भव्य भस्म भगवी मेखळा । शैली शृंगी शोभे गळां । श्रवणीं मुद्रा फांकती किळा । अलक्ष शब्दें गाजवी ॥७६॥
जो दृश्य भासावेगळा । पातिया पाति न लगती डोळां । की गिराशब्दीं नादावला । धुंद झाला अनुहतीं ॥७७॥
कुब्जा कुमंडल मृगाजिनी । शृंगी शब्दई अशब्दध्वनि । तंतवितंतरव गगनीं । मठाकाशीं भेदला ॥७८॥
योगयोगटा वज्रयोगिया वज्रासन । कुंडलिनीतें जागवोन । कुंभक ऊर्ध्व रोधिला ॥७९॥
मूळबंध उड्डियानक जालंधर । खेचरी लक्षी जालंधर । नाथ पंथ अतिसुंदर । काय वदनीं वदाआ ॥८०॥
अखंड ब्रह्माग्नि प्रज्वलित । तेथें दग्ध जन्ममृत्य । सदा धुमी धडधडीत । भस्म होय कर्माचें ॥८१॥
जो दृश्यभासा सदा उदास । निश्वळ निश्चय होतो नैराश्य । तयाचें शक्रादि वांछिती दास्य । तो स्वयें अविनाश होय पैं ॥८२॥
महान् सिध्द देशोदेशीं । येती पांथस्थ तीर्थवासी । निशीक्रमणार्थ जागरणासी । धुमीं अग्नि पाहिजे ॥८३॥
यास्तव जात सेवनासी । भिक्षार्थ तिष्ठे वृक्षापासीं । शुष्कलता आपसयेंसी । द्रुम त्यातिती तयांतें ॥८४॥
सैरा पडती बहुवस । नाथ आज्ञापिती त्यांस । आतां वियोग कासयास । संयोग होऊनि चलावें ॥८५॥
आज्ञा होतां तये क्षणीं । एकवटोनि मिळती ते क्षणीं । अगाध योगियाची करणी । त्याची कृति तो जाणे ॥८६॥
भार टाकून समग्र । जळ असतां होती चर । म्हणती हा प्रत्यक्ष ईश्वर । अंतरिक्ष चालतो ॥८७॥
काष्ठछाया मस्तकावरी । तैसेच प्रवेशती नगरीं । राजमाता उपरीवरी । सहज स्थिती उभी असे ॥८८॥
अस्मतशतस्त्रियांचे वृंद । नेत्री देखती कृति अगाध । म्हणती हा कोण महासिध्द । अंतरिक्ष चरकाष्ठ ॥८९॥
निरखोन आश्चर्य केलें पोटीं । ऐसा न देखों कदा दृष्टीं । हा धूर्जटी की परमेष्ठी । सृष्टीवरी अवतरला ॥९०॥
मनीं विस्मित मैनावती । सद्गद नेत्रीं अश्रु स्त्रवती । तंव ते वदे सर्वाप्रति । सद्गुरु निश्चिती करुं हा ॥९१॥
अन्योन्य स्त्रियांस वदे ती वदनी । गुप्तवार्ता ठेवा मनीं । जनीं झालिया षट्कर्णी । कार्या विक्षेप होतसे ॥९२॥
निजगुजगुह्याची गजबज । करितां कार्य नासे सहज । मग केवीं प्राप्त लाभ मज । गुरुप्राप्तीचा होईल ॥९३॥
परि कोठील कोठें आहे । दूतीस सांगती जाऊनि पाहे । मौनमुद्रे करी निश्चयें । शोध्द करोन येई ॥९४॥
येथें आणावा जरी तपस्वी । तरी सर्वथा न ये तो मनस्वी । ऐसें जाणोनि अधस्वी । सिध्द शोध आणविला ॥९५॥
एक याम लोटतां रजनी । शीघ्र जातसे राजजननी । आरुढोनि शिबिकायानीं । नाथदर्शनी आवडी ॥९६॥
सप्रेम कंठी प्रेममाळा । सहचरसख्या बारा सोळा । सवें येती जिच्या अबळा । सत्रावीचे ते काळीं ॥९७॥
मठीं निमग्न असतां योगी । पातली तेथें ते तन्वंग्दी । नमन करीतसे प्रत्यंगीं । स्वभावेंसी गुरुतें ॥९८॥
चरणीं स्पर्शिलें अचळ मौळ । प्रेमाश्रूचें विमळजळ । अभिषेकिलें गुरुपदयुगुळ । सकळपुष्पीं पूजिलें ॥९९॥
बध्दहस्तें करी प्रार्थना । पतितोध्दारणा पतितपावना । पूर्णब्रह्मा सनातना । नामअनामातीत तूं ॥१००॥
हे दयालुवा दयाघना । सकृप सकृत् होई दीना । जन्ममृत्युकृतांतयातना । प्रतापें त्रिताप हरी हे ॥१॥
तूं नाथ अनाथ समर्थ । शरण आलो वरोनि आर्त । आतां करावें मज कृतार्थ । स्वार्थ परमार्थ तो घडे ॥२॥
तूं निजभक्ताचा भक्तवत्सल । हेचि जपे अनुदिनीं माळ । महिमा नेणें मी केवळ । अचळ अढळ सुखाची ॥३॥
अज्ञानतिमिरा होय नाश । ज्ञानोदयाचा रविप्रकाश । ऐसा द्यावा निगमोपदेश । जेणें नासे भवभ्रम ॥४॥
ऐकोनि मैनावतीची वाणी । संतोषला मोक्षदानी । परि लौकिककडसणी । कसोटी पाहे सतीची ॥५॥
तूं होसी राजजननी । मी तों विचरे सदा स्मशानीं । वस्ती अमुची निरंजनीं । नसे ज्ञानी मी स्वयें ॥६॥
वृक्षातळीं क्षणेक बसावें । किंवा निगूढ गुहेंत सदा वसावें । किंवा स्वच्छंदें असावें । एकटे वसावें सर्वदा ॥७॥
सांप्रत वसें तुमचे नगरीं । प्रत्यहीं आणी काष्ठभारी । तृणासनी निशांबरी । अवर्णप्रावरण आमुचें ॥८॥
कंदमूळफळाशन । न मिळतां तेंचि निरशन । नृषेशी करावें जळपान । हें भूषण आमुचें ॥९॥
न जाणें मंत्रयंत्रसाधन । न जाणें उपासना आराधन । न जाणें मी ज्ञानध्यान । क्रियाकर्म मी नेणें ॥११०॥
कैचें वैराग्य त्यागभोग । कैचा योग हा भवरोग । कैचें अध्यात्म कैचा मार्ग । लयलक्ष तेंही कळेना ॥११॥
कोणें भ्रमें भ्रमलीस छंदीं । मी तों नेणें उपदेशविधि । विक्षिप्ताचे लागसी नादीं । निःशेष उपाधि वर्तत ॥१२॥
यापरी उदसोत्तरीं । वदते झाले जालंदरी । तंव दुःखित होय अंतरीं । राजमाता ते वेळीं ॥१३॥
वज्रपात मानी ते अवसरीं । की चपळा कोसळे आंगावरी । ह्रदयीं खोचली तीक्ष्ण सुरी । विकळ सुंदरी होतसे ॥१४॥
अहा कटकटा प्राक्तन । पूर्वसुकृतें वोळे सुधाघन । दुर्धर दुष्कर्म सुटला प्रभंजन । तेणें वितळला जाण पैं ॥१५॥
म्लानवदनी सजलनयनी । नमस्कारी गजगामिनी । जाती झाली राजजननी । तंव दया उपजली अंतरी ॥१६॥
मस्तकीं ठेवोनि अभयपाणि । निगमोपदेश तत्काळ श्रवणीं । जेवीं आदिनाथें मृडानी । उपदेशिली ज्यापरी ॥१७॥
जन्ममृत्युजरामरण । दर्शनें गेलों निरसोन । अनंतपुण्यकृतकल्याण । उपदेशमात्रे जाहलें ॥१८॥
भवसमुद्र उल्लंघोन । पार पावती निरंजनवन । जेथें गेलें मीतूंपण । दृश्यभान गळालें ॥१९॥
जेथें देहभावा नुरे ठाव । समस्त स्वरुपी स्वयमेव । ब्रह्मानंदीचें वैभव । प्राप्त होय गुरुकृपें ॥१२०॥
घटाकाश मठाकाश । चिदाकाशी स्थिति निवास । तेथें होवोनि सामरस्य । मूळ अविनाश तें स्थळ ॥२१॥
शून्यभुवन सर्वोत्कृष्ट । काकीमुख सूक्ष्मवाट । ब्रह्मगिरिचा अवघड घाट । त्रिकुट मार्ग देखिला ॥२२॥
॥श्रीहठ औठ्पीठ गोल्हाट । प्रकाशें प्रकाश घनदाट । अष्टदिशांत लखलखाट । भ्रमरगुहा सुभट ती ॥२३॥
जेथें सत्रावीचा संघाट । ते ब्रह्मनगरीची सुरम्य पेठ । चिद्रत्नाच्या वस्तु अचाट । निघोट सघन भरियेल्या ॥२४॥
तेथें अनंत चपळा एकवटती । सुप्रभ उदय शशी गभस्ति । उष्णचांदण्यातील स्थिति । अनुपम्य किती वदावी ॥२५॥
अनुहत तुरे सुशब्दध्वनि । मंगळ मंजुळ मंगळ गाणीं । आकाशशब्द लीन गगनीं । आलाप उठती दशविधी ॥२६॥
अनंत आनंद एकवटले । सुखाब्धीचे पूर लोटले । स्वानंदाचें भरतें दाटलें । दैन्य फिटलें दशेचें ॥२७॥
तो नाथमार्ग होय उलट । जीवसशेस करी पालट । सुषुम्नेची गति सघट । इडापिंगला आटती ॥२८॥
जेथें जीवशिवाचा संयोय । मग तेणें दवडिले भवरोग । मग गेलें दुःख सांग । सुखानुराग पैं जेथें ॥२९॥
ही योगगति जया पूर्ण । तया भुक्तिमुक्ति अनंत कल्याण । मायिक प्रपंच दुःस्वप्न । जाय निरसोन जागृतीं ॥१३०॥
असो पूर्णोपदेश मैनावतीतें । सकृप झाले ते सतीतें । मग करोनि जागृतीतें । नाथस्तवनीं अनुसरली ॥३१॥
जय जय सद्गुरु चंडांशा । निजजनमानससरोजविकाशा । सदयह्र्दय परेशा । जन्मांतका पाशहारका ॥३२॥
नमस्कारोनि वदे आदेश । म्हणे धन्य आजिचा दिवस । बहुत जन्मींचा सकृतांश । फळा आला आजि पैं ॥३३॥
आज्ञा मागोन जाय सदनीं । सोऽहंस्मरण सदा वदनीं । अजपाजत अनुदिनीं । ब्रह्मैव सत्य मानीत ॥३४॥
ब्रह्मैव सत्य मिथ्या जग । हाचि तीतें निश्चयानुराग । धिक्कारोनि राज्यभोग । वैराग्यस्थिति बाणली ॥३५॥
राजमाता राजालयीं । जाती झाली सत्वर पाही । निशी प्रवर्ततां प्रत्यही । दर्शनोद्देशें जातसे ॥३६॥
अर्ध्यपाद्यादि फलसंभार । नित्य पूजीत निरंतर । गुजगुज फुटली सर्वत्र । नगरजनीं तेगुप्त ॥३७॥
परि श्रेष्ठवार्ता न वदती कोणी । गूढ ठेविती मनींचे मनीं । उपश्रुती उडत श्रवणीं । पट्टभार्या श्रुत झाली ॥३८॥
सत्य कीं असत्य वार्ता । तो शोध करवी राजकांता । तों प्रमाणच पाहतां । राजमाता जाय कीं ॥३९॥
तों प्राप्त झाली शर्वरी । राव प्रवेशला अंतःपुरीं । रत्नखचित दामोदरीं । येता झाला स्वभावें ॥१४०॥
सदीप्त दीप्ति तेजोमय । तेणें उज्वलित दिसे आलय । अनेकवर्णी प्रदीप्तोदय । चित्रविचित्र सुप्रभा ॥४१॥
चांदवे उभविले चंद्रकांती । मुक्ताघोष झालरी डोलती । काश्मीरकवची दीपज्योति । रम्य दिसती पाहतां ॥४२॥
पाचूचे रावे उडडाण घेती । नीलमयूरें नृत्य करिती । हिर्याचे मराळ तळपती । मुक्तपुंज आननीं ॥४३॥
सजल कारंजे उडतीं । माजी माणिक्यकमळें विकासती । इंद्रनीळ भृंग झंकारिती । मीन तळपती हिरियाचे ॥४४॥
अप्रतिम रत्नपुतळे । गाती नाचती स्वयें स्वलीलें । सुगंध सुशोभी रम्य स्थळें । इंद्रभुननासारिखीं ॥४५॥
आसमंत वेष्टित स्त्रियांचे वृंद । थवे तिष्ठती तेथें विविध । ऐसा जो वर अगाध । लागला नृपवर सुकृतें ॥४६॥
अष्टाभ्जोग उपचारासह । पुष्पभूषणें अवतंसवलय । तांबूलादि सुगंध द्रव्य । प्रिया प्रियातें अर्पित ॥४७॥
सर्वसिध्दि सिध्दाचेनि । सिध्दि तिष्ठती जोडोनि पाणि । तेंवी अनुकूळ सकळकामिनी । विनीत भाव सर्वदा ॥४८॥
जेवीं नक्षत्रीं रोहिणीवर । कीं गोपीवेष्टित शारंगधर । तैसा गोपेंदु नृपवर । स्वस्त्रीसीं क्रीडत ॥४९॥
तंव तो रावचूडामणि । पट्टस्त्रियेचा धरोनि पाणि । जाता झाला तिचे भवनीं । प्रीतिवर्धनी होय ते ॥१५०॥
समग्र कामिनी द्वारप्रदेशी । राहात्या झाल्या लावण्यराशी । जेवीं शशी सकळकळांसी । पूर्णिमेसी परिपूर्ण ॥५१॥
रत्नमंचकी लावण्यलतिका । बैसविलें नृपनायका । निरखोनि पतीच्या वदनशशांका । काया कुरवाळी आपुली ॥५२॥
राजभोग विलासोपचार । स्त्रकचंदनादि सुमनहार । तांबूल देतां वारंवार । कंकणशब्द उठती ॥५३॥
तेणें नादें कामव्याळ । जागृत होऊनि उतावेळ । वमीतसे विषगरळ । निमग्न डोले स्वच्छंदें ॥५४॥
तये समयीं विनयोत्तरीं । ललना वदे ते अवसरीं । तव प्रताप सुप्रभ दिगंतरी । शरच्चंद्रासारिखा ॥५५॥
निशापतीतें परि लांछन । तव कीर्तिध्वज निर्लांछन । बाह्य जनापवादें करुन । दिसोन येतें एक पैं ॥५६॥
मज जनवार्ता झाली श्रवण । शोध घेतां होय प्रमाण । लोकापवादाचें दुषण । तेणें उद्विग्न मन माझें ॥५७॥
राव घाबरेपणें पुसत । सत्वर श्रुत करी वृत्तांत । आतुर होऊनि व्यग्र चित्त । होतें झालें नृपाचें ॥५८॥
यावारी वदे ते सुंदरी । चरित्र वर्तलें आपुले नगरीं । कानफाडा जालंधरी । नाथ राहे मठांत ॥५९॥
तुम्ही कुळशीळकुळावतंस । सत्कीर्ति कीर्ति मिरवे यश । सकळ नरेशांत नराधीश । परि महत् लज्जा वोढवली ॥१६०॥
निकट एकटी तुमची जननी । प्रत्यहीं जातसे दिनयामिनी । चर्चा उदेली विश्ववदनीं । विपरीतार्थ जनाचा ॥६१॥
वार्तासूत्रें पेटला क्रोधाग्नि । अहळबहळ ज्वाला रक्तलोचनी । श्वासोच्छावसा मौनाननीं । अधर दशनीं रोवित ॥६२॥
क्रोधचमूचा ठेकला भार । अविवेक नृप मंत्री अविचार । दुरभिमानें वेढिलें नगर । शांतिदुर्ग पाडिले ॥६३॥
दुरभिमानें घेऊन पैज । म्हणे करीन निर्वाणझुंज । लोकेषणाची त्यागून लाज । अपकीर्तिध्वज उभविला ॥६४॥
भ्रांतिभेरी ठोकिल्या सैरा । वीर आवेशले एकसरा । विविधनामें हीं अवधारा । एकाग्रतेंकरोनियां ॥६५॥
विकल्प भ्रम पंचदुराचार । काम क्रोध मद मत्सर । दंभ मोह लोभ अनिवार । अनिवार दुष्ट उठावले ॥६६॥
नृपश्रवण उल्हाटयंत्र । स्त्रीवार्तेचें अपवादसूत्र । क्रोधाग्नि पेटला क्षणमात्र । ह्र्त्सदनीं गोळा धडकत ॥६७॥
तेणें धैर्याचा स्तंभ पडिला । विचाराचा चुरा झाला । अविचार तेथें प्रवेशला । गड घेतला म्हणतसे ॥६८॥
दुर्वाक्याचे खोचती शर । तेणें घायाळ विचारांतर । आरक्त होऊन नेत्र । घूर्मीत शब्दीं थोकला ॥६९॥
बुध्दी भ्रंशला नृपवर । भ्रांति भुली दुर्वासना समग्र । वोवाळिती अति सत्वर । चिंतातुरें वाजतीं ॥१७०॥
प्रभातीं पातला सभे भूप । चित्तीं दाटला दृढ संताप । अविचार मंत्री आपोआप । येता झाला ते वेळीं ॥७१॥
लौकिकविरुध्द न दिसे जनीं । विनय नम्रता बाह्याचरणीं । पोटी कटुता वृंदावनीं । परि वरी दिसे साजिरें ॥७२॥
तेवीं त्वां जावोनि तेथें । प्रार्थोनि आणी नाथ येथें । सवें हयहस्तीरहंवरासहित । सेनासंभार पैं न्यावा ॥७३॥
मंगळवाद्य मंगळ्तुरें । गजस्कंधीं दुंसुभीगजरें । सत्कारोनि नम्रोत्तरें । जालंधरातें आणावें ॥७४॥
अवश्य वदोनि करि गमन । सेनेसह निघे प्रधान । पुढें गर्जती बंदीजन । यशवर्णन करिती ॥७५॥
वेत्रपाणि शस्त्रपाणि । छ्त्रचामरें शिबिकायानीं । अश्वस्वारसेना घेउनी । समारंभेसीं निघाला ॥७६॥
भारसंभार मठानिकटीं । येत्या झाल्या वीरथाटी । जेवीं निर्जरांच्या कोटी । ते येती शिवाचे दर्शना ॥७७॥
राजमंत्री करी आदेश । नमन करोनि म्हणे दासानुदास । आजि झाला धन्य दिवस । स्वामी दर्शनेंकरोनि ॥७८॥
बध्दहस्तें प्रार्थीतसे । तुम्हां पाचारिलें धराधीशें । उत्कंठित दर्शनोद्देशें । तुमचे असे स्वामिया ॥७९॥
येरु वदती काय कारण । आमुचें किमर्थ प्रयोजन । कदा न घडे तेथें गमन । अर्थसाधन कोणतें ॥१८०॥
परस्परें कोणता अर्थ । हेंही न कळे मनोगत । हितस्वार्थ कीं परमार्थ । कोणतेंही मी नेणें ॥८१॥
आम्ही स्मशानीं राहणार । भिक्षेसी फिरतों दारोदार । आम्हां कासया दळसंभार । गजतुरंगादि ऐश्वर्य ॥८२॥
जेणें सत्तावसनेंकरोनी । पालाणिली हे मेदिनी । ऐसा रावचूडामणि । काय म्हणोनी मज बाहे ॥८३॥
तो ऐश्वर्यवान नर पार्थिव । शक्रासमान सुखवैभव । ऐसें असोन मज गौरव । पाचारितो किमर्थ पैं ॥८४॥
मी आलिया तेथवरी । राज्य दवडील हे निर्धारी । ऐसें दिसतसें पुढारी । मज अंतरी समजलें ॥८५॥
ऐसें वदतां उदासोत्तरीं । परम घाबरला राजमंत्री । वारंवार चरणांवरी । मौळ ठेवून विनवीत ॥८६॥
तुमचे कृपेचे अवलोकनें । तत्काळ तुडतीं भवबंधनें । जन्मजरामृत्यु जाण । नाथदर्शनें नासतीं ॥८७॥
अनेक जन्मींचे सुकृत गांठीं । तरीच होय सद्गुरुभेटी । चौर्यांशीची आटाआटी । चुकवीतसे गुरुनाथ ॥८८॥
खोटें नाणें खरें बाहे । परि परिणामीं खरें नोहे । तेवीं कुटिळाचें ह्र्दय पाहे । नम्रवचनीं प्रार्थीत ॥८९॥
भोळा दयाळ करुणाघन । वोळला सकृप करी गमन । पुढें श्रवणीं मुद्रा तळपती । कटीं मेखळा विराजे ॥९१॥
शैली शृंगी अजपामाळ । कुबडी किंगरी कुमंडळ । दीनोध्दारार्थ दीनदयाळ । जाते झाले स्वइच्छें ॥९२॥
गमन करितां पादचारी । छत्रें चामरें वाद्यगजरीं । उभयभागीं नरनारी । नमस्कारिती नाथातें ।\९३॥
गुढिया तोरणें घरोघरीं । कर्दळीस्तंभ उभविले द्वारीं । कुंकुम लिपित मही सुंदरी । रंगमाळा घातल्या ॥९४॥
वार्तिक वार्ता जाणविती । ऐकोन समोरा जाय नृपति । नमस्कारोनि सद्गुरुमूर्ती । सिंहासनीं आरुढवी ॥९५॥
तंव होती झाली वरदगिरा । सफळ जन्म रे नरेश्वरा । यावत् सूर्यशशीवसुंधरा । चिरंजीव विजयी चिरकाळ ॥९६॥
अर्ध्यपाद्यादि पूजन । धूपदीपनीरांजन । परिमळद्रव्य स्त्रकचंदन । षोडशोपचारें अर्चिलें ॥९७॥
जेवीं नभगर्मी निशाकर । तेणें शुभ्र दिसे अंबर । तेवीं मुख्यासनीं जालंधर । शोभायमान दिसती पैं ॥९८॥
जोडोनियां उभयकर । प्रार्थीतसे राजेश्वर । आजि आनंदाचा दिवस थोर । उदय देखिला नाथाचा ॥९९॥
मग चतुर्विध पचवून अन्न । सुवर्णपात्रीं नाना पक्वान्न । नाथासी करविलें भोजन । अतिआदरेंकरोनी ॥२००॥
करशुध्दि अर्पोनि स्वहस्तें । मुखशुध्दि तांबूल देत । मग नाथातें प्रार्थीत । राहावें येथें आजि पैं ॥१॥
उत्तम म्हणून गुरु समर्थ । माध्यान्ह शर्वरी प्रवर्तत । तों उन्मनीसवें समाधिस्त । होते झाले स्वानंदें ॥२॥
होष्य न चुके होणार । बुध्दिभ्रंश राजेश्वर । अनर्थ योजिला दुर्धर । दुर्बुध्दीचे दुर्मदें ॥३॥
ईश्वरी माया हे विचित्र । भवितव्याचें वेगळें तंत्र । पूर्वकर्म ब्रह्मसूत्र । विनाशकाळीं दुर्बुध्दि ॥४॥
पाहा प्रारब्धें बुध्दि विपरित । अविद्यात्मकें घडे अनुचित । भविष्यानुसार येत मनांत । बुध्दि कर्माअन्वय ॥५॥
शमिक ध्यानस्थ ऋषीश्वर । छळी तया परीक्षिती नृपवर । मृतसर्पाचें कलेंवर । कंठी सूदलें तयाचे ॥६॥
स्त्रीबुध्दीचिये बोलें । रामचंद्रा वनीं दवडिलें । साहसकर्म आरंभिलें । साह्या झाले होष्य पैं ॥७॥
कीं जानकीचें वचन । कनकमृगार्थ रघुनंदन । जाता झाला न लगतां क्षण । पुढें अनर्थ वोढवे ॥८॥
तैसा गोपेंदु नृपवर । विचार न करितां अविचार । स्त्रीबुध्दीनें दुराचार । पूर्वकर्म आचरत ॥९॥
न कळतां सिंहासनासहित । नाथास टाकिलें कूपांत । अश्वमळमूत्रें आच्छादीत । अनुचित कर्म केलें पैं ॥२१०॥
जेवीं ज्योतिर्लिंगा पदीं ताडिलें । कीं शिवप्रासाद भग्न केले । सुधारसातें त्यागिलें । मोरियेमाजीं दुर्दैवें ॥११॥
भागीरथीचें जळ सोज्वळ । अमंगळस्थळीं टाकी चांडाळ । तैसें झालें आज केवळ । दुर्मद नृपाळ न जाणें ॥१२॥
असो तुरंगमूत्रगर्ता विशाळ । त्यांत टाकिला गुरुदयाळ । अश्वलिदीचा वरी अचळ । रची तत्काळ निर्दय ॥१३॥
दुर्दैवानें घेतली धांव । प्रवेशे क्रोधाचें राणीव । भूली भ्रांतीचें वैभव । विवेक हाव धरियेला ॥१४॥
अज्ञान घोर निशी दाटली । दुर्दशेची निद्रा आली । गाढ मूढ पडिली भूली । मुमूर्षु सुषुप्त होऊनी ॥१५॥
प्रभात करी जागृत । घडी घडियाळ झणत्कारित । परि ते न होती जागृत । अज्ञाननिद्रासक्त पैं ॥१६॥
पूर्वपुण्याचा अभ्युदय । तेवीं होतसे भास्करोदय । राजमाता शोध पाहे । करिती झाली नाथाचा ॥१७॥
काल ऐकिलें आले येथें । आज न दिसती पाहतां तेथें । नेणो गेले कोण पंथें । न कळे स्थळ नाथांचें ॥१८॥
अंतःपुरीं अंतःकरणीं । राजजननी दुःखित मनीं । विकळ होऊन पडे धरणीं । अश्रु नयनी लोटती ॥१९॥
बारा सोळा सहचरी । आणी द्विपंच चतुर नारी । परमप्रिया नवजणी निर्धारी । चौघी शोधिती नाथातें ॥२२०॥
साहा चार अष्टादश । जया शोधिती असमास । परि ठायीं न पडे तयांस । शिणोनि तटस्थ राहिले ॥२१॥
सात पांच तीन दशक । आणि पंचवीस सम्यक । शोधितां श्रमती निःशंक । ठायीं न पडे तयांसी ॥२२॥
चौर्यांशी लक्ष पाहिली स्थळें । परि न भेटती गुरुदयाळ । बहुसुकृताचें प्राप्त फळ । आजि निर्फळ मज दिसतसे ॥२३॥
कटकटा म्हणे रे परमेष्ठी । काय लिहिलेंस अद्दष्टीं । श्रीगुरुची पडिली तुटी । आटाआटी दुःखाची ॥२४॥
अरळ सुमनसेजेवरी । निद्रा न येचि क्षणभरी । तळमळोनि विकळ सुंदरीं । राजमाता होतसे ॥२५॥
त्यजोनियां राजभोग । ऐश्वर्यसुखाचा केला त्याग । सुमनहार भासे उरग । जेवीं विरहिणी ज्यापरी ॥२६॥
झाली विषयभोगीं उदास । मनी भरलें सुद्गुरुपिसें । अतिउत्कंठित मानस । दर्शनोद्देशें नाथाचे ॥२७॥
नगरी न करी कोणी वार्ता । सर्वही गुंतले प्रपंचस्वार्था । अज्ञान नेणती गुरुसमर्था । हितपरमार्था न जाणती ।\२८॥
नगद्री उल्कापात होती । पाषाणप्रतिमा हास्य करिती । कूपोंतोनि शब्द निघती । नक्षतपात होतसे ॥२९॥
दुर्भिक्ष आणि अवर्षण । दैन्यदरिद्र अकाळीं मरण । गुरुछळणीं दुश्विन्हें । होती झाली तेधवां ॥२३०॥
पुढील कथा परमगहन । पुण्यपावन महदाख्यान । श्रोतें वक्ते होती पावन । अगाध महिमान ग्रंथी हें ॥३१॥
अग्रापासोन मूळपर्यंत । इक्षुदंड गोड बहुत । तेवीं आदिनाथलीलाग्रंथ । शुक्लपक्षन्यायेंसी ॥३२॥
कथास्वर्गी स्वर्धुनी । करितां श्रवणें पातका धुनी । सज्जन श्रोते भगिरथयत्नीं । प्राप्त होय सर्वातें ॥३३॥
कथा गंगाजळ तुंबळ । श्रवणें भेदी पापाचळ । त्रिविध ताप करी शीतळ । कथा कलिमलनाशनी ॥३४॥
आदिनाथलीलाग्रंथभवानी । अष्टादशोऽध्याय आयुधधारिणी । षडविकारदानवदमनीं । प्रण्दवरुपिणी विश्वाद्या ॥३५॥
स्वस्ति श्रीआदिनाथलीलामृतग्रंथ । ग्रंथकर्ता भैरव समर्थ । तत्प्रसादें आदिनाथ । अष्टादशोऽध्याय गोड हा ॥२३७॥
अष्टादशाध्यायीं हेचि गति । अष्टादशभार वनस्पति । कीं अष्टादशाध्यायी सप्तशती । पुराणें वर्णिती जियेतें ॥३६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 07, 2020
TOP