श्रीनाथलीलामृत - अध्याय ९ वा
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
श्रीगणेशाय नमः ॥
आदिनाथ चित्समुद्र । सलीललीलातरंग मत्स्येंद्र । पूर्णपूर्णिमेचा गोरक्ष चंद्र । पाहून भरतें दाटलें ॥१॥
तें पूर्णब्रह्म अपांपतई । पार न पावे वेदश्रुती । जेवीं क्षारसमुद्रीं तृप्ती । तृषाक्रांताची न होय ॥२॥
जेवीं नीरदद्वारेंकरुन । मिष्ट होऊन पिके धान्य । तेवीं सद्गुरुमुखींचे वर्ण । सुधा होति सच्छिष्या ॥३॥
ऐसा सद्गुरु पूर्ण ब्रह्म । तया माझा प्रत्यंगप्रमाण । त्याचे पदाब्जीं निःसीम नेम । भवभ्रमातें हरी जो ॥४॥
प्राज्ञ उद्यानींचा वसंत । शांतिशरत्काळींचा नक्षत्रनाथ । कीं वर्षाऋतूचा चिध्दनवर्षत । तो चिद्गर्भीचा गभस्ति ॥५॥
की प्रत्यक्ष तो बादरायण । कीं द्विनेत्र चतुरानन । तो भाळलोचन पंचवदन । लांछनविहीन विष्णु तो ॥६॥
असो सद्गुरु दीनदयाळ । अष्टमोध्यायीं वदले रसाळ । वटकभिक्षा मत्स्येंद्रबाळ । अर्पिते झाले गुरुसी ॥७॥
बाह्मचक्षूतें त्यागिलें । मग ज्ञानचक्षु प्रगटले । तेणे सर्वांग देखणें झालें । ब्रह्मकटाह सबाह्य ॥८॥
गोरक्ष म्हणे पदीं प्रार्थना । प्रार्थीतसे दयाघना । स्वामी पिंडब्रह्मांडरचना । विराट समाधि ते कैसी ॥९॥
पिंडीची पाहिली प्रचीति । परि ब्रह्मांडींची कैसी गति । पाहावी हें वसे चित्तीं । कृपा करोनि दाविजे ॥१०॥
विराटाचे कूटस्थान । त्याचें सहस्त्रदळ तें कवण । हें पाहावें आपुले नयन । ऐसी इच्छ्दा उदेली ॥११॥
उत्तम म्हणोनि मत्स्येंद्रनाथें । उभय जाती पश्चिमपंथें । तंव पातले क्षीराब्धि तटातें । ते जगद्गुरु महाराज ॥१२॥
तेथें देखिलें उपमन्युस्थान । आश्रम पवित्र शोभायमान । परस्परें करुन नमन । क्षेमालिंगना मिसळले ॥१३॥
अन्योन्य पुसोन स्वागत । नाथाचें केलें परमातिथ्य । तेथून निघते झाले त्वरित । उपदेशस्थान दाविलें ॥१४॥
मत्स्येंद्र म्हणती ये स्थळीं । गिरिजेशीं उपदेशी चंद्रमौळी । माझी उत्पत्ति ते काळीं । होती झाली शिवइच्छें ॥१५॥
पुढें विलोकीट शेषशयन । महाविष्णु आदिनारायण । जया नाभी कंजजजनन । जगदाकार रची तो ॥१६॥
जे आदि सच्चिदानंदद्योतक । तयापासोन भास अनेक । वस्तु होय अनेकीं एक । कनकाळंकार ज्यापरी ॥१७॥
तंतूमाजी पट दिसती । पाहतां तंतूपासाव पटोत्पत्ति । तैसी जाण स्वरुपस्थिति । चिदाभासी व्याप्त तो ॥१८॥
तो नवनीरदघनःश्याम वर्ण । चतुर्भुज झाला सगुण । शंखचक्रगदाधारण । लीलाकमल हस्तकीं ॥१९॥
जो इंदिराह्र्त्पद्ममिलिंद । स्वानंदकंद पूर्णानंद । कोडिमदनाहूनि अगाध । लावण्यसिंधू वेद्यक ॥२०॥
आणिक वासरमणीच्या श्रेणी । तेंवी मकरकुंडलें सुप्रभ श्रवणी । उभयभागी दीप्ति कर्णी । कौस्तुभमणि शशीपरी ॥२१॥
मुक्त माळा गळां डोलती । नक्षत्रन्याय विराजती । कोटिविद्युल्लते दीप्ति । तेवी उत्तरी वस्त्र तें ॥२२॥
कोटिचपळेचा लखलखाट । तेवी कांसे वसे पीतपट । घनश्याम तनु सुभट । चपळ चपळा तळपती ॥२३॥
विशाळ भाळ आकर्ण नेत्र । सरळ नासिक सुहास्य वक्त्र । मृगमदतिलक सुंदर । मणिमय मुगुट विराजे ॥२४॥
शेष लक्ष्मी चतुरानन । ऐसा देखिला जनार्दन । आभानभांकित गगन । दिव्यदीप्ति देखिली ॥२५॥
मत्स्येंद्र म्हणती त्रिकुटस्थान । विराटाचें हेंचि लक्षण । येथून भानुमंडल भेदून । करुन आनंदी सुखावें ॥२६॥
आतां करी भानुचक्रभेद । तेथे होशी तूं अभेद । तये स्थानी पूर्णानंद । अनिर्वाच्य होय ते ॥२७॥
गोरक्ष योगमार्गगती । ब्रह्मांडसमाधीचें आर्ती । पाहूं जाती परंज्योती । जया ध्याती महर्षि ॥२८॥
अकार हरपलें स्थूल । उकाराचा लय सकळ । मकारातें महामंडळ । अर्धमात्रा समरस ॥२९॥
जें चहूं शून्याहूनि पर । जें परात्पर अगोचर । तेंचि स्वरुप निराकार । विकाररहित होय तें ॥३०॥
तेथें कैचा भेदभास । चिदानंदीं समरस । देशकाळवस्तु अविनाश । आभासभासा वेगळें ॥३१॥
ते अलक्ष गोरक्षा समाधि । अहंदेहीं हरपली बुध्दि । परिपूर्ण भरला स्वानंद उदधि । अक्षयपदींचा अधिकारी ॥३२॥
कैवल्यसाम्राज्य आले हातां । तेथें भेदाची कायसी वार्ता । तेथें ध्येय आणि ध्याता । पाहतां पाहणें उरेना ॥३३॥
कीं लवणाचा पुतळा । समुद्री जेवीं सामावला । पाहूं जातां तयाला । नसे उरला द्वैतासी ॥३४॥
कीं सागरगंगासंगम । तेवी जीवशिवात्मक आत्मयोग । तेथें द्वैताचा नसे भाग । योगी लाग जाणती ॥३५॥
असो यापरी ब्रह्मांडस्थिति । गोरक्षा लाधली योगगति । मग तेथून मत्स्येंद्रयति । जाते झाले स्वइच्छें ॥३६॥
पर्यटन करितां सिध्दगती । पातले एका नगराप्रति । परमपवित्र तेथें नृपति । अपार कीर्ति जयाची ॥३७॥
नैषध देशींचा नृपनाथ । सुदर्शन नामें परमविख्यात । शत्रुदमनीं वैवस्वत । दुजा बिडौज भूमंडळीं ॥३८॥
तया भार्या उभय असती । लीलावती आणी मालती । कनिष्ठेवरी अतिप्रीति । लीलावतीतें त्यागित ॥३९॥
अलय बांधोनि नगरानिकटीं । रम्य रमणिय पुष्पवाटि । तेथें ठेविली ते गोरटी । जेवीं जानकी असोकीं ॥४०॥
परि ते मास पक्षाची गर्भीण । असोन करी स्वधर्माचरण । देवतार्चन तुळसीसेवन । अतिथिभोजन देतसे ॥४१॥
एके दिवशीं मत्स्येंद्रनाथ । भिक्षेस आले अकस्मात । द्वारीं अलक्षोच्चार करीत । स्वयें आणीत भिक्षेतें ॥४२॥
नमन करोन अर्पी भिक्षान्न । स्वामी वदती अभयवचन । पुत्र होईल तुजलागोन । चिंरंजीव चिरायु ॥४३॥
शकुनग्रंथी बांधोन पदरीं । येती झाली स्वमंदिरीं । निश्चय निःसीम नाथावरी । दृढसंकल्प जियेचा ॥४४॥
पाहून एकरुप भावार्थ । प्रत्यहीं भिक्षेसी नाथ येत । तिचा नेमनिश्चयार्थ । कसून पाहात सद्गुरु ॥४५॥
नाथांचे न होतां दर्शन । न करी अशन उदकपान । अहर्निशीं नि:सीम ध्यान । सदा चिंतन तयाचें ॥४६॥
अकाळकाळीं भिक्षेस जाये । निर्धार सतीचा पाहात आहे. भिक्षेस न येतां पाहे । उपोषित राहे ते दिनीं ॥४७॥
प्रातःकाळीं माध्यान्हकाळीं । सायंकाळीं निशिकाळी । जेवी नभ चातक न्याहाळी । तेवीं मार्ग विलोकी ॥४८॥
भलतेच समयीं येवोन । स्वामी मागती भिक्षान्न । आधी ठेवी सिध्द करोन । मागतां अर्पी तयातें ॥४९॥
कोणे एके दिवसीं जाण । करीत असतां मंगळस्नान । तो अकस्मात प्रगटोन । अलक्ष शब्द गाजवी ॥५०॥
नग्नांगीं अंगना ये सत्वर । वृत्ति झाली तदाकार । देहाचा पडोन्नि विसर । अव्यग्र भिक्षा नेतसे ॥५१॥
नाथमाया परमगहन । इतें पाहती झणी नग्न । आंगीं वेष्टिलें दिव्य वसन । दैदीप्यमान निर्मिलें ॥५२॥
जेवीं द्रौपदीतें वस्त्र । देता झाला पंकजनेत्र । लीलावतीतें मत्स्येंद्र । तेवी देता दयाळू ॥५३॥
भोजनसमयीं याज्ञसेनी । वाढीत असतां दुर्जनश्रेणी । अकस्मात बिरडे तुटोनी । मुक्त झाली कंचुकी ॥५४॥
भक्ताभिमानी गरुडध्वज । द्रौपदी केली चतुर्भुज । अधोक्षजें राखिली लाज । दुर्जन अधोमुख लक्षिती ॥५५॥
दुर्वासें छळिलें पंडूतनुज । तत्काळ धांवे गदाग्रज । तो सच्चिदानंदमहाराज । उत्पन्न अन्नें पैं केली ॥५६॥
तैसी लीलावतीस लील । सद्गुरुनाथ दाखविता झाला । जन पाहती सर्व डोळां । कळा अतर्क्य जयाची ॥५७॥
मानवलोकीं वस्तु दुर्लभ । वस्त्र प्रकाशमय दिसे नभ । दीप्ति दैदीप्य सुप्रभ । अलभ्य लाभ पावली ॥५८॥
अत्यद्भुत भावनाभक्ति । म्हणोनि तीतें मत्स्येंद्रप्राप्ति । सदा निरंतर गुरुदास्यवृत्ति । धन्य स्थिति तियेची ॥५९॥
काया वाचा आणि मन । अहर्निशीं सद्गुरुध्यान । सदा चित्तीं चिंतन । गुरुवीण आन असेना ॥६०॥
असो भिक्षा करोन अर्पण । सदृष धरी नाथचरण । मत्स्येंद्र करिती तेथूनि गमन । मनोवेगेंकरोनि ॥६१॥
इकडे मालतीतें वार्ता श्रुत । लीलावतीतें मत्स्येंद्रनाथ । अमौल्य पीतांबर अर्पित । जो कां दुर्लभ या लोकीं ॥६२॥
सापत्नभाव द्वेष चित्तीं । अमौल्य वस्तूची तीतें प्राप्ति । तेणें तळमळ विकल चित्ती । द्वेष उत्कर्ष वाढला ॥६३॥
तंव राव सभा विसर्जोनी । येता झाला शय्यास्थानी । तों नेत्रारक्त सरोष राणी । पाहोनि पुसे तियेतें ॥६४॥
काय झाले काय कारण । कां आजि झालें दुश्चित मन । दुर्घट संकट आहे कोण । तें मजप्रति निवेदी ॥६५॥
येरी वदे कुळलांछ्न । डाग लागला प्राक्तनेंकरुन । संभावितासी होय मरण । दुराचरण दिसतसे ॥६६॥
प्रत्यहीं भिक्षेस येत अतिथि । कानफाडा नाथपंथी । त्यातें संलग्न लीलावती । अनुचित दिसे लौकिकीं ॥६७॥
दिव्य दैदीप्य विद्युल्लतेपरी । पीतांबर अर्पिला निर्धारीं । अमौल्य काय वदूं वैखरी । कोठोनि आणिला नेणवे ॥६८॥
ऐकोनि कोपला सर्वेश्वर । म्हणे आणा पाहूं कैसें वस्त्र । आणीता जाणवेल विचार । कापटय किंवा कैसे तें ॥६९॥
अंत:पुरींच्या स्त्रिया धूर्त । सवें द्यावे चतुर भृत्य । तिचें पाहोनियां कृत्य । वस्त्र आणा सत्वर ॥७०॥
आज्ञा होतां ते समयीं । दूत पावले अंतर्गृहीं । दूतिका येवोन्नि लवलाही । प्रार्थित्या झाल्या तियेतें ॥७१॥
तंव ते बैसली ध्यानस्थ । मानसपूजा एकाग्र एकांत । नासाग्रीं मुद्रा तटस्थ । निमग्न रत स्वरुपीं ॥७२॥
चित्त चैतन्य़ीम सामावलें । ब्रह्मानंदीं लीन झालें । ज्ञप्तिरुपें मात्र उरलें । उरलें सरलें तयानें ॥७३॥
अखंड दंडायमान मन । तें मनचि झाले उन्मन । तेथें कैचें ध्येय ध्याता ध्यान । द्वैतभान मावळे ॥७४॥
मीतूपणासी नसे ठाव । तो तंव देहभाव झाला वाव । राजयोगाचें हें वैभव । अनिर्वाच्य सांगतां ॥७५॥
असो दूतदूतिका विनविती । चित्ती पाहती विदेहस्थिति । दारुप्रतिमा तटस्थवृत्ती । देहभास भासला ॥७६॥
उशीर लागला म्हणून । दुसरे सेवक प्रेरिले जाण । तेही राहिले गुंतोन । तटस्थपणें तिष्ठती ॥७७॥
तों दुजा सेवक सत्वर । नाम तयाचें दुर्धर । परम दुष्ट दुराचार । कीं दुःशासनचि दुसरा ॥७८॥
राव त्यातें आज्ञा करी । तुवां जाऊन तेथवरी । तिची सर्वथा भीड न धरी । येथें आणी ममाज्ञा ॥७९॥
अवश्य म्हणे तो दुर्मति । शीघ्र जाय सत्वरगती । तीतें म्हणी तुज नृपतीं । पाचारिलें अविलंबें ॥८०॥
तंव सती नेदी प्रतिवचन । मग काय करी तो दुर्जन । मस्तकीचा अंचळ वोढोन । वेणी धरी दुष्ट तो ॥८१॥
स्पर्श करितां ते वेळां । वस्त्रातून निघती अग्निज्वाळा । भडभडाटे जेवीं चपळा । आंगीं खडतर झोंबती ॥८२॥
जेवीं मुचुकुंदशरीरीचें वसन । काढितं दग्ध काळयवन । कीं दमयंतीचे शापेंकरुन । भस्म झाला निषाद ॥८३॥
तैसा जळाला दुर्मद । जेवीं शंक्दरक्षोभें काम दग्ध । नाथ महिमा अगाध । लीलावतीचा अभिमानी ॥८४॥
हाहाःकार एकचि झाला । महाकल्पांत वोढवला । नृपाळ बहुत घाबरला । मत्स्येंद्रमहिमा देखोनि ॥८५॥
जेवीं अनुष्ठानसिध्द काळ । देवता प्रगटे तत्काळ । तेवीं मत्स्येंद्र उतावेळ । येते झाले सद्गुरु ॥८६॥
नृप धांवून लागे चरणीं । त्राही त्राही आननीं ध्वनी । मां पाहि पाहि इहीं वचनीं । सद्गद होऊन वदतसे ॥८७॥
भावें जोडोनि उभयकईर । प्राथीतसें वारंवार । मी परम पतित दुराचार । करा उध्दार पैं माझा ॥८८॥
मग मालती राणी येऊन । मत्स्येंद्रातें शरण अनन्य । म्हणे दीनातें उध्दरोन । पावन करणें मज आतां ॥८९॥
मी अधम अपराधाची खाणी । मज त्राता नसेचि या त्रिभुवनीं । म्हणोनि ठेवी पदीं मूर्ध्नि । दंड करा मज म्हणतसे ॥९०॥
स्वामी वदत ऐक माते । तूं शरण जाई लीलावतीतें । ते क्षमा करी अपराधातें । निश्चयातें जाण तूं ॥९१॥
मग लीलावतीचें चरणकमळ । धरिती झाली ते वेल्हाळ । पदीं ठेवूनियां भाळ । म्हणे अपराधी मी जननीये ॥९२॥
ते महासाध्वी पतिव्रता । कदा नेणे द्वैतवार्ता । ऐसें न करी तो पुन्हा आतां । सद्गुरु समर्था भजावें ॥९३॥
सवें विनवी बध्दकरि । उपदेश देऊन मज उध्दरीं । दयासिंधु दया करी । दीनावरी ये वेळे ॥९४॥
यावरी मत्स्येंद्र वदती वाणी । गोरक्ष येईल ये स्थानी । तो उध्दरील तुम्हांलागोनी । मनी निश्चय असो द्या ॥९५॥
यावरी प्रार्थी लीलावती । हा दुर्मति गेला अधोगती । यासी द्यावी उत्तमगति । पुनरावृत्ति चुकवावी ॥९६॥
ऐकोन म्हणती मत्स्येंद्रनाथ । जैसें जयाचें संचित । तैसी क्रियमाण क्रिया होत । आपुलें केलें फळ पावे ॥९७॥
लीलावती देत प्रतिवचन । कृतार्थ होत तव दर्शनें । ऐसे दर्शनमहिमान । तें काय असत्य होईल ॥९८॥
संचित क्रियमाण प्रारब्ध । तुमचे स्मरणें होती दग्ध । सद्गुरुमहिमा अगाध । शेषही वर्णू न शकेचि ॥९९॥
नसे गुरुकृपें काळवेळ । गुरुकृपें जिंकूं कळिकाळ । गुरुकृपें स्वानंदसोहळे । प्राप्त होतसे पैं ॥१००॥
लोहशस्त्रेंकरोन । परिसासी केलें जरी ताडण । किंवा केलिया अर्चन । सुवर्ण करणें निजधर्म ॥१॥
ईश्वरी वैर किंवा शरण । जेवीं चुकवी जन्ममरण । गजनक्ता होतां दर्शन । स्वयें प्राप्त होय दोघां ॥२॥
कीं एकीं लाविला तरुवर । एक घाव घाली निष्ठुर । परी उभयांस एकसर । छाया अभेद ज्यापरी ॥३॥
एकीं दीप प्रदीप्त केला । तयावरी प्रकाश केला । तस्करासी अपार झाला । अभेद प्रकाश पैं ॥४॥
जेवीं गंगोदक सुवर्ण पात्रीं । की मृण्मयकलशामाझारी । पवित्रपणें निर्धारी । अभेद पैं जाणावें ॥५॥
तैसे सज्जन आणि दुर्जन । तुम्हांप्रति समसमान । आतां यासी उध्दरोन । करावें पावन समर्थे ॥६॥
यापरी परिसोन म्लानोत्तर । हेलावला दयासागर । कृपादृष्टीं मत्स्येंद्र । अवलोकिती तयातें ॥७॥
जेवीं निद्रिस्त होय जागृत । तैसा उठता झाला त्वरित । भस्मांतूनि अकस्मात । प्रगट होत सत्वर ॥८॥
एकचि झाला जयजयकार । समग्र पाहती नारीनर । राव होय हर्षनिर्भर । आनंद थोर वर्तला ॥९॥
दुर्धर येऊण पदाब्जी । षट्पद होऊन घाली रुंजी । म्हणे धन्य धन्य श्रीनाथजी । उध्दार केला पैं माझा ॥११०॥
स्वामीचे दर्शनेंकरुन । मज जन्मांतरीचें झाले ज्ञान । अनेक केलें दुष्टाचरण । दुष्ट देह पावलों ॥११॥
वृक व्याघ्र सर्प तामस । हे जन्म घेतले बहुवस । जीवनाथ असमास । हत्या घडल्या बहुतचि ॥१२॥
आतां नरदेहातें पावून । मज न घडलें कांहीं साधन । मज घडलें गुरुभक्तछ्ळण । तेणें दंड पावलों ॥१३॥
माझे गुणदोष अगणित । चित्रगुप्त झाले थकित । म्हणोनि घेतलें देहांत । पुनर्जन्म पावलों ॥१४॥
आजन्म दोषाचे गिरिवर । गुरुकृपेचेम होऊनि वज्र । भग्न झाले एकसर । अगाध सामर्थ्य जयाचें ॥१५॥
स्वामी कृपाअवलोकनें । मज केलें पुन्हा निर्माण । मी काय होऊं उत्तीर्ण । जगद्गुरुचे ये वेळीं ॥१६॥
मग आरंभिता झला स्तुति । जे मत्स्येंद्रनाथ चक्रवर्ति । जगदोध्दाराचे आर्ती । अवतार घेसी गुरुवर्या ॥१७॥
नमूं आदेश देशरहिता । पूर्णब्रह्मा मायातीता । तूं सायुज्यपदाचा दाता । गुरु समर्था दातारा ॥१८॥
नमो कामगजविदारणा । क्रोध अहिनिक्रंदना । लोभारण्य अग्निदहना । मत्सरछेदना मत्स्येंद्रा ॥१९॥
मदनदहन मदनांतका । त्रितापहरणा त्रिपुरांतका । अविद्यानाशक भद्रकारका । चित्सुखदायका श्रीमूर्ति ॥१२०॥
आतां विनवी स्वामीप्रति । पुन्हा नसाव्या जन्मपंक्ति । जन्ममृत्यूच्या विपत्ति । किती आतां भोगाव्या ॥२१॥
कैचा प्रपंच कैचें घर । मिथ्या मायेचें वोडंबर । विषयासक्त होऊन नर । क्षणिक सुखातें आतुडती ॥२२॥
लिंगदेहाचा करुनि नाश । अविद्येचा तोडवी पाश । जीवदशेचा भेदभास । अविनाशपदीं मेळवी ॥२३॥
यापरी परिसोन विनवणी । वद्ती मत्स्येंद्र अभयवाणी । उदित झालासी दीक्षाग्रहणीं । तरी अर्पितो तुजलागीं ॥२४॥
मग उपदेशिला निगममंत्र । मुद्रा श्रृंगी योगसूत्र । दिव्यदीक्षा पवित्र । देते झाले सद्गुरु ॥२५॥
मस्तकीं ठेवूनि वरदहस्त । नाम ठेविलें दुर्धरनाथ । आज्ञापिती करीं तीर्थ । तेथें भेटती सिध्द पैं ॥२६॥
राजा म्हणे उठाउठी । चमत्कार देखिला दृष्टीम । वसिष्ठें सूर्यरथीं छाटी । प्रकाशविली प्रतापें ॥२७॥
याज्ञवल्कीचे मंत्राक्षतीं । शुष्ककाष्ठा पल्लव फुटती । तैसी भस्में संभूतीं । दिव्य देहीं प्रगटला ॥२८॥
धन्य धन्य सिध्दप्रताप । दर्शने जाय त्रिविधताप । सद्गदित होऊन नृप । वेळोवेळां वंदित ॥२९॥
अद्भुत लीलावतीचा भाव । प्राप्त झालें नाथवैभव । ब्रह्मांडीं कीर्तिगौरव । सार्थक केलें देहाचें ॥१३०॥
प्राप्त प्रसाद वसन । आणि दुर्धर करविला पावन । नेणोन सतीचे महिमान । छळ केला न कळतां ॥३१॥
आतां मीही कैसा तरेन । रोमांच आंगी होय स्फुरण । प्रेमाश्रु नेत्रीं विमळजीवन । कंथ दाटे तयाचा ॥३२॥
जरी कांतेसी जावें शरण । हेंही लौकीकी विलक्षण । मग सदृढ निश्चयेंकरुन । धरी चरण गुरुचे ॥३३॥
ह्रदय झाले सद्गद पोटीं । मंत्र दिधला कर्णपुटीं । तुझी सरली आटाआटी । जन्मराहटी चुकविली ॥३४॥
मग प्रार्थीतसे मालती । मत्स्येंद्र तीतें आज्ञापिती । तुज उध्दरी लीलावती । तीतें शरण जाय तूं ॥३५॥
विषमभाव न धरी अंतरीं । शुध्दमनें सेवा करीं । पुत्र होईल निर्धारी । पराक्रमी विजयी तो ॥३६॥
एकभावें एकाच चित्ती । तुम्ही असावें अभेदप्रीतीं । ऐसें सांगून तयांप्रति । मत्स्येंद्र जाती तेधवां ॥३७॥
नृपे सोडून राज्यभार । अमात्य करिती कारभार । मांडलिक देती करभार । प्रजा रक्षिती स्वभावें ॥३८॥
अतिथी पूजून झाला लाभ । यास्तव करितांचि आरंभ । चढावेढीं होत लाभ याचकातें गौरवी ॥३९॥
विप्रां देऊनि अग्रहारें । ठायीं ठाय़ीं अन्नछत्रें । शिवप्रासाद विष्णुमंदिरें । तडाग मठिका वापिका ॥१४०॥
कोणी याचक न जाय विन्मुख । देशोदेशी गाजली हाक । लीलावती परमधार्मिक । दिगंत कीर्ति जाहली ॥४१॥
असो यापरी स्वधर्माचरण । नाथार्चन आणि संतर्पण । शुक्लपक्षचंद्रन्यायेंकरुन । धर्मवर्धन करीतसे ॥४२॥
प्रत्यही घालवी सत्काळ । प्राप्त झाला प्रसूतिकाळ । अलभ्याचा लाभकाळ । प्राप्त वेळा आली पैं ॥४३॥
नवमास भरतां जाण । पुत्र जन्मला परम सगुण । परम सुखरुप लावण्य । मीनकेतन दुसरा ॥४४॥
गुढिया तोरणें मंगलोत्सव । मंडप उभविले अतिअपूर्व । याचकांचा अतिगौरव । धनें वसनें अर्पिती ॥४५॥
जातकर्म नामकरण । ब्रह्मानंद वोढवला परम । चंद्रचूड ठेविलें नाम । शर्करा वाटिल्या समस्तीं ॥४६॥
लीलावती पुत्रवंती । पाहून संतोषे मालती । अक्षयवाणें स्त्रिया करिती । हरिद्राकुंकुम पैं ॥४७॥
शुध्दपक्षीचा जेवीं चंद्र । तैसा वाढें राजकुमार । तों मालतीतें दिव्य पुत । होता झाला तेधवां ॥४८॥
वाद्ये वाजतीं मंगळतुरे । दिव्य मंडप तोरणें मखरें । जातकर्म नामसंस्कार । शर्करा गजरें वाटिती ॥४९॥
सुभद्र ठेविलें नामाभिधान । उभय दिसती ज्येष्ठसान । अनर्ध्यरत्नें रत्नभूषण । बाळलेणीं लेवविती ॥१५०॥
दोघे दिसती किशोर । एक राम की सौमीत्र । कीं एक शशि एक मित्र । बालार्क ते उगवले ॥५१॥
चिमणे वाहन विराजती । सवें चिमणे सेवक शोभाती । चिमणे सहचर असती । चिमणीं आयुधें गोजिरीं ॥५२॥
यापरी कुमार सकुमार । कमनीय स्वरुपें ते किशोर । उपनयनसंस्कारानंतर । विवाहयोजना योजिती ॥५३॥
इंद्रपुर नामे नगर । तेथील चित्रवीर्य नृपवर । उभय कन्या अतिसुंदर । उपवर होती तयाच्या ॥५४॥
परमसुंदर लावण्यखाणी । त्यांतें देखोनि लाजती पद्मिणी । चातुर्य सौंदर्य त्यांलागोनि । विरंचीनें निर्मिले ॥५५॥
रुपवती गुणवंती । नामे ठेविली कन्येप्रति । त्यांवरी रायाची बहुप्रीति । समीप असती सर्वदा ॥५६॥
त्यांचें सौंदर्य आणि सद्गुण । पाहून नृपाचें चित्त उद्विग्न । यांसीं वर योग्य असे कोण । भूमंडळांत दिसेना ॥५७॥
अमात्य मंत्री पुरोहित । भूपाळ तयांते विचारीत । यांतें वरयोजना करावी त्वरित । कुळशीळ नृपवर्य ॥५८॥
मंत्री म्हणे पाहिले सर्व । कोठें समसमान न देखूं उभय । परी एकस्थळीं अति अपूर्व । उभय पुत्र असती ॥५९॥
ऋणानुबंध मुख्य कारण । जरी असे ब्रह्मसूत्र प्रमाण । तरीच साध्य होती जाण । प्रयत्न करुं तयांचा ॥१६०॥
सुदर्शनाचे उभय नंदन । रुपाथिले प्रतिमदन । सर्व लक्षणीं सुलक्षण । सगुणगुणी देखिले ॥६१॥
कुळशीळ गोत्र घटित । वाड्.निश्चया जातों तेथ । स्थळ योग्य तेचि दिसत । शरीरसंबंध करावया ॥६२॥
ऐकोनि संतोषला नृपवर । म्हणे वधूयोग्य तेचि वर । पाहोनियां राशिनक्षत्र । तिथिनिश्चय करावा ॥६३॥
पुरोहिता मूळ पाचारुन । प्रेषिता झाला नृप आपण । समारंभें आणिलें जाण । सीमंतपूजनीं ते वेळां ॥६४॥
राव सामोरा जाऊन त्यांतें । पाहता झाला उभय जामातांतें । सुखसमुद्रा पातलें भरतें । वारंवार विलोकी ॥६५॥
यथाविधी पाणिग्रहण । रायें वोपिलें अपार आंदण । गज वाजी रथ सुखासन । दासदासी इत्यादि ॥६६॥
याचकांतें धन अपार । द्रव्यकोश फोडोनि धनसंभार । देऊनि तोषविले विप्र । कीर्तिप्रसर होतसे ॥६७॥
चारी दिवस लग्नसोहळा । होता झाला ते वेळां । उभय जामातां पाहून डोळां । संतोष नृपाला होतसे ॥६८॥
निरोप मागून वधूवर । प्रवेशले आपुले नगर । मंगळ वाद्य तुरे गजर । इंदिरापूजन पैं केलें ॥६९॥
लीलावती आणि मालती । स्नुषा पाहोनि हर्षती चित्तीं । रुपवती आणि गुणवंती । अति आवडती तयांतें ॥१७०॥
नगरनागरिक सर्व जन । म्हणती निर्मिला विधीनें । सौंदर्ये रतिमदन । तैसें भासती आम्हांतें ॥७१॥
कांहीं दिवस लोटल्यावर । होणार न चुके अणुमात्र । रायाचा जो कनिष्ठ पुत्र । सुभट नाम जयाचें ॥७२॥
तो जाता झाला वनविहारीं । चतुरंग सेना दळभारीं । मृगया खेळतां सहपरिवारीं । सहचर सवें सन्निध ॥७३॥
तंव देखिला तडाग सुंदर । माजी कमळें श्वेत शतपत्र । भोवते वृक्ष मनोहर । परमहस्य रमणिक ॥७४॥
समवय ते वयस्क । रहस्यारहस्य विनोद कौतुक । करिती तेथें एकमेळ । तो अर्क अस्ता पावला ॥७५॥
तेथेंचि राहती उपवनी । शिबिरें उभविली तये स्थानी । मृगमांसादि पक्वान्नी । भोजनीं बैसले सर्वही ॥७६॥
अन्योन्य अन्नें झुगारिती येरयेराम अपशब्द वदती । कोण वारी तयांप्रती । राजपुत्र म्हणोनि ॥७७॥
मुख्य प्रभूचा अविचार । मग प्रजेसी कैचा विचार । आधींच तस्कर दुराचार । साह्य नृपवर मग तयां ॥७८॥
असो भोजनें झाल्या समग्र । तांबुलादि उपचार । परिमळ सुमनालंकार । ग्रहण करिती सर्वही ॥७९॥
तों तंव वसंतऋतूचा दिवस । धर्मे डौरले असमास । स्त्रकचंदन गृहांत सुवास । चर्चियेलें सर्वांनीं ॥१८०॥
तडाग विस्तीर्ण एक योजन । निरभ्र चंद्राचे स्वच्छ किरण । प्रकाश पडे अतिसघन । पूर्णा तिथि ते पौर्णिमा ॥८१॥
दूतां आज्ञापी राजनंदन । नौका आणावी त्वरेंकरुन । सेवकांतें आज्ञा प्रमाण । द्रोणी आणिली तयांनी ॥८२॥
अरोहण करिती नौकेआंत । माजीं वारांगनांचें नृत्य होत । हडपी करतांबूल देत । हर्षयुक्त सर्वही ॥८३॥
करिती हास्यगीत विनोद । नाना कौतुकें गद्यपद्य । जेवी उचंबळे ब्रह्मानंद । तेवीं संतोष मानिती ॥८४॥
पाहा प्रारब्धगति विचित्र । जळी क्रीडे राजपुत्र । होणार भविष्य स्वतंत्र । भोगिल्यावीण न सोडी ॥८५॥
नौका जाय आनंदेंकरुन । पुढें ओढवलें महाविघ्न । हानि मृत्यु यशलाभ जाण । काळपरत्वें होतसे ॥८६॥
कीं दुग्धघट परिपूर्ण । त्यांत पडे जेवीं लवण । कीं पीयुषीं विष निर्माण । होतें झालें ते समयीं ॥८७॥
जळामाजीं जळदैवतें । अप्सरा सप्त वास करीत । परम उग्र ती शोभित । तामस क्रोधें खवळलीं ॥८८॥
तडाग सुह्र्द परम सखोल । जेंवीं खळाचें मानस न कळे । असो तें जळ अतितुंबळ । अंत नसे तयाचा ॥८९॥
अवले अवलिती ते वेळीं । अकस्मात मध्यें नौका बुडाली । हाहाःकारे हाक गाजली । कृतांत वोढवे ज्यापरी ॥१९०॥
तडागतटाकीं होतें कटक । बोभाइले करिती शोक । अपार वोढवलें तयां दुःख । सेवक रुदन करिताती ॥९१॥
कैवर्तक जळीं बुडया देती । परि पार न लगे तयांप्रती । उदकांमध्यें शोध घेती । बहु शिणती ते वेळीं ॥९२॥
वार्ता वार्तिक जाणविती । वर्तला वृत्तांत निवेदिती । लीलावती आणि मालती । सत्वर येती ते स्थळीं ॥९३॥
धबधबा बड्विती वक्षस्थळ । भूमी त्राहाटिती सभाळमौळ । भडभडां वाहे रक्त तुंबळ । जळसंगम होतसे ॥९४॥
उभ्या घाई उभयतां रुदन करिती लावण्यसरिता । म्हणती कोण धांवे ये आकांता । नसे त्राता आम्हांतें ॥९५॥
माझिया कुमारा सकुमारा । कोठें गेलासी सहचर विहारा । सत्वर येई माघारा । मार्ग तुझा पाहतसें ॥९६॥
अहा बाळा माझिया सगुणा । टाकोनि गेलासी कवण्य़ा वना । स्तनीं दाटला माझिया पान्हा । कवणा पाजूं ये काळीं ॥९७॥
माझिया तान्हया राजसा । सकुमारा प्रियपाडसा । जेवीं हरणी पडे फांसा । दाही दिशा विलोकी ॥९८॥
माझा स्नेहाळ बाळ मराळ । उडोन गेला कोठें न कळे । मज मृगीचें पाडस चुकलें । कोठें पाहूं तयातें ॥९९॥
म्यां लीलावतीचें केलें छ्ळण । म्हणोन गेलें माझें निधान । की मत्स्येंद्रद्रोह घडला म्हणून । निधान पडिलें जळीं ॥२००॥
कीं जन्मांतरीचें दुराचरण । उभे ठाकलें दुष्टप्राक्तन । म्हणोन उदेलें महाविघ्न । निर्वाणसमय पातला ॥१॥
पंक्तिभेद किंवा हरिहरभेद । यास्तव पुत्रशोक दुःख अगाध । की रिक्त गेले याचकवृंद । महतखेद यास्तव ॥२॥
किंवा करितां शिवपूजन । मध्येंच त्यागिलें उन्मत्तपणें । कीं साधूंचें केलें छळण । म्हणोन दुःख दुर्घट हें ॥३॥
या जळीं हरपलें मुक्ताफळ । दुदैव हें दुष्ट दुर्दैव खळ । येणें हरिला माझा बाळ । तडागजळ काळ हें ॥४॥
कोणी नाम ठेविलें जीवन । जीवचि घेतें जीव प्राण । ऐकोन पक्षी करिती रुदन । करुणावचन परिसोनी ॥५॥
पुष्पावतीचा सुवास । उडोन गेला नभास । निर्माल्य होऊनि उदास । इतें आतां काय करुं ॥६॥
ही लावण्यसरोवरमराळिका । सद्गुणवल्लीची सुवेलिका । पाहतां हिच्या वदनशशांका । ग्रहणीं ग्रस्त काळिमा ॥७॥
लीलावती म्हणे माय । शोक करिसी व्यर्थ काय । यासी करी कांही उपाय । महत्कार्य होय जें ॥८॥
जेणें अर्पिला तो पीतांबर । जेणें जीवविला तो दुर्धर । त्याचे पदीं धरीं निर्धार । तो काय एक न करीचि ॥९॥
दुःखदुस्तर हा भवसमुद्र । त्यांत त्राता सद्गुरु मत्स्येंद्र । अभद्राचें करणार भद्र । श्रीगुरु महाप्रतापी ॥२१०॥
यावरी वदे सुदर्शन । सद्गुरुपदी असावें मन । विचारें करावें समाधान । व्यथे तळमळ कासया ॥११॥
आप्ण योजावा उपाय । तेथें प्रारब्ध करी अपाय । ईश्वरेच्छेनें होय जाय । खेद काय करोनियां ॥१२॥
काय होईल ते पाहावें । भगवच्चिंतनी सर्वदा असावें । नित्यानित्य विचारावे । मन लावावें गुरुपदी ॥१३॥
अर्थजिज्ञासु अर्थाअर्थी । तेंवी सुदर्शन दर्शनार्थी । वैराग्ययुक्त विरक्ति । तादात्म्यवृत्ति मत्स्येंद्रीं ॥१४॥
भृंगकीटकन्यायापरी । अध्याय सदा दिवारात्रीं । चातकन्याय मार्ग नेत्री । सद्गुरुचा लक्षिती ॥१५॥
यावरी चंद्रचूड आणि प्रधान । करिते झाले शांतवन । म्हणती करा व्रताचरण । तेणें लाभे सर्वही ॥१६॥
सुदर्शन उभय कामिनी । राहती झाली तये स्थानी । तेथें शिवालय स्थापोनी । प्रशस्त प्राकाराप्रासादी ॥१७॥
शिवद्वारीं मंगळतुरे । चतुर्दश विष्णुमंदिरें । दिव्य उभविली दामोदरें । अन्नछत्रें पैं तेथें ॥१८॥
अतिथि न जाय विन्मुख । देशोदेशीं गाजली हाक । हाटबाजार वेव्हारिक । घडामोख वस्तूंची ॥१९॥
लीलावती म्हणे मालती । मत्स्येंद्रव्रती धरीं प्रीति । ऐक एकाग्र कथा निगुती । तुजप्रति सांगते ॥२२०॥
गुरुवारीं करीं निरशन । अरुणोदयीं करीं स्नान । तडागनदीतीरीं जाऊन । पूजन करीं सद्भावें ॥२१॥
कुंकुमें पद्मपत्रीं । सुरेख मूर्ति रेखावी साजिती । ती अर्चोनि षोडशोपचारीं । दिवा मौन असावें ॥२२॥
उभय पादुका प्रथम दिवसीं । पदद्वय तें उत्तरोत्तरेसी । चंद्रवृध्दि न्यायेंसीं । पदद्वय वाढवी ॥२३॥
रात्रीं करावा जागर । कीर्तन श्रवण भजनगजर । निशी सरल्यानंतर । उत्तरपूजा करावी ॥२४॥
यथाविधी संपादी व्रत । येणें सिध्दि होय त्वरित । उपदेशोनि मूळमंत्रातें । येणें कृतार्थ होसी तूं ॥२५॥
यापरी अनुष्ठान । हे इष्ट श्रेष्ठ आराधन । नष्ट कष्ट अरिष्ट विघ्न । उत्कृष्ट साधन हे असे ॥२६॥
आणिक दिधले नवनाथयंत्र । पूजाविधि निवेदी समग्र । अनुष्ठानीं योजिले विप्र । जपाभिषेक करिती ते ॥२७॥
इकडे काय झाला वृत्तांत । सुभद्र बुडाला जळांत । अप्सरा पाहोनि त्यातें । कामातुर जाहल्य़ा ॥२८॥
राजपुत्र सुलक्षण । पाहून वेधल्या पंचबाणें । मंदिरी आणिती प्रीतीकरुन । तया लागी तेधवां ॥२९॥
सुवर्णमंदिरें रत्नखचित सुप्रभ प्रकाश लखलखित । तेथें आणिला राजसुत । दिव्य भोग अर्पिती ॥२३०॥
तयातें नेवोनि एकांति । नेत्र कटाक्षें खुणाविती । तया विकार न ये चित्ती । कालत्रयीं जाणिजे ॥३१॥
म्हणी तुम्ही देव मी मानव । कैसा करुं अन्याय । तुम्ही माता मी तनय । सहजा कर्म घडेना ॥३२॥
धन्य धन्य तेचि पुरुष । लावण्ययोषिता स्वसंतोषें । शरण आलिया धरितां त्रास । तोचि गुरुपुत्र निश्चय ॥३३॥
तयातें वदती अप्सरावचन । काया वाचा आणि मन । आम्ही तूंतें वश्य होऊन । आम्हा त्यागिसी शतमूर्खा ॥३४॥
सर्वास मारिलें तत्काळ । तुज रक्षिलें हे काय फळ । मग म्हणती टाका गे बंदिशाळे । कारागृहीं तयातें ॥३५॥
असो यापरी एक संवत्सर । इकडे व्रतांत न पडे अंतर । दिवस दिवस अधिकोत्तर । परमप्रीती आचारती ॥३६॥
जेवीं सरल्या नष्ट काळ । अभ्युदयाची ये वेळ । तेंवी प्रगटले दीनदयाळ । मत्स्येंद्रनाथ ते समयी ॥३७॥
त्या परमानंदा काय दृष्टांत । जेवीं मरतया प्राप्त अमृत । कीं तृषार्थिया गंगा येत । अकस्मात वोघ पैं ॥३८॥
लीलावती मालती सुदर्शन । सर्वास झालें गुरुदर्शन । साष्टांग घालिती लोटांगण । परमप्रीतीकरुनि ॥३९॥
प्रार्थिती झाली लीलावती । सद्गुरु पावले या आकांती । कृतसुकृते उदया येती । तेचि प्राप्ति गुरुची ॥२४०॥
मग मस्तक ठेवूनि नाथचरणी । विनविती झाली मधुरवचनीं । पुत्र बूडाळ जीवनी । वरदपुत्र स्वामीचा ॥४१॥
नाथ पाहती विचारोन । कोठे आहे राजनंदन । भूत भविष्य वर्तमाण । अंतर साक्षी जाणती ॥४२॥
तेव्हां उदकी फुंकितां विभूत देवता झाल्या भयाभीत । तत्काळ आणिला राजसुत । अमौल्य भूषणें अर्पोनि ॥४३॥
जेवीं यमुनाह्र्दांतून । निघता झाला सीमंतिनीरमण । की क्षीराब्धींतूनि रोहिणीरमण । निष्कळंक निघतसे ॥४४॥
तैसाचि सुभद्र राजपुत्र । निघता झाला क्षणमात्र । आनंदी निमग्न सर्वत्र । हर्षा पात्र नसेचि ॥४५॥
सुभद्रे पाहूनि उठाउठी । मत्स्येंद्र्चरणी घातली मिठी । हर्ष वोसंडोनि पोटी । प्रेमाश्रु नेत्री लोटले ॥४६॥
जननीजनकाचे धरुनि चरण । परस्परें देती अलिंगन । विमलाश्रु सजल नयन । होते झाले अन्योन्यही ॥४७॥
जेवी कौसल्ये भेटे रघुवीर । तैसा मातेस भेटे सुभद्र । अखंड वाद्यांचा गजर । मंगळतुरे वाजती ॥४८॥
शर्करा वाटिती गजस्कंधी । याचकांची मिळाली मांदी । अर्पिते झाले द्रव्यसमृध्दि । द्विजां धेनू अर्पिल्या ॥४९॥
सुदर्शन आणि द्वयकामिनी । जाती झाली आनंदवनीं । पुढें बदरिकाश्रम लक्षोनी । स्वर्गारोहणी जातसे ॥२५०॥
अदृश्य झाले नाथ मत्स्येंद्र । इकडे चंद्रचूड आणि सुभद्र । सवें घेऊन द्ळभार । स्वनगरातें पातलें ॥५१॥
पुढें कथा गोड बहुत । अमृतातें पैज जिंकित । पीयुष सारोनि परौतें । स्वरुचीतें योजवी ॥५२॥
नवमोध्याय परमपावन । नवविधभक्तीचें मुख्य स्थान । कीं हे नवविध कोशधन । नवनीत होय ये ग्रंथी ॥५३॥
हे नवनाथांचें निवासभुवन । हें नवग्रहांचें एकादशस्थान । हा अध्याय करितां श्रवण । ग्रहबाधा न बाधी ॥५४॥
कीं हीं नवखंडें सुंदर । यांत नवद्वारांचें मंदिर । कीं नवरत्नांचा दिव्यहार । संतश्रोतयां अर्पिला ॥५५॥
हा अध्याय ऐकतां एकाग्र । विदेशीं बंधु भेटती कुमर । गतवस्तु लाभे सत्वर । श्रवणमात्रेंकरुनि ॥५६॥
सौभाग्यासी सौभाग्यवर्धन । दरिद्री होती धनसंपन्न । विगतधवा होती पावन । जन्मांतरी पति लाभे ॥५७॥
रोगगंडांतर काळमरण । श्रवणपठणें जाय निरसोन । कदा अन्यथा नव्हे जाण । प्रत्यक्षा प्रमाण कासया ॥५८॥
भावविश्वासें निश्चयेंकरुन । हे फळप्राप्तीसी मुख्य कारण । सर्वसिध्दि प्राप्त येणें । सत्य सत्य त्रिवाचा ॥५९॥
श्रीमत्सद्गुरोर्जयंती । आदिनाथलीलामृतीं । श्रोते सुरस्पान करिती । स्वाद जाणती चतुरास्त्र ॥१६०॥
स्वस्ति श्रीमंगलायतन । भैरवपदीं निवासस्थान । आदिनाथ विनयसंपन्न । नवमोध्याय़ीं नमीरसे ॥२६१॥
N/A
References : N/A
Last Updated : February 07, 2020
TOP