श्रीनाथलीलामृत - अध्याय ३ रा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो जी आदेश नाथ निरंजना । अलक्ष अगोचर सनातना । आदि अनादि पुरातना । स्वयंप्रकाश गुरुनाथा ॥१॥
तव नाम कल्याणकारक । भवतरुकुठारच्छेदक । तूं माया विपिनदहनपावक । सुखकारक तव नाम ॥२॥
धन्य धन्य तेचि जन । जे गुरुभक्तिपरायण । श्रवण मनन गुरुसेवन । अहर्निशीं ध्यान करिती जे ॥३॥
ते जीवन्मुक्त नरदेही । देही असोनि विदेही । त्यांचे दर्शने कित्येक पाही । उध्दरती हा निश्चय ॥४॥
सर्व व्रतांत व्रतोत्तम । गुरुभजनीं ज्याचा नेम । इतर धर्मातें सार्वभौम । गुरु परब्रह्म भजे जो ॥५॥
ते चिच्छक्ति प्रणवरुपिणी । जे जगत्साक्षिणी श्रीमृडानी । शरण गेला वसिष्ठास । गुरुसेवनीं तत्पर ॥७॥
जो श्रीकृष्ण भगवान । सांदीपनीस गेला शरण । व्यासास नारद आपण । उपदेश देत तयातें ॥८॥
चतुरानन आदि नारायण । हंसरुपें उपदीशून । कच होऊनि अनन्य । शरण गेला शुक्रातें ॥९॥
गुरुभक्तांत चूडामणि । गोरक्ष मत्स्येंद्रचरणीं । जालंदरीचा कानिफ सद्गुणी । निवृत्तीचा ज्ञानेश ॥१०॥
नामदेवासी साक्षात्कार सगुण । तयातें बोधी रुक्मिणीरमण । खेचरातें जाऊन शरण । आत्मज्ञान संपादी ॥११॥
गुरु भक्तांत परमनिपुण । तो एका एक जनार्दन । सवेंच व्हावया उत्तीर्ण । स्वयें कृष्ण दास्यत्व करी ॥१२॥
नाना करितां तपानुष्ठान । न सुटे चवर्‍यांशींबंधन । एका सद्गुरुवांचून । जन्ममरण सुटेना ॥१३॥
वेदशास्त्रीं निश्चयोत्तर । गुरुभक्तीचा महिमा थोर । अठ्ठ्यांशी सहस्त्र ऋषीश्वर । गुरुभक्तीत श्रेष्ठ पै ॥१४॥
गुरुनामाचा मुखीं चाळा । तेणें जिंकिलें कळिकाळा । स्वानंदसुखाचा सोहळा । तया प्राप्त होतसे ॥१५॥
जे नाथादि सांप्रदाय मूळ । मत्स्येंद्र गोरक्ष ज्ञानेश कुळ । इष्ट आराध्यही सकळ । पूर्वजसूत्र आमुचें ॥१६॥
गुरुआज्ञा प्राधान्यरेषा । नुलंघवे मर्यादवेळ जैसा । तया सद्गुरु परमपुरुषा । सिंधुरुपें वंदितों ॥१७॥
तुम्ही श्रोते परिसा परी । परिसा विज्ञप्ति वैखरी । तुमचें अवधान अभयोत्तरीं । सुवर्णवाणी होतसे ॥१८॥
पायाळ डोळस निर्लाछन । लेवोनि गुरुआज्ञेचें अंजन । भाग्यरेषा सुप्रसन्न । निधान जोडे गुरुकृपें ॥१९॥
असो गत कथाध्याय़ीम इतिहास । मत्स्येंद्रोत्पत्ति परम सुरस । शिवआज्ञेवरुन तीर्थाटणास । जगदोध्दारी जातसे ॥२०॥
आतां परिसा कथारहस्य । श्रवण करावें निरालस्य । इहपरकीर्ति जोडे यश । अविनाशपद ये हातां ॥२१॥
तंअ श्रोते म्हणती सुखकारक । कथारहस्य अलौकिक । श्रवणयुक्तिकास्वात्युदक । मुक्ताफळ इच्छिती ॥२२॥
मत्स्येंद्रकथा महदाख्यान । प्रम पावन ते निरुपण । ऐकोनी तृप्त झाले श्रवण । परी एक इच्छा आमुची ॥२३॥
श्रीगोरक्षप्रसादत्पत्ति । ती परिसावी यथानिगुती । श्रवण चकोराचे आर्ति । चंद्रामृतीं तोषती ॥२४॥
जी जी आज्ञा म्हणून । वक्ता वदे प्रतिवचन । गोरक्षउत्पत्ति कथा गहन । श्रवण करावी आदरें ॥२५॥
शर्करा आवडे रसने । तीच इष्ट गृही मिष्ट पक्वान्ने । ते सुरस स्वाद सेवणें । जिव्हा आवेश पैं ॥२६॥
परमभक्ति या कथेची । आज्ञा प्रमाण श्रोतयांची । गंगा लाधली अमृताची । स्नानपाना पवित्र ॥२७॥
ग्रंथब्धिमंथनीं अमृत । सुरस श्रोतयां हो प्राप्त । आतां एकाग्र करोनि चित्त । उचित ग्रंथ परिसावा ॥२८॥
अपूर्व पुण्यपुरी । अयोध्यानिकत जयश्रीनगरी । विजयध्वज राज्याधिकारी । प्रतापी नरेंद्र पैं ॥२९॥
सत्कीर्ति नामे अंगना । सगुण गुणें लावण्या । सुशीळा पतिव्रता निपुणा । परमप्रिय पतीतें ॥३०॥
वीर्य शौर्य प्रतापवर्य । अगाधसिंधूसम गांभीर्य । ऐश्वर्य औदार्य । वदान्य नृपवर होत तो ॥३१॥
स्वधर्मे करी प्रजारक्षण । राज्यांत नसे अधर्माचरण । सुखी असती गोब्राह्मण । पुराणश्रवणसन्मार्गे ॥३२॥
घरोघरीं अग्निसेवन । करिती वेदाध्ययन । अभ्यास पवमान । वेदघोषे घरोघरीं ॥३३॥
शिष्यमर्यादा गुरुआज्ञा । सेवक न करिती स्वामी अवज्ञा । स्त्रिया पतिव्रता गुणज्ञा । संकेतसंज्ञा जाणती ॥३४॥
दोष दुष्काळ दरिद्र दैन्य । रोग गंडांतर नसे जाण । पुत्र करिती पितृसेवन । यथाकाळी घनवृष्टि ॥३५॥
असो पुण्यभूमि पावन । तेथें गृहस्थ तद्देशी ब्राह्मण । वेद आणि धनसंपन्न । व्यवसायी द्रव्याचा ॥३६॥
सद्वोध नामाभिमान । स्त्री सद्‍वृत्ति नामेंकरुन । पतिशुश्रूषें सदा मन । गजांतलक्ष्मी ते गृहीं ॥३७॥
नामासारिखी कृति । हें तों पूर्वसुकृती । जया नाम बृहस्पति । परि स्खलित वाणी प्रतिशब्दी ॥३८॥
अमर नाम ठेवी संतोषे । अल्पायुषी मरतसे । नाम ठेवी वेदव्यास । परि पिसें तयासी प्रारब्धें ॥३९॥
नाम ठेविलें कुबेर । तो भिक्षा मागे घरोघर । नाम जयाचें कमलनेत्र । अंध डोळां दिसेना ॥४०॥
नाम जयाचे अर्जुन । युध्दापुढें जाय पळोन । नाम धन्वंतरी जाण । रोगग्रस्त सर्वदा ॥४१॥
नाम ठेविलें रामचंद्र । पिषाच झडपी वारंवार । नाम जया क्षीरसागर । तो तक्रईच्छा करी ॥४२॥
ऐसा नव्हे तो गृहस्थ । परम उदार भगवद्भक्त । अतिथिसेवन सतत । परमार्थ स्वार्थ जयाचा ॥४३॥
करी नित्यानित्यविचार । वेदांती निमग्न अहोरात्र । दानशीळ परम थोर । गृहस्थाश्रम संपादी ॥४४॥
दहा सहस्त्र धेनु गृहीं । संपत्तीस तया पार नाहीं । संततीवीण पाहीं । सदा दाही चिंताग्नि ॥४५॥
नित्य द्वादशगोप्रदान । गोसेवा कारी आपण । हरिहरादि देवतार्चन । कीर्तनीं श्रवण पैं ॥४६॥
एकादशी निःसीम नेम । दिवानिशी आचरे सत्करं । द्वादशीचा विशेष धर्म विष्णुतिथिते लक्षुनी ॥४७॥
शतगोदानें ते दिनीं । द्वादशशत द्विज भोजनीं । सद्भावें अतिथी पूजुनी । दानाध्यक्ष नेटका ॥४८॥
पुण्य तेथें पुरुषार्थ । सुख तेथें विश्रांत । क्षमा तेथें दय वस्त । सत्संग होय अनायासें ॥४९॥
अभ्दुदयाची पहाट फुटे । इच्छित लाभ तात्काळ भेटे । पूर्वसुकृतबळ वरिष्ठ । लावी वाटे सुखाच्या ॥५०॥
असो पूर्वानुसंधान । श्रीमत्स्येंद्र शिवाअज्ञेन । करित झाले तेथून गमन । तों अवलोकिलें वैकुंठ ॥५१॥
सर्वोत्कृष्ट वैकुंठ श्रेष्ठ । भोवतीं तुळ्सीवनें दाट । सत्वर पावले तयानिकट । तों वाटेस भेटले श्रीहरि ॥५२॥
परस्पारें करोनि नमन । सप्रेमें देती आलिंगन । पुसता झाला मधुसूदन । गमन कोठें करीतसां ॥५३॥
मत्स्येंद्र वदे गा रमापति । तव दर्शन उद्देशआर्ति । भविष्य जाणोनियां चित्ती । हास्य करी जगदात्मा ॥५४॥
मग मत्स्येंद्र निघती तेथून । द्वीपांतरा द्वीपीं फिरोन । जयश्री करुन आगमन । बोधभुवन देखिलें ॥५५॥
द्वारप्रदेशी अलक्ष शब्द । करिते झाले महासिध्द । सद्‍वृत्तिश्रवणीं सब्दोश । होता झाला ते वेळी ॥५६॥
गृहस्थलालना पाहे । लावण्यमूर्ति उभी आहे । परम दैदीप्य दिसताहे । उपमा नसे दुजी ॥५७॥
शशिसूर्याहूनि दीप्ति । तेवीं मिरवे अंगकांति । कबरी मस्तकीं विराजती । विशाळ भाळ कमळाक्ष ॥५८॥
अनंत जन्मी साधिलें अंजन । प्रत्यक्ष देखिलें निधान । अनर्ध्य रत्नांची उघडली खाण । पहातेपण तटस्थ ॥५९॥
भ्रूचाप टणत्कारुन । खेचरी उन्मन कटाक्ष मार्गण । धारणेचें निजसंधान । टाकी मुखातें लक्षोनी ॥६०॥
योगसंग्रामीं दक्ष कुशल । विंधिता झाला सहस्त्रदळ । जीवशिव ऐक्यस्थळ । निमग्न होवोनि विचरती ॥६१॥
इडा पिंगळा ऊर्ध्वगति । चंद्रसूर्य तयातें वद्ती । नासापुटीं केली वस्ती । सरळ नासिक शोभलें ॥६२॥
निमिषानिमिष न लगे पाती । खुंटली काळाची गति । आरक्त अधर बिंबाकृति । सोहंस्मरणीं रंगले ॥६३॥
श्रवणी मुद्रा नक्षत्रापरी । कीं बृहस्पति शुक्र निर्धारी । जगद्गुरुतें अवधारी । मार्ग पुसती योगाचा ॥६४॥
म्हणती भस्म कां केलें लेपन । झणी दृष्टि लागेल म्हणून । शिवें स्वहस्तें चर्चून । सकुमार तनु आच्छादी ॥६५॥
की सुस्वरुप मदनातें । हें जाणोनि अपर्णानाथें । तेचि स्वयें चिताभस्मातें । चर्चिता झाला मत्स्येंद्रा ॥६६॥
कीं अहं जाळोनि राख । सोहंभस्म चर्चिलें सुरेख । की काश्मीर कवच देख । दीपज्योतीते मिरवलें ॥६७॥
पंचतत्त्वांची मेखळा आच्छादन । अरूणवर्णी काषायवसन । सहस्त्र सौदामिनी एकवटून । शोभाताती सुरंगी ॥६८॥
कटीं मेखळा ऐशापरी । चिच्छक्ति शैलीवरी । शृंगी अनाहतगजरीं । प्रणवोच्चारी सुशब्दें ॥६९॥
अजपामाळा रात्रंदिन । एकवीस सहस्त्र प्रमाण । फेरी फेरे सोहंस्मरण । तुर्या साक्षिणी तयाची ॥७०॥
चारी मुक्तीची झोळी हातीं । भिक्षापात्र सब्दोधवृत्ति । शांती कुब्जा ते निवृत्ति । सदाचरणी पादुका ॥७१॥
वज्रकौपीन मूळबंधी । उड्डियानक जालंधर त्रिबंधी । हटयोगाचा होय उदधि । सहज समाधि जयाची ॥७२॥
सत्रावी भिक्षा घेऊन हातीं । पातली तेव्हां सद्‍वृत्ति । लावू विसरली नेत्रपातीं । स्वरुपस्थिति पाहतां ॥७३॥
देवदानव मानवपंक्ति । अपरप्रतिमा न ये व्यक्ती । अनेकजन्मपूर्वसुकृतीं । अनुपम मूर्ति देखिली ॥७४॥
भिक्षा अर्पूनि पदीं मूर्ध्नी । ठेविती झाली नितंबिनी । पंचप्राण वोवाळुनी । विनीतवचनी वदतसे ॥७५॥
परम लाभ लाभले । जन्मसार्थक फळलें । पूर्वार्जित उदया आलें । कृतार्थ झाले निश्चयें ॥७६॥
आज अकल्पित कल्पतरु । दृष्टी देखिले जगद्गुरु । कीं पूर्वपुण्याचा अचळ मेरू । नाथरुपें प्रगटला ॥७७॥
जे वेदगर्भीचें सारांश । जे योगियांचें उपास्य । सिध्दि इच्छिती ज्यांचे दास्य । ते अविनाश प्रगटले ॥७८॥
आज धन्य प्राप्तकाळ । आजन्म तरु पातलें फळ । पूर्व प्राक्तन सबळ । दीनदयाळ देखिले ॥७९॥
महद्भाग्य मी सौभाग्य । अचल लक्ष्मी आयुरारोग्य । परि संततिहीन भाग्य । व्यंग हें सांग्ग करावें ॥८०॥
तंव वदते झाले मत्स्येंद्रमुनि । निश्चयें निर्भय राहे जननी । विभूति देतसें तुजलागुनी । सदनांतरीं स्वीकारीं ॥८१॥
माझा आशीर्वाद अवधारी । विष्णु येईल तव मंदिरीं । महद्भाग्य सुंदरी । उदरीं पुत्र लाभसी ॥८२॥
भस्म करी बहु जतन । प्राप्त होईल पुत्रसंतान । आजि सरलें अप्राप्तकप्राक्तन । नूतन लाभ मानी हा ॥८३॥
हें उभयवरदोत्तरीं । तोषोनि ग्रंथी बांधी पदरीं । हर्षउत्कर्ष ह्र्दयांतरी । आनंदउदधी उचंबळे ॥८४॥
मस्तकीं ठेवोनी हस्त । गुप्त झाले मत्स्येंद्रनाथ । मंदिरीं गेली हर्षित । तो बाह्यसख्या मिळाल्या ॥८५॥
स्त्रिया वदती शपथोत्तरीं । तूंतें भेटला त्रिपुरारी । अपार पुण्य जन्मांतरीं । तरीच दर्शन सिध्दाचें ॥८६॥
एक वदती अहा वेडे । महामांत्रिक कानफाडे । कोणाचें बळ न चले त्यांपुढें । कुडेंकपट जाणती ॥८७॥
महापुरुष हे महामैंद । ब्रह्मारण्यीं करिती बोध । निरंजनीं नेऊनि वध । तात्काळ करिती तयाचा ॥८८॥
विषयसंग्रहाचें धन । जीव घेवोनि करी लुंठण । येणे जाणें मार्ग पुसोन । निर्मूळ शासन करी पैं ॥८९॥
एक म्हणती अजा पक्षी शुनी । ते करिती न लगतां क्षणी । कांही सुकृत म्हणोनी । भक्षिली नाहीं विभूतीतें ॥९०॥
प्रवृत्ति त्या निंद्य म्हणती । निवृत्ति त्या धन्य वदती । तूंचि धन्य ये जगतीं । सुशीळ म्हणोनि लाभ हा ॥९१॥
पूर्वसंधींत सदाचरण । सदा सर्वदा पतिसेवन । अगम्य न गणवे तुझे गाण । सिध्द प्रसिध्द भेटला ॥९२॥
बहुत मतांचे त्रिविध जन । कोणी करिती स्तवन । कोणी म्हणती ईश्वरदर्शन । झालें पुण्य पूर्वीचें ॥९३॥
एक म्हणती कैचें काय । भस्म सर्वथा सेवूं नये । नेणो अपाय कीं उपाय । भविष्य जाणे ईश्वर ॥९४॥
एक वदे त्यागी विभूति । न कळे पुढें होणार गति । भयाभीत होऊनि चित्ती । भस्म निश्चयें टाकिलें ॥९५॥
गृहीं न ठेवी सुजाणे । या सत्वर बाहेर त्यागणें । नाहीं तरी गृही कठिण । काय होईल कळेना ॥९६॥
गोमयगर्ता आवर्त । त्यांत टाकिली विभूत । प्रारब्ध अविधि विधिनिर्मित । ब्रह्मसूत्र टळेना ॥९७॥
दशसहस्त्र धेनूंचे गोमय । दुर्बुध्दीनें केला अपाय । जन्मांधासी रत्न काय । प्राप्त कैसें होईल ॥९८॥
विष्णुमाया गहन । बुध्दिभ्रंशप्राक्तनेंकरुन । न्यून अर्जित अर्चन । म्हणोनि बुध्दिभ्रष्ट पैं ॥९९॥
जो सच्चिदानंद स्वयमेव । अज अजित निरामय । जो अजन्मा स्वयमेव । तो गर्भस्थ न होय सर्वथा ॥१००॥
नित्यप्रत्यहीं गोमय । संचय होत पर्वतप्राय । मंगळ जननी गर्भस्थ राहे । मत्स्येंद्रबीज मज गमे ॥१॥
गृहस्थभार्येसी ऐसें झालें । हातीचें निधान दवडिलें । चिंतामणी त्यागिले । पाषाण म्हणोनी ॥२॥
कोमळ कल्पतरूची वल्ली । सदैवें द्वारी उदेली । ते दुर्दैवें खुडोनि टाकिली । तैसी झाली परी हे ॥३॥
क्षुधितागृहीं क्षीराब्धि येत । दुर्बुध्दिमाक्षिका होय पात । कीं कामधेनू अकस्मात । पशु म्हणोनि दवडिली ॥४॥
कीं विषभ्रांती पीयूष । वोतिलासे सुधारस । कीं वायस म्हणोनि राजहंस । तोडोनियां सांडिला ॥५॥
स्वात्मबुध्दी हितार्थ । परबुध्दीनें घडे अनर्थ । गुरुबुध्दि स्वार्थपरमार्थ । प्रळयार्थ स्त्रीबुध्दि ॥६॥
परबुध्दीनें भस्म त्यागिलें । गोमयगर्भी तें संचलें । अवतारांकुर कोमाईले । शुक्लपक्ष ज्यापरी ॥७॥
उदयाहूनि पळे पळ । हेळामात्रीं किळा सबळ । कीं सत्पात्री दानें ब्रह्मांडगोळ । कीर्ति विस्तारेल पैं ॥८॥
असो भूमिगर्भस्थ दिवसेंदिवस । शुभडोहळें होती आसपैस । गर्भच्छाया येतां महीस । दुर्भिक्ष दवडिलें पैं ॥९॥
यथाकाळीं वर्षे धन । पत्रीं पुष्पीं तरु सघन । वृक्ष सकळ सुभिक्ष धान्य । जरामरण नसेचि ॥११०॥
प्रजा सदाचरणी आचरणीम । दैन्यदरिद्र नसे मेदिनी । मंगळप्रद मंगळ जननी । सुमंगळ जाहली ॥११॥
मंगळतुरे मंगळायतनीं । मंगळ भोजनीं गायनीं । मंगळ भूषणीं सुवासिनी । मंगळ द्रव्य वोपिती ॥१२॥
सदुग्ध धेनु विपुल क्षीरें । घरोघरीं घुमती डेरे । शिवालय विष्णुमंदिरें । तोरणें मखरें चहुंकडे ॥१३॥
दरिद्रिया निधानें लाधतीं । जन्मांधासी नेत्र येती । वंध्या योषा पुत्रवंती । मुके वदती वेदांत ॥१४॥
तों मत्स्येंद्र स्वेच्छें विचरती । येते झाले बदरिकाश्रमाप्रति । तेथे देखिल्या सिध्दमूर्ति । जपी तपी तेजस्वी ॥१५॥
त्यांते पाहून मनेच्छा झाली । योगसिध्दि साधावी आपुली । म्हणोनि नाथ तये वेळीं । बैसले कपाटी जावोनी ॥१६॥
सूर्यसंख्या संवत्सर । समाधिस्थ मत्स्येंद्र । तो पातले तेथें महारुद्र । आदिनाथ सद्गुरु ॥१७॥
वत्सा मत्स्येंद्रा स्वइच्छेनें । गूढदरीत योगसाधनें । कां करिसी वायुरोधनें । जगकल्याण करी कां ॥१८॥
सावध होऊनि पाहे । नाथरुप अंतर्बाह्य । जगदोध्दार योजिलें कार्य । तूं कां येथें तप करिसी ॥१९॥
मीही जावोनियां तेथें । दीक्षा देवोनि पातलों येथें । त्वां सत्वर जावें उपदेशातें । गोरक्षातें प्रगटवी ॥१२०॥
आदिनाथचरणीं ठेवोनि मौळी । निघते झाले तात्काळीं । जयश्रीनगरीं उतावेळी । दीनदयाळ पातले ॥२१॥
नगरागर्भी उर्वीस्थळीं । पूर्वद्वारीं अपूर्व वेळीं । आले तेथें पूर्वस्थळीं । पूर्वस्मृति पूर्वीच ॥२२॥
अरुणोदयी अरुणवर्णी । काषायमेखळा रविकिरणी । श्रीमुख भासे प्रभाततरणी । द्वारप्रदेशी प्रगटला ॥२३॥
अलक्षी लक्ष अलक्षोच्चार । भिक्षार्थ तिष्ठे मत्स्येंद्र । तों गृहस्थस्त्री सत्वर । द्वाराबाहेर पाहतसे ॥२४॥
तिणें निरखिला ते क्षणीं । वोळखिलें तत्क्षणीं । मृगाक्षीतें सुलक्षणी । विवक्षा करी भिक्षेची ॥२५॥
भिक्षा घेवोनी जातां । शाप देईल पाहातां । गुप्त गृहीं असतां । शाप सर्वथा चुकेना ॥२६॥
उभयपक्षीं होय कठिण । मला दुजा रक्षील कोण । आतां होणार प्रमाण । जावें शरण तयातें ॥२७॥
भिक्षा घेवोनि तदोत्तरीं । अधोवदन जाय सत्वरी । नम्र होवोनि नमस्कारी । भिक्षा पवित्र वोगरी पैं ॥२८॥
मत्स्येंद्र वदे क्षेम कीं माते । सुपुत्र दावी आम्हातें । भस्म देवोनि गेलों तुम्हांतें । त्या तनयातें आणी कां ॥२९॥
येरी सलज्ज सद्गद चित्तीं । रोमांचस्फुरण बाष्प स्त्रवती । भयाभीत सलज्जवृत्ति । स्तब्ध स्थिति होतसे ॥१३०॥
प्रत्युत्तराचे आर्ती । पुण्हा तीतें नाथ पुसती । तरी वाकस्तंभ सरस्वती । स्तब्धमुद्रा अवलंबिली ॥३१॥
तो अंतरसाक्षी सर्वज्ञ । जाणी भूतभविष्यवर्तमान । जो सर्वव्यापी परिपूर्ण । सर्वसाक्षी वेगळा ॥३२॥
विस्मित होऊन अंतःकरणीं । मदाशीर्वादनिर्भयवाणी । तूंते पुत्र नसे झणी । हें आश्चर्य आमुतें ॥३३॥
माझें झालिया वरदवाक्य । नुलंघिती ब्रह्मादिक । पुत्र व्हावा आवश्यक । नव्हे आवश्यक कल्पांती ॥३४॥
आतां सत्योत्तर वदे पाही । भस्म सेविलें किंवा नाहीं । कीं टाकिलें कोणे ठायीं । तें स्थळ मातें दावी कां ॥३५॥
जरी तूं न सांगसी सत्य । शाप देईन मी यथार्थ । ऐसें ऐकोनि भयाभीत । होती झाली तेधवां ॥३६॥
मग विनीतभावें मंजुळ शब्दी । स्वामी मी असें अपराधी । लागूनियां परबुध्दी । नाश केला हिताचा ॥३७॥
मातें भस्म त्यागिलें जेथें । शीघ्र घेऊन जावें तेथें । तेव्हां तर्जनीचे संकेतें । लक्षवी ते मृगाक्षी ॥३८॥
ऐसें असतां अकस्मात । गृहांतूनि निघे गृहस्थ । भस्मवार्ता अव्यवस्थ । परिसोन स्वस्थ न वाटे ॥३९॥
मग धांवूनि आला सवेगीं । नमस्कारी अंगप्रत्यंगीं । आश्वासितसे योगी । मस्तकीं हस्त ठेविला ॥१४०॥
त्राहे त्राहे श्रीदातारा । आमुचा अपराध क्षमा करा । पतितोध्दरणा कृपा करा । मज दीनातें उध्दरी ॥४१॥
मग म्हणे मत्स्येंद्रमुनि । गोमयसंमार्जनस्थानी । दिव्यमंडप उभवूणि । रंगमाळा सुरेख ॥४२॥
कर्दळीस्तंभांची मखरें । मंगळपल्लवी मंगल तुरे । गुढिया उभवूनि एकसरें । मंगळजननी शृंगारा ॥४३॥
आज्ञा होतां ते क्षणीं । नृपति येवोनि लागे चरणीं । थाट तिष्ठती पौरवश्रेणी । बावन्न वर्ण इत्यादि ॥४४॥
भूमि शृंगारुनि सारी । सौभाग्यभूषित सौभाग्यनारी । हरिद्राकुंकुम घेऊनि करीं । परस्परें वोपिती ॥४५॥
गोमयनिकटीं मत्स्येंद्रमुनि । दीर्घस्वरें अलक्षध्वनि । भूमींतून प्रतिध्वनि । ॐ नमो आदेश सद्गुरु ॥४६॥
त्रिवार उच्चार अलक्षशब्द । आदेश गुरु शृंगीनाद । पुष्पें वोपिती विबुध । देव मानव संतोषती ॥४७॥
देव दुंदुभी वाद्ये होती । गंधर्व सुस्वर गायन करिती । शची सावित्री अरुंधती । अक्षता टाकिती आनंदे ॥४८॥
गोलोकीचें जें आराध्य । तेंचि झालें मत्स्येंद्र साध्य । न कळे ज्याचें आदिमध्य । गोमयीं गोरक्ष प्रगटला ॥४९॥
गोसेवेची आवडी परम । तोचि गोकुळीं पुरुषोत्तम । गोपाळ गाई गोपिकाप्रेम । गोवर्धनी गोविंद ॥१५०॥
पूर्वी अमित दैत्य मारिले । तेणें ह्र्दय कठोर झालें । तेंचि प्रायश्चित्त मज गमलें । स्वयें घेतलें विष्णूनें ॥५१॥
जे महद्दोष प्रसिध्द । गोमयगोमूत्रीं होय शुध्द । ज्याचा महिमा अगाध । स्वयें गोरक्ष जाणती ॥५२॥
मत्स्येंद्र भूमींत वेत्र स्पर्शित । तंव द्विभाग कुंभिनी तेव्हा होत । दीप्तज्वाळा अकस्मात । भूमींतूनि निघाल्या ॥५३॥
सहस्त्र रवींचा प्रकाश । शशिविद्युल्लातासमरस । प्रकाश दाटला असमास । मानव नेत्र झाकिती ॥५४॥
तये संधीस निर्जरभार । उभयांसी करुनि नमस्कार । प्रदक्षिणा करिती सत्वर । जाती स्वस्थानीं आपुल्या ॥५५॥
क्षीराब्धींतूनि अमृतकर । उदयाचळाहूनि भास्कर । तैसा मेदिनीतूनि सुंदर । सुखरुप निघाला ॥५६॥
कीं पाशुपतास्त्राची गवसणी । काढितां प्रकाश अनंततरणी । जळबुंथी त्यागुनी । दिनमणि प्रकाशे ॥५७॥
स्वरुपें मदन की इंद्र । शतगुणें मत्स्येंद्रपुत्र । श्यामसुंदर आकर्णनेत्र । चक्रपाणि अवतरे ॥५८॥
राजीवनेत्र सुहास्यवक्त्र । श्रोत्री मुद्रा चारुगात्र । कृष्णसूत्रें शैली पवित्र । काषायवस्त्रें शोभलीं ॥५९॥
अरुणसंध्या सुरंगवर्णी । मेखळा तप्तसुवर्ण कर्णी । उत्तरी रुळे वस्त्रा भरणी । त्रिशूळपाणि विराजे ॥१६०॥
भस्मोध्दूलित केशरी मळवट । मृगमदतिलक सुभट । वक्र भ्रुकुटिया नासापुट । रावे सलज्ज देखोनी ॥६१॥
उभय अधर बिंबफळभ्रमें । कीर चंचु वोढवी प्रेमें । तेविं तो भास मज गमे । अन्य उपमा नसेचि ॥६२॥
जो मत्स्येंद्रप्रियकुमर । द्वादशवर्षी तो सकुमार । पूर्ववय अपूर्व कुमार स्वकुमार दृढ करीतसे ॥६३॥
त्या चिताभस्मेंकरुन । सर्वांगीं लाविलें भस्मलेपन । सक्रोध मदनदहन । द्वैत सर्व ग्रासिलें ॥६४॥
मत्स्येंद्र पादारविंदमिलिंद । चरणांगुष्ठी सेवी अमोद । गोरक्ष गुंजारवें आनंद । वंदन करी ते वेळी ॥६५॥
वरी मस्तक उचलोन । मत्स्येंद्र करी अवघ्राण । कृतकतार्थ संपूर्ण । परस्परें जाहले ॥६६॥

कार्तिक्यां शुक्लपक्षे च रेवत्यां च त्रयोदशी । द्विपरार्धे दिवा विष्णोरंशो गोरक्षयोनिजः ॥१॥
भस्मगोमयसंभूतो गोरक्षः स महामुनिः । भूमिगर्भसमुद्भूतं ध्यायेन्नाथं जगद्गुरुम् ॥२॥


कार्तिक शुध्द त्रयोदशी । भृगुवासर रेवती दिवसीं । सवा प्रहर सुदिनेसीं । विष्णुअवतार उद्भवे ॥६७॥
पुष्पवृष्टि पृथ्वीतटीं । जन पाहती संपूर्ण दृष्टीं । महत्पुण्याच्या अपार कोटि । कौतुकदृष्टीं पाहती ॥६८॥
आदिनाथ जातकर्म । नामकर्म मत्स्येंद्रनेम । गोरक्षक नाम सर्वोत्तम । ठेविते झाले तयाचें ॥६९॥
गोमयगर्भी रक्षा जाण । म्हणोनि गोरक्ष नामाभिधान । जें गोलोकाचें दिव्यज्ञान । गोमय उकरडीं प्रगटलें ॥१७०॥
जो अज अजित अव्यय । अजन्म अयोनिसंभव । तेथें नाम रुपाचे वैभव । काय कैसें कळेना ॥७१॥
जो अव्यक्त न ये व्यक्ती । अजन्मा नसे जन्मपंक्ति । अरुपासी रुपव्यक्ती । कोणत्या युक्ती स्तवावें ॥७२॥
आदिनाथबीज मत्स्येंद्रवल्ली । पत्रपुष्पीं अति डवरिली । गोरक्षरुपें फळा आली । मुमुक्षुपक्ष्याकारणें ॥७३॥
गोरक्षमौळी ठेवूनि कर । आनन कुरवाळी वारंवार । अंकी घेऊनि सत्वर । वदनेदु न्यहाळी ॥७४॥
जीवी जीवा पडली गाठी । ते कदा नव्हे तुटी । जेवी कचबृहस्पतिभेटी । सुख झालें ज्यापरी ॥७५॥
जेवीं शिवअंकीं गजानन । तेवीं दिसे शोभा गहन । आनंदमय परिपूर्ण । अगाध सोहळा ते वेळी ॥७६॥
पंचानन षडानन । नारद आणि चतुरानन । कीं भरत आणि रघुनंदन । राम हनुमान ज्यापरी ॥७७॥
ऐशा पौरव जनांच्या थाटी । पाहूं पातल्या उठाउठी । जय जय शब्दाचे बोभाटी । भुवनत्रय कोंदलें ॥७८॥
सब्दोध आणि नृपनंदन । उभय उभयांचे वंदिती चरण । तेव्हां सद्वृत्ति येऊन । नमन करी सद्भावें ॥७९॥
स्वामी बोले पीयूषघन । प्रारब्धवातें गेले वितळोन । आहा प्राक्तन बलिष्ठ गहन । भोग भोगवी पां ॥१८०॥
परि उदारहस्तेंकरुन । दातृत्व केलें मजलागून । सेखी घेतसां फिरोन । थोरपण सांभाळावें ॥८१॥
भवसिंधूंत अभयद्रोणीं । मज बैसविलें कृपा करोनी । मध्यें त्यागिसी मोक्षदानी । हे काय उचित विचारा ॥८२॥
नाथ म्हणे वदसी सत्य । परि केला घात स्वहस्तें । आतां पुससी आमुतें । सत्य की असत्य वदा हें ॥८३॥
वैद्यें दिधली दिव्य औषधी । सांगून गेला यथाविधि । पथ्य चुकून केला अविधि । व्याधि बरी कैसेनि ॥८४॥
म्हणे मी अपराध खाणी । आपुली केली पावलें करणी । सदय व्हावें अंतःकरणीं । प्रार्थी प्रार्थना समर्था ॥८५॥
मजपासून पडलें अंतर । आतां द्यावें अभयोत्तर । तुम्ही होऊनि सुधाकर । याचकचकोर तोषवा ॥८६॥
माते वदसी सत्यभाव । हा अजन्म अयोनिसंभव । विष्णुअवतार स्वयमेव । तो मानवगर्भ नव्हे कीं ॥८७॥
येरी वदे यथार्थवचन । मज झालें हरिहरदर्शन । आतां मी संतानहीन । यावरी पूर्वप्राक्तनें करंटी ॥८८॥
बैसोन कल्पतरुचें तळवटी । केवी द्यावी झोळीस गाठी । चिंतामणि घेतां मुष्टीं । दरिद्रगोष्टी कासया ॥८९॥
सुधारस घेतला ग्रासी । मग केवी राहे उपवासी । साधिलिया मनोन्मनासी । मग जीवदशा पैं कैची ॥१९०॥
यावरी लल्लाटपटअक्षर । न चुके निश्चयोत्तर । काय रुसोनि देवावर । देहप्रारब्ध चुकेना ॥९१॥
देहप्रारब्ध म्हणावें जरी । आयुर्मार्कंडेय षोडषसंवत्सरीं । सोळा कल्प करी त्रिपुरारी । प्रारब्ध बापुडे कायसें ॥९२॥
आणि परिसिलें पुराणीं । असत्य नव्हे सिध्दवाणी । नसलें जरी प्राक्तनी । नूतन महर्षि निर्मिती ॥९३॥
आपुलें ध्रुववचन यथार्थ । कदा न घडे असत्य । हा तों हाय निश्चितार्थ । निश्चय करोनि ठेविला ॥९४॥
कीं सदैवदशेचा होतां लाभ । तोचि अभ्युदयप्रारंभ । दशा उजळोनि सुलभ । प्रयत्न न करितां अनायासें ॥९५॥
पुत्राअभय प्रथमच आहे । तरी द्वितीय वर मी लाहें । प्रार्थनीं होऊनि साह्य । अभय द्यावें मजप्रति ॥९६॥
नगरजनांचा उध्दार । दर्शनें जाहला निर्धार । परत्रप्राप्ति साचार । हा तो भरंवसा असे पैं ॥९७॥
माझे जननीजनक । त्यांसी पुत्र द्यावा आवश्यक । उभयकुळीं सुखकारक । दर्शनें होय आपुल्या ॥९८॥
ऐसा परिसोनि करुणावर । मत्स्येंद्र वदती अभयवर । सिध्दि पावती आर्त सर्व । निश्चयभाव असावा ॥९९॥
पुत्र बंधु होती तुज । आर्ति सरती सहज । परि एक सांगतों गुज । अनुष्ठा तुम्ही सर्वही ॥२००॥
कार्तिक शुध्द त्रयोदशीदिनी । गोमयभस्मप्रतिमार्जनी । गोरक्षक पूजावे भावेंकरोनि । प्रथमयामी जाणिजे ॥१॥
कर्दळीस्तंभ मखरमंडप । पुष्प द्रुमपल्लव अमूप । रंगमाळा धूपदीप । सुंगंधपुष्पें अर्पावी ॥२॥
मंगळतुरे जन्म कथन । मत्स्येंद्रगोरक्षाख्यान । परमहस्यनिरुपण । आनंदें कीर्तन करावें ॥३॥
परिमळद्रव्य रंगचूर्ण । तुळसी बिल्व सुगंधचंदन । उधळोनि जयघोष पूर्ण । आदेशशब्द जागवा ॥४॥
जागर जागवा रजनी । व्रतासांगता नाथार्चनी । नाथासह द्विज भोजनीं । तांबूल दक्षिणा अर्पिजे ॥५॥
हें व्रताचरण आचरतां । सर्व सिध्दि येती हातां । त्याहुन लाभ नसे परता । परमार्थतें अधिकारी ॥६॥
तुळसीवृंदावनीं जाण । हा अध्याय करितां पठण । त्यासी सर्व सिध्दि प्राप्त होऊन । कामना पूर्ण होतसे ॥७॥
पठणामृत वृक्षातळीं । एक मंडळ प्रातःकाळीं । सुपुत्र होय कुळीं । पराक्रमी ज्ञाता पैं ॥८॥
अशोकातळीं शोकहरण । औदुंबरीं होय ज्ञान । अश्वत्थीं महद्भाग्य परिपूर्ण । विकल्पवृक्षीं वैराग्य ॥९॥
गोरक्षवल्लीसंनिध । पठणीं पुण्य अगाध । सर्व सिध्दि होती साध्य । प्रत्यक्ष ते स्थळीं ॥२१०॥
पुत्र बंधु विदेशांतरीं । श्रवणीं भेटती निर्धारीं । संकट दुर्घट अशातें निवारी । स्वयें गोरक्ष आपण ॥११॥
असो ते वेळी नगरनरेंद्र । नमस्कारोनि प्रार्थी मत्स्येंद्र । म्हणे स्वामी सदयसमुद्र । सुभद्र केलें समस्ता ॥१२॥
कल्पतरुंचे झाले दर्शन । कैचें राहे दरिद्र दैन्य । मी आर्त शरण अनन्य । उपदेश देणे मजप्रति ॥१३॥
नाथवदनीं घडे सकळ । पुनर्दर्शन उतावेळ । निश्चय असों द्या निश्चळ । तो तत्काळ काळ घालवा ॥१४॥
अवतारादि उत्साहजयंती । सिध्दसाधूंच्य्दा पुण्यतिथि । पराक्रमी ज्यांच्या कृति । त्या जागृत कीर्ति जयांच्या ॥१५॥
ऐसा तो अवतार उद्भवे । मत्स्येंद्र गोरक्ष जाती सवें । जनसमुदाय आणि रावे । बोलवीत जातसे ॥१६॥
मधुमक्षिकान्यायेंकरुन । वेध वेधले सर्व जन । चमत्कारें करिती नमन । हा तो स्वभाव तयांचा ॥१७॥
कथा पाल्हाळ म्हणून । श्रोतयांचे कंटाळ्दले मन । परि स्तवनप्रवाह गंगाजीवन । हव्यासबुध्दि नाटोपे ॥१८॥
यापरी गोरक्ष उत्पत्ति । श्रोतयां निवेदिली यथामति । आरुषभावें संतांप्रति । विनंती हेचि अवधारा ॥१९॥
पुढील कथेचें आमंत्रण । बहुत रसाळ सुरस गहन । श्रोतियां विज्ञापी कर जोडून । मंद प्राज्ञें प्रार्थितों ॥२२०॥
सिध्दसिध्दामृतग्रंथी । तेचि धरोनि सत्संगती । आदिनाथलीलामृतीं । यथामति अनुवादे ॥२१॥
अमनस्कग्रंथसारांश । वामदेवा कथिती महेश । गुरुकल्पखंडींचा इतिहास । उभयध्यायी कथियेला ॥२२॥
इति श्रीमन्नाथलीलामृत । ग्रंथकर्ता भैरव समर्थ । तृतीयाध्यायीम आदिनाथ । नमन करी सद्भावें ॥२२३॥
॥ श्लोक ॥२॥ ओव्या ॥२२३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP