श्रीनाथलीलामृत - अध्याय २२ वा
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
श्रीगणेशाय नमः ॥
जो परात्पर आदिनाथ । जो सर्वांतर्व्याप्त कूटस्थ । सबाह्य सघन ओतप्रोत । परि अलिप्त सर्वांसी ॥१॥
जो स्थावअर जंगम भरला सकळ । तयावीण रिक्त न दिसे स्थळ । जो जगदाभास भासे सकळ । रिक्त अळुमाळ नसेचि ॥२॥
जो परंज्योति परमात्मा । जो आतर्क्य निगमागमा । तयाचा काय वदूं महिमा । मी एकमुखे मतिमंद ॥३॥
तेथें जीवशिवाचा संगम । तो योगमार्ग परम दुर्गम । तो नाथगृहीं होय सुगम । स्वयंब्रह्म करिती जे ॥४॥
गत कथाध्यायीं कथारंग । गोपेंदू करी सर्वस्वत्याग । स्वयें घेत अक्षयी योग । भगिनीगृहातें पातला ॥५॥
तीतें न मानोनि वीतरागी । जाता जाला तीर्थमार्गी । इकडे मैनावती सवेगीं । गुरुदर्शनातें पातली ॥६॥
गुरु वदती ऐक जननी । गोपेंदुपुत्रा राज्यासनी । विजयचंद्रातें स्थापुनी । राज्यभार चालवी ॥७॥
यावरी कानीफनाथाप्रति । जालंधरी आज्ञापिती । सवें आणिले तुवां नृपति । ते स्वराज्यातें पाठवी ॥८॥
अवश्य म्हणोनि तये वेळां । आज्ञा देत सकळ भूपाळां । तुम्ही जाऊन स्वस्थळां । आपुलें राज्य करावें ॥९॥
गुरुपदीं असो द्यावा निश्चय । येणें तुम्हातें सर्वत्र विजय । चिरकाळ भोगून ऐश्वर्य । अंती कैवल्य पावाल ॥१०॥
मैनावती म्हणे सर्वज्ञमूर्ति । गोपेंदूच्या समग्र युवती । त्या अतिशय शोक करिती । तयां आत्मस्थितीं लावावें ॥११॥
॥११॥ दीनदयाळ ते समयीं । शीघ्र पातले भूपालयीं । तंव राजकांता सर्वही । सद्गुरुदर्शना पातल्या ॥१२॥
औमानामें पट्टराणी । मस्तक ठेवी सद्गुरुचरणीं । सदुःखें विलापती कामिनी । हाहाःकार माजला ॥१३॥
राजभार्या वदती वदनीं । गुरुवर्या ही विपरीत करणी । आमुचा मृग निरंजनवनीं । दवडोन हरणी विघडल्या ॥१४॥
पूर्वप्रारब्ध बळिष्ठ । यास्तव प्राप्त विरहकष्ट । कटकटां अदृष्ट हे बळिष्ठ । दुःख कष्ट भोगवी ॥१५॥
औमेस म्हणती तुझा प्रताप । तुवां वश्य करोनियां भूप । गुरुद्रोहाचें महत्पाप । घेई माप विरहाचें ॥१६॥
राजमदें तूं मदोन्मत्त । अविचारें बोधिला नृपनाथ । त्याचें हें प्रायश्चित्त । आतां दुश्चिंय कां होसी ॥१७॥
जल्पोनि सकोप संतापवाणी । सदुःखें दुःखीत सर्व कामिनी । तुवां केली निंद्य करणी । परि फळ भोगणें सर्वातें ॥१८॥
आमचा हंसिणींचा हंस । दीक्षा देऊनि परमहंस । भेदीत गेला चिदाकाश । आमुची निराशा करोनी ॥१९॥
सालया सांडून सम्य्क । प्रपंचपिंजर्यांतूनि उडाला शुक । वैराग्यपक्षी बैसला देख । आम्हां शुकीतें देखुनी ॥२०॥
मनीं घेऊनि विषयत्रास । सांडून गेला सर्वत्रांस । त्यागून पुत्र मित्र कलत्रांस । कुळगोत्रास विटला ॥२१॥
एक म्हणे जोटा विघडला । सारस माझा दैवें तोडिला । की चक्रवका वियोग झाला । शार्वरी निशा प्राप्त पैं ॥२२॥
अहा राया सौंदर्यसिंधू । तव नाम विलसे तरी गोपेंदु । आम्हां चातका दावी मदनेंदु । पदतीर्थबिंदु इच्छितों ॥२३॥
तुझ्या कुमुदिनी होऊन दीन । तूं आमुचा रोहिणीरमण । तरी कां गेलासि आम्हां त्यागून । वियोगअमावास्या आमुतें ॥२४॥
तव प्रीतीचा वोळला घन । परि वैराग्यवातें नेला झडपोन । मयूररसाआर्ते ऊर्ध्ववदन । करोनि राहिली हिंपुटी ॥२५॥
यापरी त्या राजकामिनी । विलाप करिती म्लानाननी । सद्गुरुनें ऐकोनि श्रवणी । पुसते झाले तयांतें ॥२६॥
तुमचा जो प्राणनाथ । तो तुमचे असोनि ह्रदयस्थ । मग शोक करणें किमर्थ । व्यर्थ अनर्थ भावितां ॥२७॥
स्वदेहीं पाहा शोधून । तुमचे शरीरी वर्ते कोण । इंद्रियराहाटी ज्या सत्तेनें । पाहा वोळखोन अंतरी ॥२८॥
तो नसे कोनाचा भ्रतार । क्तो नसे कन्याकलत्र । तो नसे कोणाचा मित्रपुत्र । असे स्वतंत्र वेगळा ॥२९॥
जेवीं जीवनीं भासे तरणि । परि तो अलिप्त सर्वांहूनी । घटीं बिंबला दिसे जीवनीं । तोचि गगनीं अलिप्त ॥३०॥
जळोपाधीं दिसे चळला । परि तो ठायीं संचला । मृषा मिथ्याभास भासला । तो सघन दाटला सबाह्य ॥३१॥
वस्तुतां पाहतां एक भंगार । परि एकी अनेक अळंकार । की अनेक मंदिरें एक अंबर । कीं सागरीं तरंग ज्यापरी ॥३२॥
तैसां स्त्रीपुरुषनाम व्यक्ति । ते अव्यक्तपणें जयाची स्थिति । सर्वांतरी करोनि वस्ती । परि नेणती तयातें ॥३३॥
रांझण आणि घागरी । आकृति विविध नामें धरी । ओतप्रोत अभ्यंतरीं । परी नामरुपांवेगळा ॥३४॥
घटमठीं व्याप्त गगन । कीं ओंकारापासोनि सकळ वर्ण । ते तुम्ही नेणोनि महिमान । अज्ञानभ्रमें करोनि ॥३५॥
कीं कंठीं मुक्त करोनि धारण । मग व्यर्थ जनांच्या गळां पडणें । तें तुम्हांसी झालें ज्ञान । जवळीं असोनि प्राणेश ॥३६॥
तुम्हां जवळीं स्वतःसिध्द । परि नेणतसां मतिमंद । मृगनाभीसीं सुगंध । परि शोधी कानन पैं ॥३७॥
तुमचा जो प्राणेश्वर । तुम्हांपासींच निरंतर । त्यातें विसरोनि बाह्यकर । शोधितां व्यभिचार स्वधर्मी ॥३८॥
नेणोनि आत्मसुखाची गोडी । तुम्ही रतिसुखास्तव झालां वेडीं । जो नेणोनि स्वानंदाची प्रौढी । विषय आवडी वांछिता ॥३९॥
तरी तो क्षणिक विषयसंग । परि परिणामीं दुःख अभंग । पतंग मातंग कुरंग भृंग । मीनादि पंच प्राणहत ॥४०॥
या पंचविषयेंकरोनी । महान पडिले श्रेष्ठ व्यसनीं । या पंचकाची प्राणहानि । किती म्हणोनि वदावी ॥४१॥
तरी विषयीं होऊनि नैराश्य । निर्गुणाचें करावें उपास्य । तेणें स्वस्वरुपीं सामरस्य । द्वैतभाव मावळे ॥४२॥
तंव एक वदली शुभलोचना । हे नृपवर्या दावी वदना । तुजवीण सदुःखित अंगना । एकटा वना गेलासी ॥४३॥
आमुचें ह्र्दय वज्रापरी । विरहे वांचलों अद्यापिवरी । तंव दुजी वदे लावण्यलहरी । हें दुःखदुस्तरीं पडियेलों ॥४४॥
रवीतें कमळें अनेक । जेवीं कमळांतें रवि एक । कीं चंद्रातें बहु चातक । तेवीं निशिनायक तूं मज ॥४५॥
तंव मैनावती प्रार्थी गुरुवर्या । ह्या विरहविव्हळ राजभार्या । सक्त सुखऐश्वर्या । भ्रतारसौंदर्या वेधल्या ॥४६॥
ह्या विषयसमुद्रीं बुडाल्या । भवकर्दमीं अति गाडल्या । परमार्थासी नाडल्या । काढिल्या पाहिजे ययांतें ॥४७॥
स्त्रुता पतिसुखाच्या विरहिणी । वृत्ति गुंतलीं विषयवासनीं । यांतें सकृप होवोनी । मनोन्मनीं लावावें ॥४८॥
नाथपंथाचा सबळ पक्ष । तरी उध्दरी उभय पक्ष । तूं सर्वज्ञ सर्वाध्यक्ष । अलक्षलक्षी लक्षवी ॥४९॥
जेवीं गोकुळीं गोपांगनांतें । उध्ववें निवेदिलें निर्वाणज्ञान । परि न मानी तयांचें मन । श्रीकृष्ण सद्गुण इच्छिती ॥५०॥
तरी सकृप होऊनि अंतरी । दीनोध्दारा दीना उध्दरी । अज्ञानतमनाशका तमारि । प्रकाश करीं ययांतें ॥५१॥
ब्रह्मैव भाव होय ययांसी । पाववी ततत्वं असि पदासी । तुमच्या ह्या दासानुदासी । म्हणोनि पायांसीं लागल्या ॥५२॥
मग सिंहनादें शृंगीवादन । तंव ब्रह्मरंध्र गेलें भेदून । पावत्या झाल्या कैवल्यसदन । मनसंलग्न होऊनी ॥५३॥
जेवीं मुरलीस्वरेंकरुनी । वेडावल्या व्रजकामिनी । देहगेहभाव विसरोनी । श्रीकृष्णीं अनुसरल्या ॥५४॥
कीं नागस्वर वाद्याचिये छंद । दंदशुक होती लुब्ध । तेवीं राजस्त्रियांचे वृंद । ध्यानिनादें वेधले ॥५५॥
झाल्या तटस्थ राजयुवती । ब्रह्मीभूत झाली वृत्ति । पावोनियां आत्मस्थिती । स्वरुपी होती तटस्थ ॥५६॥
तेथें देहभावा नुरे ठाव । हंससोऽहं स्वयमेव । जेथें द्वैताचें झालें वाव । अहंभाव पैं गेला ॥५७॥
जेवीं श्रुति स्वरुपी सरती । कीं इंद्रियें तल्लीन कूटस्थीं । तेवी नृपकामिनीप्रति । परमात्मज्योति साधली ॥५८॥
तेथें कैचा राव रंक । स्त्री पुरुष कीं नपुंसक । ऐहिकदेह कैचा मायिक । आत्मत्वास सर्वदा ॥५९॥
एकमेवद्वितीयं ब्रह्म । सहज नासे हा भेदभ्रम । हेचि अनुभवाचें वर्म । हा स्वधर्म योगिया ॥६०॥
जो निरामय निरांजन । परब्रह्म जें पुरातन । ज्योतिर्मय मायाविहीन । योगी ध्यान ध्याती जें ॥६१॥
तेथें ध्येय ध्याता आणि ध्यास । मग केवीं उरेल भेदभास । तो कोंदला स्वयंप्रकाश । अविनाशसुखीं निमग्न ॥६२॥
पाहा सद्गुरुची अघटित करणी । नृपकामिनीचें मानसमणि । ज्ञानोपदेशाच्या वोविले गुणीं । सत्तासूत्रीं गुंतल्या ॥६३॥
नाथगृहींचा धन्य महिमा । राजकामिनी काष्ठप्रतिमा । विसरोनि भेदभ्रमा । परमात्मरुपीं वेधल्या ॥६४॥
पाहा गे येणें नवल केलें । सबाह्य स्वरुप सम संचलें । चित्स्वरुप चिध्दन दाटलें । डोळां दाविलें प्रत्यक्ष ॥६५॥
जळो जळो हें संसारजिण । जन्मोनि जननी केली शीन । न करी श्रीगुरु आराधन । तरी यमबंधन चुकेना ॥६६॥
अनेक केलियां व्रत तप दान । सिध्दि नव्हे सद्गुरुवांचून । जेवीं दिव्यललनालावण्य । परि कुंकुमहीन व्यर्थ पैं ॥६७॥
श्रीगुरु देवाचाही देव । श्रीगुरु परात्पर परतत्त्व । श्रीगुरु गुह्याचें निजगुह्य । श्रीगुरु उपाय मोक्षासी ॥६८॥
आहा बाई पाहा कैसें । चोज दाविलें मज आपैसें । विसरुनियां मीतूंपणास । त्रिपुटीं ग्रास करविला ॥६९॥
आतां नको राजवैभव । गौरव तें मानूं रौरव । प्रतिष्ठा ते सूकरविष्ठा होय । विषयीं त्रास पावलों ॥७०॥
संचित क्रियमाण प्रारब्ध । सद्गुरुप्रतापें झाली दुग्ध । महिमा वर्णितां शेष स्तब्ध । जिघा द्विभाग जाहल्या ॥७१॥
कल्पतरू दे कल्पिलें । चिंतामणि दे चिंतिलें । कामधेनु देई इच्छिलें । निर्विकल्प केलें गुरुनें ॥७२॥
सद्गुरुसी उतराई । काय होऊं सांग बाई । तरी मौनेंचि पायी डोई । ठेवावी मज वाटतें ॥७३॥
जरी द्यावें तनमनधन । तरी नैश्चर्य जाण जाण । आतां गुरुदक्षिणा तदर्पण । भावविश्वास दोघेही ॥७४॥
तों वर्षाकाळ प्राप्त झाला । पंचअनळ प्रळय माजला । पश्चिमेचा मारुत सुटला । मेघमाळा कोसळती ॥७५॥
जळशश महीमंडळीं । पारधी पातला गेले निराळीं । पिटीत मृगपाठीं ते काळीं । धावे सैरा नभातें ॥७६॥
शक्रें चाप धरोनि करीं । रोहिणी मृगाचे पाठीं निकरीं । मेघधारा अपार शरीं । घनसघन वृष्टि वर्षती ॥७७॥
सूर्य भयें लपवी किरण । गतआभा नभातें होऊन । लपावया शोधी स्थान । जलदबुंथी आश्रय ॥७८॥
महीखंड शलाका अभंग । अनेक पर्वत पिंडी शिवलिंग । शक्र अभिषेक करी सांग । अतिधारेसी नभपात्रीं ॥७९॥
वनस्पति अष्टादशभार । पत्रीं पुष्पीं फळसंभार । इंद्र पूजी कर्पूरगौर । पर्वत पिंडी महीवरी ॥८०॥
मेघ वीर्योदकें स्त्रवती । होत पृथ्वी गर्भवती । अनेक सफळ धान्य प्रसवती । हरित वसन नेसली ॥८१॥
नूतन तृणांकुर डवरले । चितविचित्र पट्ट शोभले । अनेक रंगीं रंगाथिले । बहु शोभली कुंभिनी ॥८२॥
पंचाशतकोटि विस्तार । मही वेष्टित हरितवस्त्र । तेणें शोभे अतिसुंदर । धरादेवीं ते काळीं ॥८३॥
कडकडाट चपळ चपळा । मेघ गडगडाट जाहला । संघाट गंगा समुद्रजळा । मिसळती सैरा सागरीं ॥८४॥
कपोत चातक मयूर । हर्षे घोष करिती दुर्दुर । वृष्टि करी मेघ उदार । जीवनीं जीववी जीवांतें ॥८५॥
मेघें टवटविती अंकुर । फळशाखा धान्य समग्र । वनस्पति संपत्तीचे संभार । धरा वोपी जगातें ॥८६॥
विधि करी सृष्टि उत्पन्न । विष्णु करी जगपाळण । तोचि स्वयें होय जलद जीवन । परोपकारीं सर्वांतें ॥८७॥
प्रमाण करोनि सूर्यचंद्र । आपण करी कृतोपकार । तो विश्वईश्वर विश्वंभर । भरण पोषण करी स्वयें ॥८८॥
ऐसा वर्षाकाळ प्राप्त जाहला । प्रार्थिते झाले सद्गुरुला । स्वानंदाचा सुखसोहळा । सर्वही इच्छिती सेवेचा ॥८९॥
चातुर्मास दीपनिरांजन । छ्त्रपादुका कनकासन । श्रीगुरुसी अर्पण । भावें करोनि आवडीं ॥९०॥
प्रातःकाळीं उठोन । राजस्त्रिया भावेंकरुन । गुरुमठीं करिती संमार्जन । केशर मृगमद सिंचिती ॥९१॥
मौक्तिकांच्या रांगोळया । चित्र विचित्र सुरेख रेखिल्या । त्या अतिसुरम्य शोभल्या । ठायीं ठायी सुंदर ॥९२॥
दीपदानें विप्रभोजन । नाथाआराधनें नाथार्चन । द्विजां देवोनि धनवसन । सद्भावमनें करिताती ॥९३॥
जेवीं चंदनाचेनि संगें । तरु होती सुगंधअंगें । तेवीं सद्गुरुचे प्रसंगें । वैराग्य अनुराअ समस्तां ॥९४॥
नाथपरायण झाल्या वृत्ति । स्वरुपीं सामावल्या स्थिति । स्वर्गसुख तुच्छ मानिती । श्रीगुरुभक्तीसी विनटल्या ॥९५॥
तपें यज्ञें स्वर्गप्राप्ति । शुध्दकर्मे सत्यलोकास्थिति । शैव वैष्णव सगुणभक्ती । कैलास वैकुंठ प्राप्त पैं ॥९६॥
ब्रह्म उपासक गुरुसेवन । तरी त्या कैवल्यपद निर्वाण । स्वस्वरुपीं समरसोन । भेदाभेदा वेगळी ॥९७॥
तरी कर्मअर्पण श्रीगुरुचरणीं । वैराग्य शुध्दि अंतःकरणी । चित्तशुध्दियोगेंकरुनी । शांति पावे निर्धारें ॥९८॥
वैराग्यशांतीकरुन । तत्काळ होय ब्रह्मज्ञान । ज्ञानें कैवल्यसाधन । ब्रह्मसोपान साध्य पैं ॥९९॥
तरी या प्राप्तीसी कारण । मुख्य करावें गुरुसेवन । चंदनापरी शरीर झिजवून । शीतळ करावें गुरुतें ॥१००॥
चंदन झिजोनि करी शीतळ । अगरु जळोनि दावी परिमळ । सुमन गुंफुनीं व्हावें माळ । सुगंध केवळ गुरुसी ॥१॥
सद्गुरुचें करावया अर्चन । पूजाद्रव्य मीच होईन । सद्गुरुचें जें सिंहासन । स्वयें होईन सर्वांगीं ॥२॥
मृदुमवाळ आस्तरण । तें मी होईन मृदुआसन । सनभ्रपणें मीच टेकण । स्वशरीराचें होईन मी ॥३॥
गुरुतांबुल पिकपात्र । तरी वोडवीन उभयकर । गुरुमस्तकीं तन्मय छ्त्र । मीच विचित्र होईन ॥४॥
विरक्तीचें होईन चामर । वैराग्य व्यजन अहोरात्र । मीच होईन शीतळ समीर । वायुवाहक मीच कीं ॥५॥
गुरुपदींच्या दृढ पादुका । मीच निजांगें झालों देखा । गुरुपायांतळींची मृत्तिका । पदरज अखंड मी होय ॥६॥
गुरु करिती आरोहण । तो मी होईन दिव्य स्यंदन । चहुं पुरुषार्थ सुखासन । गुरु बैसवीन तयांत ॥७॥
मीच होईन हडपिकार । उदक तांबुल देईन स्वकर । बध्दहस्तें सेवे सादर । मीच ठाकेन पुढारी ॥८॥
मीचि होईन बंदीजन । गुरुप्रताप करीन वर्ण्न । मीच करीन सुस्वर गायन । गुरुकीर्तन करीन मी ॥९॥
मीच गुरुचरित्र पुराण । सद्गुरुचें करवीन श्रवण । मीच करीन व्याख्यान । अर्थ सांगेन गुरुसी ॥११०॥
चतुर्विध वाद्येकरुन । मीच करीन श्रीगुरुभजन । नृत्य गीत तानमान । भावें करीन गुरुभक्ति ॥११॥
अर्ध्यपाद्यादि षोडशोपचारें । मंगळस्नान । घालीन स्वकरें । शुध्दभावें दिव्यांबरे । धूपदीपादि नैवेद्य ॥१२॥
फळ तांबूल श्रीफल दक्षिणा । अर्पित सद्गुरुनाथ चरणां । मग घालोनि प्रदक्षिणा । रत्नभूषणां अर्पित ॥१३॥
सद्गद अष्टभावें दाटून । गुरुसी करीन साष्टांग नमन । काया वाचा आणि मन । केलें सांडणें गुरुवरी ॥१४॥
चारी मुक्तीचा तल्पक । वरी पौढवीन गुरुनायक । गुरुसेवा स्वहस्तकें । मस्तकें पाय घासीन ॥१५॥
मी विसरलों कथानुसंधान । लागलें श्रीगुरुअनुसंधान । तदात्मक होऊन मन । द्वैतभान हरपलें ॥१६॥
यास्तव न कोपावें श्रोती । विनवीतसे पुढती । तुम्ही क्षमा करोनि मजप्रति । अभयोक्ति असो तुमची ॥१७॥
असो मैनावतीचे वचनीं । प्रबोधिल्या नृपकामिनी । विषयीं नैराश्य होऊनी । वैराग्यविरक्तीं बाणल्या ॥१८॥
यावरी संशय श्रोतियां प्रति । की जालंधरीची निःस्पृहवृत्ति । असोन बोधिल्या राजयुवती । हें आश्चर्य आमुतें ॥१९॥
तरी योगियाची प्रतिज्ञा ऐसी । स्त्रिया न पाहती दृष्टीसीं । मग उपदेश कासया तयांसी । हे आश्चर्य आमुतें ॥१२०॥
स्त्रियांचें होतां दर्शन । तेंचि योगभ्रष्टासी कारण । स्त्रियांसी उपदेशिलें ज्ञान । हें आश्चर्य आमुतें ॥२१॥
जियेचे नेत्रकटाक्षईक्षणें । मनोज वेधी पंचबाणें । तरी दृढ केवीं राहील मन । हें आश्चर्य आमुतें ॥२२॥
याविषय़ीं प्रत्युत्तर । प्रार्थीतसे जोडून कर । जयाची वृत्ति तदाकार । तयासी विष न बाधी ॥२३॥
जयासी समलोष्ठकांचन । स्त्री भेटतां नवयौवन । जो मातृवत् भावी मन । तयासी विषय न बाधी ॥२४॥
जो रावरंक पाहे समदृष्टीं । पिपीलिका आणि परमेष्ठी । नसे जया भेद पोटीं । तयासी विषय न बाधी ॥२५॥
जेणें कामक्रोधां जाळिलें । लोभमोहांतें वाळिलें । आशातृष्णांतें निर्दाळिलें । तयासी विषय न बाधी ॥२६॥
तया भेदाभेद गळाला । तो अहं ब्रह्मास्मि स्वयें झाला । तेथें भेदभास कैचा उरला । तयासी विषय न बाधी ॥२७॥
ऐशा चिन्ही जो गुरुवर्य । तयासी स्त्रियांचें कायसें भय । जिही केला विषयपराभव । तेथें संशय कासया ॥२८॥
मागें उपदेशिल्या बहुत युवती । तरी त्या परिसा यथानिगुती । याज्ञवल्क्यानें मैत्रेयीप्रति । उपनिषदयुक्ति बोलिली ॥२९॥
तत्त्वनिष्ठ तो देवऋषि । उपदेशिलें कयाधूसी । कपिल बोधी देवहूतीसी । परोक्षज्ञान ठसावी ॥३०॥
जो आदिनाथ शूळपाणि । तेणें उपदेशिली ती मृडानी । यज्ञपात्न्या श्रीकृष्णें बोधुनी । मेळविल्या स्वस्वरुपीं ॥३१॥
उध्दवें बोधिल्या त्या गोपिका । त्या ब्रह्मरसाच्या कूपिका । कीं स्वानंदाच्या पूर्ण वापिका । ज्ञानकुंचिका लाधल्या ॥३२॥
सर्व धर्मात धर्म श्रेष्ठ । गुरुभक्ति परम उत्कृष्ट । गुरुपुत्रातें परम इष्ट । याहुन वरिष्ठ नसे कीं ॥३३॥
इहामुत्रफळभोग धरोनि आशा । यज्ञयागादि करिती हिंसा । पुण्य सरतां अतिदुर्दशा । जन्ममृत्यु भोगवी ॥३४॥
असो सत्काळ सत्समागम । मैनावतीची गुरुभक्ति निःसीम । राजकामिनीचा तोचि धर्म । सप्रेम प्रेम गुरुभक्ति ॥३५॥
वर्षाकाळ चातुर्मास । सरतां कार्तिकाचा प्रवेश । व्रत उद्यापनें बहुवस । राजभार्या करिताती ॥३६॥
लक्षावधि विप्रभोजन । श्रीपादादि आराधन । तृष केले षड्दर्शन । सिध्दसाधु इतरही ॥३७॥
अन्नें वसनें अळंकार । देवोनि तोषविले धरामर । दीपनीरांजनें तीं अपार । दानें द्विजां दिधलीं ॥३८॥
श्रीमद्भागवत भारत । हरिवंशादि माहात्म्य ग्रंथ । शिवपुराणें चरित्रें बहुत । समाप्ति केली कार्तिकीं ॥३९॥
लक्षबिल्व लक्षतंदुळ । लक्षपुष्पदीप सोज्वळ । सुलक्ष लक्षीला जाश्वनीळ । सफळ दक्षीनें अर्चिला ॥१४०॥
राधादामोदर प्रीत्यर्थ । भावें पूजिती द्विजदंपत्य । सारोनियां नित्यनैमित्य । परमार्थ आर्त प्रीतीनें ॥४१॥
चातुर्भास सत्संग सर्वकाळ । यापरी गेला अतिरसाळ । स्वानंदसुमन सुखपरिमळ । रुंजी पराग ज्यापरी ॥४२॥
यापरी गुरुसेवें विनटल्या । जन्ममृत्युपासोनि सुटल्या । सदा स्वानंदी दाटल्या । त्या विटल्या विषयांतें ॥४३॥
गुरुनाम कल्याणकराक । गुरुनाम भवच्छेदक । श्रीगुरुनामीं कैवल्यसुख । त्वरित तारक कलियुगीं ॥४४॥
गुरुतें जो नर मनीं न मानवी । पतन पावे पडे रौरवीं । जो देवाधिदेव गुरुतें भावी । तया गौरवी हरिहर ॥४५॥
गुरुभक्ताचा अगाध महिमा । तो नेणवेचि निगमागमा । श्रीगुरुभक्तीचा पेमप्रेमा । स्वयें सच्छिष्य जाणती ॥४६॥
धन्य ते सद्गुरु सच्छिष्य । माहात्म्य वर्णितां शेष अशेष । जयाचे स्मरणें निःशेष । निर्दोष यश पाविजे ॥४७॥
हा ग्रंथ परमसुमंगल । नासी दुरितें अघअमंगल । जेवीं ब्रह्मचिंतनीं अळुमाळ । मनोमळ नासती ॥४८॥
हा सिध्दसिध्दांत सिंधुमंथनें । त्यांतील सारांश चिद्रत्नें । सद्गुरुभैरव वरदयत्नें । मान्य होय बुधजनां ॥४९॥
जेवीं वटबीज अल्पसूक्ष्म । परि विस्तार देत व्योमक्षेम । सघन छाया अतिसुगम । श्रांत विश्रांत श्रोतयां ॥१५०॥
मूळावांचोनि विस्तार कैसा । प्रगट नोहेचि पाहा सहसा । हाचि असो द्या भरवसा । नोघे अन्याथा हे वाणी ॥५१॥
मन न राहे निश्वळ । तरी या ग्रंथाचें कायसें फळ । दुर्वास मन परम चपळ । तरी नेम शृंखळें गोविजे ॥५२॥
श्रीआदिनाथलीला सुरस । रसिकजनहंसां सुधारस । श्रव्ण करोत असपास । द्वाविशतितमोऽध्याय गोड हा ॥१५३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 07, 2020
TOP