श्रीनाथलीलामृत - अध्याय १० वा
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
श्रीगणेशाय नमः ॥
ब ६श्री नमो आदिनाथ पुरातना । निराकारा सनातना । पूर्णब्रह्म निरंजना । नामरुपातीत तूं ॥१॥
जें ज्योतिर्मय परंज्योति । जेथें श्रुतिस्मृति पार नेणती । पुराणें स्वरुपीं भांबावतीं । तेथें गति न पवेचि ॥२॥
न पवे चतुरानन । व्यास झाला वक्रवदन । सहस्त्रशीर्षही लपोन । पाताळविवरीं राहिला ॥३॥
समग्र अद्रि चूर्णकज्जल । समुद्रशाई समृध्दिजल । सुरद्रुमशाखा लेखणी सबळ । पत्र विशाळ कुंभिनी ॥४॥
लेखक स्वयें सरस्वती । वक्ता वाचक वाचस्पति । तरी तव गुणमहिमा न पावती । तेथें मी किती मतिमंद ॥५॥
यालागीं करिती अनुष्ठान । मौनस्थ आणि धूम्रपान । ऊर्ध्वबाहू पर्णाशन । अनेक साधनें साधिती ॥६॥
तरी न पवती मोक्षद्वार । भ्रांतिभ्रमें पडे आंधार । चांचपिती एक संवत्सर । अणुमात्र मार्ग दिसेना ॥७॥
जेवीं आदर्श निकेतन । त्यांत गुंतोनि राहे श्वान । न सांपडे त्या द्वरखूण । चरफडोन शिणतसे ॥८॥
जेवीं जन्मांधवृंदमतें । द्विरद म्हणती अवयवांतें । देखणा सर्वांग देखत । सालंकारी हा गज ॥९॥
कीं चाहुलीचे श्वान । भुंके तस्करा देखून । इतर भुंकती त्यावरोन । अट्टहास्य त्राण ते वेळे ॥१०॥
तामस राजस क्रिया करिती । अनेक यज्ञयाग आचरती । परि गुरुमार्गातें नेणती । कैसी मुक्ती तयां पैं ॥११॥
वृत्तांत उत्तमोत्तम वद्ती । उत्कर्षमाहात्म्य म्हणती तीर्थी । अनेक उपास्यउपासना करिती । तरी स्वात्मस्थिति न बाणे
॥१२॥
गाणपत्य म्हणती गणपति । शाक्त कल्पिती महाशक्ति । स्मार्त म्हणती पशुपति । वैष्णव म्हणती महाविष्णु ॥१३॥
व्रतें तपें यज्ञहवन । यंत्रमंत्रादिपुरश्वरण । एकविध न राहे मन । येणें शीण सर्वही ॥१४॥
श्रावणसंपत्तिशनिवारीं । नरहरी पूजिती भिंतीवरी । भानुदिवसातें तमारी । अर्चिताती आदरें ॥१५॥
इंदुवासरीं त्रिपुरारी । पूजन करिती निशीमाझारी । भौमवारी मंगळागौरी । पूजिताती आवडीं ॥१६॥
शशिपुत्र बृहस्पती अर्चिती चित्रें । भृगुवारीं जीवत्या स्वतंत्र । संवत्सरीं व्रत समग्र किती म्हणोनि सांगावीं ॥१७॥
तयांचे एकविध नसे मन । चपळत्वें करीतसे गमन । जेवीं वारांगनेचें शय्यागमन । पति पाहीं शेवटीं ॥१८॥
एक सिध्दिसाधनीं गुंतले । ते गुरुपदातें मुकले । ते आत्मस्थिती दुरावले । मार्ग चुकले सर्वस्वें ॥१९॥
गतकथासंबंधविस्तार । जीवविले सुभद्र दुर्धर । आतां परिसावें एकाग्र । सिंहावलोकनेंकरुनि ॥२०॥
ब्रह्मांडसमाधीचे आर्ते । गोरक्ष गेले योगपंथें । बहुत दिवस लागले त्यांतें । मार्ग पाहती सद्गुरु ॥२१॥
मत्स्येंद्रगिरीतें मत्स्येंद्र । ध्यानस्थ पाहती तेथें कुमर । पिंडी शोधिले समग्र । ब्रह्मांडातें पाहती ॥२२॥
तों सहस्त्रदळीं सामावोन । जीवशिव होऊन लीन । मत्स्येंद्रें आणिले तेथून । निजपुत्रातें ते वेळीं ॥२३॥
गोरक्षे मिठी घालोन पायीं । मत्स्येंद्रें कवळिलें दोहीं बाहीं । तो ब्रह्मानंद तये समयीं । पार नाहीं त्या सुखा ॥२४॥
जेवीं कच संजीवनीसंपन्न । गुरुतें भेटे प्रीतीकरुन । संतोष पावले विगुधजन । तेवीं आनंद वर्तला ॥२५॥
कीं सीताशुध्दीचे आर्ती । मारुति गेले लंकेप्रति । येता झाला पुनरावृत्ती । रघुपतीतें भेटला ॥२६॥
कीं विदेशीं गेला नंदन । मातेसी भेटे द्रव्यसंपन्न । तेवीं संतोष अन्योनु । होता झाला उभयांतें ॥२७॥
मत्स्येंद्र वदती गोरक्षातें । मी जातसें पुष्करातें । तुवां यावें सवेग तेथें । सिध्दमेळा होतसे ॥२८॥
तो परमपावन गिरिवर । अद्यापि जाणती सर्वत्र । तयासमीप सागर । मत्स्येंद्रपुत्र । नगरप्रदेशीं उतरले ॥३०॥
तो शुक्लपक्ष श्रावणमास । नागपंचमी पुण्यदिवस । घरोघरीं आनंद बहुवस मंगलोत्साह होतसे ॥३१॥
तों प्राप्त झाला माध्यान्हसमय । भिक्षेसि जाती मत्स्येंद्रतनय । एक दुर्बळ द्विजवर्य । दरिद्रदैन्यें व्यापिला ॥३२॥
शिलोंछवृत्तीकरोन । शुक्लवृत्तीनें तो ब्राह्मण । करी कुटुंबउदरभरण । पोषण करी स्वदुःखें ॥३३॥
तेथें येऊन गोरक्षनाथ । अलक्षशब्द करिती नाथ । विप्रभार्या तया वदत । विलंब आहे क्षणभरी ॥३४॥
आज असे नागपूजन । मृत्तिकेचा शेष करुन । षोडशोपचारें अर्चन । नंतर भोजन करावें ॥३५॥
येणें तुष्टिपुष्टि आयुष्यवर्धन । अप्राप्तलक्ष्मी प्राप्त पूर्ण । पुत्रपौत्र वर्धमान । होत असे या व्रतें ॥३६॥
गोरक्ष म्हणे प्रतिवर्षी । अनुष्ठीतसां या व्रतासी । तरी दैन्यदशा किमर्थ ऐसी । अन्नआच्छादन नसेचि ॥३७॥
मृत्तिक पूजून पुरतें आर्त । तरी कां न पूजिती पर्वत । भ्रमें भुलले जन सर्वत्र । परमार्थातें नेणती ॥३८॥
मृत्तिका शेषाकृती पूजिती । तरी प्रत्यक्ष कां न पाचारिती । येरी वदे तयाप्रति । अघटित केवीं घडे हें ॥३९॥
नाथ करी शृंगीवादन । असंख्य प्रगटले कद्रुनंदन । श्वेत पीत आणि कृष्ण । मणि मस्तकीं शोभती ॥४०॥
प्रवाळवर्णी माणिक्यवर्णी । सुवर्णवर्णी रजतवर्णी । अरुणवर्णी शुक्लवर्णी । नीलवर्णी असंख्य ॥४१॥
एकफणी पंचफणी । दशफणी शतफणी । निघते झाले ते क्षणीं । चक्षुश्रवे अनेक ॥४२॥
अगोचर गोचर दर्वीकर । बहुविध देखून भयातुर । होत झाले नारीनर । तंव विप्रभार्या प्रार्थित ॥४३॥
म्हणे स्वामी पादोदर । उत्पन्न झाले हे अपार । परमभयानक विखार । यांचें भय वाटतें ॥४४॥
आश्वासीत सद्गुरुनाथ । पूजन करा प्रत्यक्षांत । शेषभावीं मृत्तिकेंत । पूजीत होतां आवडीं ॥४५॥
प्रत्यक्ष प्रचिती तुम्हांप्रति । दैवें देवता सिध्द होती । यांचें अर्चन परमप्रीतीं । देवगौरव करावा ॥४६॥
यांजपासून तुम्हांस भय । नाही सर्वथा माझें अभय । हें शिवभूषण परम सदय । तुष्ट होती सर्वातें ॥४७॥
नगरजन पाहूं पातले । प्रभूस सांगती नवल वर्तलें । पाताळसर्प भूमीस आले । आश्चर्य पाहिलें आजि हें ॥४८॥
व्याळवृंद संभार । प्रगट झाले एकसर । न कळे ईश्वराचें चरित्र । अद्भुत प्रताप नाथाचा ॥४९॥
ऐकोन नृप धांवे सत्वर । करी गोरक्षा नमस्कार । स्तवन करितसे अपार । सद्गुरुचें ये वेळीं ॥५०॥
जयजय दीनदयाळ पतितोध्दारणा । भक्तवत्सल करुणाघना । मज उध्दरी आलों शरणा । ब्रीदाभिमान असावा ॥५१॥
नाथ आज्ञापिती तये समयीं । पन्नग न्यावे आपुल्या गृहीं । अर्चोनियां लवलाहीं । अरण्यांत सोडावे ॥५२॥
ऐसी आज्ञा सर्वाप्रति । अवश्य म्हणे तेव्हां नृपति । म्हणती वाटे यांची भीती । मग विभूति फुंकिती ॥५३॥
तेव्हां निर्भय झाले सर्वत्र । नाग नेती नारीनर । पूजिती तयां षोडशोपचाएर । क्षिरनैवेद्य अर्पिती ॥५४॥
यापरी पंचमीपूजन । करिते झाले नगरजन । पूर्वस्थानीं गोरक्ष येऊन । वास करिती संतोषें ॥५५॥
काद्रवेय समारंभसंयुक्त । पौरव नृपवर्यासहित । येते झाले सद्गुरु जेथें । नगराबाहेर ते वेळां ॥५६॥
शिविकायानीं नागकुळ । वाद्यगजरें आणिले व्याळ । तये स्थानीं सोडिले सकळ । सद्गुरुसंनिध ते समयीं ॥५७॥
सद्गुरु आज्ञापी तयां । तुम्ही जावें आपुल्या ठायां । प्रतिवर्षी येऊनियां । प्रगट व्हावे ये स्थळीं ॥५८॥
गोरक्षआज्ञा होतां सवेग । गुप्त झाले तेव्हा नाग । अद्यापिवरी पाहती जग । अझून आज्ञा रक्षिती ॥५९॥
नृप वदे सर्वज्ञमूर्ति । शरण पातलों सद्गुरुप्रति । जगदोध्दाराचे आर्ती । स्वामी येथें पातले ॥६०॥
मी अपराधी सर्वापरी । आतां मज पतितातें उध्दरीं । भवाब्धि उतरोनि ये अवसरीं । तारी मज दयाळा ॥६१॥
यापरी परिसोन विनीतवचन । सकृप झाले दयाघन । निगममंत्र उपदेशून । पावन केलें ते समयीं ॥६२॥
नाम याचे सोमदत्त । मग ठेविलें सोमनाथ । दीक्षा देऊनियां त्वरित । अलक्ष उच्चार करीतसे ॥६३॥
जें अलक्ष लक्षातीत । तें पिंडब्रह्मांडीं प्रोत । ध्येयध्यातेपणही सरत । सच्चित्सस्वरुप स्वयेंच ॥६४॥
तेथें विश्वचि झाले देव । तेथें द्वैताचा नसे ठाव । स्वसंवेध्य स्वयमेव । सबाह्य होय आप्ण ॥६५॥
तया आज्ञा करिती शीघ्र । तीर्थे करावीं समग्र । स्वरुपी लक्ष अव्यग्र । निरंतर असावें ॥६६॥
असो द्वीपांतरीचें बीज । चिंचिणीचें होतें जहज । तेथें राखिती योगिराज । वृक्षविस्तार जाहला ॥६७॥
स्थूल फळें स्थूल तरुवर । अद्यापि पाहती जन सर्व । तेथें वास निरंतर । गोरक्षाचा असे पैं ॥६८॥
अद्यापि सेवासूत्र तेथ । आर्तसिद्धि सत्वर होत । तेथें स्फुरद स्वामी समर्थ । प्रत्यक्ष दर्शने होताती ॥६९॥
पुत्रार्थियांसी होती पुत्र । नेत्रार्थियांसी येती नेत्र । ऐश्वर्य आणि परत्र । परमार्थ प्राप्त तयांतें ॥७०॥
ब्रह्मराक्षस ब्रह्मघ्नदोष । दर्शनमात्रें होय निर्दोष । तेथें वास करितां निर्दोष । ज्ञान होय अपेक्ष पैं ॥७१॥
अद्यापि तें जागृत स्थान । असो गोरक्ष करिती तेथूनि गमन । जातां देखिलें अटव्यवन । परम घोर भयानक ॥७२॥
तो तेथें वर्तलें अपूर्व जाण । समिधार्थ पातला ऋषिनंदन । सवें भार्या अपूर्व लावण्य । येती झालीं सन्निध ॥७३॥
एकांत पाहून कानन । प्रियप्रियातें अनन्य । परमप्रीती प्रियभाषण । विनोद करिती परस्परें ॥७४॥
वयस्क असतां ऋषिनंदन । सौंदर्यकामिनी नवयौवन । म्हणे आहे एकांतवन । क्रीडास्थान सुंदर ॥७५॥
निबिड छाया वृक्षसघन । तेथें प्रवेशेना सूर्यकिरण । करुं आतां कुशलशयन । परम विव्हळ होतसे ॥७६॥
तो वदे न करी ऐसें । दिवामैथुन वर्ज असे । रवि आला माध्यान्हास । अनुचित केवीं करावें ॥७७॥
कामें विव्हळ विकळ कामिनी । तीतें वदे हो चातुर्यखाणी । कंठी झोंबली तृषासर्पिणी । ईते शांतवी सत्वर ॥७८॥
रसने शोष संतप्त गात्रें । पत्रद्रोण विशाळ पात्रें । म्हणे आणितों क्षणमात्रें । अविलंबेंसीं ये काळी ॥७९॥
पत्रद्रोण घेऊन वेगीं । जाती झाली तन्वंगी । जळशोधनार्थ एकटी मार्गी । गमन करी चपळत्वें ॥८०॥
भविष्य भावी जें संचितीं । होणार न चुके कल्पांती । जळानिमित्त जाय युवती । इकडे काय वर्तलें ॥८१॥
तेथे व्याघ्र पातला अकस्मात । कृतांतसमय वोढवे मृत्यु । देखोनि झाला भयाभीत । द्विजपुत्र तेधवां ॥८२॥
विक्राळ भयानक गाजवी हाक । पुढें येतसे तो सन्मुख । उड्डाण करोनि देख । चपेट हाणी तयातें ॥८३॥
मस्तक कडकडा चावून दश्नीं । तडतडाटे अस्थिध्वनि । भडभडा रुधिर ते क्षणीं । भळभळाटे वाहतसें ॥८४॥
खंडविखंड गात्रें विघडलीं । व्याघ गेला तये काळीं । जीवन घेऊन जंव पातली । तंव अनर्थ रोकडा देखिला ॥८५॥
धबधबा हाणी वक्षस्थळ । भूमीस त्राहाटिती झाली मौळ । परम वोढवे प्रळयकाळ । धुळी मस्तकीं घालीत ॥८६॥
अहा प्राक्तन कैसें गहन । माझें हरपलें वनीं निधान । भग्नानना देत चुंबण । आंदोळण देतसे ॥८७॥
प्रळयवातें जेवीं कर्दळी । उलथोन पडे भूमंडळीं । वारंवार वदनी धुळी । घालीतसे सदुःखें ॥८८॥
उडोनि गेला माझा हंस । दाही दिशा दिसती वोस । मज एकटीला अरण्यवास । केवी केलासे वल्लभा ॥८९॥
दुःखग्नीच्या झडकती ज्वाळा । सोसवे या विरहानळा । काय करू या कपाळा । म्हणोनि त्राहाटी सरोषें ॥९०॥
विरहदुःख सहन न होय । वनीं एकटी करूं काय । जगन्निवासा करिसी काय । म्हणोनि बोभाय अट्टहास्यें ॥९१॥
चक्रवाकवियोगपरी । त्यांतें निशा मज व्याघ्रवैरी । कोठें गेला दुराचारी । माझे वेळे नेणवे ॥९२॥
विगताधवा वैधव्यपणें । जेवीं स्मशानीं भग्न भाजनें । तेवीं निरर्थक झाले जिणें । काय वदन दानावें ॥९३॥
जळो जळो हें जीवित । सजीव असोनि मिरवे प्रेत । स्त्रियांचे माथां हा अनर्थ । धन्य धन्य रे विधात्या ॥९४॥
विलाप करोनि पडे धरणीं । तेथें कोण सावरी तिजलागुनी । जिव्हा वाळली न मिळे पाणी । दुरळ वनीं ती एकटी ॥९५॥
नेणो जन्मांतरीचें दोष । यास्तव उगवला दुष्ट दिवस । कां शिवपूजेचा विध्वंस । केला असेल पूर्वी म्यां ॥९६॥
की व्रत भंगिलें साचार । म्हणूनि हें प्राप्त दुःख दुस्तर । कीं बिघडविले स्त्रीभ्रतार । कीं सिध्दपुरुषा निंदिलें ॥९७॥
असो एकटी हरणी पडे फांसा । नैराश्यें विलोकी ऊर्ध्वदिशा । धांव पाव गा जगन्निवासा । माझी दुर्दशा योजिली ॥९८॥
म्हणे ई़श्वर तों सर्वाघटीं । काय करुनि पडेल दृष्टी । भविष्यलेख जो अदृष्टीं । तो कदापि चुकेना ॥९९॥
देव प्रार्थितां देव धांवती । मज दुर्दैवातेंही न पवती । ऐसें म्हणतां शीघ्रगतीं । गोरक्ष तेथें पातले ॥१००॥
जो परब्रह्मीचें आगर । जो दयेचा सदय सागर । तो लीलाविग्रही अवतार । जगदोध्दारा प्रगटला ॥१॥
पुसते झाले तिजप्रति । तूं कोण कोठील कोणाची युवती । दुरळवनीं एकटी एकांती । रुदन करिसी किमर्थ ॥२॥
यावरी वदे ती प्रत्युत्तर । कांत कांतारी मारिला व्याघ्रें । खंडविखंड पडिलें शरीर । दुःख दुस्तर वोढवलें ॥३॥
म्हणती जननी ऐक वचन । व्यर्थ कासया करिसी रुदन । पूर्वीचा पिता बंधु नंदन । भ्रतार कोठें पूर्वीचा ॥४॥
आलीस चौर्यांशीं लक्ष फिरोन । त्याचें तुज काय असे स्मरण । कोण कोणते आप्तस्वजन । त्यांची ओळख तुज कैची ॥५॥
मुळींच नाम मृत्युलोक । येथें मूर्खपणें करिसी शोक । मित्र पुत्र जननी जनक । कित्येक मृत्यु पावले ॥६॥
मृत्युलोकीं मरावें । अमरलोकीं अमर व्हावें । हे तूं जाणसी आघवें । जेथील धर्म तेथींचा ॥७॥
फेरे फिरसी अनेक योनी । जेवीं फिरे अखंड स्मरणी । सर्वत्र ठायीं पिता जननी । शोक करणें कोणाचा ॥८॥
एक कर्मभूमीस घडे जनन । पांचभौतिक देह निर्माण । जीवित पाहतां विद्युत्स्फुरण । देहाभिमानें नाडलें ॥९॥
आत्मा नित्य ओतप्रोत । तो अनित्याचा नसे आप्त । तो पाहतां सर्वातीत । अलिप्तपणें असे कीं ॥११०॥
कोठोनि आला कोठें गेला । आणि तो कोठें सामावला । याचा शोध काय तुजला । कळलासे सांग मज ॥११॥
आत्मा नसे स्त्री ना भ्रतार । शरीरसंबंध मानिसी जर । तरी पुढें पडलें कलेंवर । शोक काय करिसी तूं ॥१२॥
आणिक पक्षी येती आंगणीं । उडोन जाती तेचि क्षणीं । पांथस्थ वृक्षछायें येवोनी । उठोनि जात ते वेळां ॥१३॥
गंगाप्रवाही काष्ठे मिळतीं । वेगवेगळीं विघडतीं मागुतीं । जळीं बुद्बुद होती जाती । तोय शाश्वत अखंड ॥१४॥
विहंग बैसती तरुवरी । सावेंचि उडोनि जाती दुरी । अनेक वृक्षांमाझारीं । जावोनियां बैसती ॥१५॥
प्रपंचवृक्षीं जीवशिव । पक्षी बैसले अभिनव । साक्षी शिव स्वयमेव । विषयफळें जीव भक्षी ॥१६॥
विषयफळीं जे भक्षिती । ते आपणां विसरती । तयां न सुटे जन्मपंक्ति । दुःख पावती दुस्तर ॥१७॥
जन्मांतरीचें जरी पुण्य होय । तरी सद्गुरुतें शरण जाय । तेणें चुकती हे अपाय । समरस होती स्वस्वरुपीं ॥१८॥
यापरी विप्रस्त्री बोधून । तीतें वदती आज्ञावचन । प्रेतसार्थक करी जाऊन । अग्निइंधन मेळवी ॥१९॥
तनु पडली छिन्नभिन्न । गोळा करी एकवटून । स्ववस्त्रीं दृढ बांधून । जळानिकाट ने वेगीं ॥१२०॥
अस्थि पतीच्या करी गोळा । वस्त्री बांधी तये वेळां । ग्रंथी मस्तकीं घेत अबला । शोक करी आक्रोशें ॥२१॥
स्वामी म्हणती तिजकारण । तूं पुढें जाई मी आणितों इंधन । तरुतें हस्त स्पर्शितां जाण । जाति उध्दरोन ते काळी ॥२२॥
धन्य धन्य तेचि वृक्ष । जयांतें स्पर्श करी गोरक्ष । काष्ठें मोडिती कंजाक्ष । सर्वाध्यक्ष जगद्गुरु ॥२३॥
काष्ठभार रचूनि शीघ्र । पाचारिला हिंसक व्याघ्र । जेणें भक्षिला विप्रपुत्र । वोपी तयापुष्टी ती काष्ठें ॥२४॥
इतर शुष्ककाष्ठ संभार । अंतरिक्ष जाती अपार । पाहुन ते शुध्दकांतार । तयातटीं ठेविला ॥२५॥
द्विजभार्ये वदती उत्तर । हा तुझा आणिला तस्कर । तीतें वाटे चमत्कार । तरी भय वाटे अंतरी ॥२६॥
म्हणे हा प्रत्यक्ष ईश्वर । धरुनि आणिला सजीव व्याघ्र । आणि काष्ठभार पर्वाताकार । अधर तिष्ठती ज्या सत्तें ॥२७॥
अगाध ईश्वरी सूत्र । जळावरी पृथ्वी अधर । स्तंभावीण उभविलें अंबर । अघटित चरित्र जयाचें ॥२८॥
पंचतत्त्वांचे असे वैर । परि एक होती परस्पर । अपरोक्ष शशिभास्कर । नक्षत्रादि असती ॥२९॥
असो द्ते समयीं सद्गुरुनाथ । तेथें स्वहस्तें तीर्थ निर्मित । तेथें पापाचा होय अंत । अद्यापवरी पाहती ॥१३०॥
अघटित नाथाचें विंदान । जडातें करिती चैतन्य । काष्ठें विहंगापरी येत उडोन । चिंतेंत पडती अपैसें ॥३१॥
असंभाव्य चिता रचियेली । विप्रकांता वदे ते वेळी । स्वामी सहगमन ये वेळीं । मज हस्तीं करवी कां ॥३२॥
अवश्य म्हणति गोरक्षनाथ । वदसी तूं पुरती अर्थ । तुवां असावें निवांत । होईल तें तूं अवलोकीं ॥३३॥
येरी वदे करुणावचन । स्वामी इच्छी मी शय्यागमन । हा दृढनिश्चय केला मन । सद्गुरुकृपेनें घडावा ॥३४॥
यावरी वदती समर्थ । तूं तडागी स्नान करी यथार्थ । अस्थि पतीच्या चितेंत । आणोनियां ठेवीं कां ॥३५॥
यानंतर ते विप्रपत्नी । स्नान करोनि कासार जीवनीं । येती झाली ते नितंबिनी । नाथासन्निध तेधवां ॥३६॥
मग आज्ञापिती तीतें । सत्वर पाराची स्वपतीतें । आजि जाणवेल तव प्रीतीतें । परि पति येईल ये काळी ॥३७॥
ऐकोनि म्हणे हें केवीं घडेल । मृत्यु पावला पुन्हा येईल । की काळ मुखांतून वमील । केवी अघटित होय पैं ॥३८॥
पुन्हा आज्ञापिती वरदवाणी । स्वपती पाचारीं ये क्षणी । असत्य वाटे इचे मनीं । सत्य कीं विनोद नेणवे ॥३९॥
संशयसमुद्री पडली जाण । परी पतिस्मृतीनें करी रुदन । म्हणी प्राणप्रिया ये धांवून । धाय मोकळी अट्टहास्ये ॥१४०॥
अहा कटकटा प्रारब्ध गहन । विधातया करिसी निर्माण । दुरळ वनीं मी दुर्बळ जाण । पतिवीन येकटी ॥४१॥
कांता कांतारी स्वकांतेतें । त्यागोन जासी येकांतातें । करुणा नये कृतांतातें । या आकांता तये वेळीं ॥४२॥
माझा करुन घात । यांत मिळविसी काय पुरुषार्थ । मी भणंग दीन अनाथ । मजवरी कोप कासया ॥४३॥
गोरक्ष वदती ऐक माये । नाम घेऊनि पतीतें बाहे । घेऊन येईन लवलाहें । निश्चय मनीं असों दे ॥४४॥
विश्वश्रवा म्हणोन ते वेळीं । दीर्घ स्वरें हाक फोडिली । गोरक्षापुढती तये काळी । अकस्मात प्रगटला ॥४५॥
नामरुप एकत्रता । होतांच तेथें प्रत्यक्षता । तैसा तो द्विजपुत्र पाहतां । पाहात पाहातां प्रगटला ॥४६॥
उदयाचळीं भास्कर उदय । तेवीं उद्भवें ब्रह्मतनय । नमस्कारोनि प्रार्थी विनय । करद्वय जोडोनि ॥४७॥
जय जय सद्गुरुनाथ उदारा । निजजनमानस चकोरचंद्रा । करुणाघना सदयसमुद्रा । सद्गुरु नरेंद्रा तुज नमो ॥४८॥
भवभेषजा भयहारका । अघसंहरणा प्रतापार्का । दुरितदमना द्वंद्वनाशका । चित्सुखदायाका श्रीगुरु ॥४९॥
यापरी परिसोन करुणावचन । श्रीगुरु झाले प्रसन्न । म्हणे मागें वरप्रदान । जें अपेक्षित तुज असे ॥१५०॥
येरु विनवी विज्ञापना । स्वामी चुकवाव्या जन्मयातना । प्रपंचस्वप्नदुराशा मना । अनेक कल्पनातरंग ॥५१॥
पुत्र मित्र कलत्र सर्व । मायेंत गुंतले मानव । मनोन्मनीचा अनुभव । कदा नेणवे तयांतें ॥५२॥
मज आतां ही अपेक्षा । औदार्यसिंधु देई भिक्षा । साफल्य होसी कल्पवृक्षा । अर्पी स्वदीक्षा मजप्रति ॥५३॥
पुनर्जन्म दिधला मज । याचा अभिमान सर्व तुज । जन्ममृत्यु घेऊन पैज । उभवीं ध्वज चिन्नभीं ॥५४॥
गोरक्ष वदती तदोत्तर । अष्टादशवर्णी श्रेष्ठ विप्र । वेदाध्ययनीं अहोरात्र । सत्काळ आपुला घालवी ॥५५॥
संहिता अरण्य ब्राह्मण छंद । निघंट शिक्षा ज्या प्रसिध्द । ज्योतिष व्याकरण अगाध । निरुक्तादि दशग्रंथी ॥५६॥
म्हणे स्वामी दशग्रंथी । ह्या जन्मावरी मुक्त न होती । अधिक वय घालविती । परि जन्मपंक्ति चुकेना ॥५७॥
तरी ब्रह्म जानाति ब्राह्मण । हें तों वेद्श्रुतीचें प्रमाण । नेणती सत्यज्ञानाची खूण । कैसेनि ब्राह्मण तो होय ॥५८॥
जो आत्मज्ञानी ब्रह्मनिष्ठ । तो श्वपच असो परि वरिष्ठ । लीलाविग्रही योगभ्रष्ट । अंतरनिष्ठ वंद्य तो ॥५९॥
तयाचा पाहूनि निर्धार । वदती तेव्हां मत्स्येंद्रपुत्र । तुझी कांता कामातुर । इसी प्रपंच करी कां ॥१६०॥
ऐसें ऐकोन वचन । धरु धांवे स्वस्त्रीचरण । म्हणे तुझे योगेंकरुन । सद्गुरुदर्शन जाहलें ॥६१॥
माझें झालें पुनर्जनन । सद्गुरुनाथें केलें पावन । काय वदूं हें महिमान । अगाध पुण्य पैं तुझें ॥६२॥
जन्मोजन्मीं स्त्रीभ्रतार । परि न करवे पतिउध्दार । तूं कुलोध्दारीण परमपवित्र । सुख सर्वत्र तुझेनि ॥६३॥
स्वपतीची मुखवाणी । ऐकोन पश्चात्तापे कामिनी । कैचा पति कैची पत्नी । जेवी स्वप्नी देखिलें ॥६४॥
कंठ दाटून सद्गद । म्हणे स्त्रीदेह दुःखप्रद । नको पुनर्जन्म जराखेद । स्वात्मबोधें बोधवी ॥६५॥
करुणाशब्द श्रवणीं पडतां । दया उदेली गोरक्षनाथा । म्हणती ये तीर्थी स्नान आतां । करुनि येई मजकडे ॥६६॥
ये तीर्थीचें अतिमहिमान । गकारत्रय हें क्षेत्रस्नान । जो तीर्थी करील स्नान । पुनर्जन्म न होय ॥६७॥
गोरक्षा गोमंतक गोरक्षतीर्थ । त्रय गकार दुर्लभ बहुत । येथें होतां सुस्तात । पाहे प्रचीत तूं स्वयें ॥६८॥
येरी मस्तक ठेवोनि चरणीं । तत्काळ प्रवेशली जीवनीं । तंव ती पुरुष झाली ते क्षेणीं । अगाध करणी नाथाची ॥६९॥
ब्रह्मांडकरंडा ब्रह्मसृष्टि । स्वयें रची जो परमेष्ठी । तयांतें ही अघटित गोष्टी । ते प्रत्यक्ष दृष्टीं दाविली ॥१७०॥
दैदीप्य दिसे दिव्य पुरुष । प्रभा प्रत्यक्ष पडे चंडाश । तेवीं प्रकाश असमास । भूमंडळांत पडियेला ॥७१॥
मग प्रत्यंग प्रमाण । करिता झाला अतिसप्रेम । सद्गुरुकृपा अति निःसीम । फळा आली अविलंबें ॥७२॥
स्तुतिस्तोत्रादि करुन स्तवन । मग मागती दीक्षादान । तंव देते झाले दयाघन । पूर्णकृपेंकरुनि ॥७३॥
विश्वनाथ नामाभिधान । ठेवून करिती शृंगी वादन । दुजया उमानाथ म्हणोन । ठेविते झाले आवडीं ॥७४॥
उभय प्रार्थिती उभयहस्तीं । स्वामी चुकविली पुनरावृत्ति । आतां उध्दरा व्याघ्राप्रति । दर्शनमात्रेकरुनि ॥७५॥
मग म्हणती करा तीर्थसिंचन । येणे होईल तो पावन । वरी गोरक्षें प्रोक्षितां जाण । आश्चर्य वर्तलें पैं तेथें ॥७६॥
तों व्याघ्रतनूंतूनि अकस्मात । पुरुष प्रगटला दिव्य तेथ । नमन करुनि स्तवन करीत । गोरक्षातें ते काळीं ॥७७॥
जय जय मोक्षदायका । जय जय जन्ममृत्युजरांतका । जय जय अज्ञानतिमिर नाशका । भद्रकारका सद्गुरु ॥७८॥
यापरी करितां स्तवन । तों पातलें सत्वर विमान । विमानयानीं शिवगण । पंचानान दशभुज ॥७९॥
नमस्कारिती शिवपार्षद । म्हणती गोरक्षमहिमा अगाध । व्याघ्रा देऊनि शिवपद । उध्दार केला पशुचा ॥१८०॥
त्रिवर्गाते मोक्षदानी । म्हणती बैसोन विमानयानी । जावें सत्वर कैलासभुवनीं । शिवसान्निध्य सर्वदा ॥८१॥
सद्गुरुतें वदती वचन । आम्हां न लगे कैलाससदन । आमुचें कैवल्य गुरुचरण । यावीन आन असेना ॥८२॥
असो व्याघ्र शिवारुप तेजःपुंज । पंचवदन शोभे दशभुज । कर्पूरगौर महाराज । अर्धचंद्र मस्तकीं ॥८३॥
मौळ ठेवूनि गोरक्षचरणीं । व्याघ्र आरुढला विमानी । व्याघ्रचर्म तेच क्षणीं । शिवगण नेती शिवातें ॥८४॥
विश्वनाथ उमानाथ । यांते सद्गुरु आज्ञापित । तुम्ही जावें तीर्थातें । भेटी होती सिध्दांच्या ॥८५॥
धन्य ते गोरक्ष योगेश्वर । धन्य धन्य ते गोमंतक क्षेत्र । धन्य गोरक्ष तीर्थ पवित्र । अनुपम्य महिमा जयाचा ॥८६॥
हा दशम अध्याय परमपावन । दशेंद्रिय होय उन्मन । कीं दशावतारीं श्रीभगवान । लीलाकौतुक चोजवी ॥८७॥
हें दशमखंड अविमुक्ती । इतिहासप्रवाह भागीरथी । श्रवणमनन स्नान करिती । ते उध्दरती निश्चयें ॥८८॥
आजि दशमीचा विजयदिन । श्रोता वक्ता होय पावन । जन्ममृत्यु करा सीमा उल्लंघन । श्रवणकांचन लुटावें ॥८९॥
येथें समान करुन बुध्दि । तेचि शमी साधा आधी । तेणें हरती उपाधि । सिध्दि साध्य साधिल्या ॥१९०॥
कीं हा दशभुज पंचानन । प्रत्यक्ष आराध्य उमारमण । श्रवणमात्रें करी पावन । महत्साधन जाणिजे ॥९१॥
आदिनाथ लीलामृत प्रताप । ऐकतां नासती त्रिविध ताप । विजयलक्ष्मी आपोआप । घर पुसोन येतसे ॥९२॥
श्रीमतआदिनाथलीलामृत नौका । कर्णधार गुरु भैरव नेटका । आदिनाथ वंदूं तत्पादुका । दशमोऽध्यायीं वंदिला ॥१९३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 07, 2020
TOP