श्रीनाथलीलामृत - अध्याय २७ वा
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीमत् आदिनाथ स जयजयति । सत्य शाश्वत स्वयंज्योति । तूं सदय सकृप स्वानंदमूर्ति । तव स्वरुपरिस्थिति नेणवें ॥१॥
तूं चिन्नभींचा चित्सूर्य । सच्चित्प्रकाश ज्योतिर्मय । चिन्मात्र तूं निरामय । चराचरी चेष्टक तूं ॥२॥
तूं अखिल ब्रह्म परंज्योति । तुजा श्रुतिस्मृति पार न पवती । थकित जाहला बृहस्पति । शेष पाताळीं लपला ॥३॥
तव महिमामहदाकाश । भेदीत गेले व्यासादि हंस । तेही शिणोनि असमास । परतले पार न पवती ॥४॥
आधीच मी मतिमंद आळसी । मज मूर्खमुखें ग्रंथ करविसी । तुझी सत्ता अगाध ऐसी । काय एक न करिसी तूं ॥५॥
तुझे कृपेचिये बळें । मुके वाचस्पति वाचाळ । पंगु लंघिती पर्वतमौळ । जन्मांध परीक्षी रत्नांतें ॥६॥
पाहा हा नाथमहिमा अगाध । पशुवदनीं वदवी वेद । तो ज्ञानेश स्वतःसिध्द । जडचरातें चोजवी ॥७॥
असो गताध्यायी इत्यर्थ । गोरक्ष दत्तात्रेय महासमर्थ । संवाद जाहला परमार्थ । तोच स्वार्थ प्राप्त मुमुक्षां ॥८॥
यावरी मत्स्येंद्र गोरक्ष दत्तात्रेय । मज गमती हे देवत्रय । जे परमश्रेष्ठ ज्ञानवर्य । ते प्रतापसूर्य त्रिभुवनीं ॥९॥
अनुपम्य जयांचा प्रताप । स्मरणें निरसती त्रिविधताप दर्शनें करिती स्वस्वरुप । चिद्रूपरुपीं मेळविती ॥१०॥
कीं तें परब्रह्मीचेचि ठसे । मूर्तित्रय एकचि सरिसे । की शशिसूर्यअग्निसमरसे स्वयंप्रकाश त्रिमूर्ति ॥११॥
हरिद्वारतीर्थ प्रसिध्द । स्नानार्थ पातले महान सिध्द । गणगंधर्व यक्ष विबुध । ऋषिवृंद पातले ॥१२॥
शिबिरें उभविलीं अपार । वृक्षलतामंडप मनोहर । सिध्द्साधु एकसर । यात्रासमुद्र पसरला ॥१३॥
पर्वकाळाची पाहून संधि । असंख्य मिळाली सिध्दमांदी । कैवल्यप्राप्तीचे जे उदधि ते ब्रह्मानंदी निमग्न ॥१४॥
कीं साधावया लग्नघडी । आवडी मिळाले ते वर्हाडी । तेवीं तीर्थाची धरोनि आवडी । आले तांतडी सर्वही ॥१५॥
कीं मानससरोवरवेष्टित । मराळ जेवीं विराजित । कीं नृपचमू विलसे आसमंत । कीं कमळकेसरी पत्र पैं ॥१६॥
सूर्यवेष्टित किरण । कीं चंद्रवेष्टित तारांगण । कीं सफळवृक्ष देखोन सघन । पक्षी मिळती ज्यापरी ॥१७॥
मत्स्येंद्र गोरक्ष अत्रितनय । पाहूं पातले समुच्चय । परमसुखाचें सुखऐश्वर्य । एकवटलें ते काळीं ॥१८॥
कपिल वसिष्ठ विश्वामित्र । व्यासासह व्यासपुत्र । गौतम भारद्वाज ऋषीश्वर । येते झाले ते स्थळीं ॥१९॥
चर्पटी चौरंगी भर्तृहरि । कानीफ गोपेंदु जालंधरी । मेनीनाथ आणि कामारी । नाथमूर्ति असंख्य ॥२०॥
दीक्षाधारी यच्चयावत । षड्दर्शनादि अन्य पवित्र ग्रंथ । मेळा मिळाला असंख्यात । किती म्हणोनि सांगावा ॥२१॥
सिध्दऋषि योगीजन । साधुसज्जन तपोधन । ब्रह्मवेत्ते ज्ञान निपुण । नाथदर्शना पातले ॥२२॥
मत्स्येंद्र गोरक्ष दत्तात्रेय । एकरुप भासती अद्वय । सर्वांसी पाहतां संशय । एकरुप दिसती ॥२३॥
अत्रिपुत्र -मत्स्येंद्र -भेटी । दर्शनार्थ येती उठाउठी । परमलाभ मानोनि पोटीं । वंदनोद्देशें अतिहर्ष ॥२४॥
गोरक्ष करिती अतिसत्कार । पूज्यपूज्यादि पुरस्कर । आदेश वदून नमस्कार । अनुक्रमें क्रमेसी ॥२५॥
सर्वा घालूनि मंगळ्स्नान । केलें अर्ध्यपाद्यादिपूजन । धूपदीप स्त्रक चंचन । षड्सान्नें भोजना ॥२६॥
किमपि न्य़ून नसे तेथ । अष्टसिध्दि जेथें तिष्ठत । मग काय उणें तो पदार्थ । गोरक्ष समर्थ जे स्थळी ॥२७॥
यावरी कानीफ प्रार्थी गोरक्षा । उदईक आमुची असे भिक्षा । अंगिकारवी योगदीक्षा । हेचि भिक्षा मागतों ॥२८॥
निरालस्य अवश्य तेथें । आलें पाहिजे कृपावंतें । न्य़ूनपूर्ण करा सरतें । येचि अर्थी प्रार्थितों ॥२९॥
निकें म्हणे मत्स्येंद्रसुत । मग चर्पटीतें आज्ञापित । आमंत्रण देऊन सर्वात । सत्वर आणी भोजना ॥३०॥
सांग संपासूनि सर्व । तेथें राहती दिनत्रय । मत्स्येंद्रपुत्र अत्रितनय । एकरुप असती ॥३१॥
यापरी झालें यात्राकृत्य । ऋषि गेले स्वाआश्रमांत । कैक गेले बदरिकाश्रमातें । महायोगी पैं सिध्द ॥३२॥
कांहीं जाती रैवताचळीं । कित्येक गेले अर्बुदाचळीं । कोणी गेले अरुणाचळीं । उदयहेळी पैं जेथें ॥३३॥
यापरी यात्रेचा सोहळा । पुढें कथाप्रसंग काय झाला । तोचि सज्जनीं अवधारिला । पाहिजे श्रोतीं एकाग्र ॥३४॥
असो कैलासीं कैलासनाथ । उमेसहित बैसले निवांत । तों नारद आणि सवितासुत । अकस्मात देखिले ॥३५॥
नमोनि प्रार्थीं वैवस्वत । म्हणे गोरक्षाचें अगाध सामर्थ्य । चिरंजीव केले नृपनाथ । तेथें न चले आमुचें ॥३६॥
आतां बुडाला सृष्टिक्रम । हें परमेष्ठ संकट परम । शिक्षा करणे आमुचा धर्म । राहाटी राहिली सर्वही ॥३७॥
रिक्तपाशी हिंडती गण । न चले कांही दिसती दीन । नाथदीक्षेचें महिमान । तेथें न चले आमुचें ॥३८॥
जालंधरीचे वेषधर्ते । आणि नास्तिकांचे माजले मत । इंद्रजाळें मनमोहित । करिती भ्रांत मनुष्यां ॥३९॥
सुप्रसूत स्त्रियांतें साधिती । दिवा शुनी पृष्ठीं फिरविती । अनंगअंग सांग भोगिती । सांग करिती भूतांसी ॥४०॥
तस्कर मार्गघ्न वेषधारी । यात्रा लुटिती आनाचारी । प्रान घेती वरिचेवरी । घात करिती पुढिलांचा ॥४१॥
जारण मारण स्तंभन । उच्चाटण मोहन कुत्सिताचरण । साबरीमंत्र दुष्टसाधन । मंत्र यंत्र अनेक ॥४२॥
अघोरजप करिती स्मशानीं । रक्तवसनीं प्रेतासनीं । उच्छिष्टचांडाळी मांसाशनीं । रुधिरपानी अतृप्त ॥४३॥
आणि झाला विधि अवतार । नाम तयाचे मंडणमिश्र । नास्तिकमतें निर्मिलें शास्त्र । साध्य भारती जयातें ॥४४॥
सरस्वती करोन साध्य । पंडितांसीं घेतसे वाद । शास्त्रवेत्ता महाप्रसिध्द । वारानसिये प्रगटला ॥४५॥
मोडिलीं अग्निहोत्रादि हवनें । त्रयीं भयें लंघिती विप्र कानन । न घडे पुराणश्रवनमनन । देवतार्चन न करिती ॥४६॥
गीतागायत्रीचा झाला लोप । ऐसें वोढवलें महत्पाप । स्नानसंध्या जपतप । ब्राह्मण्य सर्वस्वही बुडालें ॥४७॥
कली प्रवर्तला घोर । तेणें प्रवर्तला अनाचार । भ्रष्ट झाले नारीनर । करिती व्यभिचार सर्वही ॥४८॥
न पाहती वर्णावर्ण । उन्मत्त करिती गमनागमन । विप्र करिती मद्यपान । अभक्षभक्ष्य भक्षिती ॥४९॥
होती शिश्नोदरपरायण । तेथें सदाचार पुसे कोण । परमदुःखित गोब्राह्मण । सदाचरण मोडलें ॥५०॥
उत्कर्ष पावल्य़ा व्यभिचारिणी । पतिव्रतेतें न पुसे कोणी । दैन्य दिसती दीनवाणी । अन्नवस्त्र मिळेना ॥५१॥
झाली मेघाची अनावृष्टि । परमदुःखें गांजली सृष्टि । हाहाःकारें म्हणती परमेष्ठी । काय अदृष्टीं लिहिलें ॥५२॥
पिकें त्यागिती कुंभिनी । फळें न येती वृक्षांलागोनी । झाली मद्याचीच सिराणी । कोन पुसे गोक्षीरा ॥५३॥
कलीचा झाला पर्वकाळ । वापीकूपीं न मिळे जळ । वर्णसंकर झाला सकळ । परमप्रळय भूलोकीं ॥५४॥
अघोर पाप झालें प्राप्त । उग्रदैवतें होती शांत । पितृअवज्ञा करिती सुत । वेदमंत्र मलिन पैं ॥५५॥
दुर्मद झाले दुर्जन । साधूंचा करिती अपमान । आपुला स्वपति त्यागून । व्याभिचार करिती कुळीना ॥५६॥
सत्य गेलें दिगंतरीं । असत्याचीच प्रवर्तली सारी । कोणी कोणाचा विश्वास न धरी । विश्वासघात करिती पैं ॥५७॥
प्रथमवर्णी त्यागिला स्वधर्म । हीन करिती वेदोक्तकर्म । न पाहती धर्माधर्म । अन्याय परम होतसे ॥५८॥
गोविक्रय रसविक्रय । कन्याविक्रय हयविक्रय । स्वयें करिती द्विजवर्य । हा अन्याय परम कीं ॥५९॥
करिती धनदारा-अभिलाष । द्यूरकर्मी बहुवस । वर्नाश्रयाचा धरिती त्रास । विषयविलास वृषळीसी ॥६०॥
यावरी वदे श्रीशंकर । मी धरीन अंशावतार । धर्मस्थापनार्थ निरंतर । तदोत्तर हें माझें ॥६१॥
नास्तिकांचा पराभव । मी करितों कृतनिश्चय । मी होईन शंकराचार्य । शीघ्र पाहे पैं आतां ॥६२॥
नमन करोनि श्राध्ददेव । जाता झाला आनंदमय । आज्ञा वंदोन विधितनय । तोही जाय सवेगीं ॥६३॥
जें योगियांचें परमधाम । जेथें वसती ऋषिसत्तम । तेंचि जाणावें बदरिकाश्रम । तों नारद तेथें पातला ॥६४॥
दृष्टी देखोन देवऋषी । परमानंदती सर्वही ऋषि । स्वानंदलाभ मानूनि मानसीं । नारदातं वंदिती ॥६५॥
पुढें जात सिध्द्श्रेणी । विरंचिपुत्रें देखिले नयनीं । तया वदे तये क्षणीं । वचन माझे अवधारा ॥६६॥
महादोषें उचलें कुंभिनी । वर्णसंकर झाल ये क्षणीं । स्वधर्म बुडाला मुळीहुनी । तरी अदृश्य विचरावें ॥६७॥
इकडे कथा झाली कैसी । जे त्रिकंटकस्थित अविमुक्ति काशी । त्रैलोक्य वंद्य वाराणशी । तेथील चरित्र अवधारा ॥६८॥
तेथें मंडणमिश्रनामेंकरुन । तयातें सरस्वती सुप्रसन्न । तेणें नास्तिकमत उभवून । जैन मार्ग स्थापिला ॥६९॥
तो सकळविद्याविशारद । महापंडितांसी घेत वाद । जयपत्र मागे स्वतःसिध्द । दुर्धर नावरे कोणासी ॥७०॥
पूर्णकलशीं आवाहन । सरस्वतीचें करी स्थापन । कुंभांतूनि निघती वर्ण । तेणें अजिंक्य सर्वासी ॥७१॥
ब्राह्मण करोनि एकत्र । मागे वाराण्दशीचें जयपत्र । तेणें दुःखित सर्वत्र । प्राणांतसमय वोढवला ॥७२॥
तो विद्यामदें मदगर्वित । परमसंकटीं पडिले पंडित । पराभवअपमानें सलज्जित । विप्र होती सर्वही ॥७३॥
वेदांतीं जिंकोनि वादी । शून्यमतातेंचि प्रतिपादी । तेथें न चले प्रज्ञाबुध्दि । कोणातेंही कळेना ॥७४॥
जयश्रीचा आंगीं मद । करी बुधजनातें प्रतिबंध । सर्वा संकट अगाध । दुःखउदधि उदेला ॥७५॥
म्हणती करुं समुच्चय । द्यावा दिनावधि दिनत्रय । जयपत्र देऊं कृत निश्चय । संशय कांहीं न धरावा ॥७६॥
अवश्य म्हणोन मंडणमिश्र । मुक्त केले सर्व विप्र । क्षेत्रस्थ मिळोनी समग्र । आराधिती पशुपती ॥७७॥
समुच्चय मिळोनि द्विजमंडळी । पातले विश्वेश्वराचे राउळीं । म्हणती धांव गा चंद्रमौळी । काय पाहसी कौतुक ॥७८॥
स्तुतिस्त्रोत्रांचा जयजयकार । प्रार्थिते झाले श्रीशंकर । तूं धर्मस्थापक भवानीवर । संकट परिहर करी हें ॥७९॥
तूं विश्वनथ विश्वंभर । भोळा चक्रवर्ति परमोदार । तूं विश्वनियंता परमेश्वर । ब्रीदाभिमानी तूं स्वयें ॥८०॥
तुझे स्वइच्छेंकरुन । उभविलें हें ब्रह्मांडभुवन । तो तूं दीनदयाळ भाळलोचन । भवभयमोचनकर्ता तूं ॥८१॥
तूं विरिंचिरुपें सृष्टी सृजिसी । तूं विष्णुरुपें संरक्षिसी । रुद्ररुपें संहारिसी । रुद्ररुपी महारुद्रा ॥८२॥
तूं सदय सकृप म्हणून । उपमन्यु पातला अनन्यशरण । तो मागतां पयःपान । क्षीराब्धि देसी निजकृप ॥८३॥
पाहा मृकंडऋषीचा तनय । षोडशवर्षी तो अल्पवय । तो चिरायु निर्भय । चतुर्दशकल्पपर्यंत ॥८४॥
त्या मार्कंडेयाचे पार्थिवांत । प्रगट झालासि निमिषांत । दंडोनियां भास्करसुत । रक्षिसी भक्त निजांगें ॥८५॥
ऐसी परिसोनि करुणावाणी । परम कळवळिला मोक्षदानी । अकस्मात प्रासादीं ध्वनि । मेघगिरा पैं जैसी ॥८६॥
उदयीक उदयकाळी जाण । प्रगटेल यतिवेषें करुन । नास्तिकातें परभवून । सन्मार्ग मार्ग दावील ॥८७॥
ऐसें ऐकोनि वरदोत्तर । विप्र करिती जयजयकार । संतोष पावून हर्षनिर्भर । हर शब्द उच्चारिती ॥८८॥
पूर्वदिशा अति गोमटी । अभ्युदयाचे परिपाठीं । आरक्त कुंकममळवटी । शुभसौभाग्यसूचक तें ॥८९॥
तंव विप्र पातले गंगानिकटीं । सुस्त्रात होऊनि बैसलें थाटीं । तंव अवचट देखिली दृष्टी । आचार्यमूर्ति सुप्रभ ॥९०॥
पूर्ववयांत देदीप्यमान । श्रीपाद प्रगटले सगुण । गळां मेखळा विराजमान । दंडकमंडलु हस्तकी ॥९१॥
भव्य भस्म भाळीं चर्चित । कंठीं रुद्राक्षमाळा डोलत । पदीं पादुका विराजित । काषायाशाटी शोभली ॥९२॥
तयाचें होतांचि दर्शन । सर्वही करिती नमो नारायण पाहूनि तें देदीप्यध्यान । समाधान पावले ॥९३॥
विप्र होती आनंदभरित । म्हणती कैवारी हा कैलासनाथ । तंव द्विजासी आचार्य पुसत । मंडणमिश्र पै कोठें ॥९४॥
तंव तयाच्या सहस्त्रावधि दासी । उदकार्थ पातल्या सुवर्णकलशी । पृच्छा करीत तयांसी । कोठें वसे तो नास्तिक ॥९५॥
तंव त्या वदती गीर्वानवचनीं । आचार्य आश्चर्य करिती मनीं । जया सुप्रसन्न विधिनंदिनी । तदोक्त श्लोक परिसिजे ॥९६॥
स्वतःप्रमाणं परतःप्रमाणं शुकांगना यत्र विचारयन्ति । शिष्याः प्रशिष्याः प्रपठन्ति यत्र अवेहि तन्मंडनमिश्रगेहम् ॥१॥
स्वतःप्रमाण परतःप्रमाण प्रसिध्द । हा नैय्यायिकीं अद्यावि वाद । जयाचे द्वारी हा अनुवाद । शुकसाळ्या करिती पैं ॥९७॥
आणिकही सांगती खूण । शिष्य करिती शास्त्रपठण । तेंचि तयाचें सदन जाण । जावें आपण ते ठायीं ॥९८॥
यापरी वार्ता करोनि श्रवण । आचार्य करिते झाले गमन । जेवीं बळीचे द्वारीं वामन । जाता झाला ज्यापरी ॥९९॥
कीं जन्मेजय करितां सर्पसत्र । आस्तिक पातला परमपवित्र । तेवीं मानववेषी भाळनेत्र । येता झाला त्यापरी ॥१००॥
तेथें द्वारप्रदेशीं द्वारपाळ । तिष्ठती सदा सर्वकाळ । विद्यामठीं शिष्य सकळ । पूर्वपक्ष करिताती ॥१॥
सभे बैसला मंडणमिश्र । सिंहासनीं मस्तकीं छत्र । शिष्य ढाळिती चामर । परमप्रीतिकरोनी ॥२॥
आचार्य म्हणती नारायण । येर पुसे भिक्षा कवण । वादभिक्षा आम्हांसि देणें । यावीण इच्छा नसेचि ॥३॥
जेवीं जरासंधाचे सदनीं । भीमार्जुन चक्रपाणि । स्वयें विप्रवेष नटुनी । युध्दभिक्षा मागती ॥४॥
तेवीं वादभिक्षा ऐकोनि श्रवणीं । मंडणमिश्र दचके मनीं । मजसी वाद घेणार हे मेदिनी । दुज न दिसे पाहतां ॥५॥
म्हणे नास्तिकी आचार्यातें । पूर्ववयांत संन्यास अनुचित । विषयइंद्रिय कैसेनि शांत । केवीं निवांत मन राहे ॥६॥
कन्थां वहसि दुर्बुद्धे गर्दभेणापि दुर्वहाम । शिखायज्ञोपवीताभ्यां कश्विद्भारो भविष्यति ॥२॥
आचार्य वदे मंडणमिश्र । हें कंथावोझें वाहसी थोर । खरातें न जाय हा संभार । शिखासूत्रभार तुज आला ॥७॥
आचार्य उवाचः कन्थां वहसि दुर्बुध्दे तव पित्रापि दुर्वहाम् शिखायज्ञोपवीताभ्यां श्रुतेर्भारो भविष्यति ॥३॥
आचार्य देती तदोत्तर । तुझ्याचि जो कां खर पितर । तया असह्य कंथाभार । वेदबाह्य निंद्य जो ॥८॥
तुम्हां शिखासूत्रभार तो किती । म्हणोनि वदलासी रे मंदमति । तरी शिखासूत्रभार वाहती श्रुति । मुक्त होती त्यागितां ॥९॥
मंडनमिश्र उवाचः अग्निहोत्रं गवालभ्भ्य संन्यासः पलपैतृकम् । देवराच्च सुतोत्पत्तिः कलौ पंच विवर्ज्ययेत् ॥४॥
मंडणमिश्र वदे वचन । अग्निहोत्र गवालंभयज्ञ । संन्यास मृगमांस हें जाण । देवरापासोनि संतति ॥११०॥
हीं कलींत पंच वर्ज असतीं । यथानुक्रमें धर्म न चलती । यास्तव वर्जी वेदश्रुति । निंद्य निश्चितीं आहे हें ॥११॥
आचार्य उवाचः यावद्वर्णविभागोऽस्ति यावद्वेदः प्रवर्तते । तावन्न्यासाग्निहोत्राणि कर्तव्यानि कलौ युगे ॥५॥
यावत् वर्नमर्यादा असती । यावत् वेदाज्ञा चाले श्रुति क्षितीं । तावत्संन्यासाग्निहोत्रें चालतीं । धर्म राहती उभय पैं ॥१२॥
ऐकोनि दचकली ब्रह्मकुमारी । हा नव्हे सामान्य वेषधारी । कोणी असे अंशावतारी । मानवविग्रह नव्हे हा ॥१३॥
कुंभांतोनि काढून वदन । सरस्वती वदती जाहली वचन । तूं विषयसुखातें त्यागून । संन्यास घेणें निंद्य हें ॥१४॥
तो देवाधिदेव वामदेव । जया अनुष्ठिती देवही सर्व । इंद्र भोगी राज्यराणिव । सुखवैभव ज्याचिनि ॥१५॥
जयाचे कृपेंकरुन । शक्र जाहला सुप्रसन्न । रंभातिलोत्तमेचें मैथुन । विषयाधीन हरिहर ॥१६॥
तपें यज्ञें याजन याजिती । तेव्हां घडे स्वर्गप्राप्ति । देवललना आंदोलती । तें तपश्चर्या ते तपसिध्दि ॥१७॥
विश्वा मित्रादि पाराशर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । त्या अनिवार मनोज दुर्वार । तेथें मानवकेवा काय ॥१८॥
गोलोकीं आलिंगन । क्रीडा करी स्वानंदें चुंबन । तोचि गोकुळीं अवतरुन । रासविलास करी पैं ॥१९॥
पाहा पाहा तो पाकशासन । दिव्यभोगातें अंगिकारुन । परि तृप्त नसे अंतःकरण । तोही भोगी अहिल्या ॥१२०॥
जो लावण्यसिंधु रोहिणीपति । तोही सक्त तारेप्रति । ऐसी रतिपतीची ख्याती । तत्परायण सर्वही ॥२१॥
देवर्षि महर्षि होती । तेही विषयसुखाचा पार न पवती । तेथें मानवदेहाची व्यक्ति । मर्म न पवती कदाही ॥२२॥
तपस्वई दिव्यतपें तपले । तेचि भोगिती स्त्रिसुखसोहळे । विश्वामित्र अनुष्ठानबळें । उर्वशीतें रतला ॥२३॥
जया अनंगभोग स्त्रीसंग । तेचि भाग्याथिले सभाग्य । वैराग्यातें अतिदौर्भाग्य । दैन्यभाग चुकेना ॥२४॥
सुरतरसिक रसज्ञ प्रिया । उग्रतपें लाहिजे जाया । तिचे संगें सुखाऐश्वर्या । बिडौजराज्य ज्यापरी ॥२५॥
कामशास्त्र शृंगाररस । तें ग्रंथीं वर्णिले बहुवस । मर्मज्ञ जाणसी कामरस । अनंगभोक्ता विरळा पैं ॥२६॥
चार्वाकमतापुढें पंडित । उगाच राहोन निवांत । कीं शिखंडीपुढें गंगासुत । कांही न चले पैं तेथें ॥२७॥
कीं निंदकापुढें साधुजन । कांही न वदती धरिती मौन । तैसें आचार्यासी झालें जाण । विषयानुभव नसेचि ॥२८॥
तो बीभत्सरस करावा वर्णन । तारी त्याचें काय प्रयोजन । मुख्य सारांशासी कारण । विस्तार करणें कासया ॥२९॥
यावरू सरस्वतू वदतागे । तुम्हां नसे विषयानुभव । स्वानुभवाणीण पाहे । केवी लाहे सुखातें ॥१३०॥
स्वयें नसतां स्वाआत्मज्ञान । काय करावें वाचालपण । मुख्य पाहिजे अनुभवजन्य । सबाह्य मान्य तो होय ॥३१॥
यापरी शारदानुवाद । आचार्य परिसोनि झाले स्तब्ध । अनुभव नसतां स्वतःसिध्द । मौनमुद्रें राहिले ॥३२॥
तुम्हा नरतनु प्राप्त । वयस्क असतां कां विरक्त । वयधर्म नसतां संन्यस्त । व्यर्थ भोगणें वैराव्य ॥३३॥
ऐसें होतां संभाषण । आचार्य वदते झाले वचन । आजपासून चतुर्दशदिन । होतां येईन ये स्थळीं ॥३४॥
तेथून आचार्य करिती गमन । सवें समुच्चय बहु द्विजजन । निगूढ शिवालय पाहून । येती निवांत एकांती ॥३५॥
सवें असती शिष्यसंभार । सत्वर आणविलीं निंबपत्रें । एकवट करोनि सर्वत्र । किसलयशय्या रचियेली ॥३६॥
काशीचा अमरनृप विख्यात । तयातें स्त्रिया चौदा शत । तो मृत्यु पावला अकस्मात । तंव तो मिरवत जातसे ॥३७॥
तया दुरोनि आचार्य लक्षित । आचार्य शिष्या आज्ञापित । प्रगट न करा गुह्यगुप्त । मौनमंत्र स्वीकारा ॥३८॥
आज्ञावचनी गोविले समस्त । तुम्ही चतुर्दश दिवसपर्यंत । प्रासादकपाटें न करा मुक्त । वार्ता गुप्त असों द्या ॥३९॥
मग योगबळेंकरुन । राजदेहीं प्रवेशले जाण । अमररायाचा देह परतला प्राण । तो आनंद न वर्णवे ॥१४०॥
जेवीं निद्रिस्त होय जागृत । तेवी उठिला तो नृपनाथ । प्रजा प्रधान आनंदभरित । तें सुख अद्भुत समस्तां ॥४१॥
जेवीं हतप्राणा सुधापान । कीं अवर्षणीं वर्षे घन । कीं दुष्काळीं मिष्टान्न । क्षुधितातें प्राप्त पैं ॥४२॥
मंगळतुरे मंगळाक्षता । विप्र वोपिती नृपाचे माथां । शर्करा वाटिती समस्तां । जिंतवणक्रमक्रियाही ॥४३॥
भूपसिंहासनीं आरुढोन । याचकां वोपी विपुळ धन । हरिद्राकुंकुम स्त्रक् चंदन । गौरविल्या सौभाग्या ॥४४॥
अंतःपुरीं पातला नृपवर । स्त्रियांसी आनंदनिर्भर । तो सुखाचा सुखसमुद्र । उचंबळला समुद्र पैं ॥४५॥
काया वाचा आणि मन । नृपावरोनि करिती सांडण । सप्रेमें धरिती तयाचे चरण । क्षेमालिंगन पैं देती ॥४६॥
चुंबन मैथुन क्रीडाविलास । तो किती वर्णावा बीभत्सरस । एवं कामशास्त्राचा साराम्श । अनुभव घेत विषयांचा ॥४७॥
अष्टभोग स्त्रियादिक । दिननिशीं भोगी विषयसुख । हास्यगीतनृत्यकौतुक । यथासुखें क्रीडती ॥४८॥
इकडे दिनावधि होतां पूर्ण । आचार्य होती सावधान । अकस्मात कपाटें मुक्त होऊन । बाहेर येऊन उभे पैं ॥४९॥
तंव झाला जयजयकार । परम आनंदले धरामर । सवेंचि मृत्यु पावला नृपवर । हाहाःकार माजला ॥१५०॥
पुन्हा आचार्य जाऊन तेथें । वादभिक्षा मागती त्यातें । मंडणमिश्रें भयाभीत चित्तें । सरस्वतीतें प्रर्थिलें ॥५१॥
कुंभांतून अंतरपाटांतरीं । वदली विधिजा ते अवसरीं । पुन्हा येऊनि ये मंदिरीं । काय यश जोडिसी ॥५२॥
ऐकोन सक्रोध झाले पोटीं । पडदा उचलोन उठाउठीं । वेणी धरोनि वाममुष्टीं । सव्यहस्तीं पादुका ॥५३॥
म्हणती नीचगृही करोनि वास । करिसी रंडे वेदर्हास । तूं अनुसरोनि नास्तिकास । अनाचार करविसी ॥५४॥
रे रे आचार्य म्हणसी ज्ञानी । पादुकाप्रहार कां मजलागोनी । तूं स्वयें संद्न्यस्त असोनी । स्त्रीस्पर्श करणें हें निंद्य ॥५५॥
उचितानुचित विचारिती । अद्वेष्टपणें असावी वृत्ति । सत्त्वस्थ समधान धरीं स्थितीं । निंद्य निंद्य अयोग्य ॥५६॥
यावरी आचार्य बोलत । निंद्य मार्ग उच्छेदनार्थ । धर्मस्थापक पातलों येथ । पाषंडमार्ग मोडीन ॥५७॥
तूं निंद्यगृहीं वास करोन । भ्रष्ट करिसी स्वधर्माचरण । तरी तूं घेई शापवचन । नीचगृहीं वास करिसी ॥५८॥
यावरी वदे वेदमाता । माझाही शाप घेई आतां । जेवीं वियोग कुंभसुता । वाराणशीचा पैं झाला ॥५९॥
तरी तुझें देहावसान । कैकटक देशीं पावशी निधन । हेचि मानसीं धरीं खूण । सत्य सत्य त्रिवाचा ॥१६०॥
वासना यदि भवेत्फलदात्री मामकं नगरमेव हि काशी । व्यापको यदि भवेजगदीशस्तारकं किमपि नोपदिशेन्न ॥६॥
जेथें वासना असे निश्वळ । तेंचि प्राप्त तया फळ । हा निश्चय असतां अढळ । तरी तेचि केवळ अविमुक्ति ॥६१॥
जो जगदात्मा जगव्यापक । तोचि जगदीश जगतारक । तरि तोचि देणार मोक्षसुख । तो केवीं वेगळा मजहुनी ॥६२॥
तंव शारदा पावली अंतर्धान । नास्तिकग्रंथ बुडविले संपूर्ण । कांही रक्षिले कार्याकारण । अमरादिक इत्यादि ॥६३॥
नास्तिकांचा पराभव । करोनि आचार्य पावले जय । स्वधर्माचें वैभव । प्राप्त झालें समस्तां ॥६४॥
व्याघ्रगजभय पृष्ठीं जरी । तरी न जावें जैनमंदिरीं । आचार्य आज्ञा अद्यापवरी । संरक्षिताती सर्वही ॥६५॥
आचार्यपूजन अर्चननमस्कार । पुजून करिती वारंवार । विप्र जोडून उभयकर । स्तुतिस्तोत्रें स्तविताती ॥६६॥
असो कांहीं दिवस लोटतां जाण । आचार्य करिती भिक्षाटण । तो अकस्मात विप्रसदन । मार्गी जातां देखिलें ॥६७॥
विप्रस्त्री कटीं बाळक । नाम जयाचें हस्तामलक । लावण्य सगुण सुरेख । योगभ्रष्टा लक्षिला ॥६८॥
आचार्य पाहोनि तयाप्रति । पुसते झाले परमप्रीती । तुझी निरखोनियां वृत्ति । संतोष चित्ती उदेला ॥६९॥
कस्त्वं शिशो कस्य कुतः समागतः किं नाम ते त्वं कुत आगतोऽसि । यद्यन्मयोक्तं वद चार्भक त्वं मतप्रीतये
प्रीतिविवर्धनोऽसि ॥७॥
कोठील बाळा आहेस कोण । कोठोनि आलासि कोठें गमन । कोणाचा पुत्र तव नामाभिधान । वदे वचन यथार्थ ॥१७०॥
तुझें ऐकावया उत्तर । माझे श्रवण परम आतुर । तूंतें पाहावें निरंतर । हर्षे अति स्नेहाळा ॥७१॥
नाहं मनुष्यों न च देवयक्षौ विप्रोऽपि न क्षत्रियवैश्यशूद्राः । न ब्रह्मचारी न गृहस्थो वनस्थो भिक्षोऽहमात्मा
निजबोधरुपः ॥८॥
नव्हे मनुष्य देवयक्षविप्र । नव्हे क्षत्रिय वैश्यशूद्र । न ब्रह्मचारी गृहस्थ यतिवर । मी अगोचर कूटस्थ ॥७२॥
जेवीं जगच्चेष्टवीं भास्कर । तेवीं आत्मा मी निरंतर । इंद्रियद्वारी व्यवहार । मनादि इंद्रियें चेष्टवीं ॥७३॥
इंद्रियोपाधि समस्त । जयामाजीं पावले अस्त । तोही आत्मा ओतप्रोत । सबाह्यत्वें संचलों ॥७४॥
जयाचियें महाश्रयें । मनादि वर्तती इंद्रियें । कैसी प्रवर्ततीं आपुलेचि विषय । अग्नि सूर्य सोम पैं ॥७५॥
तैसें स्वरुप अचंचळ । प्रबोधमात्रें सुखाढळ । जें वर्णव्यक्तीहुन निराळें । तोचि निश्चय स्वरुप मी ॥७६॥
जेवीं आदर्शी प्रतिभास । काय भासावेगळा दिसे । तेवीं मी बहुमती प्रकाश । मृषा जीवित्व शिव मी ॥७७॥
आचार्यशंका । प्रत्यक्ष तुझा देहविभास । यासच म्हणसी अविनाश । त्या अविनाशाचा सारांश । कांही वदे स्नेहाळा ॥७८॥
ऐकोन आचार्यशंकर उत्तर । हेलावला तो ज्ञानसमुद्र । परमहर्ष होऊनि निर्भर । काय वचन बोलत ॥७९॥
जसा जगासि जागवी सूर्य । तेवीं अंतःकरणचतुष्टय । चेष्टक तोचि मी मनस्वय । इंद्रियराहाटी त्यापरी ॥१८०॥
मी आत्मा अलिप्त सर्वकाळ । जेवीं जळीं असक्त कमळ । कीं निराळ अमळ सोज्वळ । तेवीं वेगळा मी असें ॥८१॥
परिसे आचार्या यतिवर्या । मीतूंपण हा भेद वायां । गुरुशिष्यत्व द्वैत उभयां । परि अभेद जयापरी ॥८२॥
शर्करेचे अनेक पदार्थ । परि ते सबाह्य मिष्ट होत । कीं अलंकारी सुवर्ण व्याप्त । तेवीं आत्मत्व आहे पै ॥८३॥
जेवी उद्कीं बिंबे गभस्ति । तेवीं वेगळी अलिप्त स्थिति । पाहूं जातां कूटस्थीं । भेदवृत्ति नसेचि ॥८४॥
परिसोनियां बाळभाषण । परमप्रिय कौतुकवाणे । सकृप होऊन अंतःकरण । धन्य धन्य म्हणताती ॥८५॥
हस्तामलकाचे ज्ञानेंकरुन । आचार्य पावले समाधान । पाहा अष्टवर्षाचा शिशु सान । प्रश्नोत्तरीं तोषवी ॥८६॥
चतुर्दश वाक्यांचा श्लोकार्थ । इतिहास करितां वाढेल ग्रंथ । यापरी टीका समस्त । श्रीएकनाथें पैं केली ॥८७॥
जेवीं शुक्तिकेमाजी मुक्ताफळ । परि शुक्तिका न जाने केवळ । तेवीं जननीस भासे बाळ । करतळामळ ज्ञान जया ॥८८॥
यास्तव तयाचें नामाभिधान । आचार्य ठेविती परीक्षून । हा हस्तामलक जगन्मान्य । योगभ्रष्ट प्रगटला ॥८९॥
जन्मादारभ्य वर्तणूक । सांगूं ठेले मातृजनक । आचार्यातें परमकौतुक । ऐकावया आतुर पैं ॥१९०॥
वदती झाली जन्मकाळ । कोऽहं शब्दें करि कोल्हाळ । सोऽहंभावें हास्य स्वलीळें । उभयत्यागें स्वानंद ॥९१॥
मातेनें स्तन देतां क्वचित् घ्यावें । न देतांचि स्वस्थ असावें । समाधीसुखाचे वैभवें । जडभरतन्यायें शिरोनी ॥९२॥
जो जन्मोनियां आपण । सोऽहंशब्दीं धरी मौन । मग कोऽहंभावेंकरुन । कोन रुदन करी पैं ॥९३॥
प्राणहत जरी म्हणावे पाहे । तरी नासाग्रदृष्टि राहे । पिपीलिका दंश करुं पाहे । चळणवळण नसेचि ॥९४॥
नाना मतांचे त्रिविध जन । तर्क करिती विचक्षण । परि कोणाचेही अनुमान । सिध्दि न पवे कदाही ॥९५॥
जो जन्मोनियां पाही । जन्मकाळीच विदेही । म्हणे मी मुळींच जन्मलों नाहीं । मज मृत्यु नाहीं कल्पांती ॥९६॥
मज कैचें जन्मकर्म । मज कैचा वर्णाश्रम । तयाचें जाणती वर्म । तत्त्ववेत्ते क्वचितसे ॥९७॥
तेज पाहतां देदीप्यमान । त्या अवलोकितां तन्मय मन । हरपोनि जाय भूकतहान । परि विक्षिप्त नसे तो ॥९८॥
सदा सर्वदा मातापिता । दिवानिशीं वाहती चिंता । जननी म्हणे हे विधाता । स्वसंचिता लिहिलें पैं ॥९९॥
अष्टवर्षाचा झाला कुमर । परि मुखें न वदे वर्णोच्चार । पाहून जनक चिंतातुर । व्रतबंध केवीं करावा ॥२००॥
तो म्हणे वंदु जरी वचन । तरी माझें करिती उपनयन । मी वेगळा वर्णाहून । धरी मौन्य वाहे तुज ॥१॥
आचार्य वदती जननीजनकां । प्रपंचीं हा अयोग्य वेडा मुका । हा परमार्थी परम नेटका । करा सुटका पैं याची ॥२॥
तुम्हांस भासे हा अज्ञान । यास न जाणती हे प्राकृत जन । हा करावा मज अर्पण । ते मान्य मानलें समस्तां ॥३॥
जन्मोनि मौन अवलंबिलें । परि आचार्यदर्शनें वेदांत बोले । सुरगुरुहून वक्तृत्व केलें । हेंही ऐकिलें सर्वांनी ॥४॥
मग आचार्य करविती मौंजीबंधन । सवेचि करविलें संन्यासग्रहण । आपणांसवें घेऊन । जाते झाले तेथुनी ॥५॥
अग्रपूजा व्यासाधिकार । स्वयें देती श्रीशंकर । तोचि सांप्रदाय अद्यापवर । पृथ्वीवर असे पैं ॥६॥
आचार्य निघाले तेथून । पुढें देखिलें कासारदुकान । द्वारप्रदेशीं येऊन । नारायण म्हणताती ॥७॥
तंव वद्ले झाले रसकर्ते । कांचकढया असती तेथें । आमुची कुटुंबें नगरातें । असती पैं स्वामिया ॥८॥
जगद्गुरु म्हणती तत्त्वतां । तेच भिक्षा देईं कां आतां । येर ते संकोचोनि चिंता । म्हणती अनुचित निंद्य हें ॥९॥
रसो वै विष्णु म्हणून । भिक्षा द्यावी करुं ग्रहण । तुम्ही सर्वथा अनमान । न करावें ममाज्ञा ॥२१०॥
विग्रह देखोनि तयांनी । सांडसे दर्वी धरोनी । भरोनि आणिला तये क्षणीं । पुढें पाणि वोढविला ॥११॥
नारायण म्हणोनि पान । आचार्य करिती स्वयें आपण । जेवी गंगोदक शीतळ जीवन । तेवी प्राशन पैं केलें ॥१२॥
आश्चर्य पाहून नारीनर । म्हणती हा प्रत्यक्ष श्रीशंकर । समुद्रमंथनीं विष दुर्धर । भक्षिलें पाहा पैं रुद्रें ॥१३॥
मागें असती उभे शिष्य । आचार्य म्हणतां घ्या रे पीयूष । सर्व पळाले चतुर्दिश । देहलोभेंकरुनी ॥१४॥
तंव निकट असती शिष्य चारी । तिही हस्त पसरिले ते अवसरी । ग्रास घालितां वदनांतरी । अमृतापरिस मिष्ट तें ॥१५॥
पाहून त्यांचा निश्चय । परम संतोषले आचार्य । चतुर्दिश मठाधिवर्य । स्थापिते झाले जगद्गुरु ॥१६॥
पूर्वमठ तो जगन्नाथपुरी । दुजा मठ श्रीरामेश्वरीं । तृतीय मठ द्वारकेमाझारीं । बदरिकाश्रम चौथा पैं ॥१७॥
असो दिग्विजय केला समस्त । सत्कीर्ति पृथ्वीवलयांकित । आज्ञाध्वज जयाचा मिरवत । धर्मस्थापक कलियुगी ॥१८॥
जेवीं निःक्षत्री करी रेणुकाकुमर । कीं पराशरें राक्षससत्र । कीं जन्मेजयें सर्पसत्र । केले पूर्वी पैं जैसें ॥१९॥
केले नास्तिकाचें आस्तिक । स्वधर्म स्थापिला आस्तिक । करोनि गोद्विजांचें स्वास्थिक । निगमस्थापक आचार्य ॥२२०॥
उदय होतां चंडकिरण । नक्षत्रें जातीं वितळोन । तेवीं दिगंतरीं पळती जैन । आचार्यभयें ते काळी ॥२१॥
गुर्जरदेशीं नगर पट्टन । तेथें राहिले कांहीं लपोन सदराजसिंह नृपनंदन । राज्याधिकारी पैं तेथें ॥२२॥
विश्वासें देऊन आश्वासन । लक्षावधीचें केलें रक्षण । तें आचार्यातें झाले श्रवण । तंव तेथेंचि पातले ॥२३॥
रायासि जाणवतां मात । श्रीशंकराचार्य पातले येथ । भूप सामोरा जाऊन तेथ । सन्मान सत्कार केला पैं ॥२४॥
तंव आचार्य वदती भविष्योत्तर । राया रक्षीं आपुलें नगर । उदईक उदय होतां उदकें समग्र । बुडोन जाईल निश्चयें ॥२५॥
ऐकोनि राव चिंतातुर । म्हणी काय करावा विचार । कल्पांत वोढवला दुस्तर । सकोप ईश्वर आजि पैं ॥२६॥
विचित्र ईश्वरई मायेचा खेळ । सवेंचि प्राप्त झाला प्रातःकाळ । अकस्मात जलकल्लोळ । प्रवाह तुंबळ फुटला ॥२७॥
परम खळबळिलें समस्त नगर । भयाभीत होती नारीनर । एकचि झाला हाहाःकार महाशब्द माजला ॥२८॥
राव वळंघोनी उपरीवरी । कितेक चढिले माडियागोपुरीं । झाली सजळ समग्र नगरीं । प्रळयकाळ वोढवें ॥२९॥
नास्तिकांचे वृंद सकळ । रायानिकट सर्वकाळ । नृपावेगळें अळुमाळ । कदा न होती पैं तेथें ॥२३०॥
जळसंघाट वेग बहुत । उदक आलें राजालयांत । उपरीवरी लाटा उसळत । महा अनर्थ ते काळी ॥३१॥
नाविक असे नौका बहुत । प्रकट झाल्या अकस्मात । शिवचरित्र परमाद्भुत । ब्रह्मादिकां नेणवे ॥३२॥
सर्वांस झाला परमानंद । ईश्वर अनुकूळ स्वसिध्द । पाहून सुखावले दुर्मद । परि परिणाम गुप्त कळेना ॥३३॥
कीं गोरियाचें गायन । हानि पावती जे विहरण । कीं गळीं आमिष गिळितां मीन । कीं दीपपतंग ज्यापरी ॥३४॥
तंव त्या द्रोणिका देखोन बहुत । संतोष पावले जती समस्त । आरोहण करिते झाले नावेंत । परि पुढील घात नेणती ॥३५॥
देहलोभें ते नास्तिक । लक्षावधि मानोनि सुख । तयां मृत्यु पाचारी देख । परिणाम दुःख टळेना ॥३६॥
जळाच्या लाटा नभीं उसळती । वाटे आकाशातें क्षेम देती । येरयेरां कवळिती । परमाक्रोशेंकरुनी ॥३७॥
तो जळावर्ताचा संघाट । सर्वही लागती मृत्युवाट । नौका होऊनि एकवट । अकस्मात बुडाल्या ॥३८॥
काळें पसरोनी वदन । लक्षावधीचें घेतलें अवदान । जतीमात्र पावले निधन । इतर जन ते वांचले ॥३९॥
कैच्या नौका कैचें जीवन । सर्वही इंद्रजाळ तेवीं स्वप्न । आश्चर्य करिती नगरजन । विचित्र विंदान दाविलें ॥२४०॥
भूप येवोनि बध्दहस्ती । आचार्याची करी स्तुति । म्हणे धन्य धन्य आगाधकीर्ति । जघन्य कीर्ति झाली ॥४१॥
पाहा तया स्थाळाप्रति । लाखोखाड अद्यापि वदती । तेथें नास्तिक बुडाले निश्चितीं । अद्यापी पाहती जन सर्व ॥४२॥
शिवलिंग स्थापून तेथें । आचार्य गेलेअ उत्तरपंथें । स्वधर्म स्थापून बदरिकाश्रमातें । जाते झाले संतोषें ॥४३॥
इकडे गोरक्षदर्शनोद्देश । पारुषनाथ पातले सरिसे । तेणें निवेदिलें रहस्य । श्रावकाचें सर्वही ॥४४॥
म्हणे पाखंडदर्शनीं सेवडा निश्चित । तरी तयाचा केला निःपात । अहिंसक हिंसा नेमस्त । केली निश्चित आचार्य ॥४५॥
सेवडे पाहून दुर्जय । आचर्य पावले परमजय । विशेषज्ञानें ज्ञानवर्य । अधिकार ऐश्वर्य भूलोकी ॥४६॥
यावरी वदती गोरक्ष समर्थ । तुम्ही राहुनि पैं निवांत । अवलोकावें भगवंतचरित्र । जें जें होईल पुढारीं ॥४७॥
गुप्तवेषीं शीघ्र गतीसीं । गोरक्ष पातले वाराणशीसी । विश्वेश्वरा वंदूनि भैरवासी । क्षेमालिंगन वदताती ॥४८॥
आदिअनादि षड्दर्शन । त्यांत सेवडयाचें केलें हनन । तिहीं स्वधर्म सोडिला म्हणून । केलें फळ पावलें ॥४९॥
मुळीं ऋषभदेवाचें शाप वचन । तेणेंचि ते पावले निधन । कांही राहिले याकरण । क्षेत्रपाळा संरक्षी ॥२५०॥
अवश्य म्हणोनि काळभैरव । गोरक्षाचा केला गौराव । गोरक्ष आणि दत्तात्रेय । गोरक्षगुल्मीं पातलें ॥५१॥
श्रीकाळभैरवाचे पुढारीं । गोरक्षटेकडी अद्यापिवरी । यात्रा वंदिती निर्धारी । गोरक्षस्थळ तें अनादि ॥५२॥
असो दिग्विजय करोनि क्षिती । आचार्य पातले काशीप्रति । भैरवें प्रेषिलें देवतेप्रति । ज्ञानपरिक्षार्थ पैं तेथें ॥५३॥
कदाचिच्छकराचार्यः श्रीमत्काशीपुरीं ययौ । तस्य ज्ञानपरीक्षार्थ कश्वैद्देवः समागतः ॥९॥
चांडालरुपिणं दृष्ट्वा गच्छ गच्छेति चाब्रवीत् । एवं ब्रुवन्तमाचार्य स देवः पुनरब्रवीत् ॥१०॥
सहज आचार्य पातले गंगातटीं । तंव संकीर्ण मार्ग परमनिकटीं । तों अकस्मात चांडाल दृष्टीं । सन्मुख येतां देखिला ॥५४॥
कुश्चित कुश्वळ अमंगळ मळिन । कुरुप कृश कृष्णवर्ण । जेवीं श्रियाळगृही पंचवदन । येता झाला ज्यापरी ॥५५॥
दूर समोर त्या देखून । जा जा म्हणती तिरस्कारोन । तव छाया तव भाषण । विलोकश्रवण न करावें ॥५६॥
अन्नमयादन्नमयमथवा चैतन्यमेव चैतन्यात् । यतिवर दूरीकर्तुं वांछसि किं ब्रूहि गच्छ गच्छेति ॥११॥
हा देह अन्नमय कोशमय मनोमय । या पंचकोशांचा विग्रह । जें जगद्व्यापक चैतन्य होय । तरी धिक्कार करिसी कोणाचा ॥५७॥
दूरी म्हणसी जरी देहातें । तरी भेद काय उभयतनूंचें । जरी दूरी करिसी चैतन्यातें । तरी ते व्याप्त सबाह्य ॥५८॥
सर्व खल्विदं ब्रह्म । हा श्रुतिमुखें निश्चय नेम । श्रेष्ठा आचार्य वाहसी भेदभ्रम । केवीं वर्म नेणसी ॥५९॥
किं गंगाबु निबिंबितेंऽबरमणौ चांडालवाटीपयः । पूरेवांतरमस्ति कांचनघटी मृत्कुंभयोर्वांबरे ॥
प्रत्यग्वस्तुनिरंगसहजानंदावबोधांबुधौ । विप्रोऽयं श्वपचो यमित्यपि महान्कोऽयं विभेदभ्रमः ॥१२॥
कीं गंगांबु बिंबला अंबरमणि । तोचि श्वपचवाटिकाजीवनीं । तेवीं आम्हां आब्रह्मभुवनीं । तरी भेद मानिसी किमर्थ ॥२६०॥
कीं कनककलशी गंगा वंद्य । आणि मृण्मयांत परम निंद्य । वस्तुतां आकाश स्वसिध्द । अभेदपण ज्यापरी ॥६१॥
महान् श्रेष्ठ तूं म्हणविसी । तरी भेदभ्रम कां तुजपासीं । हा चांडाळ हा द्विज ऐसी । ही द्वैतबुध्दि केवीं पां ॥६२॥
तुज ब्राह्मणाचा अभिमान । तरी मी करितों तूंतें प्रश्न । अष्टौविकल्पीं समाधान । करी माझे सुजाणा ॥६३॥
प्रथम मुख्य चार वर्ण । त्यांत श्रेष्ठत्व ब्राह्मण । ज्ञान कीं जीव की देह कीं वर्ण । धर्मज्ञान कीं पांडित्य ॥६४॥
जीव ब्राह्मण म्हणती जरी । तरी जीवसृष्टीच हे निर्धारी । चांडाळादि देहधारी । ब्राह्मण कैसेनि ते होती ॥६५॥
देह ब्राह्मण म्हणतां जाण । तरी नैश्वर्य पावे निधन । तया देहा करिसी दहन । तेथें संशय येतसे ॥६६॥
वर्ण ब्राह्मण जरी नर्दोष । तरी वर्ण असती अष्टादश । श्वेत रक्त पीत कृष्ण भास । तेव वर्ण केवीं ब्राह्मण ॥६७॥
मूळ मुख्य चार वर्ण । स्वच्छ श्वेत तो ब्राह्मण । रक्त तो बाहुक जाण । पीत वैश्य शूद्र कृष्ण ॥६८॥
अनेक वर्ण बहु असती । तरी रंगें ब्राह्मण कदा न होती । जरी म्हणसी ब्राह्मणयाति । तरी नीचयोनींत संभवे ॥६९॥
महर्षि ऋषि करीं श्रवण । मातंग शृंगी कौशिक जाण । वसिष्ठ विश्वामित्र बादरायण । कुशस्थ गौतम श्रेष्ठ जो ॥२७०॥
धीवरीपासाव झालें जनन । तोचि स्वयें व्यास भगवान । हरिणीगर्भशुक्तिकेंतून । ऋष्य़शृंग जन्मला ॥७१॥
उर्वशीचे गर्भजठरीं । उद्भवे वसिष्ठ निर्धारी । उत्पन्न कलशीं गर्भवोवरीं । अगस्ति ऋषि जन्मले ॥७२॥
मातंगीचे गर्भपुटांत । मातंगऋषि परमविख्यात । तरी ब्राह्मण निश्चित । नव्हे निश्चय जाण पां ॥७३॥
जन्मतांचि तो शूद्र । संस्कारें तो द्विजवर । वेदाभ्यासी तोचि विप्र । ब्रह्म जाणे तो ब्राह्मण ॥७४॥
आचार्य उवाचः जाग्रत्स्वप्नसुषुप्तिषु स्फुटतरा या संविदुजृंभते । या ब्रह्मादिपिपीलिकांततनुषु प्रोता जगत्साक्षिणी ॥
सैवाहं न च वश्यवस्त्विति दृढ प्रज्ञापि यस्यास्यि चेत् । चांडालोऽस्तु स तु द्विजोऽस्तु गुरुरित्येषा मनीषा मम ॥१३॥
जो जागृति स्वप्न सुषुप्ति साक्षिणी । ते स्फुटतरा प्रणवरुपिणी । ते ब्रह्मादिपिपीलिका व्यापुनी । चिद्रपिणी चिच्छक्ति ॥७५॥
ते ज्ञप्तिमात्रीं जो निमग्न । शुध्द हो अथवा ब्राह्मण । तयाचे नमस्कारीन चरण । वारंवार मस्तकीं ॥७६॥
दृश्यादृश्य मी कोण । हेंही जया नसे स्मरण । ही दृढप्रज्ञा सम्यक् ज्ञान । त्यासी शरण अनन्य मी ॥७७॥
जो द्विज असो की चांडाळ । गुरुरुपचि केवळ । तयाचे पदीं निश्वळ अढळ । बुध्दि अचळ हे माझी ॥७८॥
ब्रह्मैवाहमिंद जगच्च सस्तारितम् कलं चिन्मात्रवि। सर्व चैतदविद्यया त्रिगुणया शेषं मया कल्पितम् ॥
इत्थं यस्य दृढा मतिः सुखतरे नित्ये परे निर्मले । चांडालोऽस्तु स तु द्विजोऽस्तु गुरुरित्येषा मनीषा मम ॥१४॥
जो ब्रह्मानंदीं झाला लीन । तया कैचें दृश्य भान । जनीं विजनीं पाहे समान । त्रिगुणरहित होय जो ॥७९॥
जो आत्मत्व पाहे जगतीं । तयाची असो कांहीं न जाति । तेथें माझी निश्वळमति । तो गुरुमूर्ती वंदितों ॥२८०॥
जें निरंतर ब्रह्म प्रकाशघन । जें अद्वैतस्वरुप संपूर्ण । ऐसें जयाचें शांत मन । तयासी नमन सद्भावें ॥८१॥
शश्वन्नश्वरमेव दृश्यमखिलं निश्चित्य वाचा गुरोः नित्यं ब्रह्म निरंतरं विमृशता निर्व्याजशांतात्मना ॥
भूतं भावी च दुष्कृतं प्रदहाअ संचिन्मये पावके । प्रारब्धाय निवेदितं स्ववपुरित्येषा मनीषा मम ॥१५॥
जो अनित्यातें नित्य पाहे । गुरुवचनानुभवप्रत्यय । त्याचा उर्वरी जो हविर्दैह । अर्पिता होय प्रारब्धा ॥८२॥
भूतभावी जें दुष्कृत । जो ज्ञानानळें दग्ध करीत । अखंडस्थ समाधिस्थ । तया प्रणिपात पैं माझा ॥८३॥
हें जग चिन्मात्र विस्तारित । स्वयं ब्रह्माचि जो भावित । जो त्रिगुण अविद्यारहित । ब्रह्मैव पाहे समदृष्टीं ॥८४॥
जयाचा श्रीगुरुवचनीं निर्धार । दृश्य पाहे हें क्षणभंगुर । ऐसें निश्वय दृढांतर । तो सद्गुरु त्या नमूं ॥८५॥
या तिर्यड्.नरदेवताभिरहमित्यंतःस्फुटा दृश्यते । यद्भासा ह्रदयाक्षदेहविषया भांति स्वतोचेतनाः ॥
तां भास्यैः पिहितार्कमंडलनिभां स्फूर्ति सदा भावयन् योगी निर्वृतमानसो हि गुरुरित्येषा मनीषा मम ॥१६॥
तिर्यक् देहादि नरदेव । दृश्य तें नैश्वर्य सर्व । भासाभास मानी निश्वय । तो गुरुवर्य वंदिला ॥८६॥
जे आत्मिकप्रभा स्वतःसिध्द । तया बुंथी देहविषयादि जलद । तें स्फुरत सदा स्वसंवेद्य । या उपाधि भेद नसेचि ॥८७॥
तया स्वस्वरुपीं योगीजन । मनोन्मनी संलग्न निमग्न । ते समरसीं झाले सलीन । तयांसी नमन सद्भावें ॥८८॥
यत्सौख्यांबुधिलेशलेशित इमे शक्रादयो निर्वृताः । यच्चित्ते नितरां प्रबोधकलने लब्ध्वा मुनिर्निर्वृतः ॥
तस्मिन्नित्यसुखांबुधौ गलितधी ब्रह्मैव न ब्रह्मावित् । यः कश्वित्ससुरेंद्रवंदितपदो नूनं मनीषा मम ॥१७॥
ज्या सुखाब्धीचा लेशलेश । शक्रादि होती निर्जराधीश । जे त्या सौख्यसिंधुसमरस । त्या वंदिती इंद्रादि ॥८९॥
जया सच्चित्सुख निरंतर । प्रशांत जयाचें अंतर । तो द्विज हो कां इतर । जो निर्वृत वंद्य त्रिलोकीं ॥२९०॥
जो चित्सुखाचा उदधि । तेथें विषयतरंग कैची उपाधि । ऐसी जयाची दृढबुध्दि । तो ब्रह्मानंदीं निमग्न नांदत ॥९१॥
ऐसे चिन्हीं जो मंडित । त्यासी साष्टांग प्रणिपात । तो द्विज कां अंत्यज होत । तो जीवन्मुक्त वंद्य पैं ॥९२॥
हो कां श्वपच अथवा श्रेष्ठ वर्ण । तयासि माझें शिरसा नमन । तो गुरुरुपचि त्रिवार वचन । मी अनन्य शरण त्या ॥९३॥
यापरी झाला अनुवाद । आचार्य झाले परमसद्गद । रोमांचस्फुरण गात्रीं विशद । बध्दहस्तें वंदिती ॥९४॥
परम विस्मय चित्तीं । विचार करितां नये व्यक्ती । कोणी अंशधारी निश्चितीं । मज प्रतीति बाणली ॥९५॥
तों निमिष न लगतांचि जाण । देवता पावली अंतर्धान । आचार्य आश्चर्य होऊन । चकित होऊनि राहिले ॥९६॥
विचारुन पाहतां अंतःकरणीं । ही तो काळभैरवाची करणी । मग तत्काळ बध्दपाणि । क्षेत्राधीशा नमीतसे ॥९७॥
देवराजसेव्यमानपावनाध्रिपंकजम् । व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखरं कृपाकरम् ॥
नारदादियोगिवृंदवंदितं दिगंबरम् । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥१८॥
यापरी आचार्य स्तोत्र स्तवित । श्रीभैरवासी करोनि प्रणिपात । जो हें अष्टक उच्चारित । सिध्दि तिष्ठत अष्टही ॥९८॥
मग तेथूनि करिती शीघ्र गमन । घेऊं जाती पार्वतीदर्शन । तंव तें रिक्त सिंहासन । अन्नपूर्णा अदृश्य पैं ॥९९॥
सवेंचि ध्यानस्थ मानसगतीं । जाते झाले कैलासाप्रति । तेथें वंदिला श्रीपशुपति । परि देवी दृष्टीसी दिसेना ॥३००॥
तंव कर्पूरगौर गौरीवर । वदे नीलग्रीव गंगाधर । तुवां वाममार्ग उच्छेदिला समग्र । यास्तव रुष्ट मृडानी ॥१॥
तुवां जाऊन अंतःपुरीं । भवानी प्रार्थिसी जरी । मग सुप्रसन्न होऊन अंतरीं । वर देईल इच्छित ॥२॥
ऐसें वदतां मदन दहन । आचार्य निघाले तेथून । जातां निगूढ द्वारांतून । तंव शक्ति हरण झाल्या ॥३॥
सवेंचि शक्तिआर्कषण । शरीर ग्लान आनन म्लान । उभय डोळां उरला प्राण । कांहीं त्राण असेना ॥४॥
गिरिजा वदे ते अवसरीं । कां न येववे येथवरी । आचार्य म्हणे मम गात्रीं । मी शक्तिहीन अशक्त ॥५॥
पुनरोत्तरीं हिमनगबाळी । त्वां शाक्क्तमार्ग उच्छेदिला सकळीं । अद्यापि शक्ति इच्छिसी ये काळीं । किमर्थ हा यतिवरा ॥६॥
हा बौध्द अवतार असतां कलींत । तुवां उच्छेदिलें बौध्दमत । जे मदुपासक निःसीम शाक्त । निर्भर्त्सिलें त्वां तयांतें ॥७॥
आचार्य पाहून गताभिमान । भवानी होऊन सुप्रसन्न । म्हणे तेरावी पायरी येथून । तेथील श्लोक अवलोकीं ॥८॥
भवानीस करोनि नमन । आचार्य निघाले तेथून । श्लोक वाची अंतःकरण । समाधान पावला ॥९॥
तोचि श्लोक पाहून प्रमाण । श्रोतीं करावें एकाग्र श्रवण । हें मूळपीठ पूजेस कारण । मंत्रराज श्रेष्ठ हा ॥३१०॥
श्रीनाथादिगुरुत्रयं गण्सपतिं पीठत्रयं भैरवम् । सिध्दौघं बटुकत्रयं पदयुगं द्यूतीक्रमं मंडलम् ॥
वीरेचाष्टचतुष्टषष्ठनवकं वीरावलीपंचकम् । श्रीमन्मालिनिमंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलम् ॥१९॥
हा श्लोकार्थ करितां विस्तार । ग्रंथीं होईल बहु प्रसर । यास्तव वदलों ध्वनितोत्तर । श्रोते चतुर जाणती ॥११॥
असो आचार्य करिती मानसपूजन । परमभक्तीं शक्तिआराधन । स्तोत्रमंत्रस्तुति स्तवन । अंबिकेतें प्रार्थिलें ॥१२॥
यापरीस पूजिली गौरी । मग वदते झाले आनंदलहरी । श्रीचक्रादि अनेक स्तोत्रीं । जगन्माता तोषली ॥१३॥
आचार्य येतां स्वदेहाप्रति । अन्नपूर्णेतें विलोकिती । मग सुप्रसन्न देखिली चिच्छक्ति । पार्वती प्रणवरुपिणी ॥१४॥
आदिनाथलीलासुधासागर । अनेक इतिहासतरंग नागर । निर्जर श्रोतयां सुखागार । हेलावला आर्तातें ॥१५॥
आदिनाथलीलाग्रंथ नृपवर । नानाख्यानें महावीरशूर । प्रातापधनुर्वाड झुंझार । कामक्रोधा निर्दाळिती ॥१६॥
हा केवळ अविमुक्ति । येथें मुक्ति चारी तिष्ठती । परि मुख्य असावी दृढभक्ति । तिणें प्राप्ति सर्वही ॥१७॥
आदिनाथलीलाग्रंथचंद्र । सत्तावीस आध्यें हें नक्षत्र । रेवतीरमणानुज अहोरात्र । वास करी ग्रंथीं हे ॥१८॥
आदिनाथग्रंथ सुंदर । सत्तावीस खणांचें दामोदर । मोक्षश्री श्रोतयां परमोदार । सदा सादर संतुष्ट ॥१९॥
श्रीमतआतिनाथलीलाग्रंथ । वरदोदित भैरव समर्थ । तत्प्रसादें आदिनाथ । सत्ताविसावा वंदिला ॥३२०॥
N/A
References : N/A
Last Updated : February 07, 2020
TOP